वंचितांचा सर्वांगिण विकास हेच राशीचे ‘लक्ष्यम’

0

“मी कधी कल्पनाही केली नव्हती की मी माझ्या आईच्या पाऊलावर पाऊल ठेऊन चालेन, पण मी इथे आहे,” लक्ष्यमची संस्थापिका राशी आनंद सांगते. लक्ष्यम वंचित समाजाच्या कल्याणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे.

समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या राशीच्या आईने आपले आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी वाहिले. आपल्या आईचे काम पहात लहानाची मोठी झालेल्या राशीने समाजातील विविध स्तर, त्यातील काही लोकांचे समस्यांनी आणि संकटांनी भरलेले आयुष्य, त्या मार्गावरुन होणारा त्यांचा खडतर प्रवास या सर्व गोष्टी खूप जवळून पाहिल्या होत्या.

सामाजिक क्षेत्रातला आपल्या आईचा प्रवास पहात मोठी झालेली राशी कॉलेजला जाताना रोज एक दृश्य पहायची. राशी सांगते, “मी ऑटोने कॉलेजला जायचे तेव्हा मी कृश केसांची अस्वच्छ, अस्ताव्यस्त अवतारातील मुलं पाहिली होती, जी रेड सिग्नल असताना प्रत्येक गाडीला वेढा घालायची आणि सिग्नल ग्रीन झाला की एकत्र जमायची आणि प्लास्टीक बाटल्यांबरोबर खेळायची.” दररोज हा प्रकार पहाणाऱ्या राशीने घरोघरी जाऊन वापरलेली खेळणी जमा करायची आणि या मुलांना वाटायची असे ठरवले. राशी या कामामध्ये अधिकाअधिक गुंतत गेली तशी तिने ‘लक्ष्यम्’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली.

राशी रांचीमध्ये लहानाची मोठी झाली. ‘लक्ष्य’ हे तिच्या आईने रांचीमध्ये सुरु केलेल्या संस्थेचे नाव. “ती माझा आदर्श आणि माझी मार्गदर्शक असल्यामुळे मी माझ्या संस्थेचे नाव ‘लक्ष्यम’ ठेवलं. तसंही मला वाटतं माझं म्हणणं योग्यरित्या मांडणारा दुसरा कुठला शब्द असूच शकत नाही. लक्ष्य- ध्येय. माझ्यासाठी हे चांगला समाज निर्माण करण्यासाठी केलेल्या निरंतर संघर्षाचे आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे प्रतिक आहे. एक अखंड ध्येय,” राशी सांगते.

तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राशीने दिल्लीमधील अनेक वस्त्यांची पहाणी केली. बालविकास कार्यक्रमांतर्गत मुलांच्या भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी लक्ष्यमने दोन सर्वांगिण प्रयत्न सुरु केले.

बटरफ्लाय: मुलांना निकोप शिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘बटरफ्लाय’चा जन्म झाला. ज्यामध्ये केवळ शैक्षणिक पातळीवरचेच नाही तर आरोग्य आणि स्वच्छता या विषयीचेही शिक्षण देण्यात येते. शिक्षणाच्या जोरावर ही मुले ‘बटरफ्लाय’ म्हणजेच फुलपाखरासारखे पंख पसरुन मुक्त भरारी घेऊ शकतील हाच अर्थ प्रतित करणारे हे शीर्षक आहे. लक्ष्यमच्या टीमसाठी ‘शिक्षण’ या शब्दाचा अर्थ आहे व्यक्तीचा सर्वांगिण विकास. शालेय अभ्यासाबरोबरच जगण्याशी संबंधित सर्व गोष्टींचे आणि कलांचे ज्ञान. इथल्या कुठल्याही मुलाला जो कलाप्रकार शिकायची इच्छा असेल तो कलाप्रकार त्या विषयातील निष्णात शिक्षक त्याला शिकवितात. लक्ष्यमने अनौपचारिकरित्या दत्तक घेतलेल्या वस्त्यांमध्ये उपचारात्मक शाळा सुरु केल्या आहेत. जिथे मुलांना उपचारात्मक शिक्षण दिले जाते जे त्यांच्या औपचारिक शालेय शिक्षणामधील राहिलेली कसर भरुन काढते. त्याचबरोबर मुलांना त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान आरोग्यदायी आणि सुरक्षित बनविण्यासाठी विविध कार्यशाळा आणि शिकवण्यांचे आयोजनही केले जाते.

टॉय लायब्ररी: २००४ मध्ये लक्ष्यमने दिल्लीमध्ये भारतातील सर्वात पहिली टॉय लायब्ररी सुरु केली. प्रत्येक मुलाचे लहानपण खेळण्यांपासूनच सुरु होते. मात्र काही मुलांना याचा आनंद घेता येत नाही. हा भावनिक बंध आणि आधार यांचा अभाव राशीच्या डोळ्यांनी टिपला होता आणि त्यातूनच लक्ष्यमच्या दिशेने तिचे पहिले पाऊल पडले होते. टॉय लायब्ररीची संकल्पना प्रचंड यशस्वी झाली आणि आता ती लक्ष्यमच्या प्रत्येक शाखेचा एक भाग बनली आहे.

रुह: लक्ष्यमच्या महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांना निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी विकण्याचे कौशल्य शिकविण्यात येते. आरोग्य आणि स्वच्छता यांच्याविषयीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते आणि पुरुषप्रधान, मागास समाजात आपल्या आवडी आणि हक्क यांचे रक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाते.

लक्ष्यमचा नवीन उपक्रम, ‘अभ्यास’ची दोन उद्दीष्टे आहेत. याद्वारे वापरलेल्या कागदांचा पुनर्वापर आणि लक्ष्यमच्या शाळांतील मुलांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येते. या सर्व कार्यक्रमांचा सामूहिक परिणाम अभूतपूर्व आहे. लक्ष्यमने देशभरातील २०,८०० जणांच्या आयुष्यात बदल घडविला आहे.

लक्ष्यम भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत आहे. लक्ष्यमचे मुख्य कार्यालय दिल्ली येथील कौशंबी येथे आहे. प्रत्येक शाखेचा एक कार्यकारी प्रमुख आहे. जो त्या शाखेचे कार्यक्रम सांभाळतो आणि राशीच्या मार्गदर्शनानुसार योजनांची अंमलबजाबणी करतो.

वैयक्तिक निधीवर संस्था कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांना कुठल्याही कोर्पोरेट संस्थेकडून अथवा सरकारी संस्थांकडून निधी प्राप्त झालेला नाही. कर्मचाऱ्यांचे वेतनही चालू खर्चाच्या अंदाजपत्रकाचा एक भाग आहे. राशी सांगते की अत्यंत कमी पैशात ते काम करतात आणि एवढ्या कमी पैशात सर्व उपक्रम राबविणं खरंच खूप कठीण आहे.” ती पुढे सांगते, “ त्यातच, खूप मोठया प्रमाणात सुरु असलेल्या प्रमोशनल ऍक्टीव्हिटीजसाठीही खूप पैसा लागतो. त्यामुळे अनेकदा रिझल्टही कमी मिळतो.”

लक्ष्यमच्या टीममध्ये सध्या १५ कर्मचारी आहेत, जे लक्ष्यमच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. सहा संचालक आहेत जे सल्लागार समितीमध्ये आहेत आणि ते संस्थेच्या कारभारात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात. राशी सांगते, “ केवळ माझ्या टीममुळे लक्ष्यम आज जिथे आहे तिथपर्यंत पोहचू शकलं आहे.”

लक्ष्यमला त्याच्या सहयोगी संस्थांचा मजबूत आधार लाभला आहे. मॅनफोर्ड, अशोका चेंजमेकर्स, सेफ एक्सप्रेस, जुवालिया ऍण्ड यू, क्रॅफ्युसन, हँग आऊट, आयआयटी दिल्ली, ओल्ड ऍबरडीन गिफ्ट स्टोअर, इ बे, बुक युवर ड्रीम स्टोअर, आय वॉलन्टीअर्स ऍण्ड सीएएफ या लक्ष्यमच्या सहयोगी संस्था आहेत.

‘शक्सियत पुरस्कार २०१५’ मध्ये लक्ष्यमला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरविण्यात आले. यु टीव्ही बिन्दासच्या ‘बी फॉर चेंज’ पुरस्काराने भारतातील चार जणांना गौरविण्यात आले. त्यातील एक राशी होती. त्याचबरोबर वुमन ऑफ विजन पुरस्कार, नारी सशक्तिकरण पुरस्कार, सोशल ऑन्त्रप्रनॉर ऑफ दि इयर पुरस्कार अशा विविध पुरस्काराने राशीला गौरविण्यात आले आहे.

राशी मानते की सोशल वर्क करताना सर्वात कठिण काम असते ते पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. शिक्षणाचे फायदे न समजणारे पालक अनेकदा मुलांना शाळेत पाठवायला कडाडून विरोध करतात. घरातूनच प्रोत्साहन नसल्यामुळे मुले सुद्धा शाळेत जायला फार उत्सुक नसतात. राशी सांगते, “माझ्या कल्पनेतलं जग पहायचं माझं मोठं स्वप्न आहे. महिला सबलीकरण किंवा बाल कल्याणासाठी काम करण्याची माझी इच्छा नाही. किंबहुना मला असं जग घडविण्यासाठी संघर्ष करायचा आहे, जिथे प्रत्येकाच्या हातात त्यांच्या समस्येशी झगडण्यासाठी योग्य शस्त्र असेल. आणि मला वाटतं शिक्षण आणि सर्वांगीण विकास हेच ते शस्त्र आहे. लिंगभेद, दहशतवाद यासारख्या समाजातील अनेक समस्यांना कारणीभूत ठरणारे गैरसमज केवळ शिक्षणामुळेच दूर होऊ शकतात.”