श्रवणीने चमकवल्या कॉर्पोरेट कार्यालयांच्या भिंती, कलाकृती देते भाड्याने!

श्रवणीने चमकवल्या कॉर्पोरेट कार्यालयांच्या भिंती, कलाकृती देते भाड्याने!

Wednesday November 18, 2015,

3 min Read

जीवन वेगाने पुढे जात आहे. त्यासोबतच लोकांमध्ये पैसा कमाविण्याची अशी स्पर्धा आहे की, या स्पर्धेत त्यांनी आपल्या शरीराला पैसा कमाविण्याचे यंत्र आणि जीवनाला वेगाने धावणारी गाडी बनवले आहे, जी फक्त पळत राहिली पाहिजे. या धावपळीत माणसाला त्याच्या छंदासाठी वेळही देता येईनासा झाला आहे. आजच्या ‘कॉर्पोरेट कल्चर’चा लोकांवर पगडा बसला आहे. तरीही याच क्षेत्रात नोकरी करणे आजही प्रतिष्ठेचे समजले जाते आहे. पण वास्तव हे देखील आहे की, या क्षेत्रात लोकांना त्यांच्या ‘करिअर’ची संधी मिळत आहे. लोक चांगला पैसा कमावित आहेत. तर दुसरीकडे त्यासाठी जीवन कष्टदायकही होत आहे.

image


अशावेळी कला हेच माध्यम आहे ज्यातून लोकांना शांती आणि समाधान मिळू शकते. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यालये अशाप्रकारे सजवली जात आहेत की, तेथे काम करणा-यांना समाधान वाटावे. कलेच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजातील नीरसता कमी केली जाऊ शकते. असे खूप लोक आहेत जे कलासक्त आहेत पण व्यस्त राहिल्याने प्रदर्शनांना भेटी नाही देऊ शकत. अशावेळी श्रवणी वटी आपली कंपनी ‘आर्ट एन्थ्यूज’ च्या माध्यमातून कॉर्पोरेट कार्यालयांना कलाकृती भाड्याने उपलब्ध करून देतात.

श्रवणी त्यासाठी या कार्यालयांना भेटी देवून हे जाणून घेतात की, तेथील लोकांना कोणत्या प्रकारची कला पसंत आहेत. त्यांची रुची लक्षात घेऊन त्या कलाकृती किंवा मूर्ती कार्यालयांना उपलब्ध करून देतात. या कलाकृती कुठे लावाव्या याची देखील त्या देखभाल करतात किंवा सूचना देतात.

image


श्रवणी यांनी बिटस् पिलानी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिकण्याच्या काळातच त्यांनी एका कलासंस्थेत नोकरी केली. त्याकाळात त्यांना सुमारे दोनशे कलाकारांचे कौशल्य जवळून पहाता आले. त्यातून त्यांना जाणवले की, याक्षेत्रात त्या काहीतरी नवीन करु शकतात. ही सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की, आज श्रवणी दोन कलासंबंधी उभरत्या संस्थांच्या संस्थापिका आहेत. या दोन्ही संस्था पुण्यात आहेत.

सन २०१२ मध्ये पदवी परिक्षेनंतर श्रवणी यांनी ‘आर्टडिजन’ ची सुरूवात केली. हे एक ई-कॉमर्स पोर्टल आहे ज्यावर कलाकृती विक्रीचे काम चालते. श्रवणी सांगतात की, प्रत्येकाची कलेकडे पाहण्याची स्वत:ची एक नजर असते, त्यामुळेच या क्षेत्रात कलाकारांना खूपश्या संधी आहेत. त्यांच्या संकेतस्थळावर सहाशे कलावंतांची माहिती (पोर्टफोलिओ) आहे. त्यांच्या कलाकृती ऑनलाइनवर उपलब्ध आहेत.

image


मागील तीन वर्षांत त्यांनी जवळपास शंभर कलाकृती विकल्या आहेत. ज्यांची किंमत सुमारे दीड लाख रूपये आहे. या दरम्यान श्रवणी यांनी अनेकांशी चर्चा केल्या, त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना कलाकृती तर आवडतात मात्र त्या विकत घेण्याची त्यांची तयारी नसते. कार्पोरेटमध्येही अनेक लोक आपल्या कार्यालयात कलाकृती लावून चांगले वातावरण तयार करु इच्छितात मात्र या कलाकृतींच्या किंमतीमुळे त्यांना त्या विकत घेता येत नाहीत. त्यामुळे श्रवणी यांनी विचार केला की, का नाही कार्यालयांना भाड्याने या कलाकृती उपलब्ध करता येतील? त्यानंतर त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये ‘आर्ट एन्थ्यूज’ चा पाया घातला. सुरुवातीला अडचणी खूप होत्या, कारण कलाकार त्यांची कामे भाड्याने देण्यात राजी नव्हते. मात्र जसे गणेश पांडा यांच्यासारखे कलाकार श्रवणी यांच्या सोबत काम करू लागले तस तसे अनेकजणांनी त्यांना साथ देण्यास सुरुवात केली. श्रवणी यांच्यासाठी हे देखील सोपे नव्हते की, त्या मोठ्या कलावंतांना सोबत घेतील. त्यांना त्यासाठी कष्ट घ्यावे लागले, आणि कलाकारांना समजवावे लागले की, मोठ्या प्रदर्शनातूनही त्यांना इतका फायदा होणार नाही जितका ती भाड्याने दिल्याने होणार आहे. त्यासोबतच असे करताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची कला पोहोचू शकते. त्यामुळे कलाकारांचे नांव आणि कला दोघांना ओळख मिळते.

आज ‘आर्ट एन्थ्य़ूज’ च्या माध्यमातून देशभरातील जवळपास दोनशे कार्यालयांतून अनेक कलावंतांच्या कलाकृती झळकल्या आहेत. त्यातून कंपनीला प्रतिमहिना दोन-तीन लाख रूपये मिळतात. श्रवणी सांगतात की, अनेकदा असेही होते की, कंपन्या भाड्याच्या कलाकृती विकतही घेतात.

देशात कलाप्रेमींची संख्या खूप आहे, आणि यासाठी जितके काम व्हायला पाहिजे तितके होत नाही. त्यामुळे या क्षेत्रात अद्याप खूप काही नवीन करता येण्यासारखे आहे. हे क्षेत्र अनंत शक्यता घेऊन उभे आहे. 


लेखक : अपर्णा घोष

अनुवाद : किशोर आपटे.