कल्पना सरोज यांच्या कल्पनातीत भरारीची कहाणी

यशस्वी व्यक्तीची कहाणी सर्वांनाच आकर्षित करते. यशोगाथा वाचून लोक यशाचा मूलमंत्र जाणून घेतात. जगभरात लोकांना प्रेरणादायी ठराव्या अशा अनेक यशोगाथा आहेत. रोज नवनवीन कहाण्या लिहिल्या जात आहेत. या प्रेरणादायी कहाण्या वाचून अनेकांमध्ये सकारात्मक परिवर्तन होत आहे, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होत आहे. पण प्रत्येक प्रेरणादायी कहाणी लोकांच्या लक्षात राहतेच असे नाही. काही कहाण्या कालोघात लोप पावतात. तर काही कहाण्या वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या प्रभावशाली ठरतात. त्यांची लोकप्रियता कायम राहते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे कल्पना सरोज यांची. ही कहाणी कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे, बोधकथा ठरली आहे. कल्पना सरोज या भारतातल्या सर्वात यशस्वी महिला उद्यमींपैकी एक आहे. त्यांची कहाणी वेगळी आहे, छाप पाडणारी आहे, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका गावातल्या महिलेची आहे. या कथेत अनेक चढउतार आहे, संघर्ष आहे, नैराश्य आहे, निरागसता आहे, अपयश दडलेले आहे मात्र या अपयशातच भलेमोठे यश दडलेले आहे. शेणाच्या गोवऱ्या विक्रीपासून ते थेट कोट्यावधींचा व्यवसाय करणाऱ्या या यशस्वी महिला उद्यमीचा प्रवास थक्क करणारा आहे. एक गरीब महिला ज्यांच्याकडे मुंबईमध्ये राहायला घर देखील नव्हते, त्यांनी बांधकाम व्यवसायात यशाची शिखरे पादाक्रांत करत मुंबई सारख्या मायानगरी मध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नाव कमावले. एका दलित कुटुंबात जन्म झालेल्या सरोज यांच्या घरात कोणताही व्यावसायिक वारसा नसताना प्रसिद्ध उद्योगपती रामजी हंसराज कमानी यांच्या बुडीत खात्यात गेलेल्या कोट्यावधीच्या कंपनीला पुन्हा उभारी देत त्याच्या मालकीण झाल्या. कल्पना सरोज यांनी आपल्या जीवनात जातीवाद, गरीबी, बाल-विवाह, सासरच्या लोकांकडून छळ, , अपमान, निंदा, तिरस्कार, धमक्या, अपघात या साऱ्याचा अनुभव घेतला आहे. असह्य अशा परिस्थितीसमोर हात टेकत त्यांनी एकदा आत्महत्या देखील करायचा प्रयत्न केला, मात्र त्यातून त्या बचावल्या. कल्पना यांची कहाणी अनेकांना एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटते. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, इमानदारी, साहसी वृत्तीने मार्गक्रमण करत उतुंग उंची गाठणाऱ्या कल्पना यांची कहाणी सर्वसामान्याना विचार करण्यास भाग पाडते.

कल्पना सरोज यांच्या कल्पनातीत भरारीची कहाणी

Thursday November 10, 2016,

29 min Read

कल्पना सरोज यांचा जन्म महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात रोपड़खेड़ा गावात झाला. त्यांचे वडील महादेव पोलीस खात्यात हवालदार होते. आई गृहिणी होत्या. महादेव यांना तीन अपत्ये होती. तीन मुली आणि तीन मुले. बहिण भावंडांमध्ये कल्पना धाकट्या तसेच वडिलांच्या सर्वात लाडक्या होत्या. कल्पना यांचे आजोबा शेतामध्ये मजुरी करायचे. त्यांनी जमीनदारांकडे नोकरीदेखील केली. त्यांना वाटायचे त्यांच्या मुलांनी त्यांच्या प्रमाणे मजुरी करू नये. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना शाळेत घातले. महादेव यांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मोठ्या कष्टाने त्यांनी पोलीस खात्यात नोकरी मिळवली. पोलीस खात्यात नोकरी असल्याने त्यांना राहायला सरकारी क्वॉर्टर मिळाले. असे असतानाही कल्पना आणि त्यांच्या परिवाराला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. कल्पना सांगतात की, “ पोलिस खात्यातही अशी माणसं होती, जी दलित समाजाला अतिशय तुच्छ समजत. अन्य समाजातील लोक त्यांच्या मुलांना आमच्याबरोबर खेळू देत नसत. त्यांच्याबरोबर उठबस करण्यास विरोध करत. उच्चवर्गीय आम्हाला घरात देखील येऊ देत नसत".

image


शेजारपाजारीच नाही तर शाळेत सुद्धा कल्पना यांना जातिभेदाला सामोरे जावे लागले. इतर मुलांच्या तुलनेत कल्पना खूप हुशार होत्या. अभ्यासातच नाही तर खेळात, नाचण्या-गाण्यात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यात त्या पुढाकार घ्यायच्या. या सर्व गोष्टींमध्ये त्यांना कमालीचा रस होता. मात्र त्यांना प्रोत्साहित करणे तर दूरच शाळेतील शिक्षक त्यांना कशातही भाग घेऊ देऊ नसत. दलित असल्याकारणाने इतर उच्चवर्गीय मुलांबरोबर त्यांना खेळण्यास, नाचण्या-गाण्यास मज्जाव केला जायचा. आपल्याला खेळण्यासाठी भाग घेता यावा म्हणून कल्पना आपल्या शिक्षकांना विनवण्या करायच्या मात्र जातीवादी शिक्षक कल्पना यांना भाग घेऊ देईनात. काहीतरी कारण सांगत कल्पना यांना टाळले जायचे. कल्पना सांगतात, “ शिक्षिका म्हणायच्या की तू नाही करू शकणार किवा त्या म्हणायच्या की – तू चांगल्या पद्धतीने नाही करू शकणार. शिक्षकांनी मला शाळेत कशातही सहभागी होऊ दिले नाही”.

कल्पना यांच्या मते, त्यांचा परिवार पोलीसलाईन मधील सरकारी घरामध्ये राहायचा, त्यामुळे परिस्थिती हाताळ्ण्याजोगी होती. त्या दिवसात गावपातळीवर, वस्त्यांमध्ये परिस्थिती फारच गंभीर होती. दलित समाजाला हीन लेखले जायचे. त्यांना वाईट वागणूक मिळायची. त्यांचे शोषण केले जायचे, अपमानित केले जायचे. उच्चवर्गीय दलितांच्या सावलीला देखील उभे राहत नसत. कल्पना एकदा आपल्या आजोबांसमवेत गावी गेल्या होत्या. तसे त्यांचे आजोबादेखील त्यांच्याच बरोबर राहायचे मात्र अधूनमधून गावीदेखील जायचे. असेच एकदा ते कल्पना यांना आपल्याबरोबर गावी घेऊन गेले असताना गावातल्या लोकांनी त्यांच्या आजोबांना जी वागणूक दिली ती पाहून कल्पना यांच्या बालमनावर फार वाईट परिणाम झाला. आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “ आजोबांना त्या लोकांनी घरात येऊ दिले नाही, तुटलेल्या भांड्यात त्यांना प्यायला पाणी दिले आणि वेगळ्या ठेवलेल्या कपात त्यांना चहा प्यायला दिला. ज्या पद्धतीने ते आजोबांशी बोलत होते, वर्तन करत होते ते पाहून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. लोकांचे असे वागण्यामागचे कारण जेव्हा मी आजोबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आपण दलित आहोत म्हणून उच्चवर्गीय लोक आपल्याशी असे वागतात.”

image


कल्पना यांना लवकरच कळून चुकले की लोकं जातीच्या नावाखाली भेदभाव करतात. गावांमध्ये दलित समाजाची वेगळी वस्ती असायची. कल्पना यांना समजत नव्हते की सर्वजण तर एकसारखीच हाडामासाची माणसं आहेत मग हा भेदभाव कशासाठी ? त्यांना हे समजायचे नाही जर इतर मुलं त्यांच्याबरोबर खेळले तर त्यांचे काय वाईट होणार ? त्यांना हे जाणून घ्यायचे होते त्या जर एखाद्याच्या स्वयपाकघरात गेल्यात तर त्यामुळे त्यांचे काय नुकसान होईल ? बालवय होते, समज यायची होती, त्यामुळे त्यांच्या समोरील परिस्थिती त्यांना समजून घेणे कठीण होते.

जातीवादाबरोबरच कल्पना यांना गरीब परिस्थितीचे चटकेदेखील सोसावे लागले. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला असून सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.

कल्पना यांचे कुटुंब खूप मोठे होते. घरात आई-वडील, आजोबा-काका तसेच तीन भाऊ आणि दोन बहिणी राहात होत्या. या सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या वडिलांवर होती. घरात कमावणारे ते एकटेच होते. छोट्याशा पगारात एवढ्या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणे कठीण होते. कल्पना सांगतात, “ त्या दिवसात माझ्या वडिलांचा पगार ३०० रुपये महिना होता. काकांच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांवरच होती. त्यांची आत्या देखील नेहमी घरी यायची. हे सारे पाहून मला वाटले की वडिलांना हातभार लावला पाहिजे.” वय लहान होते, मात्र कल्पना यांनी मोठा निर्णय घेतला. वडिलांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी लहानपणापासूनच कामं करायला सुरुवात केली. शाळा सुटल्यावर कल्पना जवळच्या जंगलात जाऊन लाकडे गोळा करून आणायच्या. लाकडाचा स्वयपाकघरात उपयोग केला जायचा किवा लाकडे विकून पैसे मिळत असत. कल्पना यांनी लहानपणापासूनच शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. पैसे कमावण्याच्या हेतूने त्यांनी गवत तोडणे, भुईमूग काढणे, कापूस गोळा करणे यासारखी कामे करू लागल्या. लहानपणी कल्पना यांनी शेणाच्या गोवऱ्यादेखील बनवून विकल्या. कल्पना सांगतात की, या कामाचे त्यांना कधी आठ आणे तर कधी बारा आणे मिळायचे. या मिळणाऱ्या पैशातून त्या आपल्या गरजा पूर्ण करत असत. लहानपणापासूनच लिहिण्याची वाचण्याची आवड असल्याकारणाने मी याच पैशातून महत्वाची पुस्तके खरेदी करत होत”.

image


कल्पना जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांचे विचार परिपक्व होऊ लागले होते. स्वतःच्या जबाबदारीची त्यांना जाणीव होऊ लागली होती. शाळेत सुट्ट्या लागल्यावर त्यांच्या बरोबरीच्या मुलींबरोबर त्या शेण गोळा करायला जात असत. त्या सांगतात की, “ मी माझ्या सवंगडी मैत्रीणीना सांगायची की जर आपण शेण गोळा करून त्याच्या गोवऱ्या बनवल्या तर याचा आपल्या परिवाराला फायदा होईल. आपण आपल्या परिवाराला मदत करू शकू. माझे म्हणणे ऐकून अनेकजणी माझ्याबरोबर शेण गोळा करायला यायच्या. आम्ही ठरवून शेण गोळा करायचो. मात्र काही मैत्रीणीना शेण गोळा केल्याने त्यांच्या आईकडून मार खावा लागायचा. त्या म्हणायच्या हे काम तुझे नाही, ज्याचे आहे त्यानेच ते करावे”.

आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना कल्पना सरोज यांनी सांगितले की, “ त्या दिवसांत पाच पैशाला एक डबल रोटी मिळायची. मी माझ्या कमावलेल्या पैशातून डबल रोटी खरेदी करायची आणि आम्ही सर्व बहिणी मिळून ती खायचो”.

image


लहानपणी कल्पना यांना झाडावरून चढून फळे तोडायला खूप आवडायचे. त्या नेहमी बोरं, पेरू, चिंचा तोडायला जायच्या. त्या सांगतात, बोराच्या झाडाला खूप काटे असायचे तरीसुद्धा मी त्या झाडावर उंच चढायची. चिंचा सुद्धा खूप तोडून खायचो. खूप मज्जा वाटायची. शाळेतून जेव्हा अर्ध्या दिवसाची सुट्टी व्हायची तेव्हा त्या बोरं किवा चिंचा तोडायला जायच्या.” कल्पना हे देखील सांगतात की, लहानपणी या सर्व गोष्टी करायला खूप मजा वाटते. कारण लहानपण मजेदारच असते, गरिबी श्रीमंतीचा भेदभाव तिथे नसतो, फक्त सर्वाना मिळून मस्ती करण्यातच आनंद असतो”.

इतर मुलांप्रमाणे लहानपणी कल्पना यांची देखील काही स्वप्न होती. लहानपणी त्या सैन्यात किंवा पोलिसांत भरती होण्याची स्वप्ने पहात असत. वडील पोलीस होते त्यामुळे हे स्वाभाविक होते की त्यांच्यासारखेच खूप शिकून पोलीस अधिकारी व्हावे असे त्यांच्या मनात येत. त्या सांगतात की, “ मी हकीकत सिनेमा पाहिला त्यांनतर त्याचा माझ्या मनावर असा प्रभाव राहिला की सीमेवर जाऊन आपणही शत्रूला मारावे असे वाटत असे.” मात्र कल्पना यांचे हे स्वप्न पूर्ण झालेच नाही. त्यांच्या इतर स्वप्नांचाही चुराडा झाला. केवळ १२ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. त्यांनी सांगितले की, “ मी खूप रडले होते, हातापाय पडले होते, आई-वडील सा-यांना सांगत होते मला आता लग्न नाही करायचे, मला शिकायचे आहे. मात्र या गोष्टींचा घरातल्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही, आणि कल्पना यांचे लग्न झाले. तसे तर कल्पना यांच्या वडिलांचेही मत होते की त्यांचे लग्न इतक्या लहान वयात करु नये, मात्र त्यांच्या आई आणि मामा यांचा हट्ट होता त्यामुऴे त्यांचे काही चालले नाही. कल्पना म्हणाल्या की, माझे मामा म्हणत की मुलगी विषाची पुडी असते, तिला जास्त दिवस घरात ठेवता कामा नये. ती शिकून काय करणार आहे तिला सासरी तर चुल आणि मूल सांभाळायचे आहे ”

image


कल्पना पाचव्या वर्गात होत्या तेंव्हापासून त्यांना स्थळे येऊ लागली होती. पण वडिलांनी लग्न केले नाही. पण त्या सातवीत असताना मामाने एक स्थळ आणले. मामांनी यावेळी अशी खेळी की त्यांचे वडील त्यात फसले. कल्पना यांच्या मते “मामांनी मुंबईचे स्थळ आणले होते, त्याकाळी गावच्या लोकांसाठी मुंबई म्हणजे अमेरिका होती. मामांचा आग्रह झाला वडिलांनाही नाही म्हणता येईना. माझ्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही. माझे लग्न झाले. त्यावेळी मला लग्न म्हणजे काय तेही माहिती नव्हते. मी केवळ बारा वर्षांची होते” म्हणजेच कल्पना यांचा हा बालविवाह होता. त्याकाळी सुध्दा इतक्या लहान वयात लग्न करणे गुन्हा होता. गुन्हेगार स्वत: वडीलसुध्दा होते जे स्वत: पोलिस होते, पण सामाजिक बंधने त्यंच्यावरही अशी होती की, त्यांनी कायद्याची पर्वा न करता मुलीचे लग्न करुन दिले. जर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असती तर त्यांचे पिता आणि पती दोघेही तुरुंगात गेले असते.

बारा वर्षांच्या कल्पना यांचा विवाह त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या व्यक्तिशी झाला. त्यामुळे कल्पना यांना शिक्षण अर्ध्यात सोडावे लागले होते. त्यांची स्वप्न कायमसाठी संपली होती. लग्नानंतर पति त्यांना मुंबईला घेऊन गेला. मुंबईत कल्पना यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. सासरच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. मुंबईचे जे चित्र त्यांना दाखविण्यात आले होते ते प्रत्यक्षात खूप वेगळे होते. कल्पना सांगतात की “ मला वाटले सासरी मला खूप प्रेम मिळेल, लोक मला स्विकारतील, प्रतिष्ठा देतील. पण सासरी खूप काही वेगळेच होते. मला वाटले की, मी चांगल्या जागी राहीन, माझे सासर खूप चांगल्या जागी असेल. पण माझे सासर झोपडपट्टीत होते. बस एकच खोली होती त्यातच सारे जण राहात होते. सासरे, मोठे दीर-जाऊबाई, त्यांची मुले, लहान दीर सारेच. मी खूप चांगल्या जागी राहिले होते, पोलिस कॉलनी होती. स्वच्छता होती. येथे मात्र घाण होती, दुर्गंधी होती, झोपड्या होत्या. कल्पना यांच्यासाठी केवळ वातावरणच खराब होते असे नाही तर सासरची माणसेही खराब होती. त्यांचे वास्तव लवकरच त्यांच्या लक्षात आले. मोठे दीर आणि जाऊ यांनी त्यांच्याशी गैरवर्तन सुरु केले. लहान सहान गोष्टीवरून मारहाण सुरू झाली. शिव्या देणे तर रोजचे झाले होते. दीर आणि जाऊ इतके वाईट वागले की त्यांनी केस पकडून मारहाण केली, जखमी केले. त्यांना वेळेवर जेवण मिळत नव्हते, उपाशी ठेवले जात होते, टोमणे-शिव्या तर नेहमीच्या झाल्या होत्या. कल्पना सांगतात की, “ ते खूप वाईट दिवस होते, मला त्यांची आठवण सुध्दा नको आहे, ते आठवले तरी रडू येते, ते दिवस मनात खूप सलत राहतात, त्रास होतो त्यांच्या आठवणींचा. मला सासरी आल्यावरच समजले की सासरची मंडळी लोकांच्या घरची घरकामे करत होते. जसे मी तेथे पोहोचले नवीन सून म्हणून मला सारी कामे सोपविण्यात आली. सकाळी चार वाजता मला उठावे लागे, घरात साफ सफाई करून बारा लोकांचे जेवण करावे लागे, त्यांनतर कपडे भांडी घासावी लागत, सारी कामे मी करत होते. माझ्या कामात चुका काढून मला मारले जात होते. कधी सांगत की यात मीठ कमी झाले, कधी सांगत यात मिर्ची जास्त झाली बस निमित्त होते आणि मारहाण सुरु होती. माझ्या वडिलांच्या घरी मी केसांना तेल लावत असे आणि इथे एक दिवस तसेच मी तेल लावायला घेतले तर दीर म्हणाले की नटून थटून कुठे जायचे आहे? आणि मला मारहाण केली. माझ्या सासरी अशा शिव्या दिल्या जात ज्या मी ऐकवू शकत नाही.”

image


कल्पना यांच्यासाठी हे दिवस अवमान, त्रास, शोषण आणि दु:ख याचे होते. कल्पना यांना वाटले की त्यांच्या माहेरी आणि इतर नातेवाईकांना याबाबत माहिती कळावी. पण सासरचे लोक त्यांना पत्र पाठवू देत नसत. लग्ना नंतर सहा महिन्यांनी त्यांचे वडील महादेव त्यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना पाहीले तर आधी त्यांना ते ओळखूच शकले नाहीत. कारण तर स्पष्टच होते कल्पना यांची स्थिती बिघडली होती. रात्रं-दिवस कष्टाने त्यांचे रुप बदलून टाकले होते. कल्पना सांगतात की, “ मी चंचल होते, हसत खेळत होते, माझ्या वडिलांचे पहिलेच अपत्य म्हणून सारे मला प्रेम करत होते. वडिलांनी मला त्या अवस्थेत पाहिले तर ते हैराण झाले. मुलीची अवस्था पाहून त्यांना खूपच दु:ख झाले. ते सुन्न झाले त्यांना खूप पश्चाताप झाला की ते आधीच भेटायला का आले नाही. मग त्यानी निर्णय घेतला की कल्पनाला सासरी ठेवणार नाही. सासरच्यांनी त्याना विरोध केला खूप भांडणे झाली, वाद झाले. वडील परत गेले पण लवकरच परत आले, ते पोलिसांच्या वेशात होते. त्यावेळी सासरचे त्यांना थांबवू शकले नाहीत. कल्पना यांना घेऊन ते आपल्या गावी परत आले.

image


कल्पना यांना वाटले गावी परतल्यावर त्यांना पुन्हा सुखाचे दिवस पाहायला मिळतील. रोज होणाऱ्या कटकटीतून आणि अपमानस्पद वागणुकीतून त्यांची सुटका होईल. माहेरचे प्रेमाने वागतील. अशी मनोमनी आशा बाळगत कल्पना गावी परतल्या खऱ्या, मात्र त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना डिवचायला सुरुवात केली. सासर सोडून माहेरी आल्याने त्यांच्यावर वारंवार टीका टिपण्णी होऊ लागली. प्रेम सहानभूती तर सोडाच कल्पना यांना तिरस्काराला सामोरे जावे लागले. कल्पना सांगतात, मी विचार केला होता की आई-वडिलांकडे गेल्यावर सुख शांती मिळेल. पण येथेही बोलणेच ऐकावे लागत होते. शेजारचे आई-वडिलांना दोष देऊ लागले. त्यांना नाना तऱ्हेच प्रश्न पडत. लोकांचे म्हणणे होते की, “ लग्नानंतर मुलींना सासरी सारे काही सहन करावेच लागते. मुलीचे एकदा लग्न झाले की, त्यानंतर त्याच घरातून तिची अर्थी निघते. लोक अशा पद्धतीने बोलत असत, त्यांच्या नजरेत मी दोषी होते, वाईट होते. मला वाटले की, लोकांच्या अशा वागण्याने माझ्या आई-वडिलांना खूप त्रास होतोय. मला हे सारे काही सहन करायची ताकद राहिली नव्हती. त्यामुळे मग स्वतःला कायमसाठी संपवण्याचा मी निर्णय घेतला.”

image


कल्पना यांनी बाजारातून ढेकुण मारण्याचे औषध विकत आणले आणि त्या त्यांच्या आत्याकडे निघून गेल्या. त्यांच्या आत्या एकट्याच राहायच्या त्यामुळे त्यांना वाटले तिथे त्यांना कोणीच पाहणार नाही किवा कोणी अडवणार नाही. त्यांनी ठरवले तसेच झाले आत्या घरी नव्हत्या हे पाहून कल्पना यांनी तीनही बाटल्यातील औषध प्यायले. आत्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की कल्पना यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत आहे आणि त्या जमिनीवर तरफडत पडल्या आहे. आत्याने ताबडतोब शेजारच्यांच्या मदतीने त्यांना जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरानी स्पष्टच सांगितलं की, कल्पना यांची प्रकृती फारच गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण आहे. डॉक्टरांनी सुचवले की, त्यांना ताबडतोब अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जावे. जिथे अधिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टर असल्याने कदाचित कल्पना यांचे प्राण वाचू शकतील. मात्र कल्पनाच्या गावातल्या ठाणे प्रमुखाने सांगितले तसे केल्यास पोलिसात केस जाईल घरच्यांबरोबरच पोलीस खात्याचीदेखील बदनामी होईल. कारण कल्पना यांचे वडील पोलीस कर्मचारी होते. तिथल्याच डॉक्टरांना विनंती करण्यात आली की शक्य होईल तेवढे प्रयत्न करावे आणि त्यांचा इलाज गावातल्याच रुग्णालयात करावा. असे म्हटले जाते जो पर्यंत वरच्याचे बोलावणे येत नाही तोपर्यंत तुमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही. कल्पना या जीवघेण्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडल्या.

image


मृत्यूच्या दारातून कल्पना बाहेर तर पडल्या मात्र लोकांचे डिवचणे सुरूच होते. कल्पना सांगतात की, “ मी मृत्युच्या जबड्यातून बाहेर तर पडले मात्र अडचणी आहे तशाच होत्या. लोकांना माझ्याविषयी बोलायची आणखी एक संधी मिळाली. ते म्हणायचे जर जीव गेला असता तर आई-वडिलांच्या इज्जतीचे काय झाले असते ? काहीजण तर म्हणायचे की मीच काहीतरी चुकीचे कृत्य केले असणार म्हणूनच मरायचा प्रयत्न केला. सगळ्यांच्याच नजरेत मी वाईट ठरले. मात्र त्यावेळी मी निश्चय केला की, यापुढे मी कधीही मरण्याचा प्रयत्न करणार नाही किवा मरण्याचा विचार करणार नाही. मी निर्णय घेतला की जीवनात नक्कीच काहीतरी मोठे काम करेन, एक ना एक दिवस तर सर्वांनाच मरायचे असते. मग काहीतरी चांगले काम करून का मरू नये”.

त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या लक्षात आले की गावात फक्त शेतीकामच आहे. त्यांना आता शेतावर काम नव्हते करायचे. काम करण्यासाठी त्यांना मुंबईला जायचे होते. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांची आई त्यांना मुंबईला पाठवायला तयार नव्हती. पण, कल्पना यांनी त्यांच्या आईला धमकी दिली जर तिने मुंबई पाठवले नाहीतर रेल्वेगाडी खाली येऊन त्या आत्महत्या करतील. कल्पना यांचे बोलणे ऐकून आई घाबरली आणि कल्पना यांना त्यांच्या काकांकडे मुंबईला पाठवण्यात आले. आई स्वतः त्यांना सोडवायला मुंबईला आल्या. कल्पना सांगतात की, “ माझे काका दादरच्या बापट मार्गावर राहायचे. ते पापड विकायचे. त्यांच्याकडे राहण्यास पुरेशी जागा नव्हती. त्यांची दृष्टी कमजोर होती. त्यांना मला त्यांच्याकडे ठेवायला भीती वाटत होती. तेव्हा आई त्यांना म्हणाली की कल्पनाची मानसिक अवस्था खूप नाजूक आहे. जेव्हा तिला बरं वाटेल तेव्हा मी तिला इथून घेऊन जाईन. आईचे बोलणे ऐकून त्यांनी मला ठेवून घेतले”. काकांना माझी खूप काळजी वाटत होती. त्यांना वाटायचे की ते जेव्हा कामावर जातील तेव्हा घरात कल्पनावर काही वाईट प्रसंग आला तर नाहक बदनामी होईल. म्हणून मग त्यांनी एका ओळखीच्या गुजराती कुटुंबात कल्पना यांची राहण्याची व्यवस्था केली. त्या गुजराती परिवारात तीन मुली होत्या. चौथी मुलगी म्हणून कल्पना यांना त्या कुटुंबांत राहायला मिळाले. त्या कुटुंबात कल्पना यांना प्रेम आणि आपलेपण मिळाले

image


कल्पना शिवणकामात तरबेज होत्या. गुजराती कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमाची शिवणकामाची कंपनी होती. कल्पना यांनी त्या इसमाला काम मिळण्याबाबत विनंती केली. कल्पना यांची विनंती मान्य करत तो इसम कल्पना यांना त्यांच्या कंपनीत घेऊन गेला आणि तिथल्या एका मशीनवर काम करायला सांगितले. मोठी कंपनी आणि मशिनी पाहून कल्पना इतक्या घाबरल्या की, त्यांचा आत्मविश्वास डळमळला. अनेक स्त्रिया आणि पुरुष मोठ्या प्रमाणात एकत्रित काम करताना त्यांनी पहिल्यांदाच पहिले होते. घाबरल्यामुळे कल्पना यांना मिळणारी नोकरीची संधी गमवण्याची वेळ आली. पण त्यांच्या विनवणीनुसार त्यांना धागा कापायचे काम दिले गेले, जे हेल्परचे काम होते. या कामाचे कल्पना यांना दररोज दोन रुपये मिळायचे. म्हणजे त्यांना महिन्याकाठी साठ रुपये पगार मिळायचा. एक दिवस कल्पना यांच्या मनात विचार आला की मला जर शिवणकाम चांगल्याप्रकारे येते तर घाबरण्याचे कारण काय. जेवण्याच्या वेळी, चहाच्या वेळी जेव्हा जेव्हा कर्मचारी मशीन सोडून जात तेव्हा तेव्हा कल्पना मशीनवर काम करायच्या आणि लवकरच त्यांनी मशीन चालवण्याची कार्यप्रणाली जाणून घेतली. भीती निघून गेल्यानंतर त्यांनी कंपनीच्या मालकाला शिवणकाम देण्याबाबत विचारणा केली. त्यांना शिवणकाम करण्यास संमती मिळाली. त्यांचा पगार ६० रुपयावरून २२५ रुपये इतका झाला. कल्पना सांगतात की जेव्हा शिलाई कामाचा पहिला पगार झाला तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी शंभर रुपयाची नोट जवळून पहिली, हाताळली”. आपला पहिला पगार कल्पना यांनी गुजराती परिवाराला द्यायचे ठरवले आणि तसे केले मात्र घरातल्या प्रमुखाने त्यांचा पगार नाकारला आणि म्हणाले की आमच्याकडे मुलींकडून काही घेतले जात नाही. उलट त्यांना दिले जाते. त्यांनी कल्पना यांना पैश्यांची बचत करण्यास सांगितले.

image


यातच कल्पना यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं. काहीतरी कारणाने वडिलांची पोलीस खात्यातली नोकरी गेली. सरकारी घर सोडावे लागले. राहण्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आईला शेतावर जाऊन मजुरी करावी लागत होती. कुटुंबाची अवस्था पाहून कल्पना यांनी आपल्या कुटुंबियांना मुंबईमध्ये घेऊन यायचा निर्णय घेतला. मुंबई सारख्या शहरात भाड्याने स्वस्त घर मिळणे अवघड काम होते. म्हणून मग कल्पना यांनी कल्याण येथे ४०० रुपये अमानत रक्कम भरून ४० रुपये भाड्याने एक घर राहायला घेतले. कल्पना गुजराती कुटुंबाला सोडून दादरवरून कल्याणला राहायला गेल्या. कल्पना यांना आजही तो दिवस आठवतो गुजराती परिवारातल्या कुटुंब प्रमुखाने त्यांना एक पत्र्याची पेटी दिली होती, ज्यामध्ये कल्पना यांच्या बचतीचे सर्व पैसे सुरक्षित ठेवण्यात आले होते. या आठवणी सांगताना त्या म्हणतात की, “ जगात अद्यापही चांगले लोक आहेत ”

image


कल्याणच्या घरात कल्पना आणि कुटुंबियांचे सुरळीत सुरु होते. कल्पना यांना वाटायला लागले हेच त्यांचे खरे आयुष्य आहे. जिथे सर्व परिवार एका छताखाली गुण्यागोविंदाने राहतोय. त्या सांगतात की, “सर्वजण एकत्र होते यातच आनंद होता, परिस्थिती फारच चांगली होती असे नाही. कधीकधी एक वेळेलाच जेवण मिळायचे, पण तरी वृत्ती समाधानी होती, कोणतीही तक्रार नव्हती. संघर्ष फक्त पोटापुरताच होता. कोणतेही मोठे स्वप्न नव्हते, कोणतेही ध्येय नव्हते. असे वाटायचे आयुष्य असेच संपून जाईल.”

यातच एक अशी घटना घडली ज्यामुळे कल्पना यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. कल्पना यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यांचे ध्येय निश्चित झाले. कल्पना यांची लहान बहिण गंभीररीत्या आजारी पडली. कल्पना यांनी त्यांची पूर्ण ताकद लावून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची बहिण वाचू शकली नाही. अंतिम समयी त्यांची बहिण तिला वाचवण्यासाठी याचना करत होती मात्र कल्पना काहीही करू शकल्या नाही. आर्थिक बाब बहिणीच्या मृत्यूचे कारण झाली, त्या वेळीच कल्पना यांनी निश्चय केला की व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे. कल्पना बहिणीच्या आठवणी सांगताना भावूक झाल्या होत्या. डोळ्यातील अश्रू आवरणे त्यांना कठीण झाले होते. कल्पना सांगतात, “ माझी बहिण सोळा-सतरा वर्षाची होती. ती आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र आजाराने गंभीर रूप धारण केले. मारताना तिने मला सांगितले की, मला जगायचे आहे, मला वाचव. ती मृत्यूशी झुंजत होती, काहीच करू शकत नव्हती. माझ्या बहिणीला मी नाही वाचवू शकले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की जवळ पैसे नसतील तर माझ्या परिवारातल्या अन्य सदस्यांना देखील मी वाचवू शकणार नाही. आई-वडील, बहिण-भाऊ यांची सर्वांची जबाबदारी माझ्यावरच होती. तेव्हाच मी ठरवले की खूप पैसा कमवायचा आणि खूप श्रीमंत व्हायचं”.

image


कल्पना यांच्या मनात एकच विचार सुरु होता की पैसे कसे कमवायचे. रात्रंदिवस त्या फक्त काय केल्याने पैसे अधिक कमावता येईल यावर विचार करत होत्या. त्याच वेळी त्यांनी रेडीओवर जाहिरात ऐकली. ही जाहिरात म्हणजे बेरोजगारांना कर्ज देणारी एका योजनेची जाहिरात होती. ती जाहिरात ऐकून कल्पना यांना वाटले की, तसेही आपल्याला तर कोणी कर्ज देणार नाही. या योजनेमार्फत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करणे शक्य आहे. मात्र कर्ज काढणे सोपे काम नव्हते. कर्ज मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. तरीसुद्धा कल्पना यांनी प्रयत्न सुरु केले. सरकारी कार्यालयात ये-जा सुरु झाली. अथक प्रयत्नानंतर त्यांना कर्ज मिळाले. कल्पना यांनी फर्निचर तयार करण्याचे काम सुरु केले. कल्पना सांगतात की, “ मी कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी करणार होते, कारण त्या कामाचा मला अनुभव होता. त्यानंतर विचार आला एखादे बुटिक का सुरु करू नये. मात्र शेवटी फर्निचर व्यवसाय करण्याचे निश्चित केले. बुटिकच्या व्यवसायात दिवसाचे पाचशे रुपयेच मिळणार होते. फर्निचर व्यवसायात मात्र दिवसाचे किमान हजार रुपये कमावणे शक्य होते”.

व्यवसाय सुरु करताना कल्पना यांच्या मनात एक क्रांतिकारी विचार आला तो म्हणजे गरजूंना मदत करणे, त्यांना प्रेरणा देणे. सुरवातीपासूनच कल्पना यांची भावना स्वतःचाच लाभ व्हावा अशी नव्हती. त्यांना पैशांचा मोह नव्हता. त्यांनी आतापर्यंत ज्या अडचणींचा सामना केला होता. जो अनुभव त्यांच्या गाठीशी होता त्याचा फायदा इतरांना व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कर्ज घेताना जो त्यांना त्रास झाला तो इतरांना होऊ नये, शासनाच्या योजनांचा बेरोजगारांना लाभ व्हावा म्हणूनच त्यांनी ‘सुशिक्षित बेरोजगार युवा संगठन’ नावाची एक संस्था सुरु केली आणि गरजूंना मदत करणे सुरु केले. कल्पना यांनी बेरोजगार तरुणांसाठी शिबीरं घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. कल्पना यांनी या कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांना, बँक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या मार्फत मार्गदर्शनपर शिबीर राबवले. सरकारी योजनांची माहिती तरुण पिढीला दिली

image


या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकजणांना लाभ झाला. अनेकांनी सरकारी योजनांचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कल्पना सांगतात की, “ मला जिथे कर्ज मिळवण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागले, तिथे या तरुणांना केवळ दोन ते तीन महिन्यात कर्ज मिळवणे केवळ या शिबिरांमुळे शक्य झाले. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला.”

शिक्षित बेरोजगार युवा संगठनामुळे कल्पना यांची एक विशेष ओळख निर्माण झाली. तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांची ओळख समाजसेविका म्हणून होऊ लागली. ज्या युवकांनी कल्पना यांच्या शिबिरांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु केला त्यांच्या कुटुंबात कल्पना यांच्याविषयी आदर निर्माण झाला. जसजशी कल्पना यांची लोकप्रियता वाढली अनेकजण त्यांच्याकडे मदतीसाठी येऊ लागले. लोकांची मदत करता करता काही दिवसातच कल्पना या सर्वांच्या ‘कल्पना ताई’ झाल्या. सरकारी कार्यालयातही त्यांची चांगली ख्याती निर्माण झाली.

त्याच दरम्यान त्यांच्याकडे एक अशी व्यक्ती आली ज्यांची जमीन कल्याणमध्ये कमाल जमीनधारणा कायद्यात अडकली होती. त्या व्यक्तिने कल्पना यांना ही जागा खरेदी करण्यास सुचविले. त्यांना पैश्यांची गरज होती. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे कुणीही ती जागा विकत घेण्यास तयार नव्हते. जमीन मालकाने या जागेची किंमत अडीच लाख असल्याचे सांगत स्पष्ट केले की इतक्या कमी पैश्यात ही सोन्यासारखी जमीन नाईलाजाने ते विकत आहेत. कल्पना यांनी कसेबसे लाखभर रुपये जमा करुन त्यांना दिले. बाकीचे पैसे नंतर देण्याचे ठरले. आता ही जमीन कल्पना यांची होती मात्र तिला कमाल जमीन धारणा कायद्यातून वाचविणे हे आव्हान होते. या कायद्यामुळे या जागेवर केवळ शेती केली जाऊ शकत होती आणि इतर काहीच उपयोग या जागेचा नव्हता. कल्पना यांना यासाठी देखील खूप वेळ लागला. सुमारे दोन वर्ष प्रयत्न केल्यावर त्यांना यश आले आणि त्यांची जागा कायद्यातून मुक्त झाली. कल्पना यांनी खरेदी केलेल्या मातीचे जणू सोने झाले होते त्याच अडीच लाखात खरेदी केलेल्या जागेला पन्नास लाख किंमत आली होती.

image


कल्पना मौल्यवान जमिनीच्या मालकीण झाल्या होत्या मात्र त्यावर विकास करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांची कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्याची स्थिती नव्हती, अशावेळी एका सिंधी समाजाच्या व्यापा-यासोबत ३५-६५च्या भागीदारीत त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले.

त्यांनी या भागीदारीच्या व्यवहारात जो करार केला होता त्यानुसार जमीनीची मालकी त्याची राहणार होती मात्र बांधकाम त्यांच्या भागीदाराने करायचे होते. येणा-या नफ्यात ३५% त्यांना आणि६५% त्यांच्या सिंधी भागीदाराने घ्यायचे होते. कल्पना यांच्यासाठी हा सौदा फायद्याचा झाला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

मात्र बांधकाम व्यावसायिक होण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक मात्र नव्हता. जसा कायद्याच्या कचाट्यातून त्यांनी तो भुखंड सोडविला त्याची किंमत वाढली आणि गावगुंडांच्या नजरेत ही गोष्ट आली. त्यांनी या जागेवर कब्जा करण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र कल्पना त्यांना पुरून उरल्या, त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी कल्पना यांच्या हत्येची सुपारी सुध्दा दिली. ज्या टोळीला ही सुपारी देण्यात आली त्याच टोळीच्या एकाने त्यांना ही माहिती दिली. कल्पना सावध झाल्या त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी मग कारवाई करत सुपारी देणारे आणि घेणारे यांना अटक केली. या घटनेनंतर कल्पना यांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तुल ठेवण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती मिळवली सुध्दा. कल्पना सांगतात की, “माझ्या पिस्तुलात सहा गोळ्या आहेत त्या संपल्यावरच मला तुम्ही मारु शकाल.” कल्पना यांच्या चर्चेतून हे स्पष्ट जाणवते की, त्यांच्यात आत्मविश्वास परिपूर्ण भरला आहे. त्या कुणाच्या धमक्याना घाबरत नाहीत, प्रत्येक आव्हानासाठी त्या सज्ज आहेत.

image


कल्याणमधील त्या जमिनीच्या व्यवहाराने त्यांना करोडपती बनविले. त्या म्हणतात की, “ मी फायद्याच्या हेतुने ती जागा घेतली नव्हती, तर त्या माणसाच्या मदतीसाठी ही जागा खरेदी केली होती. त्यावेळी मला माहिती नव्हते की ही जागा सोन्याची होईल. मात्र या जागेला कायद्याच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. अनेकदा मी सरकारी कार्यालयाचे खेटे मारले. ज्या महिलेला मुंबईत रहायला घर नव्हते ती आता बांधकाम व्यावसायिक बनली होती आणि लोकांना घरे विकू लागली होती.”

बांधकाम व्यवसायात आल्यावर कल्पना यांच्या यशाच्या नव्या कहाणीचा जन्म झाला. त्यांनी अनेक प्रकारचे उद्योग सुरु केले. लवकरच त्यांची व्यापारी आणि उद्योजिका अशी नवी ओळख तयार झाली. १९९९ मध्ये त्यांनी अहमदनगर येथे साईकृपा शुगर मिलचा व्यवहार केला. बबनराव पाचपुते यांच्या सल्ल्याने त्यांनी साखर कारखाना सुरु केला आणि संचालक बनल्या. कल्पना यांच्या जीवनात मोठे वळण त्यावेळी आले ज्यावेळी बंद झालेल्या कमानी ट्यूब कंपनीतील काहीजण मदत मागण्यासाठी त्यांच्या जवळ आले. त्यांची ओळख आता अशी झाली होती की, बंद पडत असलेल्य उद्योगाला आता केवळ त्याच संजिवनी देवू शकतात असा विश्वास लोकांना होता. त्यामुळे मोठ्या आशेने हे कामगार त्यांना भेटले होते.

image


कमानी ट्यूब कंपनी काही साधारण नव्हती, त्याची सुरुवात प्रसिध्द उद्योगपती रामजी हंसराज कमानी यांनी केली होती. रामजी कमानी यांची महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू यांच्याशी जवळीक होती. मात्र कमानी परिवारातील वाद मालक आणि कामगार संघटना यांच्यातील संघर्षातून ही कंपनी अडचणीत आली होती. या समुहातील दोन कंपन्या त्यापूर्वीच तोट्यात गेल्या होत्या. कमानी मेटल्स कामगारांच्या संघटनेच्या ताब्यात होती आणि कमानी इंजिनिअरिंग आधीच आरपीजी समुहाने खरेदी केली होती. कमानी इंजिनिअरिंग कंपनी महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावरुन रामजी कमानी यांनी सुरु केली होती. गांधीजीच्या स्वदेशीच्या आग्रहासाठी त्यांनी ही कंपनी सुरू करण्याची सूचना केली होती. त्यामुळे १९४५मध्ये ती सुरु झाली. या कंपनीने इतिहासात चांगली कामगिरी केली होती ज्यावेळी देशात विजेच्या उपकरणात स्वदेशात निर्मिती करण्याचे महत्वाचे काम कंपनीने केले होते. इतकेच नाहीतर भाक्रा नांगल या धरणाच्या कामासाठी लागणारे पोलाद तयार करुन देण्याचे कामही याच कंपनीने केले होते. १९६०मध्ये कुर्ला येथे कंपनीने कमानी ट्यूब्ज या उद्योगाची सुरुवात केली आणि तांब्याच्या ट्यूब्ज आणि गज तयार करण्याचे काम सुरू केले. सुरुवात चांगली झाली मात्र १९६६ मध्ये रामजी कमानी यांच्या निधनानंतर स्थिती बदलली. त्यांच्या वारसांना ही कंपनी नीट चालविता आली नाही. त्यांचे तीनही उद्योग तोट्यात गेले. त्यानंतर कमानी इंजिनिअरिंगला आरपीजी समुहाने खरेदी केले. मात्र कमानी ट्यूब्ज चे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाने ही कंपनी चालविण्याचे आधिकार कामगार संघटनाना दिले. मग त्या आदेशाने कामगार संघटनानी कंपनी सुरु केली. मात्र यश येत नव्हते. एक वेळ अशी आली की तोट्यात गेलेल्या कंपनीचे पाणी आणि विजेच्या जोडण्या तोडण्याची वेळ आली आणि उद्योग बंद पडला. १९९७ पर्यंत कंपनीचा तोटा ११६ कोटी होता. २००६ मध्ये कल्पना यांच्या हाती सूत्र आली आणि स्थिती पालटू लागली. त्यांनी या उद्योगाला पुन्हा नफ्यात आणण्याचे आव्हान स्विकारले. आपले विचार कामगारांचे सहकार्य आणि पाठींबा या बळावर त्यांनी कायापालट करून दाखविला. कमानी ट्यूब्जला त्यांनी ज्याप्रकारे आजारी उद्योगातून नफेदार कंपनी बनविले ती कहाणी देशाच्या इतिहासात आदर्श असे उदाहरण बनले आहे. कल्पना सांगतात की, “ मी नफा मिळावा म्हणून या कंपनीचे काम हाती घेतले नाही. मला केवळ त्या कामगारांना मदत करायची होती. त्यांच्या घरात चुल जळत नव्हती हे पाहून मला त्यांना मदत करावीशी वाटली. मला माहिती नव्हते मला यश मिळेल की नाही, रुपये मिळतील की नाही. पण त्यांना मदत नक्की करायची यासाठी मी निर्णय घेतला होता.”

image


कल्पना यांना जेंव्हा ही कंपनी चालू करण्यासाठी विचारणा झाली त्यावेळी त्यांनी याकडे व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक कार्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक लोकांना तोट्यात गेलेल्या उद्योगाचा भार घेणे वेडेपणाचे आणि मुर्खपणाचा व्यवहार वाटले होते. महत्वाचे म्हणजे सतत आजारीउद्योग म्हणून बीआयएफआर (औद्यिगिक आणि आर्थिक पुनर्वसन प्राधिकरण) ने आणि आयडीबीआय बँकेने हा तोट्यातील उद्योग विकून टाकण्याची जाहिरात सुध्दा दिली होती. त्याच भितीने कामगार कल्पना यांच्याकडे आले होते. त्यांनी होकार दिल्याने कामगारांनी उत्साहाने त्यांना एक दिवस परिसरात नेऊन कंपनी दाखवली. तेथे संचालक मंडळाची बैठक सुरु होती. त्याच बैठकीत कल्पना यांना ही जबाबदारी घेण्यास सागण्यात आले आणि त्यांनी ते मान्य केले. मग कल्पना यांनी आपली जबाबदारी ओळखून कंपनीच्या मागच्या काळातील सारी माहिती घेतली, सर्व खर्चाची गणिते जुळविली. त्यांनतर त्यांनी माहितीगार तज्ज्ञांची एक समिती तयार केली त्यांच्या सुचनेनुसार त्या कामकाज करु लागल्या. याच समितीनं त्यांना सांगितले की कंपनीला ११६ कोटी रुपये कर्ज आहे आणि त्यात मोठा भाग व्याज आणि दंडाच्या रकमेचा आहे. कल्पना यांनी विचार केला की जर कंपनी सुरु ठेवायची असेल तर त्या व्याज आणि दंडाची रक्कम माफी झाली पाहिजे. त्यांना समजले की बँकाचे अधिकारी हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे त्यावेळी वित्त मंत्र्यांना जाऊन सांगितले. त्यांनी कंपनीचा मागचा इतिहास आणि सध्याच्या आव्हानात्मक स्थितीबाबत बाजू मांडली आणि केंद्र सरकारने मदत करावी अशी विनंती केली. जर ही सवलत मिळाली नाहीतर कंपनीचे दिवाळे जाहीर होणार होते. आणि कंपनीने ज्यां बँकांच्या मार्फत कर्ज घेतली होती ती देखील बुडणार होती त्यामुळे वित्तमंत्र्यांनी त्यांना व्याज आणि दंड माफ करण्याचा प्रस्ताव मान्य केला आणि आयडीबीआय बँकेने मूळ रकमेच्या २५% रक्कमही माफ करण्याचा निर्णय घेतला. कमानी ट्यूब्ज साठी हा निर्णय संजीवनी देणारा ठरला होता. त्यांनतर कल्पना यांनी कामगारांची थकीत देणीच नाहीतर त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमा देखील परत देण्यास सुरुवात केली. त्यांनतर वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातूनही त्यांनी कंपनीला बाहेर काढले. काही कामगार नेत्यांनी यामध्ये खोडे घालण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र कल्पना आपल्या इराद्यावर कायम राहिल्या आणि वकीलाच्या मदतीने त्यांनी सारे न्यायालयीन वाद मिटवले. २००६ मध्ये आयडीबीआय बँकेने जी न्यायालयाच्या निदेशानुसार कंपनीच्या व्यवहारांवर प्रशासक म्हणून काम करत होती त्यांनी पुर्नगठन करण्यासाठी निविदा काढल्या. त्यात कल्पना यांनी कंपनी विकत घेतली आणि अध्यक्ष झाल्या. त्यानंतर नव्या उत्साहाने आणि जोमाने त्यांनी काम सुरु केले. कामगारांनी साथ दिली आणि मग त्यांनी सर्वानी सहकार्य दिल्याने तोट्यात गेलेल्या उदयोगाला फायद्यात आणणे शक्य झाले. त्यामुळे कर्ज परत करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या सात वर्षाच्या कार्यकाळापूर्वीच त्यांनी सारी कर्जे फेडून टाकली. इतकेच नाही कामगारांची देणी देण्याच्या तीन वर्षाच्या नियोजित वेळे पूर्वीच त्यांचीही देणी काही महिन्यात देण्यात आली होती. इतकेच नाहीतर ज्यावेळी त्यांनी ही कंपनी ताब्यात घेतली त्यावेळी कंपनीवर ११६कोटीचे कर्ज कामगारांची देणी, न्यायलयातील १४० खटले, गंज पडलेली यंत्रे आणि सामग्री अशा समस्यांचे डोंगर उभे होते मात्र त्यांनी सारे काही सहजपणे मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पार केले होते. एका तोट्यात गेलेल्या उदयोगाला पुन्हा फायद्यात आणलेच शिवाय नवा इतिहास घडविताना अनेकांच्या समोर आदर्श ठेवला होता की प्रामणिक प्रयत्न केले तर काहीच अशक्य नसते!

कमानी टयूब्स या कंपनीला पुनर्जीवित करून कल्पना यांनी यशाची जी कहाणी लिहिली आहे, तिचे स्थान इतिहासाच्या पुस्तकात कायमसाठी पक्के झाले आहे. परिस्थिती फारशी अनुकूल नसताना कल्पना यांनी हार न मानता हिम्मतीने आणि मेहनतीने सारे काही मिळवत यशोशिखर गाठले. एका दलित समाजाच्या कमी शिकलेल्या कल्पना यांनी जे करून दाखवले आहे ते व्यावसायिक क्षेत्रात मोठमोठ्या महारथींना देखील जमले नाही. कल्पना सांगतात, “ जेव्हा मी कमानी ची जबाबदारी घेतली तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले. लोक म्हणायचे हे काम करणे म्हणजे आगेशी झुंज देण्या इतपत कठीण आहे. पण मला मजुरांची मदत करायची होती. आणि मला त्यांना मदत करणे शक्य झाले. त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण केला यातच माझे यश दडलेले आहे ”. कल्पना हे हि सांगतात की, “लहानपणापासूनच मला काम करायला, मेहनत करायला आवडायचे. मी जेव्हा दुसऱ्याची मदत करते तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असते. मला कसलाही मोह नाही. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याकडे पाव खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते. लोकल ट्रेन मधून प्रवास करायला देखील माझ्याकडे पैसे नव्हते. मी कुर्ला ते चेंबूर पायी चालून जायचे. मी आज जे काही ते फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळे आणि इमानदारपणामुळे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करत राहीन इतरांना मदत करत राहीन”

image


कल्पना यांनी कमानी टयूब्सचा नवीन कारखाना ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे सुरु केला. कमानी टयूब्सचा व्यवसाय अधिकाधिक वृद्धींगत करण्यासाठी, परदेशात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या योजना तयार आहेत. त्या खूप अभिमानाने सांगतात की, “एकेकाळी कमानी टयूब्सचे खूप नाव होते. प्रतिष्ठा होती, मला तीच प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून द्यायची आहे. कमानी टयूब्सला मला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आहे.” एका प्रश्नाचे उत्तर देताना कल्पना म्हणाल्या की, “ पैसे मिळवणे आवश्यक आहे, पण पैसेच सर्वकाही नाही. जेव्हा तुमच्याजवळ पैसे नसतात तेव्हा तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणून पैसा मिळवणे गरजेचे आहे. मात्र माणुसकी दृष्ट्या गरजूंना मदत करणे त्याही पेक्षा महत्वाचे आहे, माणुसकी पैशांपेक्षा मोठी आहे”.

कल्पना यांना हे सांगायला संकोच वाटत नाही की, भाग्य त्यांच्यासोबत होते. त्या म्हणतात की, “ माझ्यासारखे भाग्यवान फार थोडे असतात ज्यांना नशिब बोलावून घेते. तो जमीन विकणारा माझ्याकडे आला, मला तर त्याची माहिती सुद्धा नव्हती. कदाचित त्याच्याकडे मी कधीच गेले नसते. कमानीचे कामगार माझ्याकडे आले मी त्यांच्याकडे गेले नव्हते. पण सगळ्यांच्या बाबतीत असे होत नाही. लोकांना संधीची वाट पहात बसावे लागते त्यांनी स्वत: काहीतरी संधी शोधली पाहिजे.” आणखीएका प्रश्नाच्या उत्तरात या प्रचंड यशस्वी उद्योजिकेने सांगितले की, “ जर तुमच्या मनात काहीतरी करण्याची आस नसेल तर तुम्ही काहीच करु शकत नाही. मला बघा माझ्याकडे कोणतीच पदवी नाही, पार्श्वभूमी नाही तरीही जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर मी पुढे गेले. जर व्यक्तीमध्ये मेहनत, प्रामणिकता आणि विश्वास असेल तर तो यशस्वी होतोच.

image


कल्पना सरोज बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रध्दा आहे. त्या म्हणतात की, “ मी आज जे काही आहे ते बाबासाहेब यांच्यामुळेच आहे.” लोकांना प्रेरित करताना त्या नेहमी बाबासाहेबांच्या वचनांचा दाखला देत असतात. आमच्याशी बोलताना देखील त्यानी सांगितले की, “ जर मागून तुमचे हक्क मिळत नसतील तर तुम्हाला ते हिसकावून घेता आले पाहिजेत. मी सांगते की जर तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही डरपोक आहात आणि जर तुम्ही हातावर हात धरून बसत असाल तर तुमचे जीवन काही कामाचे नाही. उठा आणि हक्कासाठी लढा द्या”. एक महत्वाची गोष्ट ही देखील आहे की, कल्पना सरोज यांच्याच सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने लंडन मधील बाबसाहेबांचे ते घर खरेदी केले ज्या ठिकाणी ते दोन वर्षे शिक्षण घेताना राहात होते. कल्पना जेंव्हा केंव्हा लंडनला जातात त्या घराचे दर्शन नक्कीच घेतात. लंडनच्या एका भेटी दरम्यान त्यांन समजले की या घराचा लिलाव होणार आहे. हे पाहून त्यांना खूप दु:ख झाले. त्यांनी तात्काळ भारत सरकारला सर्तक केले आणि सरकारने ते घर खरेदी करावे अशी विनंती केली. सरकारने देखील तातडीने पावले उचलली परंतू त्या दरम्यान देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आणि निवडणुक आचारसंहितेमुळे काम थांबले. परंतू निवडणुकानंतर नव्या सरकारच्या मार्फत त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. कल्पना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच लंडन मधील ते घर खरेदी करण्याची मागणी केली. सरकारने त्यांची मागणी मान्य करत लंडन मधील डॉ बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या काळातील ते घर खरेदी केले. कल्पना सरोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील सन्मानाने उल्लेख करतात. त्याच्या मते पंतप्रधान मोदी यांनी काही मिनीटात बाबासाहेबांच्या घराच्या खरेदीचा निर्णय घेतला. कल्पना म्हणतात की, “ ज्यादिवशी पंतप्रधानानी समारंभात माझी प्रशंसा केली होती, तो दिवस माझ्या जीवनातील शुभ दिवसांपैकी एक होता. तो आनंद मला शब्दात वर्णन करणे शक्य नाही.

परंतू कल्पना सरोज यांना या गोष्टीचे दु:ख आहे की, देशात दलित समाजाला अजुनही सन्मानाची वागणूक मिळत नाही आणि लोकांची त्यांच्याकडे बघण्याची मानसिकता अजून बदलत नाही. त्यांच्या मते थोडा बदल आहे मात्र तो पुरेसा नाही. त्याचे म्हणणे आहे की दलित समाजाच्या लोकांनी सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे आणि मनातील भिती टाकून काम केले पाहिजे. कल्पना म्हणतात की, “ मी सुरुवात केली त्यावेळी संधी नव्हत्या, आज लोकांना अनेक संधी आहेत.

शिक्षणाची संधी, नोकरी-व्यवसायाच्या संधी आहेत. लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपला मार्ग स्वत: निवडला पाहिजे.”एक गोष्ट ही देखील आहे की पैसा-दौलत मिळवल्यानंतर आणि त्याची मालकी मिळाल्यानंतरही कल्पना सरोज यांनी समाजसेवेच्या बाबतीत काही कसूर केली नाही. त्या महिला, दलित, आदिवासी गरिबांच्या किंवा गरजूंच्यासाठी मदत देणारे कार्यक्रम आयोजित करतात. हजारो गरजू मुले, महिलांना त्यांच्या या योजनेचा फायदा झाला आहे.

image


कल्पना सरोज आज अनेक प्रकारच्या व्यवसायात आहेत. त्या अनेक कंपन्यांच्या मालक आहेत. बांधकाम, पायाभूत सुविधा, ट्यूब्ज खाणउद्योग, यामध्ये त्या प्रसिध्द आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रासह, आदरातिथ्य क्षेत्र तसेच पर्यटनाच्या क्षेत्रातही हातपाय पसरले आहेत. कृषी आधारित उद्योगातही त्या काम करत आहेत. त्यानी हवाई वाहतूक क्षेत्रामध्येही उड्डाण करण्याचे ठरविले आहे. करोडोंची संपत्ती त्यांच्या नावे आहे. त्यांची गणना आता देशाच्या सर्वात यशस्वी महिलाउद्योजिकांमध्ये केली जाते. समाजसेवक म्हणुनही त्यांची ओळख आहे. लोकांमध्ये धाडसी, प्रामाणिक, म्हणून त्यांचा आदर्श सांगितला जात आहे. त्यातून अनेक लोक प्रेरणा घेत आहेत. त्यांच्या कहाणीमध्ये शोषण, दु:ख यांच्यासोबत यशाच्या मंत्राचा समावेश आहे. त्यामुळे निराश मनाला प्रेरणा मिळते. या यशाला अनेकांनी वाखाणले आहे. अनेक पुरस्कार त्यांना त्यासाठी देण्यात आले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने गौरविले आहे. आज यशाच्या शिखरावर बसून कल्पना यांच्याकडे ते सारे काही आहे ज्याची त्यांनीच काय कुणीच कल्पना केली नसेल.

कल्पना सरोज यांची मुलाखत उल्हासनगर मध्ये त्याच्या घरी झाली. प्रत्येक मुद्यावर त्यांची स्वत:ची मते होती. जीवनाच्या सा-या घडामोडी त्यांनी आम्हाला तपशिलात सांगितल्या. कॅमेरासमोरही त्या बोलल्या. त्यावेळी अनेकदा भावूक झाल्याने त्यांना अश्रू थांबविता आले नाहीत. मात्र असे असेल तरी त्या कुणाला घाबरत नाहीत याचाही त्यांनी प्रत्यय दिला. त्यांना मृत्यूची भीती नाही. कितीही मोठे संकट असो त्या सदैव त्याच्यावर मात करण्यासाठी सज्ज असतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवले की त्या अशा संधी शोधत असतात की जेथे सारे हारले आहेत आणि त्या मात्र त्या कामात आव्हान घेऊन ते यशस्वीपणे पेलून दाखवण्यास उत्सुक आहेत. अशा मोठ्या कामगिरीच्या त्या शोधात आहेत हे जाणवले.

त्यांच्या निकटवर्ती लोकांच्या माहिती नुसार त्यांनी मुंबईतच एका फर्निचर व्यावसायिकाशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही झाली. ज्यावेळी आम्ही मुलाखतीला त्यांच्या घरी गेलो त्यावेळी त्यांच्या मुलीने आमचे स्वागत केले होते. त्यांची मुलगी त्याच्या कामात आता शक्य ती मदत करते. त्यांच्या मुलीनेही लंडन येथून आदरातिथ्य व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेतले असून त्यांनाही स्वत:च्या बळावर नाव कमवायचे आहे. त्यांचा मुलगा पायलट आहे आणि त्या त्याच्या उंच उड्डाणामुळे खूश आहेत. कल्पना यांचे जावई देखील उद्योगात विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

    Share on
    close