एक साधा स्टोव्ह बदल घडवण्यासाठी पुरेसा आहे..

‘नवदुर्गा’...ग्रामीण भारतासाठी 'नव'संजीवनी !

एक साधा स्टोव्ह बदल घडवण्यासाठी पुरेसा आहे..

Sunday October 04, 2015,

4 min Read

परंपरागत घरगुती चुलींमधून बाहेर पडणा-या धोकादायक वायू आणि इतर पदार्थांमुळे जवळपास 4 कोटी भारतीय विविध आजारांनी ग्रस्त आहेत. गंभीर बाब म्हणजे यामध्ये 90 टक्के महिला आहेत. या आजारांमध्ये श्वसनाचे, फुफ्फुसाचे आणि डोळ्यांचे असे गंभीर आजार आहेत. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या आकडेवारीनुसार 1 कोटी 30 लाखांहून अधिक भारतीयांचा चार भिंतींमध्ये होणा-या वायुप्रदूषणामुळे मृत्यू होतो. लाकूडफाटा आणि शेणापासून तयार करण्यात आलेलं इंधन स्वयंपाकासाठी वापरलं, तर त्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायूचं ऊत्सर्जन होतं. या 1 कोटी 30 लाखांपैकी बहुतांश मृत्यू हे अशा प्रकारच्या विषारी वायुमुळेच होतात.

एक साधा स्टोव्ह बदल घडवण्यासाठी पुरेसा आहे...

एक साधा स्टोव्ह बदल घडवण्यासाठी पुरेसा आहे...


घरगुती मातीच्या चुली किंवा इतर स्टोव्हचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. पण त्याचबरोबर या चुलींसाठी लागणारं इंधन अर्थात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी आणि शेणापासून गवरी बनवण्यासाठी भरपूर वेळही खर्च होतो. भारत सरकारच्या ‘एनर्जी स्टॅटिस्टिक्स 2013’ या अहवालानुसार 80 कोटींहून अधिक भारतीय लाकूडफाटा, कोळसा, शेतातील टाकाऊ कचरा आणि शेणाच्या गवरी अशा पारंपरिक इंधनाचा वापर करतात. याशिवाय रोजच्या वापरासाठी रॉकेलचा वापर करणा-या कुटुंबांना त्यांच्या कमाईच्या 30 टक्के हिस्सा या इंधनासाठी बाजूला काढून ठेवावा लागतो.

याच समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सौरभ सागर जयस्वाल आणि त्यांचे वडिल अरविंद सागर जयस्वाल यांनी 2009 साली ‘नवदुर्गा मेटल इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. खरंतर ही संकल्पना सौरभ यांचे सासरे महेंद्र प्रताप जयस्वाल यांची. नेपाळमध्ये असताना त्यांनी एका गरीब शेतक-याला तांदूळाचा फुफाटा अर्थात पिकाची साल चुलीत इंधन म्हणून वापरताना पाहिलं. तिथूनच पर्यावरण पूरक आणि आरोग्याला धोका नसणारा स्वयंपाकाचा स्टोव्ह तयार करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. याचाच परिणाम म्हणून ‘नवदुर्गा’चा पहिला स्टोव्ह, ‘जनता चुल्हा स्मोकलेस स्टोव्ह’ तयार झाला. ज्याची किंमत होती, फक्त 500 रूपये.

महेंद्रप्रताप जयस्वाल यांचा मुलगा विभोर सांगतो, “आम्हाला वाटलं अशाप्रकारे स्वस्त आणि आरोग्यदायी स्टोव्ह तयार केल्यामुळे भारतातल्या लाखो गरीब कुटुंबांच्या आरोग्याला फायदा होऊ शकेल आणि जागतिक पर्यावरण रक्षणालाही मदत होईल. आमच्या या स्टोव्हमुळे त्यांना अनेक फायदे होतात. सुरक्षा, उत्तम आरोग्य, अधिक मिळकत. आणि विशेष म्हणजे इंधन गोळा करण्याचा आणि अन्न शिजवण्याचा वेळही कमी झाल्यामुळे उरलेला वेळ त्यांना दुस-या कामासाठी, रोजगारासाठी वापरता येऊ शकतो. पर्यावरणाला निर्माण होणारा धोकाही यामुळे कमी होऊ शकतो.” 2012 साली विभोर संचालक म्हणून ‘नवदुर्गा’मध्ये रूजू झाला. खरंतर विभोर ह्युमन रिसोर्समधला एमबीए पदवीधर. याआधी तो स्पाईसजेट एअरलाईन्ससोबत काम करत होता. शिवाय देशभरातल्या अनेक इ-गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये विभोरनं काम केलं. मात्र इंधन वाचवणारा एक पर्यावरण पूरक स्टोव्ह बनवण्याच्या आपल्या वडिलांच्या स्वप्नापासून प्रेरणा घेऊन विभोरनं लठ्ठ पगाराची नोकरी सोडून ‘नवदुर्गा’सोबत काम करायचा निर्णय घेतला.

बदल घडवायचाय...

बदल घडवायचाय...


विभोरचा निर्णय अजिबात चुकीचा नव्हता. त्यानं ‘नवदुर्गा’मध्ये काम सुरु केल्यापासून ‘नवदुर्गा’चा विस्तार तीन राज्यांपासून आठ राज्यांमध्ये झालाय. इतकंच नाही, तर गुंतवणूक शोधणे, तांदुळाच्या फुफाट्यावर चालणा-या स्टोव्हसाठी मागणी वाढवणे आणि कमी उत्पन्न असणा-या कुटुंबांमध्ये या स्टोव्हबद्दल विश्वासार्हता निर्माण करणे अशा महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्यातही विभोरनं मोलाची भूमिका बजावली. जयस्वाल सांगतात ‘नवदुर्गा’चे स्टोव्ह परंपरागत एलपीजी स्टोव्हसारखंच काम करतात. शिवाय काही क्षणांत कोणत्याही धुराशिवाय पेटणारी तशीच निळी ज्योतही देतात. भारतात परंपरागत चालत आलेल्या चुलींपेक्षा ‘नवदुर्गा’चे स्टोव्ह नक्कीच उजवे ठरतात. आत्तापर्यंत ‘नवदुर्गा’ने 10 प्रकारचे स्टोव्ह बनवले आहेत. यामध्ये तांदुळाचा फुफाटा आणि शेतातून निघणा-या इतर टाकाऊ कच-याचा इंधन म्हणून वापर होतो. आणि परंपरागत चुलींपेक्षा या स्टोव्हच्या वापरामुळे घरात निर्माण होणारं प्रदूषण तब्बल 80 टक्क्यांनी कमी होतं.

भारतात दरवर्षी तब्बल 12 कोटी टन इतका तांदूळाचा फुफाटा तयार होतो. आणि विशेष म्हणजे यातला बहुतांश फुफाटा हा एकतर जाळून तरी टाकला जातो, किंवा कचरा म्हणून फेकून तरी दिला जातो. अगदी अलिकडेच ‘हस्क पॉवर सिस्टीम्स’सारख्या कंपन्या वीज तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून या फुफाट्याचा वापर करू लागल्या आहेत. ‘नवदुर्गा’ने इंधन म्हणून वापर सुरु केलेला तांदुळाचा फुफाटा हा एका चांगला धूररहित इंधन पर्याय आहे.

“ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे स्टोव्ह पुरवणं महत्त्वाचं होतं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की मायक्रो फायनान्सिंग, गुंतवणूक आणि क्षमता वाढवण्यासाठीच्या योजना या बाबीही व्यवसायासाठी प्रत्यक्ष उत्पादनाप्रमाणेच महत्त्वाच्या आहेत”, जयस्वाल म्हणतात, “सध्या फक्त तांदुळाच्या फुफाट्याचा इंधन म्हणून वापर करणा-या स्टोव्हचा विचार केला तर देशभरात आमची अशी एकमेव कंपनी आहे जी अशा प्रकारचे स्टोव्ह स्वत: बनवते आणि वितरितही करते.” ‘नवदुर्गा’चं मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशातच आहे. पण बिहार, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आणि मेघालय या राज्यंमध्येही ‘नवदुर्गा’च्या शाखा आहेत.

एका साध्या स्टोव्हच्या माध्यमातून ‘नवदुर्गा’ने तब्बल 30 हजार कुटूंबं, म्हणजेच जवळपास 1 लाख 80 हजार लोकंच्या आयुष्यात बदल घडवून आणलाय. त्यांच्याच अंदाजानुसार, हे स्टोव्ह विकल्यामुळे दरवर्षी सुमारे 60 हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचं ऊत्सर्जन कमी होतं. प्रत्येक ‘अग्नी राईस हस्क स्टोव्ह’ वर्षाला सरासरी 20 झाडं, स्वयंपाकाचे 730 तास आणि दोन टन ग्रीनहाऊस गॅसचं ऊत्सर्जन वाचवतो. याशिवाय ‘अग्नी राईस हस्क स्टोव्ह’मधून तयार होणारी कोळसा आणि फुफाट्याची राख शेतजमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते.

सध्या ‘नवदुर्गा’ शेतीमधून तयार होणा-या घनकच-यापासून इंधन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार भारतातील इतर राज्यांमधल्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. नुकताच ‘नवदुर्गा’नं ‘अग्नी मिड डे मिल स्टोव्ह’ तयार केलाय. त्या त्या ठिकाणची गरज ओळखून हे स्टोव्ह तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातल्या शाळांसाठी विविध आकारांमध्ये हे स्टोव्ह उपलब्ध आहेत. विभोर म्हणतो, “या वर्षाच्या अखेरीस आम्ही नेपाळमध्येही आमचं प्रोडक्ट पोहोचवणार आहोत.”

‘नवदुर्गा’ इतक्यावरच थांबणार नाहीये. 2016पर्यंत भारतभर तब्बल 2 लाख स्टोव्ह बनवून वितरित करण्याचा त्यांचा मानस आहे.

विशेष : 2014च्या ‘संकल्प पुरस्कारा’साठीच्या अंतिम स्पर्धकांमध्ये ‘नवदुर्गा’चा समावेश होता. ‘युअरस्टोरी’ 2014च्या ‘संकल्प अनकन्व्हेन्शन समिट’ची मीडिया पार्टनर होती.