लहान मुलांमधील चिकित्सक वृत्तीला प्रेरणा देणारे 'बिबॉक्स'

0

जर तुम्ही एखाद्या पाच वर्षाच्या मुलाला खेळणं किंवा यंत्रासोबत मोडतोड करताना पाहाल, तर त्याच्या भविष्याची कल्पना तुम्ही कशी कराल? ३२ वर्षीय संदीप सी सेनन जेव्हा पाचवीत शिकत होते, तेव्हा त्यांना मोकळ्या वेळेत शेजाऱ्यांच्या टीव्ही आणि रेडिओ दुरुस्तीच्या दुकानावर जायला आवडायचे. लहानपणीच्या त्यांच्या या छंदानेच त्यांना रेफ्रिजरेटर, टॉकिंग मशीन आणि कॉफी मेकरची डिझाईन बनवायच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्यास प्रवृत्त केले. संदीप हे मूळचे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यामधील भद्रावती या गावचे आहेत. दहावीत शिकत असताना त्यांनी विश्वेश्वरैय्या विद्यापीठातून संगणक विज्ञान या विषयात अभियांत्रिकी करण्याचे निश्चित केले. त्यानंतरही यंत्रांबद्दल असणारे आकर्षण संदीप यांच्यात कायम होते. त्यामुळेच शालेय विद्यार्थी त्याची कल्पना कशाप्रकारे एखाद्या वर्किंग मॉडेलमध्ये परिवर्तित करू शकतो, याचा विचार ते करू लागले. या एका विचारामुळेच २०१२ साली त्यांना 'बिबॉक्स' (BIBOX)च्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. 'बिबॉक्स' हे तंत्रज्ञानाने प्रेरीत असलेले असे व्यासपीठ आहे, जेथे पाचवी ते दहावीपर्य़ंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट मशीन्स, रोबोट आणि इतर यंत्रे बनविण्यास सहाय्य केले जाते.

संदीप सांगतात की, ''बिबॉक्स' (BIBOX) म्हणजेच (Brain in a Box), हे लहान मुलांकरिता हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर सोल्यूशन आहे. 'बिबॉक्स' हे एका इलेक्ट्रॉनिक मेंदूप्रमाणे आहे, जे एखादा लहान मुलगा ग्राफिकल सॉफ्टवेयरच्या सहाय्याने टॅबलेट, स्मार्टफोन आणि संगणकावर सहज वापरू शकतो. 'बिबॉक्स'मध्ये एखादा लहान मुलगा त्याचे तार्किक विचार सहज मांडू शकतो, ज्याचा वापर करुन खेळण्यापासून ते लाईटपर्यंत सर्व तयार करू शकतो.' संदीप हे एम्बेडेड सिस्टम्स, आयओटी, रोबोटीक्स, वर्च्युअल रिअलिटी आणि हॅप्टीक्स तंत्रज्ञानातील तज्ञ्ज आहेत. त्यांनी बंगळूरू एन्डोस्कोपिक सर्जिकल प्रशिक्षण केंद्रातदेखील काम केले आहे. तसेच २००९ साली त्यांनी ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी थिंकइनसॉफ्ट सॉल्यूशन्स येथे काम केले, जेथे त्यांना टाईम्स ग्रूपच्या एका उपक्रमाअंतर्गत लहान मुलांना भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी शिकवण्याची संधी मिळाली.

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत असताना संदीप हे पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आवडीकडे वळले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी व्हर्च्युअल रिअलिटी सिम्युलेटर्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्ट सिस्टम, रोबोटीक मशीन्स आणि इतर विषयांवर प्रकल्प तयार केले. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील त्यांच्या दोन प्रकल्पांची तर 'डीआरडीओ' (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था)ने दखल घेत निवड केली होती. संदीप यांनी त्यानंतर महाविद्यालयातील ज्युनियर विद्यार्थ्यांना कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा सुरू केली. ''बिबॉक्स' यांनी एक टूलकिटदेखील तयार केले होते, जे विद्यार्थी सहजरित्या हाताळू शकत होते. त्यानंतर त्यांनी एक सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम तयार केला, ज्यामुळे मुलांमधील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना कोणत्याही क्षेत्रातील आव्हाने हाताळण्यास सक्षम करता येईल', असे संदीप सांगतात. संदीप यांच्या या मॉडेलकरिता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागातर्फे त्यांना निधी देण्यात आला. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानेदेखील त्यांची दखल घेत त्यांना निधी दिला.

एप्रिल २०१३ साली संदीप यांची भेट ४८ वर्षीय मधुसूदन नामबुदिरी यांच्याशी झाली. त्यांनी नंतर 'बिबॉक्स'मध्ये सह-संस्थापक म्हणून काम पाहिले. मधुसूदन यांना शिक्षण, आरोग्य, रिटेल आणि टेलिकॉम या क्षेत्रातील अनुभव होता. 'बिबॉक्स'मध्ये काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी ग्रेसेल्स १८ मिडिया लि., या कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहिले होते. तेथे त्यांनी एकट्याने शाळांमध्ये के१२ कन्टेंटच्या विक्रीसाठी विशेष जागा मिळवली होती. या दोघांनी सर्वप्रथम मुंबई एन्जेल्स या शाळेशी ऑगस्ट २०१३ साली संपर्क साधला. २०१४च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी इन्फोसिसचे माजी उपाध्यक्ष नरेंद्रन के, मुंबई एन्जेल्सचे अनिरुद्ध मालपानी आणि रेअर एन्टरप्रायजेसचे माजी व्यवस्थापकिय संचालक मनीष गुप्ता यांच्या सहाय्याने एन्जेल निधी १.५ कोटी एवढ्यावर नेला होता. बंगळूरूस्थित शेडफ्लेक्स इंडियाचे व्यवस्थापकिय संचालक रवी कृष्णमूर्ती यांच्या सहाय्याने त्यांनी हा निधी ३.५ कोटींवर नेला. सध्यापर्यंत या स्टार्टअपने विविध प्रकारे जवळपास ६.५ कोटींचा एकूण निधी जमा केला आहे.

'बिबॉक्स'मधील मार्गदर्शक विविध शाळांमध्ये ८० मिनिटांचे एक सत्र घेतात, ज्यात मुलांना त्यांचे प्रकल्प आणि संशोधने पूर्ण करण्यासाठी लागणारे साहित्य आणि टूलकिट दिले जाते. संदीप सांगतात की, ट्राफिक लाईट, स्वयंचलित दरवाजे, स्मार्ट रुम लाईट्स, वॉटर थ्रोईंग अलार्म, ड्रिप इरीगेशन सिस्टम, अस्थमा डिटेक्टर, वायब्रटरी ब्लाईंड स्टीक, इंटरएक्टीव्ह बॉबकॅट आणि वस्तू उचलणारा रोबोटीक हात, कंट्रोलेबल बोट्स आणि स्मार्ट कार हे असे काही प्रकल्प आहेत, जे बंगळूरू, केरळ, कोईंबतूर आणि दिल्लीमधील विविध शाळांतील मुलांनी तयार केले आहेत. 'बिबॉक्स' हे सध्या बंगळूरू येथील १८, केरळमधील २१, गाझियाबाद आणि नोयडा येथील ४ शाळांशी संलग्न आहे. तसेच मुवथ्थुपुझा, कोट्टायम, कोल्लम, अंगामली, एर्नाकूलम आणि कालिकत येथील शाळांमध्ये सध्या ते आपला विस्तार करत आहेत. आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना 'बिबॉक्स'च्या उपक्रमाचा फायदा झाला आहे. 'बिबॉक्स'मध्ये विद्यार्थी टूलकिट तसेच साहित्य प्रत्यक्षपणे हाताळतात, असे संदीप सांगतात. 'बिबॉक्स' स्टार्टअप हे प्रत्येक विद्यार्थ्याला एका शैक्षणिक वर्षाकरिता २ हजार ५०० ते ६ हजार ५०० दरम्यान शुल्क आकारते. गेल्या एका वर्षात 'बिबॉक्स'ची महसूलाच्या बाबतीतील वाढ ही तिप्पट झाली आहे. यावर्षी ती चौपट करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्यांच्याकडे ७५ कर्मचारी कार्यरत असून, बंगळूरू, केरळ, तामिळनाडू आणि नवी दिल्ली येथे ते सक्रिय आहेत. २०१६च्या अखेरपर्य़ंत १२० शाळांशी जोडून घेण्याची 'बिबॉक्स' यांची योजना आहे. तसेच लहान मुलांकरिता 'बिबॉक्स' आधारित उत्पादने बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान विषयात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी भारतात आता विशेष प्रयत्न केले जात आहेत. मॅनपॉवर अहवालानुसार, २०२० सालापर्यंत १.५ ते २.२ दशलक्ष अभियंत्यांची कमतरता भासल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुलांना कल्पक बनवण्यासाठी तसेच 'बिबॉक्स'चा वापर करुन त्यांना तंत्रज्ञानाबद्दल विचार करण्यास भाग पाडण्याची संदीप यांची आवड निश्चितच कौतुकास्पद आहे. चाकोरीबाहेर जाऊन विचार करणारा संशोधक म्हणून संदीप हे एक उत्तम उदाहरण आहेत. मधू यांच्यासोबतची त्यांची व्यवसाय भागीदारी ही त्यांच्या यशातील एक महत्त्वाचा भाग होती. या दोघांनी एकत्र येऊन एक यशस्वी व्यवसाय मॉडेल उभे केले आहे, अशी प्रतिक्रिया गुंतवणूकदार डॉ. मालपानी यांनी दिली.

या सारख्याच आणखी काही नाविन्यपूर्ण  कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

"विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याकरता आयआयएम ग्रज्युएटची मोठ्या पगाराकडे पाठ "

‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’च्या माध्यमातून दोन क्रिएटिव्ह एक्स-टेकीजने जगासमोर आणले समाजातील भयाण वास्तव

घरी बसल्या आपल्या मुलांना द्या खेळणी आणि पुस्तके, ‘ friendlytoyz’ देते भाड्याने!


लेखक – अपराजिता चौधरी
अनुवाद – रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi