ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी अनवाणी पायाने ‘ती’ धावली ३५० किलोमीटर !

0

भारतात महिलांचे सर्वात जास्त मृत्यू स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर मुळे होतात. स्त्रियांचे स्वतःकडे होणारे दुर्लक्ष, तपासणी करण्यास वाटणारा संकोंच, त्यामुळे होणारा विलंब, जनजागृतीचा अभाव यामुळे देशभरात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात बळावते आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर या स्त्रियांच्या आजाराविषयी लोकांनी गंभीरतेने लक्ष द्यावे, याविषयी जनजागृती करण्यासाठी हैदराबादच्या ३० वर्षीय नीलिमा पुडोता या महिलेने नुकतेच विजयवाडा ते विशाखापट्टणम ३५० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यांनी ते नुसतेच धावून पूर्ण केले नाही तर अनवाणी पायाने धावत हे अंतर त्यांनी पूर्ण केले.

नीलिमा या माजी कॉर्पोरेट कर्मचारी आहेत, याआधी त्या एवरेस्ट शिखर सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या, हे अंतर त्यांनी आठ दिवसांत पूर्ण केले होते. गेल्या महिन्यात २० तारखेला महिला स्वास्थ्य जनजागृतीसाठी विशाखापट्टणम येथे पिंकाथोनचे आयोजन करण्यात आले होते त्यातही नीलिमा यांनी सहभाग नोंदवला.

विजयवाडा ते विशाखापट्टणम ३५० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करण्याआधी नीलिमा यांनी पाच महिने अनवाणी पायाने धावण्याचा सराव केला असल्याचे त्यांनी सांगितले. “ दमट आणि उष्ण वातावरणात हे अंतर धावून पूर्ण करणे आव्हानात्मक होते, मात्र ज्या परिसरातून हे अंतर पूर्ण केले तो परिसर चांगला होता, तिथले लोकं चांगले होते. मी पहाटेच धावायला सुरुवात करायची कडक ऊन तापेपर्यंत धावायचे, नंतर पुन्हा सूर्यास्त होतेवेळी धावणे सुरु करायचे. दुपारच्या कडक उन्हात धावणे शक्यच नव्हते. धावतांना वाटेत अनेकवेळा साप आडवे आले. या परिसरात साप जास्त प्रमाणात आढळतात कारण रस्त्याच्या आजूबाजूला शेतजमिनी मोठ्या प्रमाणात आहे,” नीलिमा यांनी सांगितले.

२०१४च्या एका सर्वेक्षणानुसार भारतात ९७,३२८ महिला स्तनांच्या कर्करोगाने पीडित आहे. २०३०मध्ये हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी गेल्यावर्षी राज्यसभेत दिली. बंगळूर, चेन्नई आणि मुंबई या शहरात ३५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे तर दिल्लीमध्ये ४५ते ५४ या वयोगटात हे प्रमाण आढळते.

-पीटीआय