सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत लक्ष वेधण्यासाठी त्या परिधान करतात मुखवटे!

0

सध्या गोरक्षण ही आपल्या देशातील सर्वात मोठी बाब मानली जात आहे, मात्र महिलांबाबतचा दुर्लक्षित दृष्टीकोन मात्र पराकोटीला गेल्याचे पहायला मिळत आहे. गायीला इजा करणा-यांवर सध्या तातडीने कारवाई केली जाते. मात्र महिलांबाबत हिंसा वाढत असताना त्याकडे मात्र समाज डोळ्यावर कातडे ओढुन बसला आहे. २३ वर्षांच्या सुजात्रो घोष यांनी याबाबत जागृती करण्यासाठी अभिनव छायाचित्र अभियान सुरू केले आहे. 


सन २०१५ मध्ये प्रसिध्द झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी माहिती केंद्राच्या(एनसीआरबी) अहवालानुसार ३४हजार बलात्काराच्या प्रकरणांपैकी केवळ २१ टक्के प्रकरणात न्याय प्रक्रिया करण्यात आली. इंस्टाग्रामच्या छायाचित्राच्या माध्यमातून सुजात्रो यांच्या छायाचित्रातील महिला वर्गात बसलेल्या आहेत किंवा दुकानासमोर उभ्या आहेत आणि त्यानी गायीचा मुखवटा परिधान केला आहे.

या उपक्रमासाठी दिल्ली आणि कोलकाता येथे जो काही खर्च झाला तो सुजात्रो यांनी सहन केला. या शिवाय त्यात मुंबई आणि बंगळूरू असा विस्तार देखील करण्याचा त्यांचा मानस आहे, मात्र त्यासाठी दात्यांचा त्यांना शोध आहे. सुजात्रो यांचा हा उपक्रम लोकांना भावाला आहे आणि जगभरातून त्याना फोन कॉल्स आणि प्रतिक्रिया येत आहेत की ‘ आम्हाला यात सहभागी व्हायचे आहे’.

सुजात्रो यांनी त्यांचे मत स्पष्ट केले आहे की, ते स्वत: प्राणीप्रेमी आहेत, आणि त्यांना गोरक्षण करण्यास काही हरकत नाही. त्यांचा विरोध कशाला असेल तर सध्याच्या देशातील राजकीय-सामाजिक मानसिकतेला ज्यामध्ये स्त्रीयांच्या सुरक्षेचा मुद्दा दुय्यम समजला जातो. त्यांचे एक स्नेही जे या उपक्रमात सहभागी आहेत ते म्हणाले की, ‘कुणीतरी तिची छेड काढेल ही शक्यता कमी होईल ज्यावेळी ती गायीचा मुखवटा धारण करून रस्त्याने जाईल. त्यावेळी देवत्वाच्या कल्पनेतून तरी तिला गाय समजून कुणी छेडणार नाही’.

ज्या देशात दर १५मिनिटाला एक बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, वास्तव असे आहे की, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर लक्ष देण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो आहे. या विदारक वास्तवाचा सामना करताना तातडीने त्याबाबत कृती होण्यासाठी गोरक्षणाइतकाच हा मुद्दा देखील महत्वाचा आहे यावर सुजात्रो यांना लक्ष वेधायचे आहे त्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे.