जगातील सर्वात मोठ्या घुमटाची आगळीवेगळी बांधकाम शैली - एमआयटी टेेक्निक - प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी

0
विश्‍वशांती केंद्र (आळंदी) च्या राजबाग येथील शैक्षणिक परिसरात साकार होत आहे अतिविशाल घुमट!
विश्‍वशांती केंद्र (आळंदी) च्या राजबाग येथील शैक्षणिक परिसरात साकार होत आहे अतिविशाल घुमट!

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत तर्फे राजबाग लोणी काळभोर येथील शैक्षणिक परिसरात जगातील सर्वात मोठ्या घुमटाकार इमारतीची अतिशय आगळ्यावेगळ्या अशा ‘एमआयटी टेक्निक’ पद्धतीने उभारणी होत आहे. संस्थेतर्फे पुणे शहर व परिसरातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअर्स्, आर्किटेक्ट्स् व इतर संबंधित व्यावसायिकांना ही उभारणी प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याचे व अभ्यास करण्याचे जाहीर निमंत्रण या पत्रकाद्वारे देण्यात येत आहे.

सध्या जगातील सर्वात मोठा घुमट हा व्हॅटिकन सिटी (रोम) येथील सेंट पीटर्स् बॅसिलिका या इमारतीवर आहे, ज्याचा व्यास आहे सुमारे 137 फूट. विश्‍वशांती केंद्रातर्फे उभारण्यात येणार्‍या घुमटाचा व्यास 160 फूट इतका असून, पूर्ण झाल्यानंतर तो जगातील सर्वात मोठा घुमट असेल. या घुमटाचे सुमारे दोन तृतीयांश इतके बांधकाम पूर्ण झाले असून अंतिम एक तृतीयांश बांधकाम, हे अतिशय क्लिष्ट, जिकीरीचे व आव्हानात्मक असून ते करण्यासाठी संस्थेने एक विशिष्ट बांधकाम शैली स्वत: विकसित केली असून, त्याला ‘एमआयटी टेक्निक’ असे नाव देण्यात आले आहे.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॅा. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या कल्पक व द्रष्ट्या संकल्पनेच्या व संरचनेच्या माध्यमातून राजबाग पुणे येथे अतिविशाल असे ‘वर्ल्ड पीस लायब्ररी अ‍ॅण्ड प्रेअर हॅाल’ उभारण्यात येत आहे. त्याचाच कळस म्हणून हा जगातील सर्वात मोठा घुमट बांधण्यात येत आहे. प्रा. डॅा. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विष्णु भिसे,  दिलीप पाटील, गोविंद आलेटी व त्यांचे सहकारी अहोरात्र हे आव्हानात्मक बांधकाम करीत आहेत.

वरील घुमटाच्या अखेरच्या टप्प्यासाठी 63 फूट लांबीच्या माईल्ड स्टीलच्या 72 कैंच्या (Trusses) तयार करण्यात आल्या आहेत. या कैंच्या जमिनीपासून उचलून घुमटाच्या वरच्या टप्प्यात अचूकपणे बसविण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची 88 मीटरची बलाढ्य क्रेन, पुण्याच्या इतिहासात प्रथमच या प्रकल्प स्थळावर कार्यान्वित करण्यात आली आहे. या कैंच्या उचलून त्या नियोजित ठिकाणी बसविण्याचे प्रत्यक्ष कार्य नुकतेच सुरू झाले असून, ते पुढचे 25-30 दिवस चालू राहील.

संस्थेतर्फे सर्व संबंधितांना, विशेषकरून अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी इतिहासात कदाचित प्रथमच वापरल्या जाणार्‍या या अनोख्या व आधुनिक तंत्रशैलीचा अभ्यास करण्यासाठी बांधकाम स्थळाला प्रत्यक्ष भेट द्यावी. अशा प्रकारची संधी कदाचित नजिकच्या भविष्यकाळात येण्याची शक्यता नसल्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा. या परिसरात हे बांधकाम पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

या संदर्भात श्री. दिलीप पाटील, इस्टेट मॅनेजर, राजबाग कॉम्प्लेक्स. मो. 8308453600 किंवा श्री. धावरे, साईट इंजिनिअर, मो. 9075636577 यांच्याशी संपर्क साधावा.