सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी सदाशिव अमरापूरकर फाऊंडेशन

0

महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले दोन असे कलाकार आहेत ज्यांची पडद्यावरची भुमिका अनेकदा खलनायकाची असली तरी आपल्या खऱ्या आयुष्य़ात ते नेहमीच नायक राहिले. एक म्हणजे निळू फुले आणि दुसरे सदाशिव अमरापूरकर. दोघे ही कलाकार म्हणून उत्तम होतेच पण आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी एक नवा पायंडा पाडला. ३ नोव्हेंबरला सदाशिव अमरापूरकर यांची पहिली पुण्यतिथी होती. याच दिवशी त्याच्या सामाजिक कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच्या जवळच्या मित्र परिवारानं ‘सदाशिव अमरापूरकर फाऊंडेशन’ची घोषणा केली.

या फाऊंडेशनबद्दल सांगताना जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितली, “सदाशिव हा उत्तम सजग असायचा.कला आणि सामाजिक भान हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे दोन मुख्य पैलू मानता येतील. त्याची आठवण जागृत ठेवायला या दोन पैलूंची सांगड घालताना सदाशिव अमरापूरकर फाऊंडेशन या संस्थेची संकल्पना पुढे आली”.

सदाशिव अमरापूरकर यांनी विविध सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतला होता. आपल्या कमाईचा बराचसा हिस्सा ते सामाजिक कार्यासाठी देत असत. प्रसंगी मानधन न घेता काम करत असत. अशा या कलावंताच्या सामाजिक कार्याची यादी फार मोठी आहे. हे सामाजिक कार्य या फाऊंडेशऩ मार्फेत पुढे नेण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देताना त्यांची मुलगी रीमा अमरापूरकर म्हणाल्या “त्यांची स्मृती जागृत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, ज्या गोष्टीबद्दल त्यांना तळमळ होती, त्या क्षेत्रात काम करत राहणे. या संस्थेचे दोन मुख्य कार्यक्षेत्र असतील – सांस्कृतिक व सामाजिक किंबहुना सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमार्फत सामाजिक उपक्रमांना सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे हा संस्थेचा मुख्य उद्धेश आहे. तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना मग ते लेखक, अभिनेते, दिग्दर्शक किंवा कला क्षेत्राशी निगडीत कोणीही असोत, यांच्या कलेला एक व्यासपीठ देणे हा देखील संस्थेचा उद्देश राहील”.

कलाकार आपल्या कलेनं अजरामर राहतो. सदाशिव अमरापूरकर हे असे कलाकार आहेत जे कलेबरोबरच आपल्या सामाजितक कार्यामुळं नेहमी लोकांच्या लक्षात राहतील. संस्थेच्या उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी इमेल द्वारे संपर्क साधता येईल. इमेल आहे sadashivamarapurkarfoundation@gmail.com. श्रीमती सुनंदा अमरापूरकर आणि प्रसिध्द लेखक डॉ. अनिल अवचट हे या संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत.