सर्बियाचे पंतप्रधान भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाची अट शिथील करण्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घेणार 

0

सर्बिया व भारत या दोन्ही देशांतील नागरिकांचे परस्पर देशांत पर्यटन वाढीस लागावे, यासाठी सर्बियाचे सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय सर्बियामध्ये पर्यटन करता यावे, यासाठी येत्या दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी आज ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या बैठकीत दिले.


सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी आज कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्या (सीआयआय) सदस्यांसोबत हॉटेल ताज महल पॅलेस येथे संवाद साधला. यावेळी सीआयआयच्या पश्चिम भागाचे चेअरमन सुधीर मेहता, उपाध्यक्ष निनाद करपे, इंडियन हॉटेल इंडस्ट्रीजचे फरहत जमाल, एसओसीटी ट्रॅव्हलचे विशाल सुरी, मास्टेकचे अशांक देसाई, केमोट्रॉल इंडस्ट्रिलचे के. नंदकुमार, रिलायन्स ग्रुपचे जुरजेन हासे, सर्बियाच्या भारतातील राजदूत नरिंदर चौहान, सीआयआयच्या जान कारकाडा आदी यावेळी उपस्थित होते.


यावेळी  वुसिक यांनी सर्बिया शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. भारतीय नागरिक कष्टाळू व प्रामाणिक असतात. त्यांच्याबद्दल सर्बियन नागरिकांना आदर असून भारतीयांनी आमच्या देशात यावे व पर्यटनाचा आनंद घ्यावा. तसेच तेथे येऊन गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  वुसिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विविध निर्णयांचे कौतुकही केले.

मेहता म्हणाले की, सीआयआय ही संघटना भारतातील सर्वच उद्योगांचे प्रतिनिधीत्व करते. देशात सध्या मोठ्या प्रमाणात उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया सारखे उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे उद्योग वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सर्बिया व भारतामध्ये व्यापार, माहिती तंत्रज्ञान, निर्मिती, कृषी आदी क्षेत्रात एकमेकांमध्ये सहकार्याची मोठी संधी आहे.