शिकवणीच्या पैशांनी सुरु केलेल्या ‘फिटवर्कस’ने ५०० स्त्रियांना दिले फिटनेसचे प्रशिक्षण

0

असे म्हणतात की ‘आरोग्यंम धन संपदा’. जर आपल्या कडे भरपूर धन असेल तर आपण श्रीमंत आहात पण जर तुमचे स्वास्थ निरोगी असेल तर तुम्ही स्वतः नशीबवान असे मानले जाते. जिथे आपण भेसळयुक्त अन्न व प्रदुषणाच्या राक्षसी विळख्यात फसलो आहोत, तिथे पैसे कमावणे एक वेळ शक्य आहे पण निरोगी रहाणे अधिक कठीण होत चालले आहे. आज मनुष्य पैश्याच्या मागे धावत सुटला पण अजाणतेपणे आपल्या शरीराकडे तो दुर्लक्ष करू लागला आहे. आपल्या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करून ऑफिसचे काम ही मनुष्याची प्राथमिक गरज बनली आहे. बऱ्याचवेळा ती त्याची विवशता असते किंवा स्वतःचा आळस असतो. आज बहुतांश लोक हे खाजगी कंपनी मध्ये कामाला असतात. जिथे कामाचे स्वरूप व तास हे निश्चित नसतात. बऱ्याचवेळा रात्रपाळी करावी लागते. या प्रकारच्या कामाचा परिणाम सरळ आपल्या प्रकृतीला मारक ठरू शकतो. यामुळे मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी पडून बदलत्या ऋतूनुसार प्रकृती लवकर खराब होते. यासाठी गरज आहे ती व्यस्त दिनचर्येतून स्वतःसाठी वेळ काढून आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची.


वाढते प्रदूषण आणि भेसळीच्या या वातवरणात लोकांना आपल्या प्रकृती बद्दल जागरूक करून त्यांना तंदुरुस्त रहाण्यासाठी गरजेच्या सुविधा देण्याच्या या कामासाठी स्वतःला वाहून घेतले आहे दिल्लीच्या तरुण उद्यमी आशिमा गुप्ता यांनी. आशिमा तीन वर्षापासून ग्रेटर कैलाश मध्ये स्त्रियांसाठी एक फिटनेस स्टुडिओ ‘फिटवर्कस’ चालवत आहे. त्यांच्याकडे नऊ वर्षाच्या मुलींपासून ५४ – ५५ वर्षाच्या स्त्रिया पण येतात. आशिमा यांचा प्रवास तीन वर्षापूर्वी दोन स्त्रियांच्या फिटनेस ट्रेनिंगने सुरु झाला आणि आज त्यांच्या फिटनेस स्टुडीओ ‘फिटवर्कस’ मध्ये जवळजवळ १०० स्त्रियांचा उल्लेखनीय सहभाग आहे.

आशिमा या फक्त २५ वर्षाच्या आहे व त्यांनी आपल्या स्टुडिओची सुरवात आज पासून तीन वर्षापूर्वी सुरु केली होती जेव्हा त्या फक्त २२ वर्षाच्या होत्या. सुरवातीपासून त्या तंदुरुस्तीप्रती बऱ्याच जागरूक होत्या. आशिमा यांनी नृत्याची सुरवात वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरु केली, त्या कथक, भरतनाट्यम व अन्य नृत्यात पण निपुण आहेत. तंदुरुस्ती ही एक अशी कला होती जिने अशीमाला नेहमीच आकर्षित केले. शालेय शिक्षणानंतर त्यांचा इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रवेशानंतर त्यांनी एका अश्या संस्थेत (विद्यानिकेतन) दाखला घेतला, जिथे त्यांनी फिटनेस ट्रेनिंग व फिटनेसच्या नवीन तांत्रिक बाबींचे बारकावे नीट समजावून घेतले. इंजिनिअरिंग नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी त्यांना पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहित केले जेणेकरून त्यांनी फिटनेसच्या क्षेत्रात नाव कमवावे. याच दरम्यान त्यांना नोकरीचे अनेक चांगले प्रस्ताव आले पण त्यांनी त्यामध्ये मध्ये रुची न दाखवता याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. आशिमा सांगतात की, त्या पूर्वी पासून शिकवणी घेत असल्यामुळे त्यांची चांगली बचत झाली व ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांनी स्वःकमाईने ग्रेटर कैलाश मध्ये एक फिटनेस कार्यालय उघडले.


या पूर्ण कामासाठी तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी महिलांसाठी प्रशिक्षणाचा श्रीगणेश केला. त्यांना प्रारंभी दोन स्त्रियांपासून सुरवात करावी लागली. जवळजवळ वर्षभर तडजोड करून कार्यालयाचा पूर्ण खर्च, वेगवेगळी बिल देणे तसेच कार्यालयाचे भाडे या सगळ्यांसाठी त्यांना बरेच कष्ट उपसावे लागले. पण आशिमा यांनी हार न मानता स्वतःच आपल्या स्टुडिओचा प्रचार करून स्त्रियांना तंदुरुस्तीसाठी जागरूक केले. मदतनीस नसल्यामुळे अनेक तास त्या एकट्याच प्रशिक्षण द्यायच्या. पण हळूहळू त्यांच्या कडे येणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली व जागेच्या कमतरतेमुळे आशिमा यांनी ग्रेटर कैलाश मध्येच एक मोठी जागा भाड्याने घेऊन आपल्या कामकाजाची सुरुवात तेथून सुरु केली. आज त्यांच्या कडे १०० नियमित ग्राहक आहे. त्यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त स्त्रियांना प्रशिक्षण दिले आहे. आशिमा व्यतिरिक्त त्यांच्या स्टुडिओत चार अन्य फिटनेस ट्रेनर आहे. ‘फिटवर्कस’ मध्ये एरोबिक्स, योग, किक बॉक्सिंग व अन्य फिटनेस उपक्रम राबविले जातात तसेच आपल्या प्रकृतीच्या विषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला जातो.


आशिमा सांगतात की अजून त्यांचे केंद्र फक्त स्त्रियांसाठीच आहे पण लवकरच भविष्यात स्त्री व पुरुष हे दोघेही याचा निश्चित लाभ घेऊ शकतील. जिथे प्रत्येक प्रकारचे फिटनेस ट्रेनिंग असेल जसे – वेट ट्रेेनिंग, एरोबिक्स ,योग, व अन्य शारीरिक व्यायाम इ.

आणखी काहीनाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

नूतन वर्षात स्थुलतेपासून सुटका ऋतू रानी यांचे अचूक उपाय

स्पा आणि सलून्सना ऑनलाईन व्यासपीठ देऊन ग्राहकांची सोय करणारी ‘स्टायलोफी’

मेडीनफाय – वैद्यकीय क्षेत्राची अस्सल आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे व्यासपीठ आता नव्या वळणावर...


लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे