‘एमएनसी’ सोडून एक यशस्वी कृषी उद्यमी होण्याची आगळी कहाणी!

0

या देशातील कित्येक तरूणांना शिकून-सवरून परदेशात काम करण्याची आस असते. त्यांचे स्वप्न असते की शिक्षण झाल्यावर एखाद्या मोठ्या विदेशी कंपनीसोबत मोठ्यापदावर काम करावे. त्यातून त्यांच्या सन्मानासोबतच कुटूंबाच्या सन्मानालाही जोडले जाते, असे म्हणता येईल की, ही आमच्या तरूणांमध्ये प्रथाच होत चालली आहे. पण आम्ही आपणांस सांगितले की, असाही कुणी माणूस आहे की, ज्याने विदेशी कंपनीच्या मोठ्या हुद्द्याचा राजीनामा देवून आपल्या मायदेशात केवळ शेतकरी होण्यासाठी परत आला तर विश्वास बसणे कठीण आहे. पण सुरेश अय्यर असा माणूस आहे, ज्यांनी कॉर्पोरेट जगात केवळ देशातच नाहीतर विदेशातही यश मिळवले. पण केवळ शेती करण्याचा ध्यास घेऊन कॉर्पोरेटला रामराम केला. त्यांच्या मनात या गोष्टीची खंत होती की त्यांना यातून बाहेर पडून काही वेगळे करायचे आहे. काही असे ज्यातून त्यांना शेतीशी, त्यांच्या गावाशी जोडता येईल. शेतकरी होण्याची इच्छा त्यांच्या मनात इतकी दृढ झाली की, एक दिवस त्यांनी राजीनामा देऊन आंध्रप्रदेशातील आपले गाव क्षीरसागर येथे काही जमीन घेतली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे सुरेश सांगतात की, दहा वर्षांपेक्षा जास्त त्यांनी कॉर्पोरेट जगात काम केले, पण त्यांना असे वाटत असे की आपण एक यंत्र होऊन गेलो आहोत. ते सांगतात की, त्यांनी आपले गाव क्षीरसागर मध्ये जमीन घेतली तेंव्हा त्यांना त्यांच्या काही मित्रांनी मूर्ख देखील ठरवले आणि फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुरेश यांनी निर्णय घेतला होता आणि जमीनही खरेदी केली होती.

सुरेश अय्यर यांना ‘फार्म टू होम’ ही संकल्पना विकसित करायची होती. ज्यातून शेती उत्पादन थेट ग्राहकांच्या घरात पोहचवावे असा प्रयत्न होता. ही कल्पना नाविन्याची होती तरी ती साकारणे अवघड होते. डिसेंबर २०१२मध्ये आपल्या ‘फार्म टू होम’ ची सुरुवात सुरेश यांनी सिकंदराबाद येथे एक वखार सुरू करून केली ज्याचे नाव त्यांनी ‘अक्षय होम फार्म’ ठेवले. ऑनलाइनवर त्यांनी ‘मायहोमफार्म डॉट इन’ च्या नावाची संकल्पना सुरू केली. त्यांना सुरुवातीपासून या कल्पनेबाबत विश्वास होता की, ही संकल्पना ते लोकांना चांगल्या प्रकारे पटवून देत रुजवतील. विशेष म्हणजे शेतीच्या आणि व्यवसायाच्या अशा दोन संकल्पना यात होत्या आणि सुरेश काहीसे असेच करु इच्छित होते. शेतीची आवड आणि कॉर्पोरेटमधील अनुभव या दोन्हीचा या निमित्ताने छान संयोग जुळून आला होता. ऑनलाइनवर भाड्याने वस्तु घेण्याची पध्दत रूढ होत असताना पण त्याद्वारे भाज्या,फळे खरेदी करण्याचे प्रमाण अद्याप खूपच कमी होते.

‘माय होम फार्म’ अशी कंपनी म्हणून दाखल झाली होती, जी स्वत: उत्पादनही करत होती. खरेतर ऑनलाइनवरुन हे करणे कठीणच होते, पण शेतीबाबतची त्यांची महत्वाकांक्षा असल्याने त्यांनी हार मानली नाहीच.

‘माय होम फार्म’ साप्ताहिक पध्दतीने काम करते. त्यात निवडण्यासाठी तीन बास्केटचे पर्याय,नेहमी, मध्यम आणि पारंपारिक असे असतात. ‘नेहमी’ची किंमत १४००रुपये आहे ज्यात ग्राहकांना २४प्रकारच्या भाज्या मिळतात. ते सांगतात की, भाज्यांची मागणी घेतल्यावर ग्राहकसमन्वय अधिकारी वितरण करण्याआधी दोन दिवस पहिले पुन्हा एकदा कॉल करून मागणीची खात्री करून घेतात आणि मग नोंदणीप्रमाणे हव्या त्या भाज्या पाठविल्या जातात. सुरेश सांगतात की यासाठी त्यांना सहा जण सहायक म्हणून मदत करतात जे कोठार सांभाळतात. सहाजण शेतात काम करतात. बाराजणांच्या या संघाद्वारे ग्राहकांपर्यंत सहजपणाने हव्या त्या भाज्या पोहोचवू शकतात. सुरेश सांगतात की एकावेळी त्यांच्याजवळ तीनशे पर्यंत ग्राहक येतात. त्यानंतरही सुरेश सांगतात की, ग्राहकांच्या मनात अजूनही एक भयाचे वातावरण असते. ते दर्जा आणि प्रमाण याबाबत तडजोड करत नाहीत. कारण ऑनलाईनच्या दुनियेत काही ग्राहकांना असे वाईट अनुभव आले आहेत त्यामुळे त्यांना हे एक आव्हानच आहे. असे असले तरी सुरेश अय्यर यांच्याजवळ ग्राहकांची निश्चित संख्या आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकप्रियता वाढल्याने सुरेश यांनी आता म्हैसूर येथेही एक शाखा उघडली आहे, त्यांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. सुरेश अय्यर कंपनीच्या या यशाने उत्साहित आहेत आणि विस्तार करण्यासाठी गुंतवणूकदारांचा शोध घेत आहेत. रिलायंस फ्रेश सारख्या मोठ्या कंपन्यासोबत काम करण्याचा एक पर्याय आहेच असे ते सांगतात. आपली कंपनी आणि कल्पना यावर सध्या सुरेश अय्यर समाधानी आहेत. त्यांना विशेष आनंद हा आहे की त्यांच्या मनात जे आले ते त्यांनी यशस्वीपणाने करून दाखवले.

लेखक : जुबीन मेहता

अनुवाद : किशोर आपटे.