डान्स ते डान्सिंग शूज, जमील शाहांच्या स्वप्नांची रंजक कहाणी

0

मायानगरी मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोक येतात आणि या शहराच्या गर्दीत हरवून जातात. यातले काहीच जण असे असतात ज्यांची स्वप्न पूर्ण होतात. तर बहुतांश लोक स्वप्नं पूर्ण करण्याच्या नादात शहराच्या गर्दीचा हिस्सा बनून राहतात. पण ३३ वर्षीय जमील शाह यांनी मुंबईत स्वप्न घेऊन येणाऱ्या लोकांसाठी एक नवा आदर्श ठेवलाय. कठीण परिस्थितीतही ते या मुंबईच्या गर्दीत फक्त टिकून नाही राहीले तर त्यांनी आपलं नाव कमावलं. जमील शाह डान्सिंग शूज बनवतात. मोठ मोठ्या बॉलीवुड स्टार्स बरोबरच देशविदेशांतून त्यांच्या या डान्सिंग शूजला मागणी आहे.

जमील शाह मुळचे बिहारचे... दरभंगा जिल्ह्यातल्या दोघरा गावातले. घरातली परिस्थिती अगदी जेमतेम. आर्थिक परिस्थिती नसल्यानं जमील यांना शिक्षण सोडावं लागलं. पण त्यांची स्वप्न फार मोठी होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. त्यांना डान्सर व्हायचं होतं. पण परिस्थितीपुढे त्यांनी हात टेकले. पण स्वप्न पूर्ण करायचंच होतं. म्हणूनच त्यांनी दिल्ली गाठली. हाती पुन्हा एकदा निराशा आली. पण एक गोष्ट घडली जी त्यांना पुढे जाऊन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार होती. इथं जमील यांनी एका लेदर शूज कंपनीत काम केलं. काही दिवसांतच त्यांना चामड्याचे शूज बनवण्याच्या कलेत महारत प्राप्त झालं. पण दिल्लीत मन लागणं शक्य नव्हतं. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला.

जामील शाह यांनी १९९६ साली मुंबई गाठलं. अगोदर ते भिवंडीत रहायचे. तिथं पॉवरलूमवर काही दिवस काम केलं. पण ते न जमणारं होतं. म्हणूनच मग ते धारावीत आले. धारावीत राहण्याचे दोन फायदे होते. एक तर इथल्या लेदर फॅक्टरीत काम मिळणार होतं आणि त्यांना आपलं डान्सचं प्रेमही जोपासता येणार होतं. डान्सर व्हायचं पक्कं होतं. म्हणून जवळच डान्स क्लास सुरु केला. इथं एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ती म्हणजे डान्स करण्यासाठी विशिष्ट डान्स शूजचा वापर केला जातो. अगदी स्टार्सपासून मॉबमध्ये नाचणाऱ्या प्रत्येकजणांना हे डान्सिंग शूज हवे असतात. बहुतांश वेळा हे डान्सिंग शूज परदेशातून आणण्यात येतात. त्यामुळं ते महागडे असतात. हे जाणून घेऊन जमील शाह यांना हे शूज तयार करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी या व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. आधी त्यांनी स्वतःसाठी डान्सिंग शूज बनवले. क्लासमध्ये त्याचा प्रयोग केला. त्यानंतर मित्रांना बनवून दिले. अशाप्रकारे त्यांच्या या पूर्णपणे भारतीय डान्सिंग शूजची चर्चा सर्वत्र झाली. त्याला मागणीही येऊ लागली.

गेल्या 8 ते १० वर्षांच्या काळात शाह लेदर वर्क या त्यांच्या कंपनीची व्याप्ती चांगलीच वाढलेय. शाहरुख खान, कॅटरिना कैफ, बिपाशा बासू, ऋतिक रोशन, आमिर खान प्रियंका चोपडा आणि नच बलिये सारख्या रिएलिटी शोसारख्या कार्यक्रमांमधले स्पर्धक शाह शूजच पसंत करतात. भारतातल्या विविध शहरात आपल्या शूज कंपनीचे स्टोर सूरु करण्याचा जमील शहा यांचा मनसूबा आहे. आता त्यांच्या शूजला परदेशातूनही मागणी येऊ लागलेय. परदेशी ब्रांडच्या नावाखाली लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी 'शाह शूज मेड इन इंडिया' हा चांगला पर्याय आहे असं जमील छातीठोकपणे सांगतात.