‘दुसऱ्याला सुख-समाधान दिल्याचा आनंद काही औरच असतो’ - अच्युत सामंत

आदिवासींना शिक्षणाचे महत्व पटवून देणे आणि त्यांना किमान शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांच्यातील गरिबी, मागासलेपण, दारिद्र्य कायमसाठी दूर करण्याचे धाडसी काम करताहेत अच्युत सामंत... शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती घडवणारे अच्युत सामंत जगाला शिकवत आहे ‘देण्याची कला’... त्यांनी अनुभवलेल्या उपासमारीमुळे त्यांनी गरजूंना मदत करण्याचे ठरवले... लहानपणी कितीतरी दिवस मूठभर धान्यदेखील त्यांच्या नजरेला पडत नसे... त्यांची आई फक्त एकच साडी होती, तरी सुद्धा रात्रंदिवस काम करून तिने आपल्या सात मुलांचे पालनपोषण केले...आईला हातभार म्हणून अच्युत यांनी वयाच्या सातव्या वर्षापासूनच छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. आणि कामं करता करताच सुरु केली ‘समाजसेवा’.... आठ किलोमीटर दूर अनवाणी पायाने शाळेत जात होते अच्युत....महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली... पदव्युत्तर शिक्षणानंतर प्राध्यापक म्हणून नोकरी केली...एका क्रांतिकारी विचाराने त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे जनक बनवले...

‘दुसऱ्याला सुख-समाधान दिल्याचा आनंद काही औरच असतो’ - अच्युत सामंत

Wednesday September 14, 2016,

15 min Read

• ओरिसाचे अच्युतानंद सामंत देशाचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, सामाजिक उद्यमी आणि समाजसेवक आहे. त्यांनी देशात एका नवीन शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. त्यांनी जे काम केले ते अद्याप कोणत्याही सरकारी, निमसरकारी संस्था करू शकलेल्या नाही. अच्युत यांनी स्थापन केलेल्या कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेजमध्ये पंचवीस हजार आदिवासी मुलांना निःशुल्क शिक्षण दिले जात आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पंचवीस हजार मुलांची राहण्याची, खाण्या-पिण्याची सोयही कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज या संस्थेत करण्यात आली आहे. भारताच्या प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अवलंब करत इथल्या आदिवासी मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देखील या संस्थेत दिले जातात. या संस्थेतील मुलं अशा घरातून आलेले आहे ज्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नव्हते. अनेक मुलं अशी आहे ज्यांच्या घरात कोणीही शिक्षण घेतलेले नाही. अनेक मुलांचे पालक नक्षलवादी आहेत. म्हणजेच एकाच छाताखाली अनेक गरीब मुलांचे भवितव्य घडवण्याचे काम ही संस्था करते आहे. सर्वात जास्त संख्येने आदिवासी मुलांना शिक्षण देणारी ही जगातली सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेमुळे अच्युत सामंत यांची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. आदिवासी मुलांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरु करणे अच्युत सामंत यांच्यासाठी फार सोपे काम नव्हते. त्यांच्या बालपणी त्यांनी अठराविश्व दारिद्र्य अनुभवले आहे. अनेकदा त्यांना उपाशी देखील राहावे लागायचे. चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. विधवा आईला हातभार लावण्यासाठी अच्युत यांनी छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. गरिबी त्यांनी जवळून अनुभवली होती. लहानपणीच त्यांना जाणीव झाली की शिक्षणानेच गरीब दूर करता येईल. स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गरीब मुलांना शिक्षित करायचे महाआंदोलन सुरु केले. त्यांनी सुरु कलेल्या आंदोलनाला यशही मिळाले. कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज आज जगासमोर एक असे उदाहरण आहे की प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास मोठे स्वप्न निश्चितच साकार होतात.

image


अच्युत यांना कोणतेही गुरु, मार्गदर्शक किवा गॉड-फादर लाभले नाही. मात्र लोकांना मदत करण्याचे ध्येय समोर ठेवून त्यांनी एका मागोमाग एक शिक्षण संस्था उभारल्या. पुढे याच संस्थेला विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले. आपल्या याच शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी घोडदौड केली. त्यांच्या या कार्यामुळे ओरिसा राज्याला जगाच्या नकाशावर आपली विशेष ओळख प्राप्त झाली आहे. गरिबी आणि मागास समजले जाणारे ओरिसा राज्य अच्युत यांच्या शैक्षणिक संस्थांमुळे नावारूपाला आले आहे.

image


अच्युत यांच्या या यशोगाथेमध्ये अनेक प्रेरणादायी प्रसंग आहे. त्यांच्या कहाणीची सुरुवात ओरिसाच्या कलारबंका या अतिदुर्गम, मागासलेल्या गावातून होते. जिथे अच्युत सामंत यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म २० जानेवारी १९६५ मध्ये कटक जिल्ह्यातील कलारबंका गावामध्ये झाला. त्यांचे वडील अनादिचरण सामंत जमशेदपुर मध्ये टाटा कंपनीत कामाला होते. आई नीलिमाराणी गृहिणी होत्या. अनादिचरण आणि निलीमाराणी यांची एकूण सात अपत्य होती. अच्युत हे सहावे अपत्य होते. अच्युत यांचे दोन मोठे भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी होत्या. त्यांची एक लहान बहीणही आहे. जिचे नाव इति आहे.

image


अच्युत जेव्हा चार वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे रेल्वे अपघातात निधन झाले. अनादिचरण जेव्हा जमशेदपुरवरून आपल्या गावी परतत होते त्याच वेळी रेल्वे अपघात झाला. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. घरातला कर्ता पुरुष काळाने हिरावला. त्यांच्या आईच्या दुखाला पारावार राहिला नाही. सात मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. पतीच्या निधनानंतर नीलमराणी यांना आपल्या सात मुलांसमवेत जमशेदपुरवरून पुन्हा आपल्या गावी कलारबंका येथे परतावे लागले. त्यांच्या पतीने कोणतीही जमापुंजी मागे ठेवली नव्हती. त्यामुळे नीलमराणी यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. जे लोक अच्युत यांच्या वडिलांना ओळखायचे ते अच्युत यांना सांगतात की त्यांचे वडील खूप दयाळू होते. जे कोणी त्यांना मदत मागायचे त्यांना ते मदत करत असत. गावातील गरीब आणि गरजूंना मदत करणे त्यांना आवडायचे. गावात फारच गरिबी होती. त्या तुलनेत अनादिचरण नोकरी करायचे म्हणून त्यांची परिस्थिती चांगली होती. मात्र गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते गेल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी काहीच शिल्लक राहिले नाही.

image


अच्युत यांची आई नीलिमा राणी या एका संपन्न आणि संस्कारी कुटुंबातल्या होत्या. त्या अत्यंत स्वाभिमानी होत्या. पतीच्या मृत्त्युनंतर त्यांनी कोणालाही मदत नाही मागितली. स्वत: मेहनत, मजूरी करून आपल्या मुलांचे पालन पोषण त्यांनी केले. परंतू सात मुलांचे खाणे पिणे रहाणे शिक्षण ही काही सोपी गोष्ट नव्हती. मुलांचा सांभाळ करण्यासाठी निलीमा राणी यांना लोकांच्या घरी घरकाम करावे लागे. आपल्या झोपडीवजा घरासमोर त्यांनीभाज्या उगवल्या आणि विकल्या. त्याकाळी तांदूळाच्या मिल नव्हत्या त्यामुळे धान्य सडून त्याचा कोंडा काढायचे काम मजूरच करत असत. अच्यूत यांच्या आईने गावातून हे काम मिळवले आणि लोकांचे तांदूळ सडून दिले. खूप अंगमेहनत असलेल्या या कामात लहानगे अच्यूत आपल्या आईला मदत करत असत. इतके सारे करूनही अनेकदा मुलांना उपाशीच झोपावे लागत असे. अथक श्रम करुनही माऊली मुलांचे पोट भरू शकत नसे. अनेकदा अच्यूत आणि त्यांच्या भावंडाना दोन-तीन दिवस उपवास घडे. जेंव्हा कधी कमाई होत असे आणि घरात भाजीभात शिजत असे आई आधी आपल्या मुलांना खायला घालत असे. सात मुलांना खायला घालून जर काही शिल्लक राहिले तर आई खात असे.

image


कारण दररोज सगळ्या मुलांना खायला घालणे शक्य नसल्याने आईने वेगळा नियम तयार केला. घरात जेवण बनले तर आधी मोठ्या मुलांना ते मिळत असे, जो सर्वात मोठा असे त्याला आधी आणि लहान असेल त्यांला नंतर जेवण मिळत असे. अनेकदा असे होई की जेवण तिस-या चौथ्या क्रमांकालाच संपत असे आणि सहावा क्रमांक असलेल्या अच्यूत यांना उपाशीच रहावे लागे. हा नियम करण्याचे कारण होते की, आईला वाटे जे मोठे आहेत ते खाऊन पिऊन लवकर मोठे होतील आणि घरच्या खर्चात हातभार लावतील. आईला वाटे की लहानग्यांचा संभाळही मग मोठे करतील. त्यामुळे लहान भावडांना नेहमी ही अपेक्षा असे की मोठे त्यांच्याकरीता काहीतरी सोडतील. लहानांना अनेकदा जेवण मिळत असे आणि नाही देखील.

image


हाच नियम तोडल्याने एकदा आईने अच्यूत यांना खूप रागावले होते आणि लाकडाने झोडले होते. आईच्या माराने अच्यूत यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. झाले असे की, अच्यूत यांना भूक लागली होती, आणि त्यांच्या कडून राहवले जात नव्हते, सहन न झाल्याने अच्यूत यांनी मोठ्या भावासाठी ठेवलेले जेवण खाण्यास सुरुवात केली. आईने हे जेंव्हा पाहिले तेंव्हा तीला क्रोध अनावर झाला. त्या भरात तीने हाती आलेल्या लाकडाने अच्यूतला मारले. मारल्यानंतर रागाने आई निघून गेली तिने मार लागल्याने काय इजा झाली हे पाहिलेही नाही, त्यामाराने अच्यूतच्या डोळ्याला जखम झाली रक्त आले. लहान बहिणीने हे पाहिले आणि आईला बोलावले. ते पाहून मग आई घाबरली. तिला खूप दु:ख झाले, तिने अच्यूत यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. अच्यूत स्वत:ला भाग्यवान मानतात कारण त्यादिवशी डोळा बचावला होता. त्यांना भिती होती की त्यांचे डोळे गेले असते.

image


गरिबीने अच्यूत यांच्या कुटूंबाला अनेक दिवस जखडून ठेवले होते. त्यामुळे आई आणि सात मुले यांनी अपार मेहनत केली. अनेक दु:ख भोगली. उपाशी राहून अनेक दिवस घालविले. खुप मेहनत केली घाम गाळला. एक एक पैसा मिळवण्यासाठी रात्र जागविली. तरीही गरीबीने पाठ सोडली नाही. अच्यूत यांनी मर्मस्पर्शी मुलाखती दरम्यान सांगितले की, “ गरीबी इतकी भीषण होती की मी शब्दात वर्णन करु शकत नाही. दोनच गोष्टी सांगतो म्हणजे समजेल गरिबी काय होती.- आम्ही इतके गरीब होतो की आठ जणांना दोन दिवसांनी एकदा जेवण मिळत असे. आईची एकच साडी होती.” अच्यूत म्हणाले की, “ लहानपण लहानपणच असते, प्रत्येक मुलाचे ते एक स्वप्न असते. सर्वांनी शिकावे खेळावे इतर मुलांसारखे रहावे असे वाटे. काहींच्या वाट्याला ते नसते तसाच मी होतो.”

गरिबीमुळे अच्यूत यांना आईने शाळेतही घातले नाही. अच्यूत यांचा शाळा प्रवेश ही देखील रोचक घटना होती. ही देखील लक्षणीय बाब आहे की त्यांचे नाव अच्यूत हे देखील शाळेत ठेवण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनीच हे नामकरण केले. शाळेत जाण्याआधी त्यांना सारे सुकूटा या नावाने संबोधित करायचे. त्यांचे वडील सहाव्या आणि सातव्या अपत्याचे नामकरण करण्यापूर्वीच मयत झाले होते.

image


अच्यूत लहानपणी आपल्या गावातील त्या गरीब मुलांमध्ये खेळत जी शाळेत जात नसत. एक दिवस खेळता खेळता ही मुले सरकारी शाळेच्या परिसरात पोहोचली. मुलांच्या लक्षात आले की ती शाळेच्या परिसरात आली आहेत आणि गोंधळ घातला तर गुरूजी ओरडतील. त्यामुळे घाबरून इतर सारी मुले पळून गेली. अच्यूत तेथेच राहिले. शिक्षकांनी अच्यूत यांना पकडले आणि विचारणा केली की, शाळेत का येत नाही? शिकत का नाही? त्यावेळी अच्यूत यांनी विचारले की शाळा काय असते? मग शिक्षकांनी सांगितले की, तू उद्यापासून शाळेत येऊन शिकायला सुरुवात कर. त्यावर अच्यूत म्हणाले की, कोण शिकवणार? शिक्षक म्हणाले की, मी शिकवतो. शिकवेनही आणि पाटीसुध्दा देईन.” अच्यूत यांना हा प्रस्ताव आवडला. त्यानंतर शिक्षक त्यांना वर्गात घेऊन गेले आणि हजेरीपुस्तक उघडले आणि त्यांना त्यांचे नाव विचारले, अच्यूत यांनी त्यांचे काहीच नाव नसल्याचे सांगितले, त्यावेळी शिक्षक हैराण झाले, मग त्यांनी त्यांची विचारपूस केली घरच्यांची नावे विचारली. मग त्यांनी स्वत:च या मुलाचे नाव अच्यूतानंद असल्याचे सागंत तसे हजेरी पुस्तकात नोंद केली. आणि त्यांचे नाव अच्यूतानंद सामंत झाले. अच्यूत म्हणाले की, “ माझ्या सर्वात मोठ्या भावाचे नाव अंतर्यामी आहे आणि दुस-याचे अनिरुध्द आहे, त्यामुळे शिक्षक म्हणाले की दोन्ही भावांची नावे देवाची नावे आहेत त्यामुळे मी तुझेही नाव देवाचे नाव असले पाहिजे, आणि माझे नाव अच्य़ुतानंद ठेवले”. घरी जाऊन आईला हे सांगितल्यावर तिलाही आनंद झाला. तेही स्वाभाविकच होते कारण मुलाचा शाळेत प्रवेश झाला आणि शिक्षकांनीच त्याचे नामकरण केले.

image


प्रवेश केल्यांनंतर अच्यूत रोज शाळेत जात होते. पण त्यांना घरची स्थिती चांगली माहिती होती. त्यामुळे त्या लहान वयातच त्यांनी आईवर भार द्यायचा नाही असे ठरविले होते. अच्यूत आईला धान्य सडायला मदत करत असत. आपल्या बागेतील भाज्या विकत. त्याकाळी त्यांनी नारळ आणि केळीदेखील विकली. अच्युत भात शेती करायला मदत करू लागले. भाज्या पिकवून त्याची बाजारात विक्री करायला त्यांनी सुरुवात केली. अशी छोटी-मोठी कामं करून अच्युत आईला हातभार लावत होते. त्यांना मिळालेले पैसे ते आपल्या आईला देत असत तसेच लहान बहिणीलाही पैसे देत असत. त्यातून उरलेल्या पैशात ते अनेक गरजूंना मदत करू लागले. जसजशी त्यांची मिळकत वाढत गेली तसतसे ते इतरांच्या मदतीला धावू लागले. आजूबाजूच्या गावातील महिलांना सामान आणून देणे तसेच इतर मदत करणे यासारखी कामे करून त्यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली. अनेकांचे आशीर्वाद मिळवले. इतरांना मदत करण्याचा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच लाभला होता. ते सांगतात की, “ लहानपणी मी सर्वाना मदत करायला पुढे असायचो, ‘गुणी मुलगा’ म्हणून माझी ओळख निर्माण झाली. त्याच वेळी मी निर्णय घेतला की मी आयुष्यभर इतरांची मदत करेन जेणेकरून एक भला माणूस म्हणून माझी ओळख निर्माण होईल”. वयाच्या सात वर्षापासूनच अच्युत यांनी समाजसेवेचे काम सुरु केले. त्याचबरोबर शिक्षणही सुरूच ठेवले. घरी वीज नसताना कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला.

image


अच्युत यांना लहान वयातच जाणीव झाली होती की शिक्षण घेतले तरच परिस्थिती सुधारेल. त्यामुळे त्यांनी खूप मन लावून अभ्यास केला. गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अच्युत यांनी रघुनाथपुरच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. शाळा गावापासून आठ किलोमीटर दूर होती. अच्युत यांना रोज पायीच ये- जा करावी लागत होती. दहावी पास झाल्यानंतर अच्युत यांचा दाखला जगतसिंहपुरच्या इंटर कॉलेज मध्ये करण्यात आला. त्यांनी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे प्रमुख विषय निवडले. अकरावी आणि बारावी पास केल्यानंतर अच्युत यांनी पुरी येथील एस.सी.एस. कॉलेज मधून बीएससी केले. बीएससीची पदवी प्राप्त केल्यानंतर अच्युत यांनी उत्कल विश्वविद्यालय मधून रसायनशास्त्र या विषयात एमएससी केले. शिक्षण सुरु असतानाच अच्युत पडेल ते काम करत आपल्या शिक्षणाचा खर्च तसेच घरालाही हातभार लावत होते. एवढेच नाहीतर त्यांनी आपल्या गरजू मित्रांनाही मदत केली.

image


एमएससी झाल्यानंतर अच्युत यांनी तिथल्याच एका स्थानिक फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर ते घरी येऊन शिकवण्याही घेऊ लागले. काही दिवस तर त्यांनी लॅब असिस्टंटचे देखील काम केले. प्राध्यापकाच्या नोकरीमुळे अच्युत यांना खूप फायदा झाला. त्यांची आर्थिक बाजू मजबूत होऊ लागली. अच्युत सांगतात की, “ माझ्या कुटुंबातील सर्वचजण माझे शिक्षण पूर्ण होण्याची आणि मला नोकरी मिळण्याची वाट पाहात होते. मला नोकरी मिळाली आणि माझ्या दोन भावांची लग्न झाली. त्यानंतर दीड वर्षांनी माझ्या बहिणीचेदेखील लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सर्वजण आपापल्या कुटुंबासमवेत वेगळे राहू लागले. आई, लहान बहिण आणि मी आम्ही तिघे एकत्र होतो”. मोठ्या भावांना आणि बहिणीला त्यांची खूप मदत झाली.

image


फार्मसी कॉलेज मध्ये शिकवत असताना अच्युत यांच्या मनात क्रांतिकारी विचार आले. त्यांनी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. अच्युत यांना वाटले की ओरिसा येथील आदिवासी मुले सर्वात मागासवर्गीय आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही नाही. अच्युत यांनी १२५ आदिवासी गरीब मुलांची निवड केली आणि त्याच्या मिळकतीतून त्यांना शिकवायला सुरुवात केली. अच्युत यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली जेव्हा त्यांनी एक आयटीआय अर्थात इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट सुरु करण्याचा निर्णय घेतला. 1992-93 मध्ये अच्युत यांनी या इंस्टिट्यूटची स्थापना केली. विशेष बाब म्हणजे अच्युत यांनी जेव्हा या संस्थेची स्थापना केली त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ५००० रुपये होते आणि संस्था चालवण्यासाठी त्यांच्याजवळ त्यांचे स्वतःचे घर किवा जागा नव्हती. मात्र त्यांची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की त्यांनी सर्व समस्यांवर मात करत दोन शिक्षण संस्था स्थापन केल्या. या शिक्षणसंस्था त्यांनी भाड्याची जागा घेऊन सुरु केल्या. १२ विद्यार्थी आणि दोन कर्मचारी यांच्या साथीने या संस्था सुरु झाल्या. ही सुरुवात साधारण सुरुवात नव्हती. ही एक ऐतिहासिक सुरुवात होती. अच्युत यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या शिक्षणसंस्थेचा विस्तार केला. त्यानंतर तरुण असतानाच त्यांनी इंजीनियरिंग कॉलेज सुरु करण्याचे ठरवले. त्यावेळी देखील त्यांच्याजवळ आर्थिक पाठबळ नव्हते. तरीदेखील त्यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या आणि जिद्दीच्या बळावर कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी आणि कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज उभे केले. हे करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या संस्था स्थापणेसाठी त्यांनी कर्जदेखील घेतले होते. १९९५ मध्ये घेतलेले हे कर्ज १५ लाख रुपये होते. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती. कर्ज डोक्यावर असल्याकारणाने अच्युत हताश व्हायचे. त्यांनी एकदा तर आत्महत्या करण्याचा विचार देखील केला. मात्र याचदरम्यान त्यांना एका बँकेने २५ लाखाचे कर्ज दिले. या मिळालेल्या कर्जामुळे अच्युत यांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले. त्यानंतर त्यांची प्रगती वेगाने झाली.

image


१९९७मध्ये अच्युत यांना इंजिनियरिंग कॉलेज सुरु करण्याची परवानगी मिळाली, ज्यामुळे कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजीचे एका इंजीनियरिंग कॉलेजमध्ये परिवर्तन झाले. अच्युत यांनी ओरिसासारख्या मागासलेल्या राज्याची राजधानी भुवनेश्वर मध्ये कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंजिनियरिंग कॉलेज उभारले. २००४मध्ये कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी, ‘कीट’ केआईआईटी या नावाने प्रसिद्ध झाले. या त्यांच्या महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाचा दर्जा देखील मिळाला. ‘कीट’ या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात २५ वर्ग तसेच २२ कॅम्पस आहेत. या विद्यालयातील इमारती, आकर्षक आणि पर्यावरण अनुकूल आहे. या विश्वविद्यालयत १०० पेक्षा अधिक वेगवेगळे स्थानिक तसेच बाहेरगावाचे २५ हजार विद्यार्थी मुले शिकत आहे. ३८ वर्षाच्या वयात अच्युत ‘कुलुगुरू’ देखील झाले.

अच्युत यांनी गरजवंतांसाठी एक सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरु केले. त्यांच्या महाविद्यालय परिसरात त्यांनी मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज सुद्धा स्थापन केले. अच्युत यांनी गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावपातळीवर ठिकठिकाणी रुग्णालयं सुरु केली. कला, संस्कृती आणि पत्रकारिता क्षेत्रातदेखील त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. अच्युत यांची संस्था कलिंगा मीडिया प्राइवेट लिमिटेड ओरिसा भाषेत एक वृत्तवाहिनीदेखील चालवत आहे. ते ‘कादम्बिनी’ नावाने एक कौटुंबिक पत्रिका ओरिसा भाषेत काढणार आहे. मुलांसाठी त्यांनी ‘कुनिकथा’ नावाने पत्रिका काढायला सुरुवात केली आहे. हिन्दू धर्म आणि अध्यात्मावर विश्वास ठेवणारे अच्युत यांनी किट टेम्पल ट्रस्ट ची स्थापना केली आणि अनेक अध्यात्मिक केंद्र उभारले.

कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज या त्यांच्या समाजसेवी संस्थेमुळे जगभरात त्यांची ख्याती पसरली. देश-विदेशात त्यांच्या संस्थेला ओळख मिळाली. अच्युत यांनाही अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज आज जे काम करत आहे ते जागतिक पातळीवर आजपर्यंत कोणत्याही संस्थेने वा सरकारी व्यवस्थेने केले नाही. या संस्थेमुळे २५,००० आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले जात आहे. या विद्यार्थांना सर्व शिक्षण मोफत तसेच इतर खर्चही संस्था करत आहे.

आदिवासी मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या सुविधा पुरवणारी कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज जगातली सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. केवळ शिक्षणच नाही तर कला, क्रीडा क्षेत्रातही या संस्थेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लट्ठ पगाराची नोकरी देण्याचे कामही ही संस्था करत आहे. इथले विद्यार्थी मोठ्या नामवंत कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत आहे.

अच्युत यांनी स्थापन केलेल्या संस्था एवढे मोठे समाजकार्य कसे काय करू शकतात हा प्रश्न विचारला असता अच्युत सांगतात की, त्यांच्या शिक्षण संस्थेतून मिळणाऱ्या मिळकतीतून ते समाजकार्य करतात. विशेष बाब म्हणजे कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज चालवण्यासाठी एक दिवसाला जवळपास ५० हजार रुपये लागतात. या संस्थेचे स्वयंपाकघर जगातले सर्वात मोठे स्वयंपाकघर असल्याचा दावा अच्युत करतात. २५,०००मुलांचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण या ठिकाणी तयार केले जाते. या स्वयंपाक घरात दर दिवशी ७,५०० किलो तांदूळ, २,२०० डाळ, ७,२०० किलो भाजी, २५,००० अंडे, २,८०० किलो चिकन, ६०० किलो मासे इत्यादी जिन्नस वापरले जाते. मुलांना सकाळच्या नाष्ट्याला भात, कॉर्नफ्लेक्स, दही आणि दूध दिले जाते. मुलांना पौष्टिक संतुलित, स्वादिष्ट, आरोग्यदायी आहार दिला जातो.

कलिंगा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल सायंसेज एक आदर्श संस्था मानली जाते. अच्युत सामंत हे अविवाहित आहे. ते सांगतात की, “ मला माझ्या आयुष्यात सुख उपभोगण्यासाठी वेळच मिळाला नाही. मी जीवनात कायम संघर्ष करत राहिलो. माणूस लग्नाचा विचार तेव्हाच करतो जेव्हा तो सुखात असतो. मी लग्न केले असते तर एवढे विश्व उभारणे शक्य झाले नसते”.

विशेष बाब म्हणजे अच्युत सामंत भुवनेश्वर मध्ये दोन खोलीच्या घरात राहतात. पांढरे वस्त्र परिधान करतात. चप्पलच घालतात. साधे जगणे पसंत करतात. दररोज १६ ते १८ तास काम करतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ शिक्षणसंस्थेमध्ये व्यतीत करतात. अच्युत यांच्या नावावर कोणतीही संपती नाही. त्यांच्या बँक खात्यात जास्त रक्कम नाही. त्यांच्याकडे लक्झरी कार किवा अलेशान बंगला नाही. आपल्या शिक्षण संस्थेत ते नेहमी पायी चालत जातात.

समाज-सेवा आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदानासाठी त्यांना देशातील तसेच परदेशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. २५ विश्वविद्यालयातून त्यांना डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. अच्युत यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी देशविदेशातील शिक्षणसम्राट तसेच प्रतिष्ठित लोक त्यांच्या शिक्षणसंस्थेला भेट देतात आणि प्रभावित होतात.

एका प्रश्नाचे उत्तर देताना ते सांगतात की, “ लोक मला वेगवेगळ्या कारणाने ओळखतात, काहीजण मला शिक्षणसंस्थेचे संस्थापक म्हणून ओळखतात तर काहीजण समाजसेवक म्हणून ओळखतात. मात्र एक चांगला माणूस जेव्हा मला संबोधले जाते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो. आणि याच गोष्टीला मी माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे यश मानतो. मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही, कधी चुकीचे काम केले नाही, कोणाला फसवले नाही, कोणाचे वाईट केले नाही”.

अच्युत सामंत यांच्या भविष्यातल्या योजना काय असे विचारले असता ते सांगतात की, “ मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत गरिबी दूर करण्यासाठी काम करत राहील. ओरिसा राज्यात इतकी गरिबी आहे की माझ्यासारखे एक हजार लोकांनी जरी काम केले तरी गरिबी दूर होऊ शकत नाही. तरी माझे प्रयत्न राहतील की, मी जास्तीत जास्त लोकांची उपासमारीची समस्या दूर करण्यास प्रयत्न करेन. आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करेन”.

ओरिसातील भीषण दारिद्र्याचे वर्णन करताना अच्युत सामंत दोन घटना सांगतात, “ १९८४मध्ये ओरिसाच्या कालाहांडी मध्ये गरीब परिस्थितीमुळे एका बाईने आपल्या मुलाला पाचशे रुपयात विकले होते. तेव्हा देशाचे पंतप्रधान स्वतः तिथले वास्तव जाणून घेण्यासाठी कालाहांडी येथे आले होते. तेव्हा जगाला कळले होते की ओरिसामध्ये किती गरीब परिस्थिती आहे ते. या घटनेला ३२ वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा परिस्थिती फारशी बदलली नाही. अलीकडेच एका गृहस्थाची पत्नी मरण पावली तेव्हा तिला घरी घेऊन जाण्यासाठी त्याला अॅम्बुलंस मिळाली नाही. तेव्हा या गृहस्थाने तिचे प्रेत आपल्या खांद्यावर घेऊन घर गाठले. या घटनेवरून सर्व जगाला कळले की ओरिसात अद्यापही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे.”

गेल्या काही वर्षांपासून अच्युत एका नव्या संकल्पनेवर काम करत आहे, त्याचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांची ही संकल्पना म्हणजे “देण्याची कला”. अच्युत यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत उच्चभ्रू लोक गरजू लोकांचा विचार करत नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. त्यांचे म्हणणे आहे की दिल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. ते म्हणतात की, मी लहानपणापासून खूप दुखः सहन केले आहे. तरीसुद्धा लोकांची मदत केली आहे. आजही मी तेच काम करतो आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मला आवडते. स्वतः दुख: भोगून इतरांना आनंद देणे इतके सोपे काम नाही, मात्र जो असे करतो तो यशस्वी नक्कीच होतो आणि शेवटी त्यातूनच त्याला आनंद मिळतो”.

अच्युत सामंत हे गरीबीलाच वरदान मानतात. त्यांचे म्हणणे आहे की, मी गरीब होतो, गरिबी जवळून अनुभवली आहे. मला माहित आहे की गरीब माणूस काय विचार करतो, त्याला काय हवे असते. म्हणूनच मी गरीब लोकांना समजू शकतो, त्यांना मदत करणे आपले कर्तव्य समजतो. जर मी लहानपणी श्रीमंत असतो तर कदाचित मोठा झाल्यावर गरिबांना भाकरी दिली असती. गरिबी जाणली म्हणून त्यांना शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला”.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

    Share on
    close