राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहयोगाने पर्यटन क्षेत्र अर्थव्यवस्थेत देऊ शकते सर्वात मोठे योगदान

राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहयोगाने पर्यटन क्षेत्र अर्थव्यवस्थेत देऊ शकते सर्वात मोठे योगदान

Friday February 05, 2016,

3 min Read

विविधतेने नटलेला भारत देश हा पर्यटकांसाठी नंदनवनच म्हणायला हवा... निसर्गसौंदर्याने नटलेली, अतिशय समृद्ध अशी संस्कृती आणि इतिहास असलेली ही भूमी... सहाजिकच पर्यटन व्यवसायासाठी येथे सुवर्णसंधी आहे. पण पर्यटन क्षेत्राची येथील सध्याची परिस्थिती धक्कादायकच म्हणावी लागेल. एकीकडे पर्यटनाच्या एवढ्या संधी उपलब्ध असताना, क्षेत्राचे देशांतर्गत एकूण उत्पादन अर्थात जीडीपी (ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट) मधील योगदान सहा टक्क्यांहून जास्त नाही. ‘इनव्हेस्ट कर्नाटक, २०१६’ ला नेमके हेच चित्र बदलण्याची आशा आहे.

अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन आणण्याची ताकद पर्यटनामध्ये असल्याचे मत या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना कर्नाटकाचे पर्यटन मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केले. “ जगभरात असे अनेक छोटेछोटे देश आहेत, जे त्यांची अर्थव्यवस्था टिकून राहिल्याबद्दल तेथील विकसित पर्यटन क्षेत्राचेच आभारी असतील,” ते म्हणाले. 

image


तर पर्यटन सचिव प्रदीप करोला यांनी यावेळी सांगितले की खासगी क्षेत्राकडून कर्नाटकमध्ये गुंतवणूक होण्यासाठी, येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणे अत्यावश्यक आहे.

या क्षेत्राचा विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. कर्नाटक पर्यटनाचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की याद्वारे १९,००० कोटी रुपयांचा महसूल आणि ८०,०००-९०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर हॉटेल खोल्यांचा विचार करता, या खोल्यांची संख्या सध्याच्या वीस हजाराहून वाढवून एक लाखावर नेण्याचाही राज्याचा प्रयत्न आहे.

त्याशिवाय राज्य सरकार संपूर्ण किनारी प्रदेशाचा अभ्यास करत असून पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम जागांचा शोध घेत आहे. तसेच राज्य सरकार विविध प्रकल्पांच्या शोधात असून, त्यावर पच्चावन कोटी रुपये खर्चिण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना प्रदीप यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार जमीन भाडेपट्टीवर देण्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या दृष्टीनेही नवीन पर्यटन धोरणे करणार आहे. “ सध्या ६३,४६४ एकर जमीन उपलब्ध असून विविध प्रकल्पांसाठी तिचे विभाजन करण्यात आलेले आहे. पारदर्शक बोली पद्धतीने साठ वर्षांच्या दीर्घकालीन भाडेपट्टीवर ही जमीन उपलब्ध आहे,” प्रदीप विस्ताराने सांगतात.

image


“ मला स्वतःला प्रवासाची अतिशय आवड आहे आणि मी खूप प्रवास करत असते. मात्र प्रवासाचा एकसंध अनुभव मिळविण्यासाठी, अगदी छोट्या गोष्टीचीही काळजी घेतली गेल्याची खात्री पटवून घेणे, हे अतिशय गरजेचे असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले आहे,” एफडीसीआयच्या संचालक रथी झा यांनी यावेळी आपले हे मत आवर्जून व्यक्त केले.

विविध पब्लिक प्रायवेट पार्टनरशीपच्या अर्थात सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील भागीदारीच्या सहाय्याने हे साध्य झाले आहे. जेट एअरवेज आणि राज्य पर्यटन विभागाने तयार केलेले ब्रसेल्स कनेक्टीव्हीटी हब हे याचेच एक महत्वाचे उदाहरण आहे. त्यांच्या या सहयोगामुळे ब्रसेल्सहून येणारे प्रवासी विमानानी थेट बंगळुरुला येऊ शकतात, खास करुन ज्यांची द गोल्डन चॅरियट रेल्वेने प्रवास करण्याची योजना आहे.

याचेच दुसरे उदाहरण आहे केएसआरटीसी आणि बीआयएल यांच्या सहयोगातून तयार झालेली फ्लायबस... याबाबत बोलताना बीआयएलचे अध्यक्ष हरी मरार सांगतात की प्लायबस तुम्हाला खात्रीशीरपणे एकसंध प्रवासाचा अनुभव देते. यासंदर्भातील एक उदाहरण देताना ते सांगतात की, जर दिल्लीहून एखादा प्रवासी मैसूर किंवा मंगलोरला भेट देण्यासाठी आला असेल, तर त्याला थेट बोर्डींग पास मिळतो. त्यामुळे एकदा का हा प्रवासी बंगळुरुमध्ये उतरला की त्याला ताबडतोब फ्लायबसकडे नेले जाते, जे त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाते.

युवर स्टोरीचे मत

एकसंध कनेक्टीव्हीटी, सुरक्षिततेसाठी प्रवासी मित्रांना प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदार या क्षेत्राबाबत आशावादी असले, तरी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि पर्यावरण क्षेत्राची वाढ आणि विकास पहायचा आहे, हे त्यांना मान्य आहे.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

    Share on
    close