शेतकऱ्यांना मिळाली संजीवनी - १ -१ रुपया वर्गणी गोळा करून दुष्काळ निवारण्यासाठी बांधला बंधारा

0

जर दृढ निश्चय व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यशाचा टप्पा गाठने अशक्य नाही. मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातल्या पतलावत गावात राहणाऱ्या अनिल जोशी यांनी असेच अशक्य काम शक्य करून दाखविले आहे. त्यांनी आपल्या प्रयत्नांनी दर वर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मातच केली नाही तर १ -१ रुपया गोळा करून असे कार्य केले की जेथे सरकारी यंत्रणा सुद्धा फोल ठरली आहे. अनिल यांनी गावकऱ्यांकडून देणगीच्या रुपात मिळालेल्या पैशातून असा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला की ज्यामुळे या भागतील शेतकरी आपल्या शेतात भरपूर उत्पन्न काढू शकत आहे आणि जे शेतकरी दुष्काळाला कंटाळून गाव सोडून गेले होते त्यांनी आता परत येऊन शेतीला आपला मुख्य व्यवसाय बनवला आहे.

शेतीची आवड असणाऱ्या अनिल जोशींना शेतात काम करण्यास आणि स्वतःला शेतकरी म्हणून घेण्यात जास्त धन्यता वाटते. त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला असून गावातल्या लोकांवर ते वेळोवेळी उपचार करतात. काही वर्षापूर्वी मंदसौर भागात दरवर्षी दुष्काळ पडायचा कारण पावसाचे पाणी अडवण्याच्या उपाय योजना नव्हत्या. इथले शेतकरी या अवघड परिस्थितीत वर्षभरात फक्त एकच हंगामी पिक घेऊ शकत होते. पण आता चित्र बदलले आहे. ज्या भागात बंधारे बांधली गेली आहेत तिथे वर्षभर मुबलक पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. अनिल सांगतात ते स्वतः दुष्काळाने त्रस्त होते म्हणून त्यांनी आपल्या शेताच्या आसपासच्या विहिरींची खोली वाढवली जेणे करून शेती साठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होईल पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.


अनिल यांच्या गावाजवळ सोमली नावाची नदी वाहते. जिला वर्षातून २ – ३ महिनेच पाणी असते नंतर ती कोरडी पडते त्यामुळे काही वर्षांपासून येथे दुष्काळाची स्थिती जाणवू लागली आहे त्यामूळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलो दूर जावे लागते. पूर्वी ज्या शेतात २०० क्विंटल धान्य पिकत होते तिथे मुश्कीलीने २० किलोपर्यंत धान्याचे उत्पन्न होऊ लागले होते. त्यांना तातडीचा व प्रभावी उपाय म्हणून एक कल्पना सुचली की नदीला बांध घालून ते पाणी शेतीला तसेच जनावरांच्या पिण्यासाठी उपयोगात आणता येईल.


आपल्या कल्पनेला वास्तविक रुपात साकार करण्यासाठी अनिल यांनी आपली योजना काही मित्रांना सांगितली की, जर सोमाली नदीवर बंधारा बांधला तर अतिरिक्त वाया जाणारे पाणी अडवले जाईल. मित्रांच्या मिळालेल्या होकाराने अनिल यांनी मित्रांना बांध घालण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची व्यवस्था करायला लावली. यासाठी अनिल यांनी काही मजूर आणि आपल्या मित्रांच्या मदतीने एक कच्चा बांध घातला. काही दिवसांनी पाऊस पडून बंधाऱ्यात पाणी जमा झाले याचा परिणाम असा झाला की जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूच्या अनेक कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. अनेक वर्षांनी या भागात पिके जोमाने डोलू लागली. पण इतर भागात परिस्थिती जशीच्या तशीच होती व तिथे पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती.


पुढच्या वर्षी परत एकदा बांध घालण्यासाठी त्यांनी लोकांकडे मदत मागितली पण कुणीही पुढे येण्यास तयार नव्हते. अनिल यांनी लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न करुनही त्यांना कुणीही साथ दिली नाही. एक दिवस त्यांनी आपली विवंचना त्यांच्या पत्नीला सांगितली व त्यांच्या पत्नीने लगेच स्वतःचे दागिने त्यांच्या पुढ्यात ठेवले जेणेकरून ते विकून आलेल्या पैशातून त्यांना बांध बांधायला मदत होईल व त्यामुळे भागाचा विकास होईल अशी इच्छा बोलून दाखवली. अनिल यांच्या अशाच प्रयत्नांनी अनेक भागात हिरवळ दिसू लागली आहे, लोक संपन्न होऊ लागले तर दुसरीकडे मदतीसाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हते. मग अनिल यांनी विचार केला की दरवर्षी बांध घालावा लागतो तर त्याच जागेवर पक्का आणि मजबूत बंधारा तयार करावा म्हणजे या दरवर्षीच्या अडचणीतून कायमची मुक्तता होईल. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काढल्यानंतर त्यांना कळले की १ लाख रुपयांची गरज आहे. त्यांच्या जवळ इतकी मोठी रक्कम नसल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना मदत करण्यासाठी याचना केली. गावकऱ्यांनी नेहेमीप्रमाणे हात वर केले. हे काम सरकारचे आहे तुम्ही उगाच मध्ये पडता या त्यांच्या वक्तव्याने कुणीही निराश झाले असते पण आपल्या निश्चयाशी ठाम असलेल्या अनिल यांनी हे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला.


त्यांनी विचार केला की बंधारा बांधण्यासाठी लोकांकडून १-१ रुपया निधी गोळा केला आणि दिवसाला १००० लोकांनी जरी १ रुपया दिला तरी दोन-तीन महिन्यांमध्ये आपल्याकडे १ लाख रुपये जमा होतील. याप्रमाणे मंदसौर आणि जवळपासच्या गावांतून १-१ रुपया वर्गणी मागून त्यांनी १ लाख रुपये जमा केले आणि बंधारा बांधण्याचे काम सुरु केले. पक्का बंधारा बांधून झाल्यानंतर त्याचा फायदा आजूबाजूच्या ५ गावांना मिळाला. त्यामुळे गावातल्या लोकांना वर्षभर पिण्याचे पाणी मुबलक मिळू लागले. सिंचनाच्या पाण्याची पण व्यवस्था झाली व जिथे शेतकरी आपल्या शेतात एकच हंगामी पिक घेत होते तिथे आता रब्बी आणि खरीप असे दोन पिके घेऊ लागली. शिवाय दुष्काळामुळे अनेक जंगली जनावरे पाण्याच्या शोधात गावात येण्याची भीती होती ती पण गावाबाहेरच त्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे टळली होती. आज या भागात सोयाबीन, गहू, लसून, हरबरा, मोहरी, मेथी, कोथंबीर आणि अनेक प्रकारची पिके घेतली जात आहेत.

आता परिस्थिती इतकी बदलली आहे की, जिथे अनिल यांच्या गावापासून १०० किलोमीटर दूरच्या गावात जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा यांचे गाव हिरवेगार असते. त्यामुळे दुसऱ्या गावातील लोकसुद्धा त्यांचा शोध घेऊन त्यांना आपल्या गावातसुद्धा अशाच प्रकारचा बंधारा बांधण्यासाठी गळ घालू लागले आहेत. अनिल आतापर्यंत १० बंधारे बांधण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील लोकांची दुष्काळापासून सुटका होऊन परिस्थिती बदलण्यास मदत झाली. अनिल सांगतात की या भागातील बरेच लोक दुष्काळाला कंटाळून स्थलांतरित झाले होते ते आता परत आपल्या गावात येऊन शेती करू लागले आहेत. जमिनीला योग्य प्रमाणात मशागत आणि पाणी मिळाल्यामुळे जमिनीतून मोती पिकू लागले आहेत. अगोदर जेव्हा या लोकांना धान्य विकत आणून खावे लागत होते तिथे आता त्यांच्या घरात वर्षभर पुरेल एवढे धान्य पिकत आहे. आज जर बंधाऱ्याला काही दुरुस्तीची वेळ आली तर लोक सगळे मिळून ती करतात. अनिल सांगतात की, "आज सगळे शेतकरी या गोष्टीशी सहमत आहेत की बंधाऱ्याच्या व्यतिरिक्त पाण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही".

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे