त्वचेच्या निगराणीकरिता कोईंबतूरच्या जोडप्याने आणलीत १०० टक्के सेंद्रीय उत्पादनं

नैसर्गिक उत्पादनांचा पोकळ दावा करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल

त्वचेच्या निगराणीकरिता कोईंबतूरच्या जोडप्याने आणलीत १०० टक्के सेंद्रीय उत्पादनं

Saturday April 30, 2016,

6 min Read


गेल्या काही वर्षांपासून ‘सेंद्रीय’ हा शब्द सतत आपल्याला सगळीकडून ऐकू येतो. उत्पादनांच्या वेष्टनावरची माहिती वाचा, हा सल्लाही मिळतोय. पण ही माहिती आरोग्य आणि पोषणमूल्याच्या बाबतीतच जास्त विचारात घेतली जाते.

क्रिम, शँपू किंवा लोशनच्या आवरणावरिल क्लिष्ट माहिती वाचायची खूप जास्त तसदी आपण घेत नाही. पण या कळत नसणाऱ्या शब्द आणि माहितीबाबत आपण गुगलवर शोधाशोध केली तर आपल्याला धक्कादायक सत्य कळेल की नैसर्गिक, सेंद्रीय, शुद्ध या शब्दांचा आसरा घेत या कंपन्या आपल्या माथी कोणती उत्पादनं मारत आहेत. या कंपन्याच्या जाहिरातींना भूलून आपलं माकड कसं बनवलं जातयं याचा साक्षात्कार होईल. आपणही सविस्तर माहिती न घेता ही सेंद्रीय उत्पादनं वापरत असतो.

३३ वर्षीय प्रितेश आशेर सांगतात, “आम्हीही या भूलथापांना भूलून उत्पादनं घ्यायचो. एक दिवस अचानक आमच्या ही गोष्ट लक्षात आली. एकदा रविवारी खरेदी करण्याच्या निमित्ताने आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. माझ्या पत्नीला तिच्या खरेदीत मी मदत करतोय असं भासवत होतो. इतक्यात नव्याने सुरू झालेल्या एका नैसर्गिक उत्पादनांच्या स्टॉलचा सेल्समन मला त्यांच्याकडील उत्पादनं दाखवू लागला. या उत्पादनांवरून नजर फिरवताना त्यावरिल सामानाची सूची (ingredients) वाचू लागलो. आणि मी हादरलोच. कारण आमच्या पेट्रोलियम उत्पादन केंद्रात प्रक्रियेकरता वापरण्यात येणाऱ्या कच्चा मालातील काही घटक या नैसर्गिक आणि सेंद्रीय लेबल असणाऱ्या वस्तूमध्ये होते. नैसर्गिक आणि सेंद्रीय असं लेबल आणि त्याच्या मागील सामानसूचीतला विरोधाभास माझ्या लक्षात आला. सामानसूचीतच तीव्र परिरक्षक (preservatives), पॅराबेन्स, खनिजतेल, सिंथेटिक रंग, कृत्रिम सुगंध आणखीही बऱ्याच गोष्टी यात होत्या”.

या उत्पादनांच्या ‘नैसर्गिक’ नावाच्या पडद्याआड ग्राहकांच्या माथी रासायनिक गोष्टी मारण्यात येत होत्या. कारखाने आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राला लागणाऱ्या वंगणाची (lubricants) निर्मिती प्रितेश करत असल्यामुळे या गोष्टी काय आहेत हे त्याच्या चटकन लक्षात आलं. या क्षेत्राची माहिती नसणाऱ्या लोकांना या गोष्टी काय आहेत याचा जराही अंदाज बांधता येणार नाही. प्रितेशने त्याची पत्नी मेघाच्या नजरेस ही गोष्ट आणून दिली. मेघालाही याचं प्रचंड आश्चर्य वाटलं. पण बाजारात याच गोष्टी उपलब्ध असल्याचं मेघाने प्रितेशला सांगितलं. आणि मग तिच्या विचारांचं चक्र फिरू लागलं. तिला एक कल्पना सुचली...

रविवारची मॉलमधली खरेदी त्यांच्याकरता चांगलीच महत्त्वाची ठरली. ते सांगतात, “आम्ही शुद्ध नैसर्गिक उत्पादनांचा शोध घेऊ लागलो. पण आमच्या हाती काही लागलं नाही. आम्ही आमच्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबतही याबाबत चर्चा केली. पण त्यांनाही नैसर्गिक अथवा सेंद्रीय उत्पादनांमधील रासायनिक घटकांबाबत फारच कमी माहिती होती. त्वचेशी संबंधित उत्पादनांमध्ये असणाऱ्या रासायनिक घटकांबाबत आणि त्यांच्या घातक परिणामांबाबत फारच कमी जणांना थोडीफार माहिती होती. पण पूर्णतः नैसर्गिक अथवा सेंद्रीय उत्पादन बाजारात उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना उपलब्ध गोष्टी घेण्यावाचून पर्याय नव्हता”.

बाजारात खऱ्या अर्थाने नैसर्गिक आणि सेंद्रीय असणाऱ्या उत्पादनाची प्रकर्षाने गरज होती. आशेर जोडप्याने याकरता प्रयत्न करायचं ठरवलं. त्वचेच्या निगराणीकरता शुद्ध नैसर्गिक उत्पादनं बनवण्याच्या ध्येयाने २०१४ मध्ये स्वतःचा ब्रँड आणण्याच्या कामाला त्यांनी सुरूवात केली. कोईंबतूरमध्ये ‘ज्युसी केमिस्ट्री- जेसी (Juicy Chemistry - JC)’ या नावाने त्यांनी नैसर्गिक गोष्टी वापरुन आपला ब्रँड बाजारात आणला.

मेघा आणि प्रितेश आशेर, संस्थापक, ज्युसी केमिस्ट्री

मेघा आणि प्रितेश आशेर, संस्थापक, ज्युसी केमिस्ट्री


image


वेगवेगळ्या फॉर्म्युलांवर काम करण्यामध्ये मास्टर असणारा प्रितेश कामाला जुंपला. त्वचेच्या निगराणीकरता आवश्यक असणाऱ्या सेंद्रीय गोष्टींचं, साध्यासोप्या पद्धतीने उत्पादनांमध्ये परिवर्तन करण्याकरता जेसी काम करू लागलं. संशोधनानंतर त्यांना भयंकर माहिती कळली की, बहुतांश उत्पादनांमध्ये पेट्रोकेमिकल पदार्थांचा पॅराफिन, परिरक्षक, ग्लायकोल्स, कृत्रिम रंग आणि सुगंध या ना त्या रुपात समावेश आहेच. या पदार्थांमुळे त्वचेवर घातक परिणाम होतात.

image


या सगळ्यात परिवर्तन आणण्याकरता जेसीने काही गोष्टी केल्या. त्यांनी खनिजतेलाऐवजी पौष्टीकमूल्य असणाऱ्या लोणी आणि तेलाचा वापर सुरू केला. कृत्रिम सुगंधाऐवजी सेंद्रीय आणि मान्यताप्राप्त तेलं, कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक माती, ताजी फळ आणि भाज्या, प्लॅस्टिक एक्सफोलिएन्ट ऐवजी एएचए समावेश असणारी साखर. पेट्रोलियम उत्पादनांऐवजी अशा नैसर्गिक गोष्टी वापरल्याने साहजिकच रासायनिक घटक नामशेष झाले आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक उत्पादन तयार झालं.

मेघा म्हणते, “आम्ही तयार केलेल्या मिश्रणातून पाण्याचा अंश काढण्यात यशस्वी झालो. घातक परिरक्षकं, इम्युलसिफायर आणि पॅराबेन यांच्याशिवाय उत्पादनं तयार करता येऊ लागले. आमची उत्पादनं खूप काळ टिकणारी नाहीत, पण त्यांच्यामुळे कोणतीही हानी होत नाही तर ती आरोग्याकरता गुणकारी आहेत”.

आशेर पतीपत्नी म्हणतात, “नैसर्गिक असं लेबल मिरवणाऱ्यांना ‘नैसर्गिक’ हे नाव वापरुन केवळ धंदा करायचा असतो”. ग्राहकांना अतिउत्तम उत्पादनं मिळावीत याकरता जेसी कानाकोपऱ्यातून सेंद्रीय वस्तू आणते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि आड भागातूनही कच्चा माल आणावा लागत असल्याने तसेच उत्पादन निर्मितीप्रक्रियाही किचकट असल्याने तयार उत्पादनाची किंमत वाढते. किंमत जास्त असल्याने सध्या मर्यादीत ग्राहकच या उत्पादनाचा वापर करतात. त्यांना आता त्यांची ग्राहकसंख्या वाढवण्यावर भर द्यायचा आहे.

प्रितेश म्हणतो, “आम्ही उत्तम दर्जाचा सेंद्रीय कच्चा माल वापरतो. उत्तम माल आणि आमचे काबाडकष्ट यामुळे आमचं उत्पादन उच्च दर्जाचचं बनतं. यासर्वाचा परिणाम उत्पादनाच्या किंमतीवर होतो”.

image


मेघा काही उदाहरणाने जास्त किंमतीचं गणित समजावते. ती म्हणते, लहान मुलांकरता कोरफड आणि सुवासिक फुलांचा साबण बनवण्यासाठी आम्ही पारंपरिक कोल्ड प्रेस्ड पद्धत वापरतो. सेंद्रीय एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, सुवासिक फुलांचं तेल, व्हर्जिन खोबरेल तेल, कोरफड, शुद्ध पाणी, सोडियम हायड्रॉक्साइड (सॅपोनिफिकेशन प्रक्रियेनं तेलाला साबणामध्ये परिवर्तित करण्याकरता. साबण तयार झाल्यावर सोडियम हायड्रॉक्साइडचा अंश शिल्लक राहत नाही.) सध्याच्या एका अग्रेसर कंपनीच्या लहान बाळांकरता असणाऱ्या साबणात खोबरेल तेल, इथेनॉल, पाणी, सुक्रोस, सोडियम हायड्रोक्साइड, ग्लिसरिन, एरंडेल तेल, सायट्रिक अॅसिड, सुगंध, पीइजी ४० हाइड्रोजेनेटेड कॅस्टर ऑइल, ट्रिडेथ-9, प्रोपायलेन ग्लायकॉल, जोजोबा ऑईल, टेट्रा सोडियम इडिटिए हे घटक आहेत.

महसूल-

जेसीची सध्या सुरूवात आहे. अठरा महिन्यांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मेघा म्हणते, “वैयक्तिक काळजीच्या उत्पादनांबाबत ग्राहक खूप सजग असतात. या विभागातली उत्पादनं ते चटकन बदलत नाहीत. बाजारात आता आमची ओळख निर्माण झालीय. आम्ही स्वतःला सिद्ध केलं आहे. आमचे जुने ग्राहकच आता आमची जाहिरात करतात आणि नवीन ग्राहकांना आमच्याकडे आणतात”. कमी अवधीतच देशातच नाही तर परदेशातले मिळून दहा हजाराहून अधिक जण त्यांचे नियमित ग्राहक आहेत. देशातल्या २५ राज्यात आणि २० देशांमध्ये त्यांची उत्पादनं मिळतात.

image


जेसीकडे लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुष सर्वांकरता त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं आहेत.

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये वितरणाकरता जेसीकडे खूप जण चौकशी करत आहेत. सध्या ते बीटूसी तत्वावर वितरण करत आहेत. लक्जुरी स्पा आणि मोठमोठ्या रिसॉर्टस् मध्ये त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे.

शाश्वत आणि सामाजिक बांधिलकी

शाश्वतता आणि पारदर्शकता या दोन मूल्यांवर जेसीचं काम चालतं. मेघा आणि प्रितेश म्हणतात, “जेसीच्या उत्पादनांमध्ये घातक रसायनं, पॅराबेन्स, पथॅलेटस् आणि सल्फेट यासारखे कोणतेही घटक नाहीत. उत्पादन प्रक्रियेदरम्यान किंवा नंतरही पाण्याचे स्त्रोत आणि जलचरांवर काहीही परिणाम होत नाही. उत्पादनावर ‘ग्रीन वॉश्ड’ लेबल म्हणजेच पर्यावरणस्नेही आहे. आम्ही दोघेही आमच्या व्यवसायातली प्रत्येक पातळी शाश्वत कशी असेल हे पाहतो. आमची उत्पादनं रसायनमुक्त असण्यासोबतच प्राण्यांवर त्यांची परिक्षा करण्यात येत नाही. पुनर्वापर करता येणाऱ्या वेष्टनात ती आम्ही ग्राहकांपर्यंत पोहचवतो”.

लघुउद्योगांना चालना मिळावी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याकरता जेसी त्यांच्या उत्पादनांचं पॅकिंग स्थानिक पातळीवर बांबूचे बास्केट्स, बांबू हॅम्पर्स, गिफ्ट बास्केट्स यामध्ये करते. मुलांच्या शिक्षणाकरता आणि महिला सक्षमीकरणाकरता ते सामाजिक-आर्थिक कार्यक्रम राबवतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याकरता बचत गटांमार्फत महिलांना दर्जेदार वस्तूंचं उत्पादन करण्यास शिकवलं जातं. तसेच मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिलं जातं आहे.

आव्हानं आणि वाटचाल

मेघा सांगते, “आमच्या या नवीन पण वेगाने वाढणाऱ्या व्यवसायात पैशाचा ओघ कायम ठेवणं खूप कठिणं जातं. कुशल कामगारांची वानवा किंवा प्रशिक्षणानंतर काम सोडणं यामुळे बाजारातल्या मागणीनुसार पुरवठा, किंमतीत सातत्यता, उत्पादनाचा दर्जा या गोष्टींवर परिणाम होतो. स्टार्टअप म्हणून आम्ही बाजारात आमच्या उत्पादनांना उतरवलं आणि लोकांची त्याला पसंतीही मिळाली. पण कुशलतेने ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक दर्जेदार उत्पादनं पुरवणं हे आमच्यापुढे सध्या आव्हान आहे”.

जेसीने व्यवसाय वाढीकरता जोरदार कंबर कसायला सुरूवात केली आहे. पुढील आर्थिक वर्षात मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूत त्यांच्या उत्पादनांची दुकानं ते सुरू करणार आहेत. जेसीचे बहुतांश ग्राहक त्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळे ते सध्या ऑनलाईन जाहिरात आणि विपणनावरही भर देत आहेत. जेसीच्या उत्पादनांना तिसऱ्या कोणत्यातरी मान्यताप्राप्त संस्थेकडून मान्यता मिळावी याकडेही ते गंभीरपणे लक्ष देत आहेत. समिपाला या दाम्पत्यानं सांगितलं की “आमच्या उत्पादनांना मान्यता मिळाल्यावर त्वचेच्या निगराणीची दर्जेदार उत्पादनं पुरवण्याच्या आमच्या ध्येयाची पूर्तता होईल”.

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

‘सेव्हऑनमेडीकल्स’- वैद्यकीय खर्चातील बचतीसाठी मदत करणारे विशेष माध्यम 

रातुल नरेन यांचं ‘बेंपु ब्रेसलेट’ अपुऱ्या वजनाच्या बालकांना देतयं संजिवनी

वेगन फॅशनसंदर्भात समाजात सजगता निर्माण करणारे 'एड्रेस चिक' 

लेखिका – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे