इंजिनीअरची नोकरी सोडून गरजवंतांसाठी ते बनले टॅक्सी ड्रायव्हर  

0

स्वतःचे दु:ख सावरून दुसऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालणे सोपे नसते. ते पण अश्या परिस्थितीत जेव्हा कुणीतरी अगदी जवळची व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा स्वतःच्या दु:खाला कोणतीही परिसीमा रहात नाही. असे फक्त एखादा साहसी मनुष्यच करू शकतो जो जीवनातल्या वाईट व कठीण परिस्थितीत सुद्धा हार न मानता अश्या परिस्थितीचा सामना करतो. आपल्या पत्नीचे कष्ट बघून डोंगराला फोडून सार्वजनिक रस्ता बनवणाऱ्या बिहारच्या दशरथ मांझी बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकले असेल. मांझीची गोष्ट हा भूतकाळ झाला ज्यांच्या आठवणी व कहाणीच आता शेष राहिल्या आहेत. पण मांझी सारखीच एक व्यक्ती मायानगरी मुंबई -अंधेरीमध्ये आजपण आहे.  त्यांनी मात्र कोणताही डोंगर फोडून रस्ता बनवला नाही, कोणत्याही राजासारखे आपल्या राणीच्या आठवणीत एखादा अलिशान ताजमहाल बांधला नाही. हो पण, सुमारे ३० वर्षांपासून हजारो लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी गरजूंना मदतीचा विडा उचलला आहे. ते आपल्या टॅक्सीमधून रात्रीच्या अंधारात वेदनेने अस्वस्थ लोकांना दवाखान्यात पोहचवतात, ते सुद्धा नि:शुल्क व नि:स्वार्थ भावनेने. पैशाच्या बदल्यात ते कोणाकडून आशीर्वादाची सुद्धा अपेक्षा करत नाही, कारण या कामामुळे मिळणाऱ्या आनंदानेच त्यांना मन:शांती मिळते. असे असण्याचे कारण म्हणजे त्यांनी स्वतः हे दु:ख व आजार कधी काळी आपल्या डोळ्यांनी बघितला व अनुभवला व त्यानंतर सुद्धा त्यांचे हे टॅक्सीचालक होणे हे काय नशिबात लिहिले नव्हते, परंतु या पेशाला त्यांनी स्वतः निवडले होते. ते पण एका बहुराष्ट्रीय कंपनी मधील इंजिनिअरची नोकरी सोडून. इंजिनिअर ते टॅक्सी ड्रायव्हर बनण्याच्या मागे लपलेले त्यांचे दु:ख व आपल्याच व्यक्तीपासून दूर जाण्याची दारूण वेदना या कहाणीतून स्पष्ट होते.

कधी आपल्या नशिबावर करत होते गर्व

मुंबई मध्ये अंधेरीत रहाणारे व ११ भाषेचे ज्ञान असलेले ७४ वर्षीय विजय ठाकूर हे उत्तरप्रदेश मथुरा जिल्यातील एका संपन्न कुटुंबातून आलेले होते. मथुरा शहरातील एका सरकारी कॉलेजमधून सन १९६७ मधून पॉलीटेकनिकची पदवी संपादन करून नोकरीच्या शोधार्थ त्यांनी मुंबई गाठले. इथे एल अॅण्ड टी मध्ये त्यांना नोकरी मिळाली जवळजवळ १८ वर्ष त्यांनी या कंपनीत काम केले. याच दरम्यान त्यांचे लग्न होऊन त्यांना दोन मुले झाली. विजय ठाकूर यांचे आयुष्य अतिशय सुखात व समाधानात चालले होते त्यांना स्वतःचा मत्सर वाटायचा त्यांनी आयुष्यात कधीच कोणत्या प्रकारचे दु:ख बघितले नव्हते ते आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न सजवत होते. पण अचानक याला कुणाची तरी दृष्ट लागली. विजय यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, जिथे फक्त आयुष्यभराचे दु:ख व पिडाच होती. गरोदरपणात त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले. दुसऱ्या मुलाने व सुनेने त्यांची साथ सोडली. पुढचे आयुष्य जगण्यासाठी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. आता त्या मुलींचे संगोपन व गरीब रुग्णांची देखरेख हेच त्यांच्या आयुष्यातील मुख्य उद्दीष्ट आहे.

ती भयानक रात्र........ आणि एक इंजिनिअर, टॅक्सीवाला झाला

ही घटना १९८४ सालातील आहे. रात्री अडीचची वेळ होती. विजय ठाकूर यांच्या पत्नीला अचानक प्रसूती वेदना जाणवायला लागल्या. त्यांना त्यांच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी एका टॅक्सीची गरज होती. पण टॅक्सीमध्ये झोपलेल्या चालकांनी येण्यास साफ नकार दिला. तिकडे विजय ठाकूर यांच्या पत्नीचा त्रास वाढतच चालला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर एका ड्रायव्हरने येण्यासाठी संमती दर्शवली पण यासाठी त्यांनी बेहिशेब भाडे त्यांच्याकडून वसूल केले. ३२ वर्षापूर्वी त्या टॅक्सीवाल्याने ४ किमीसाठी ३०० रुपये घेतले. विजय ठाकूर जेव्हा आपल्या बायकोला घेऊन दवाखान्यात पोहचले तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की जर वेळेत त्यांच्या पत्नीला आणले असते तर त्यांना वाचवता येणे शक्य झाले असते.

या घटनेनंतर नोकरीला दिला राजीनामा

या घटनेनंतर ठाकूर पूर्णपणे खचून गेले. मुबलक पैसा असूनही वेळीच उपचार न मिळाल्याने  ते आपल्या पत्नी व मुलाला वाचवू शकले नाही. याचे कारण फक्त टॅक्सीचालकांचे बेजबाबदार वागणे कारणीभूत होते. कठीण परिस्थितीत असणाऱ्या एका माणसाप्रती दुसऱ्या व्यक्तीच्या अश्या वर्तवणूकीमुळे ते खूप दु:खी होते. या घटनेबद्दल त्यांनी खूप विचार केला. अंततः या निष्कर्षावर पोहचले की कोणत्याही प्रवाशाला किंवा रुग्णाला आपल्या टॅक्सीमध्ये बसवणे किंवा नाही ही त्यांची इच्छा आहे व यासाठी तसा कोणताही बंधनकारक कायदा नाही. टॅक्सीचालकांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे अनेक लोक त्रस्त असतील. यासाठी त्यांनी स्वतः टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. खास करून अश्या लोकांसाठी ज्यांना रात्रीच्या वेळेस त्यांची नितांत गरज असेल. यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या सहकाऱ्यांना जेव्हा खरे कारण कळले तेव्हा त्यांनी खूप समजावले पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. नोकरी सोडून टॅक्सी विकत घेतली व चालवण्यास सुरवात केली. तेव्हा पासून रात्रीच्या वेळेस ते गरजवंतांची गरज पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात.

रुग्णांकडून भाडे घेत नाही

विजय ठाकूर कधी दिवसा तर कधी रात्रपाळी मध्ये काम करतात. पण रुग्णांसाठी ते २४ तास तत्परतेने उभे रहातात. रुग्णांकडून ते कोणतेही भाडे घेत नाही. त्यांच्या टॅक्सीच्या मागे त्यांचा मोबाईल नंबर व संदेश लिहिलेला आहे कुणीही फोन करून त्यांना बोलावू शकतो. ठाकूर सांगतात की, "कमाई कितीही असली तरी खर्चांपुढे नेहमीच कमी पडते. सध्यातरी मी महिना १५ हजार रुपये कमवत आहे. जगण्यासाठी पैसा कमवायचा आहे का पैश्यासाठी जगायचं आहे हे आपण ठरवायचे. गरीब व गरजवंतांची मदत करून मला आत्मिक समाधान मिळते, जे कधी पैशाने विकत घेता येत नाही.”

मुलीचे वाचवले प्राण

विजय ठाकूर एका घटनेची आठवण सांगतात की, "एकदा एका कार दुर्घटनेत एक महिला व मुलगी गंभीर जखमी झाल्या दोघींना मी एका दवाखान्यात पोहचवले, जेथे त्या स्त्रीचा मृत्यू झाला, पण मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले. या घटनेनंतर त्या स्त्रीच्या नव-याने जे खूप मोठे व्यावसायिक होते त्यांनी माझे आभार मानून माझ्या समोर तिजोरी उघडी केली, किती पैसे पाहिजे तेवढे घेऊन जा, पण हे माझ्या तत्वात बसत नव्हते म्हणून असे करायला मी नकार दिला.”

दुसऱ्या घटनेचा उल्लेख करतांना त्यांनी सांगितले की, एकदा आगीत जळालेल्या स्त्रीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी टॅक्सीवाल्यांनी नकार दिला. पण त्यांनी तत्परतेने त्या स्त्रीला दवाखान्यात पोहचवले. विजय अडचणीच्या वेळेस रुग्णांना दवाखान्यातच पोहचवतात असे नाही तर ते पूर्णपणे नीट होईपर्यंत त्यांची विचारपूस करतात, त्यांनी मुंबई २००५ व २००८ मध्ये आलेल्या पुरात लोकांची खूप मदत केली.

टॅक्सीवाला म्हटल्यामुळे होते गर्वाची अनुभूती

विजय ठाकूर यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त रुग्णांना दवाखान्यात पोहचवण्याची मदत केली आहे. आता त्यांचे वय ७४ वर्ष आहे. ते सांगतात की जेव्हा मला कुणी टॅक्सीवाला म्हणतात तेव्हा मला गर्वाची अनुभूती होते. ठाकूर यांना त्यांच्या या कामासाठी देशातच नाहीतर पूर्ण जगात लोक ओळखतात. त्यांना फोन करून त्यांची खुशाली विचारतात. त्यांच्या या कामाची अनेक सिनेकलाकारांनी प्रशंसा केली आहे विजय ठाकूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका दूरदर्शनवाहिनीवर मुलाखत सुद्धा दिली आहे. अनेक वृतपत्र व वाहिन्यांनी त्यांच्या चांगल्या कामाच्या बातम्या प्रसारित केल्या आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दशरथ मांझी...पहाडाला हरवणारा माणूस !

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चार दशकांपासून घेतलाय भारताला स्वच्छ करण्याचा वसा  

‘हिंडन’ नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा भगीरथ प्रयत्न म्हणजेच विक्रांत शर्मा

लेखक – हुसैन तबीश
अनुवाद – किरण ठाकरे