महिलांची प्रतिष्ठा जपणारे "MITU"

0

आपल्या मुलीच्या रस्ता अपघातात झालेल्या दुर्दैवी अंतानंतर कला चार्लु यांनी आपले आय़ुष्य महिलांचे जीवन सुकर बनविण्याच्या ध्येयासाठी वाहून घेतले. गेल्या पाच वर्षांपासून त्या ʻMultiple Initiatives Towards Upliftmentʼ (MITU) नामक संस्थेच्या संस्थापक ट्रस्टी आहेत. महिलांच्या मासिक पाळी स्वच्छते संबंधीच्या व्यवस्थेबाबत प्रत्येक गोष्टीवर त्या कार्य करतात. यासोबतच अपसायकलिंगच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मितीचे कामदेखील केले. कला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. गृह विज्ञान या विषयात त्यांनी पदवी घेतली असून, त्यासोबतच डायटेटिक्सचा डिप्लोमादेखील केला आहे. कला यांनी खेळातदेखील चमकदार कामगिरी केली असून, बास्केटबॉल आणि रायफल शूटींग स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 

कला सांगतात की, ʻआमच्या घरात पाच बहिणींपैकी मी सर्वात लहान. आम्हा सर्व बहिणींचे पालन पोषण आणि देखभाल वेगवेगळ्या आणि स्वतंत्र पद्धतीने व्हावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी माझ्या पतीच्या निवृत्तीनंतर माझ्या ९० वर्षीय वडिलांसोबत बंगळूरू येथे आले, तेव्हा माझी मुलगीदेखील तिच्या लहान मुलासह तेथे आली होती. आम्हाला वाटले होते की, सर्वकाही आता सुरळीत चालले आहे.ʼ त्या पुढे सांगतात की, ʻमाझी २६ वर्षीय मुलगी मैत्री हिच्या रस्ता अपघातात झालेल्या अकाली निधनाने आम्ही हादरुन गेलो. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी काही समाजसेवेची कामे करू लागली. मात्र यामुळे मलाही समाधान मिळत नव्हते आणि मी ज्यांना मदत करायची त्यांनादेखील. या अनुभवानंतर मला असे वाटले की, काहीतरी वेगळे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मी एका संस्थेच्या निर्मितीचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने ʻMultiple Initiatives Towards Upliftmentʼ (MITU) संस्थेचा जन्म झाला.ʼ 

कला यांच्या परिवाराने आणि आसपासच्या लोकांनी त्यांच्या या निर्णयाचे प्रसन्न मनाने स्वागत केले. कला सांगतात की, ʻमी माझ्या जीवनात स्वतः कधीही कोणाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले नाही.ʼ ʻMultiple Initiatives Towards Upliftmentʼ (MITU) च्या वाटचालीबद्दल बोलताना कला सांगतात की, ʻमी जेव्हा २००९ साली सुरुवात केली तेव्हा माझ्यासमोर स्पष्ट ध्येय नव्हते. तेव्हा मी ʻगूंजʼ आणि त्यांच्या मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापनाबद्दल वाचले. सुरुवातीला आम्ही शिंप्यांच्या सहाय्याने कपड्यांच्या तुकड्यांपासून सॅनटरी पॅड बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र लवकरच आम्हाला हे समजले की, आम्ही जर लोकांना सदर सॅनटरी पॅड मोफत जरी दिले, तरी ते त्यांचा वापर करणार नाहीत. त्यामुळे आम्ही किमान किंमतीत सॅनटरी पॅड उपलब्ध करुन देणे सुरू केले. त्यामुळे आमचे ʻडोनेट फॉर डिग्निटीʼ अभियान सफल झाले आणि बंगळूरू येथील अनेक विद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये आम्ही स्वस्त दरात सॅनटरी पॅड पुरविण्यास सुरुवात करू शकलो.ʼ कला सांगतात की, ʻ२०१२ साली ʻMultiple Initiatives Towards Upliftmentʼ (MITU)ला मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापनाचा संदेश प्रसारित करण्याची एक संधी मिळाली. त्यानंतर २०१४ पर्यंत हे अभियान तुमकुर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये पोहोचले. हल्लीच आम्ही १७ शाळांमध्ये इनसिनेटर बनविले असून, वापरण्यात आलेल्या पॅडचे ते निवारण करते.ʼ 

कला यांच्या जीवनातील सर्वात मोठा धक्का त्यांच्या प्रियजनांचा अकाली झालेला मृत्यू हा होता. कला यांच्या मुलीच्या अकाली जाण्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला होता. त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागला. त्यानंतर त्यांचे वडिलदेखील अशक्तपणामुळे अंथरुणाला खिळले. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडणे, कला यांच्यासाठी कठीण होते. त्यांचा सर्वात मोठा मानसिक आधार त्यांच्या वडिलांद्वारे वेळोवेळी देण्यात येणारा सल्ला हा होता. कला सांगतात की, ʻमी जेव्हा कधीही द्विधा मनस्थितीत असायची किंवा कोणत्याही बाबतीत माझी भूमिका स्पष्ट नसायची, तेव्हा माझ्या वडिलांनी मला सल्ले दिले आहेत. त्यांनी मला माझ्या प्राथमिकता ठरविण्यासाठी आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.ʼ कला सांगतात की, ʻʻMultiple Initiatives Towards Upliftmentʼ (MITU)चे संचालन करताना मला हे समजले की, ध्येयवेडेपणा, विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही चकित व्हाल, असे यश प्राप्त करू शकता. चांगल्या उद्देश्याकरिता नेहमी चोहोबाजुंनी आणि अनपेक्षितरित्या मदतीचे हात पुढे येतात. मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापनाच्या कामाशी जोडले जाण्यात मी धन्यता मानते.ʼ कला या त्यांच्या संस्थेला भविष्यकाळात मूल्य आधारित, नियम आणि संस्कृतीच्या आधारे चालणाऱ्या संस्थेच्या स्वरुपात पाहू इच्छितात. त्या सांगतात की, ʻआम्ही कपड्याचे सॅनटरी पॅड पुन्हा बनवायला सुरू केले आहेत. ज्यांना नरम कापसाच्या कपड्याने बनलेले पॅड पसंत आहेत, अशा भारतातील आणि परदेशातील शहरी महिलांना आम्ही ते उपलब्ध करुन देतो.ʼ मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापनाबद्दलचा कला यांचा हा प्रयत्न महिलांची प्रतिष्ठा जपण्यात एक मैलाचा दगड सिद्ध होऊ शकतो.

Related Stories

Stories by Ranjita Parab