अपंगत्वावर मात करणाऱ्या ʻराजलक्ष्मीʼ

0

ʻमी स्वतःला एक नशीबवान व्यक्ती समजते कारण मी एकाच जीवनात दोन वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य जगू शकली. त्यापैकी एक म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचे आणि दुसरे म्हणजे एका अपंग व्यक्तीचे.ʼ, हे उद् गार आहेत २९ वर्षीय दंतचिकित्सक डॉ. राजलक्ष्मी एस. जे. यांचे. २०१४ साली मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस व्हिलचेयर स्पर्धेच्या त्या विजेत्या आहेत. त्या सांगतात की, जर त्यांचा सामना अपंगत्वाशी झाला नसता, तर त्यांना अपंग लोकांच्या आय़ुष्यात येणाऱ्या आव्हानांची जाणीवच झाली नसती. एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्या त्यांचे आयुष्य जगत होत्या. मात्र २००७ साली झालेल्या एका वाहन अपघाताने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. चेन्नईमध्ये त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या मणक्याच्या हाडाला दुखापत झाली. परिणामी त्यांचे दोन्ही पाय लकवाग्रस्त झाले. बंगळूरूच्या स्थायिक असलेल्या डॉ. राजलक्ष्मी त्या दुर्घटनेबाबत बोलताना सांगतात की, ʻबीडीएसच्या परिक्षेत अव्वल आल्यानंतर आणि सुवर्णपदक मिळाल्यानंतर मी माझ्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्ससाठी काही कागदपत्र गोळा करत होती. त्या दरम्यानच माझ्या गाडीचा अपघात झाला.ʼ विशेष म्हणजे या अपघातानंतर आलेल्या अपंगत्वाला त्यांनी आपल्या आयुष्यातील अडसर ठरू दिले नाही. या अपघातानंतर सहा महिन्यापर्यंत त्या स्वतःहून बसूदेखील शकत नव्हत्या. उर्वरित आयुष्य व्हिलचेयरवर काढायचे, या कल्पनेनेच त्यांना चीड येत असे. परिणामी त्यांनी व्हिलचेअर वापरण्यासदेखील नकार दिला. ʻमी जर अशाच पद्धतीने व्हिलचेयरला नकार देत राहिले तर मला एकाच जागी खिळून राहावे लागेल. मला स्वप्नातदेखील कोणावर अवलंबून राहायचे नव्हते.ʼ, असे सांगताना सध्या व्हिलचेयरच माझी सर्वात चांगली मैत्रिण असल्याचे राजलक्ष्मी सांगतात.

या अपघाताने राजलक्ष्मी यांना पुरते हादरवून टाकले. त्या सांगतात, ʻजर हा अपघात घडला नसता, तर मी नक्कीच एवढी यशस्वी आणि दृढ निश्चयी झाले नसते.ʼ राजलक्ष्मी यांच्या अपघातानंतर त्यांचा संपूर्ण परिवार समर्थनार्थ त्यांच्या पाठिशी उभा राहिला. मात्र अनेक परिचितांनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याशी संबंध तोडले, या गोष्टीचे त्यांना दुःख होते. त्यांच्या ओळखीचे लोक औपचारिकता म्हणून त्यांना भेटायला येत, त्यांचे सांत्वन करत आणि निघुन जात. राजलक्ष्मी सांगतात की, ʻमला सहानुभूतीचा प्रचंड राग यायचा. कोणत्याही अपंग व्यक्तीला तुमच्या सहानुभूतीची गरज नसते. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांना समर्थन देऊ शकत नाहीत, तर त्यांना निराश तरी करू नका.ʼ या दुर्घटनेनंतरही राजलक्ष्मी यांनी आत्मविश्वास गमावला नाही. एमडीमध्ये ७३ टक्के गुण प्राप्त करत त्या कर्नाटकमध्ये अव्वल आल्या. एवढा मोठा अपघात झाल्यानंतरही पुढचा प्रवास राजलक्ष्मी यांच्यासाठी सोपा नव्हता. भारताच्या संविधानानुसार शिक्षण क्षेत्रात अपंगांकरिता ३ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत मात्र सर्वजण या नियमाची पायमल्ली करतात. २०१० साली एका शिक्षण संस्थेतून पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी त्यांना एक प्रदीर्घ न्यायालयीन लढा द्यावा लागला. एका सरकारी महाविद्यालयात दंत चिकित्सा अधिकारी पदावर त्यांना काम करायचे होते. मात्र हे काम करण्यापासून त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी स्वतःचे एक दंत चिकित्सालय (डेंटल क्लिनिक) सुरू केले.

डॉक्टर बनण्याचे राजलक्ष्मी यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. बालपणी राजलक्ष्मी यांनी आपल्या आईवडिलांना घराच्या इमारतीमध्येच चिकित्सालय (क्लिनिक) चालवताना पाहिले होते. त्यामुळे त्यांनादेखील तसेच करायचे होते. ʻस्थानिक लोक माझ्या वडिलांना ʻदेवारूʼ म्हणून हाक मारायचे, ज्याचा कन्नडमध्ये अर्थ ʻदेवʼ असा होतो. कारण ते लोकांचा जीव वाचवायचे.ʼ, असे भावनिकपणे राजलक्ष्मी सांगतात. राजलक्ष्मी जेव्हा दहाव्या इयत्तेत शिकत होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. एक डॉक्टर बनण्यासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातदेखील नशीब आजमवण्याचे राजलक्ष्मी स्वप्न पाहत असत. त्यामुळेच त्यांनी आपल्या शिक्षणात काहीकाळ ब्रेक घेऊन फॅशन डिझायनिंग करण्याचा विचार केला. अशात जेव्हा त्यांना एका स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी काही विचार न करता, स्पर्धेत नावनोंदणी करण्यासाठी शुल्क भरले. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजलक्ष्मी यांनी स्वतःलाच व्यायाम करण्यापासून ते केसांची निगा राखणे, डायटींग करणे यासाठी प्रेरीत केले. मिस व्हिलचेयर, ही स्पर्धा या दातांच्या डॉक्टरकरिता रोमांचकारी अनुभव देणारी ठरली. सुरुवातीला २५० स्पर्धकांपासून सुरू झालेली ही स्पर्धा नंतर ठराविक स्पर्धकांपर्यंत सीमित झाली. अखेरीस राजलक्ष्मी ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झाल्या. त्या स्पर्धेत राजलक्ष्मी यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराने पंच आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. त्या स्पर्धेत राजलक्ष्मी यांना विचारण्यात आले की, तुम्हाला जर पुन्हा एकदा जीवन जगण्याची संधी मिळाली, तर तुम्ही कोणाच्या जीवनाची निवड कराल?, त्यावर राजलक्ष्मी यांनी ʻमाझे स्वतःचे जीवनʼ, हे उत्तर दिले होते. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या राजलक्ष्मी यांनी पुढे सांगितले की, ʻतेव्हा एक सामान्य व्यक्ती म्हणून मी केलेल्या चुका सुधारल्या असत्या. भारतात अपंगांची परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न केले असते.ʼ यावेळेस त्यांना मिस व्हिलचेयर स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे, जी डिसेंबर महिन्यात बंगळूरू येथे आयोजित होण्याची शक्यता आहे.

आपल्या या अपंगत्वावर कोणताही ठोस इलाज नसून, आपले उर्वरित आयुष्य त्यांना दोन लकवाग्रस्त पायांसोबत व्यतित करायचे आहे, याची त्यांना पुरेपुर कल्पना आहे. राजलक्ष्मी सांगतात की, ʻसध्या उपलब्ध असलेले संसाधन माझा इलाज करण्यास असमर्थ आहेत. या परिस्थितीचा इलाज करण्यासाठी सक्षम स्टेम सेलच्या संशोधनाचे काम अजुनही सुरू आहे. त्यासाठी निश्चितच काही कालावधी लागेल. याबाबत जर तुम्ही मला विचाराल, तर मी फक्त एवढेच सांगेन की, यावर कोणताही उपाय नाही.ʼ या दुर्घटनेनंतर अनेक फिजिओथेरपीच्या सत्रानंतर राजलक्ष्मी आता स्वतंत्र आहेत. त्या स्वतः आपली गाडी चालवतात. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. व्हिलचेयरवर असूनही त्यांना प्रवास करण्याची खुप आवड आहे. त्या अनेक यात्रा करतात. फक्त भारतातील अनेक ठिकाणांचाच नाही तर परदेशी यात्रांचादेखील त्यांनी आनंद घेतला आहे. मात्र अखेरीस भारत हाच सर्वात सुंदर देश असल्याचे त्या सांगतात. वास्तविक, तुमचे घर तिथेच असते जिथे तुमचे मन आहे, असे त्या सांगतात.

Related Stories

Stories by Ranjita Parab