कॅन्सर पिडीतांसाठी मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये गिटार वाजवतात 'सौरभ निंबकर'

0

काही लोक असे असतात जे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संतुष्ट होतात, तसेच त्रस्त लोकांच्या जीवनात हास्याची हळुवार फुंकर घालण्यात त्यांना समाधान मिळते. नक्कीच हे काम कठीण आहे पण इथे सगळं काही शक्य आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे सौरभ निंबकर. मुंबईत डोंबिवली मध्ये राहणारे सौरभ निंबकर नेहमी आपल्या गिटार सोबत अंबरनाथ ते दादर मध्ये चालणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये दिसतात. सौरभ लोकांना त्यांचे आवडीचे गाणे ऐकवतात व त्याच्या बदल्यात प्रवासी त्यांना पैसे देऊ करतात, मिळालेले पैसे ते गरीब कॅन्सर पीडित व त्यांच्या परिवाराला मदतीच्या रुपात देतात.


बालपणापासून मनोरंजनाची आवड

२३ वर्षीय सौरभ सांगतात की, ‘मला लहानपणापासूनच लोकांचे मनोरंजन करायला आवडायचे. कॉलेजच्या दिवसात मी आणि माझे मित्र लोकल ट्रेनमध्ये गिटार वाजवून गाणे म्हणत जायचो. बऱ्याच वेळा इतर लोक पण आम्हाला साथ द्यायचे.’ सौरभ यांनी बायोटेक मधून पदवी घेतली आणि बायो अॅनॅलीटीक सायन्स मधून पदवित्त्युर शिक्षण घेतले व सध्या एका फार्मा कंपनी इन्हेंटीया हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीच्या या नाजूक वळणावर सुद्धा सौरभ अनेक महिन्यांपासून सलग आठवड्यातले तीन दिवस लोकल ट्रेनच्या गर्दीत गाणे गात आहेत.

कॉलेजच्या दिवसात सौरभने गिटारच्या नोट्स शिकल्या तसेच संगीताच्या प्रेमापोटी त्यांची भेट एका गुरूंशी झाली. त्यांच्या आवाजात विशेष जादू नसल्यामुळे त्यांना स्टेजवर गाण्याची संधी कधी मिळाली नाही. सन २०१३ मध्ये सौरभ यांच्या आईला कॅन्सरमुळे किंग एडवर्ड मेमोरियल दवाखान्यात दाखल करावे लागले. सौरभ सांगतात की, ‘माझी आई जेव्हा दवाखान्यात होती तेव्हा मी तिथे गिटार घेऊन गेलो. गिटार वाजवताच रुग्णांच्या नातेवाईकांना एक प्रकारची मनशांती मिळाली. याच मानसिक समाधानाने पुढे जाऊन लोकांसाठी गिटार वाजवण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर नित्य तेथे जाऊन मी लोकांसाठी गिटार वाजवू लागलो. या कामामुळे आईच्यापण चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसला.

नवे वळण

दवाखान्यात दाखल केल्यानंतर एका वर्षातच सौरभच्या आईचे देहांत झाले व त्यांनी दवाखान्यात जाणे सोडले पण याच दरम्यान ते कॅन्सरच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासापासून चांगले परिचित होते.

सौरभ सांगतात की, ‘आपला समाज सगळीकडे गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करीत आला आहे. पण दुर्भाग्य असे की कॅन्सर रुग्णांच्या उपचाराच्या बिलात कोणतीही सवलत मिळत नाही ज्याची इथे नितांत गरज आहे. रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा मोठा खर्च यामुळे गरीब लोकांचे जीवन नरकासमान होते. परंतु अनेक कॅन्सर संस्था रुग्णांच्या उपचाराचा खर्च उचलत असतात पण कुटुंबातील इतर गरजा त्यांना हतबल करतात. कॅन्सरच्या रुग्णांना जवळजवळ ३-४ लाख रुपये खर्च येतो पण कुटुंबातील सदस्यांबरोबर राहून हा खर्च २-३ लाख रुपये अजून वाढतो. अशा वेळेस प्रश्न असा असतो की अशा कुटुंबाची मदत कोण करणार?’

चांगले कपडे आणि गिटारच्या साथीने भिकारी

सौरभ सांगतात की मी निश्चय केला होता की मला तेच काम करावयाचे आहे जे मी माझ्या कॉलेजच्या दिवसात करत होतो, लोकल ट्रेन मध्ये लोकांचे मनोरंजन करण्याचे. यावेळेस मला लोकांकडून दान घ्यायचे नव्हते. मला माहित होते की मला मदत करायची आहे पण माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे होते. लोक माझ्यावर विश्वास ठेवतील का? मी माझ्या खरेपणाची ओळख कशी पटवून देणार? या सगळ्या समस्यांचा अंदाज घेऊन सौरभ यांनी एक स्वयंसेवी संस्थेशी जोडण्याचा निर्णय घेतला व या एनजीओ च्या नावाने सौरभ लोकल ट्रेनमध्ये लोकांचे मनोरंजन सुरु केले.

हळूहळू सौरभच्या या प्रयत्नांना इतर लोकांनी सोबत केली. काही प्रवासी त्यांच्याजवळ आपल्या आवडीच्या गाण्यांची फर्माईश करू लागले पण काही जण त्यांची उपेक्षा पण करीत होते. सौरभ सांगतात की अनेक लोकांसाठी मी चांगले कपडे आणि गिटारच्या साथीने एक भिकारी आहे पण बऱ्याच जणांचा मी आवडीचा आहे. अनेकवेळा एखादा प्रवासी माझ्या गाण्याला बंद करण्यास सांगतो तर दुसरा प्रवासी त्याला असे करण्यापासून थांबवून मला प्रोत्साहित करतो.

सौरभ सांगतात की चांगल्या दिवशी मला ८०० ते १००० रुपयांपर्यंत दान मिळते. लोक मला १० ते ५०० रुपयांपर्यंत दान देतात. या पैशांनी कॅन्सरपीडितांच्या कुटुंबाला आर्थिक रुपात मदत केली जाते. सौरभ सांगतात की ते जास्त गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये चढत नाही कारण त्यांना गिटार वाजवण्यासाठी जागेची गरज असते. याशिवाय रिकाम्या ट्रेनमध्ये पण ते प्रवास करत नाही कारण तेथे त्यांना दान देणारे लोक कमी भेटतात.

एकमेकांसाह्य करू –

सौरभ सांगतात की प्रत्येकाजवळ एखादीतरी कला असते. जरी मला संगीताबद्दल ज्ञान कमी असले तरी त्याच्या प्रयोगाने मला एक ओळख मिळाली आहे. कल्पना करा जर अशा अनेक कला-गुणांनी आपण काम केले तर ती परिवर्तनाची नांदी ठरेल हे बरोबर नाही का? जर हे जमत नसेल तर मला वाटते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वेतनामधला काही हिस्सा आपल्या भागातील अशा एखाद्या संस्थेला दिला पाहिजे जे समाजासाठी काहीतरी चांगले करीत आहे. याचा अवलंबन करणे कठीण आहे पण असंभव नाही. सौरभ यांच्या या कामाने लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे नवीन प्रस्ताव पण देत आहेत. काही जणांचे असे मत आहे की त्यांनी पैसा जमवण्यासाठी एक बँड सुरु करायला हवा. पण मी लोकांना एका व्यक्तीच्या शक्तीचा आभास करून देऊ इच्छितो. माझ्या कामाने प्रेरित होऊन लोक स्वतः विचार करू लागले आहेत की आपण सुद्धा हे शिवधनुष्य उचलायला हवे.

लेखक : अनमोल

अनुवाद : किरण ठाकरे