फोटोग्राफीच्या १० हजार कोटींच्या बाजारात उतरणारा धाडसी तरुण

0

लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि दोन परिवारांचे मिलन...या समारंभातील प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी फोटोग्राफी हा लग्नाचा अविभाज्य भाग झालाय. जीवनातील हे सोनरी क्षण आणखी सुंदर व्हावेत यासाठी फोटोग्राफीतही नवनवीन संकल्पना येऊ लागल्या आहेत. बदलत्या काळात लग्नातील फोटोग्राफीतून १० हजार कोटींची उलाढाल होऊ शकते हे ऐकलं तर धक्का बसेल. पण हे खरं आहे. हीच संधी हेरुन चेन्नईच्या प्रनेश पद्मनाभन यांनी बीटेक आणि मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्सची पदवी असतानाही फोटोग्राफीच्या या व्यवसायात प्रवेश केला. कुटुंबाचा विरोध असतानाही त्यांनी हा निर्णय घतेला होता. कुटुंबीयांनी मदत नाकारल्यानं त्यांनी त्यांच्या काकांच्या एसएलआर कॅमेऱ्यानं व्यवसायाची सुरूवात केली. कोणताही अनुभव नसल्यानं त्यांनी सुरूवातीला खूप सराव केला. आपण निवडलेल्या मार्गावर यशस्वी होण्यासाठी प्रनेशने खूप मेहनत घेण्यास सुरूवात केली.


प्रनेश यांनी १६५ पेक्षा जास्त लग्नसमारंभांमध्ये आपल्या फोटोग्राफीची कमाल दाखवली आहे. सर्वप्रकारच्या लग्नसमारंभांसाठी एका दुकानासारखं काम आम्ही करतो. यात पारंपरिक व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी, लग्नाआधीची आणि नंतरची फोटोग्राफी, वधूचे फोटो आणि इतर फोटो या सर्व सेवा आम्ही पुरवतो. या सर्व दर्जेदार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहक आम्हाला पंसती देतात असं प्रनेश सांगतात.


प्रनेश फोटोग्राफी किंवा पीपी या नावानं ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतीच ‘सरप्राइज मंत्रा’ या नावानं नवीन सेवा सुरू केलीये. यात नवविवाहित जोडप्यांना त्यांचे कुटुंबीय किंवा मित्र विविधप्रकारे सरप्राईज देऊ शकतात. यात पीपीकडे विविध किंमतीचे पाच हजार पर्याय आहेत. चेन्नईतल्या स्टुडिओमध्ये प्रनेश ग्राहकांना भेटतात तसंच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीशी संबंधित कामं ते याच स्टुडिओमध्ये करतात. त्यांच्या या कामासाठी एकूण २० जणांची टीम आहे. यातील पाच जण पूर्णवेळ, १० लोक अर्धवेळ आणि५ लोक फ्रीलान्सिंग करतात.

प्रनेश आपल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमांचा वापरही करतात. ६ महिनेआधीच ग्राहक त्यांना बुक करतात. प्रनेश सध्या एका मोठ्या स्टुडिओसाठी भांडवल मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. इथं फोटोशूटसोबतच फोटोग्राफीचं प्रशिक्षण देण्याची त्यांची योजना आहे. देशातील सर्वोत्तम १० फोटोग्राफरमध्ये आपली गणना व्हावी असा प्रनेश यांचा प्रयत्न आहे.