देहदानाविषयी जनजागृतीसाठी सक्रीय ‘दधीचि देहदान मंडळ’

0

आपले आयुष्य, आपला वेळ इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, गरजूंच्या मदतीला धावणारी अनेक देवमाणसे आपल्या समाजात आहेत. गरजू व्यक्तींची मदत करुन दुसऱ्यांच्या कामी येण्याचा संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. देहदानाच्या मार्गाने अशा व्यक्तींना हे मनाचे मोठेपण मरणोत्तरही जपता येऊ शकते. केवळ अशा व्यक्तींनाच नाही तर आयुष्याच्या धकाधकीत समाजाचे ऋण फेडायचे राहून गेलेली प्रत्येक व्यक्ती आपला देह दान करुन मरणोत्तर कुणाच्या तरी कामी येऊ शकते. मात्र देहदानाची ही संकल्पना आपल्या समाजात अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. कुणी धर्माच्या विरोधात म्हणून तर कुणी आप्तस्वकीयांच्या देहाची चिरफाड करु द्यायला मन धजावत नाही म्हणून देहदानाला विरोध करते. अशा सर्वांना देहदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम ‘दधीचि देहदान मंडळा’च्या माध्यमातून डोंबिवलीचे गुरुदास तांबे आणि त्यांचे सहकारी गेली २९ वर्ष निरंतर करीत आहेत.

१९८७ साली गुरुदास तांबे स्वेच्छा निवृत्त झाले. “त्यावेळी पुण्याचे ग. म. सोहनी देहदानाच्या प्रचाराचे कार्य करीत होते. त्यांची संस्था नोंदणीकृत नसल्याने त्यांच्या मरणानंतर त्यांच्या संस्थेचं कार्य थांबलं. मी त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. त्या भाषणाने मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर मी मुंबईतील रुग्णालयांमध्ये जाऊन खरोखरच परिस्थिती सोहनी यांनी सांगितल्याप्रमाणे आहे का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जे जे रुग्णालयात मला चांगला प्रतिसाद मिळाला. तिथल्या ऍनाटोमी विभागाच्या लेले मॅडमकडून मला समजलं की खरोखरच वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसे देह मिळत नाहीत. दहा विद्यार्थ्यांमध्ये मिळून एक देह अभ्यासासाठी वापरला जातो. हे देह फॉर्मालिनचा वापर करुन जतन केले जात असल्यामुळे यासाठी केवळ चांगल्या अवस्थेतील देह लागतात. रस्त्यावरचे, अपघात झालेले देह चालत नाहीत. ही सत्य परिस्थिती स्वतः जाणून घेतल्यानंतर मी सोहनी यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार केला आणि सहा-सात मित्रांच्या सोबतीने १८८७ मध्ये ‘दधीचि देहदान मंडळा’ची स्थापना केली. १९८८ मध्ये ही संस्था रजिस्टर करुन घेतली,”

आपली मजबूत हाडे इंद्र देवाचे शस्त्र बनून देवलोकीच्या रक्षणाकरिता कामी यावी म्हणून आपला देह त्यागणाऱ्या दधीचि ऋषींचे नाव या मंडळाला देण्यात आले आहे. “आपले देह निधनानंतर तसेही फुकट जातात. तेव्हा देहदान केल्यास ते कुणाच्या तरी उपयोगी येऊ शकतील ही धारणा लोकांमध्ये रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही निरनिराळ्या संस्था, विविध सभा, कॉर्नर मिटींग्ज अशा ठिकाणी आमचा विषय मांडतो. ज्यांना विषय पटतो, देहदान करायची तयारी असते अशा लोकांना आम्ही फॉर्म देतो,” असं तांबे सांगतात. या फॉर्मकरिता केवळ पाच रुपये शुल्क आकारले जाते. पूर्णपणे भरलेल्या फॉर्मबरोबर देहदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तीचे दोन फोटो आणि रुपये २०१ आजीव सभासद वर्गणी घेतली जाते. त्याची त्यांना रितसर पावती आणि ८० जी सर्टिफिकेट दिले जाते. त्याचबरोबर देहदानाविषयी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जातात.

या संस्थेमध्ये दर तीन महिन्याला जवळपास ५० ते ६० जण सभासद नोंदणी करतात. “आमच्याकडे नोंदणी केलेल्या सभासदाचा अर्ज आम्ही रुग्णालयात पोहचवतो. देहदान करणाऱ्या व्यक्तीचे रहाण्याचे ठिकाण लक्षात घेऊन त्यानुसार सभासदांचे अर्ज जे. जे. रुग्णालय किंवा कळवा रुग्णालयाच्या मेडिकल कॉलेजला नेऊन देतो आणि तिथून त्यांचे ओळखपत्र बनवून आणून ते त्यांना सुपूर्द करतो. हे ओळखपत्र आम्ही त्यांना नेहमी त्यांच्यासोबत ठेवायला सांगतो. जेणेकरुन ते प्रवासात असताना किंवा एखाद्या दुसऱ्या शहरात असताना एखादी दुर्घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तरी त्यांच्या खिशातील ओळखपत्रामुळे त्यांचा देह ते असलेल्या परिसरातील रुग्णालयातही स्वीकारला जाऊ शकतो,” तांबे सांगतात.

या संस्थेने आता देहदानाबरोबरच नेत्रदान, त्वचादान, अवयवदान याबाबतही जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. “गेल्यावर्षीपासून आम्ही अवयव दानासाठी निधी उभारायला सुरुवात केली आहे. किडनी प्रत्यारोपण करायचं म्हटल्यास आज सरकारी रुग्णालयात किमान पाच ते सहा लाख खर्च येतो तर खाजगी रुग्णालयात यासाठी १० लाखाच्या पुढे रक्कम मोजावी लागते. हे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचं आहे. म्हणूनच आम्ही अवयवदानाकरिता निधी उभारायचं ठरवलं. सुरुवातीला २५ लाख उभे करायचं निश्चित केलं. मात्र एवढी रक्कम जमा व्हायला खूप वेळ लागेल हा विचार करुन १५ लाख जमा झाल्यावर त्यावर मिळालेली एक लाख रुपये व्याजाची रक्कम गरजूंना वाटायची असं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे अर्ज तयार करुन हॉस्पिटल्सना पाठविले. त्यापैकी एक अर्ज भरुन आला आहे. ५४ वर्षांच्या एका गृहस्थाने १६ वर्षांच्या मुलाला किडनी दिली आहे. त्यांना आता अनुदान दिलं जाईल,” असं तांबे सांगतात.

“सभासदांकरिता तीन प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये तिळगुळ कार्यक्रम असतो. यावेळी पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार केला जातो. दर दोन वर्षांनी सर्वसाधारण सभा असते. तसेच दर वर्षी दधीचि ऋषींची जयंती साजरी केली जाते. याचबरोबर दर तीन महिन्यांनी ‘पत्रिका’ नावाचे त्रैमासिक सभासदांना दिले जाते. त्याशिवाय प्रत्येक सभासदाला त्याच्या वाढदिवशी हाताने लिहिलेले शुभेच्छापत्र पाठविले जाते,” असं तांबे सांगतात.

ते पुढे सांगतात, “आमच्या ‘पत्रिका’ या त्रैमासिकातून आम्ही देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, इच्छामरण असे विविध विषय हाताळतो. याविषयीची नवनवीन माहिती सभासदांना देत असतो. त्याशिवाय या त्रैमासिकामध्ये दर तिमाहीला नोंदणी केलेल्या नवीन सभासदांची नावे, मृत सभासदांची नावे, देणगीदारांची नावे, संस्थेबद्दलची माहिती इत्यादी तपशील असतो. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आम्ही सभासदांना देहदानाविषयी प्रत्यक्ष सूचना देण्याबरोबरच या त्रैमासिकामधूनही त्या सूचना तसेच आमचे संपर्क क्रमांक देत असतो. जेणेकरुन देहदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुढे नेमके काय करावे याबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती राहिल, ते आम्हाला संपर्क साधू शकतील. जर मृत व्यक्ती बरेच दिवस अंथरुणाला खिळलेली असेल आणि त्यामुळे तिला जखमा झाल्या असतील, किंवा कॅन्सर पेंशट किंवा एड्स पेशंट असेल तर त्यांचा देह रुग्णालयाकडून स्वीकारला जात नाही. कारण असा देह जतन करता येत नाही. म्हणून रुग्णालयात नेण्यापूर्वी पेशंटची स्थिती काय होती हे त्याच्या डॉक्टरकडून जाणून घेणं महत्त्वाचं असतं. त्या परिस्थितीत वारसांना हे सगळं करावं लागू नये म्हणून त्या व्यक्तीचे निधन झाल्याची बातमी आम्हाला कळवायला सांगतो. त्याचबरोबर ते आम्हाला आमच्याकडे रेकॉर्ड ठेवण्याच्या दृष्टीनेही गरजेचे असते.”

ग. म. सोहनी यांच्याप्रमाणेच देहदानासाठी कार्यरत असलेले आणि देहदान सहाय्यक समितीचे अध्यक्षपद भूषविलेले ना.ग.गोरे यांच्याबाबत तांबे यांनी सांगितलेली गोष्ट अचंबित करणारी होती. ते सांगतात, “आयुष्यभर देहदानाचा प्रचार करणाऱ्या ना. ग. गोरे यांचे मात्र देहदान होऊ शकले नाही. त्यांच्या मुलीने आणि जावयाने देहदान करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे त्यांचे जावई स्वतः डॉक्टर होते. आपल्या माणसाच्या शरीराची चिरफाड नको म्हणून किंवा धर्मांधता या कारणांमुळे देहदानाला लोकांचा विरोध असतो. ना. ग. गोरे यांच्याबरोबर घडलेल्या घटनेनंतर १९९५ मध्ये आम्ही देहदान शंका समाधान नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. ज्यामध्ये नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान आणि इच्छामरण असे पाच विषय हाताळण्यात आले आहेत. १४० पानांच्या पुस्तकाची सहावी आवृत्ती नुकतीच २४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली.”

तांबे सांगतात, “सुरुवातीच्या काळात आम्हाला खूप विरोध सहन करावा लागला. लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. धर्माविरोधात काम करतो असं म्हणून मला समारंभाच्या ठिकाणी डावलण्याचे प्रकारही घडले. मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे. लोक स्वतःहून देहदानासाठी पुढे येत आहेत.”

‘दधीचि देहदान मंडळा’चे आज साडे तीन हजारच्यावर सभासद आहेत. “मुंबईमधील जवळपास एक हजार सभासद आहेत, पुण्यामधील दहा-बारा आणि पनवेल, नवी मुंबई, सोलापूर, नांदेड असे मुंबई बाहेरचे राज्यातले जवळपास १२५ सभासद आहेत. याव्यतिरिक्त डोंबिवलीतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे,” असं तांबे सांगतात. या संस्थेच्या मार्फत आजवर साडेपाचशेच्यावर देहदान झाले आहेत. हे आकडे गुरुदास तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या २९ वर्षांच्या मेहनतीचे फलित आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.