आता हाताला चटके बसणार नाहीत, रोबोट बनवणार पोळ्या

आता हाताला चटके बसणार नाहीत, रोबोट बनवणार पोळ्या

Friday December 18, 2015,

5 min Read

प्रणोती नगरकर गोष्टी सहज आणि साध्या करण्यावर भर देतात. सुबोधता हे त्याचं वैयक्तिक तत्वज्ञान आहे आणि म्हणूनच रोटीमॅटीक बनवणाऱ्या त्यांच्या चमुसाठीही ही सुबोधता पथदर्शीतत्व ठरलंय.

झिंप्लिस्टिकचं उत्पादन असणारं रोटीमॅटीक हा पहिला रोबो आहे, जो अगदी घरगुती चवीच्या चपात्या बनवतो आणि एका सेकंदात त्या घडी करून ठेवू शकतो. नव्याने लग्न झालेल्या प्रणोती यांना कुटुंबाला ताजं जेवण द्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी हा रोबोट बनवला. त्यांच्या कामाच्या वेळापत्रकात धावपळ होऊ लागली आणि त्यांना ही कल्पना सुचली.

झिंप्लिस्टिकनं जुलै २०१५ मध्ये बी वर्गातील गुंतवणुकीतील $११.५ दशलक्ष इतकं लक्ष्य साध्य केलं आहे.

image



"महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकताना मी शर्टांना इस्त्री करण्यासाठी स्वयंचलित इस्त्री बनवली होती आणि तेंव्हाच मला कळलं की मी एक चांगली संशोधक होऊ शकेन ज्याने मी इतरांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून शकेन."


सुरुवातीची वर्ष :

अभियांत्रिकीचा वारसा असणाऱ्या घरातली प्रणोती ही चौथ्या पिढीतली इंजिनियर! प्रणोतीनं नेहमीच संशोधक होण्याचं स्वप्न पाहिलं. त्या सांगतात," माझे आई-वडील दोघेही आपापल्या परीने उद्योजक. माझी आई अत्यंत बुद्धिमान आणि चैतन्याने सळसळती अशी चित्रकार. तिने स्वत:चा इंटेरियर डिजाईनचा व्यवसाय सुरु केला. अनेक विविधांगी काम तिनं केली आजच्या युगाशी समतोल साधण्यासाठी ती संगणक शिकली आणि आता तिच्या आवडीच्या गणित विषयाची ती शिक्षिका आहे. वडील तर अगदी व्यवहारी, तर्कशुद्ध आणि विचारांचे पक्के, मशीन डिजाइनचा त्यांचा व्यवसाय. वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी स्वत:चा एक नवा व्यवसाय सुरु करण्याच धाडस केलं.” प्रणोती म्हणतात की, त्यांच्यात दोन्ही पालकांचे गुण उतरलेत. आई थोडीशी बंडखोर पण कलाकार तर वडील व्यवहारी तर्कशुद्ध आणि नम्र विचारांचे. पुण्यात वाढलेल्या प्रणोतीला महाविद्यालयात शिकताना सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. सिंगापूर एअरलाइन्सच्या स्कॉलरशीप कार्यक्रमांतर्गत. अभियांत्रिकी शाखेत जायचं हे ठरलेलं असल्यानं त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरींगची पदवी मिळवली आणि सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठात प्रॉडक्ट डिजाइनिंगचा अभ्यास केला. स्टुडंट एक्सचेन्ज कार्यक्रमांतर्गत त्या सिंगापूरला गेल्या आणि बार्कले इथे त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

रोटीमॅटीक चा शोध :

एका नामांकित ग्राहक कंपनीसोबत विविध उत्पादन ग्राहकांपर्यंत योग्य रीतीने घडवून पोहोचवण्याचं समाधान मिळत असतानाच प्रणोतीला आपल्या कुटुंबांला सकस आहार कसा देत येईल याचा विचार सतत पिंगा घालत होता.

"यासाठीच मी २००८ मध्ये झिंप्लिस्टिकची सुरुवात केली. माझी स्वत:ची बचत, वेळ आणि सगळे संपर्क पणाला लावत मी माझं स्वप्न साकारलं. जगातलं पाहिलं स्वयंचलित पोळ्या बनवणार मशीन 'रोटीमेटिक ' बनवून." गेल्या सात वर्षात प्रणोती आणि त्यांच्या टीमनं अथक परिश्रम घेतलेत सिंगापूरमध्ये स्पर्धाही जिंकलीय. इंटेल बार्कले तंत्रज्ञान व्यावसायिकता आव्हान स्पर्धेत त्यांनी तिसरं स्थान पटकावलं.

image


प्रणोती यांनी एका प्रॉडक्ट डिजाईन कंपनीत उत्पादनाच्या विस्ताराची प्रक्रिया समजून घेण्यासाठी २ वर्ष कामही केलं. हे सगळं करत असताना त्यांच्या डोक्यात सतत, 'करावयाच्या गोष्टी' याची यादी तयार होतीच. प्रकृतीला जपणाऱ्या प्रणोती याचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांनी आजच्या युगातील सर्वांना भेडसावणाऱ्या समस्येवर मात करायचं ठरवलं. ते म्हणजे सकस आहार आणि तोही पटकन .

रोटीमॅटीक , भविष्यातलं साधन :

रोटीमेटिक एका मिनिटात एक अशा २० चपात्या बनवू शकतं . तेल, त्या पोळ्यांची जाडी किंवा त्याला कसं भाजायचं आहे या सगळ्या विकल्पांसहीत ". २०१४ मध्ये जेव्हा आम्ही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वीच ग्राहकांची मागणी लक्षात घेतली तेव्हा आम्हाला मिळणारा प्रतिसाद उदंड होता हे आम्हाला जाणवलं." प्रणोती सांगत होत्या. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागलीय. आधी ३५ होती आता ती वाढतेय. आता त्याचं लक्ष्य हे दुसऱ्या टप्प्यावर आहे. जिथे ग्राहकांना उत्पादन तयार होण्याआधीच मागणी करायला लावणे . " माझ्या टीम मध्ये योग्य लोकांची निवड करणं हे एक संस्थापक म्हणून माझ्यासमोरचं मोठं आव्हान आहे. ध्येयच म्हणा ना. रोटीमॅटिकसारखं उपयोगी आणि जगातील पहिलं असं संशोधन घडवण्यासाठी चांगल्या कामाची इच्छा आणि संशोधनाला पूरक वातावरण तयार करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. जिथे एक कुटुंब म्हणून आपण काम करू शकतो." प्रणोती सांगत होत्या .

सध्याचा त्यांचा ग्राहक वर्ग हा अनिवासी भारतीय आहे. विशेष करून अमेरिकेत राहणारे भारतातील कुटुंबीय. प्रणोती आपल्या ग्राहकांबद्दल सांगत होत्या. " चपाती किंवा पोळी हा त्यांच्या इथेही जेवणातला मुख्य घटक आहे. पण ती बनवता येणं यात कसब आहे. ते वेळखाऊ आहे आणि कधीकधी खूप पसाराही होतो. त्यामुळे त्यांना रोज पोळ्या मिळत नाहीत ही त्यांची तक्रार असते."

त्या पुढे म्हणतात," रोटीमॅटीकला खरंतर मोठी बाजारपेठ आहे. संपूर्ण जगभरात सपाट ब्रेड हा आवडीनं खाल्ला जातो. ज्याची नावं वेगवेगळी आहेत. दक्षिण अमेरिकेत टोर्टीला असो किंवा इथिओपिया मधलं इंजेरा असो किंवा मग इटलीतलं पियादिन असो, रोटीमॅटिकमुळे जगभरातल्या कुटुंबाना नरम आणि गरम पोळीचा हा प्रकार निश्चितच आवडेल."

तंत्रद्यान जगतातील स्त्रिया :

प्रणोती हे प्रांजळपणे कबुल करतात की, महिला हार्डवेयर क्षेत्रात अगदी नवख्या आहेत. त्यांनाही या कंपन्यांमध्ये काम करताना हा अनुभव आला. म्हणजे लोक त्यांना मुख्य तंत्रज्ञ अधिकारी किंवा अभियांत्रिकी रचनाकार म्हणून कधीच ओळखायचे नाहीत. त्यांना वाटायचं की या विक्री किंवा विपणन विभागातल्या असाव्यात.

" म्हणून मग मी आमच्या मिटींगला जाताना चक्क मोटरसायकलनं जायचे. त्यांना दाखवायला की मी वेगळी आहे ." त्या हसत सांगत होत्या .

गरोदर असताना तर एक वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्या म्हणतात ," मी गरोदर आहे हे कोणाला कळू दिलं नाही कारण मला माझ्यासाठी वेगळी सोय नको होती." तरीसुद्धा त्यांच्या अनुभवातून एक स्त्री असणं म्हणजे काय हे त्या शिकल्या. "आपल्याला स्त्रीत्वाचा त्याग नाही करायचाय तर आपल्यातल्या पुरुषी आणि स्त्रीत्वाच्या सद्गुणांचा मिलाप करून समतोल साधायचा आहे." प्रणोती सांगत होत्या. प्रत्येक गोष्टीला १००% महत्त्व देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे स्वत:तल्या या दोन्ही प्रवृत्तींना त्यांना समान न्याय देता आला.

image


त्यांचे पती ऋषी इसरानी हे त्यांच्या व्यवसायात भागीदार आहेत आणि सुरुवातीपासूनच्या त्यांच्या प्रवासाचे साथीदारही. “सुरुवातीला जेंव्हा मी एकटीच या मशीनचे सुट्टे भाग बनवत होते, तेंव्हा ते मला सतत मदत करत होते. त्यानंतर त्या मशीनमध्ये जेंव्हा साॅफ्टवेयरचा प्रश्न आला, तेंव्हा त्यांनी पूर्णपणे माझ्यासोबत माझ्या व्यवसायात स्वत:लाही झोकून दिलं. " प्रणोती आपल्या आठवणी सांगत होत्या. ऋषी यांना एक हॉटेल सुरुं करायचं आहे. हे त्याचं स्वप्न आहे आणि दोघांनाही सकस आहार याविषयी कार्य करायचं आहे.

जेंव्हा तुम्ही एकत्र राहता आणि एकत्र काम करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही मर्यादा आड येत नाहीत. एकमेकांच्या कामाचा त्यांच्या शक्तीस्थानानुसार परीघ आखून घेणं हे समस्येचं समाधान आहे असं त्यांना वाटतं. त्या म्हणतात," आमच्यासमोर जेंव्हा आव्हानं येतात, तेंव्हा आम्ही दोघे त्यावर आपापल्यापरीने विचार करतो, ज्यामुळे कधीकधी संभाषणात्मक दुवा निखळू शकतो, पण मग एकमेकांशी सतत संवाद ठेवणं हा कधीही उत्तम पर्याय ठरू शकतो.

पण या शोधाच्या जननी स्वत: त्यांनी शोध लावलेल्या वस्तू घरी वापरतात का? यावर त्याचं उत्तर आहे," अर्थात माझ्या घरीही मी रोटीमॅटीक वापरते. मी माझ्या स्वत:चा प्रश्न सोडवण्यासाठी मशीनची निर्मिती केली होती, ते म्हणजे व्यस्त असतानाही सकस खायला मिळणं. एकीकडे व्यवसाय सांभाळणं आणि या धबडग्यात कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी रोटीमॅटीक हा माझ्या किचनमधला अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला आहे.

लेखक : स्म्रिती मोदी

अनुवाद : प्रेरणा भराडे