आई झाल्यावर घेतला स्वतःतील उद्योजिकेची शोध, अशिनी यांच्या स्टार्टअपच्या जन्माची कहाणी !

आई झाल्यावर घेतला स्वतःतील उद्योजिकेची शोध, अशिनी यांच्या स्टार्टअपच्या जन्माची कहाणी !

Friday February 19, 2016,

5 min Read

अशिनी शाह यांनी आपल्या उद्योगाची काळजी देखील आपल्या बाळाप्रमाणेच घेतली आहे. तान्हुल्या बाळाला जसे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या आईवर अवलंबून राहावे लागते तसेच एखाद्या स्टार्टअप उद्योगाचे देखील असते. त्याच्यावर माया करावी लागते मग ते छान बाळसं धरू लागतं. झीझीझू (Zeezeezoo) च्या सहसंस्थापक यांच्याकरता ममत्व आणि उद्योजकत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

बाळाकरता कसं आपण नेहमी तत्पर असतो. त्याला कोणत्या क्षणी काय हवंय, काही होत असेल तर आपल्याला लगेच कळतं. तसंच आपल्या उद्योगाची नस अन् नस आपल्याला पूर्णपणे माहीत असणं आवश्यक असतं. आपण आई म्हणून २४ तास बाळाच्या सेवेत हजर असतो. आता मी जरा आराम करते, बाळाला काय हवं ते नंतर बघते असं नाही करत, त्याचप्रमाणे आपल्या उद्योगाकरताही डोळ्यात तेल घालून आपण दक्ष असतो.

आपल्या उद्योगाला आपण नेहमी झुकते माप देत असतो. कोणी कितीही सल्ले दिले किंवा टीका केली तरी आपण ऐकण्याचं काम करतो, आपण आपल्या कल्पनेला घट्ट धरून असतो. कधी कधी आपल्या कल्पनेमध्ये काहीतरी त्रुटी आहेत हे आपल्याला माहीत असतं पण आपण सर्व आव्हानं स्वीकारत ती तडीस नेत असतो.

image


आई झाल्यावरच अशिनीमधली उद्योजिका जागी झाली. लहान मुलांना लागणारी दुपटं, कपडे, बांगड्या, खेळणी, फ्लॅशकार्डस् आणि भित्तीचित्र यांचं उत्पादन करण्याचं त्यांच्या डोक्यात आलं. आणि मग लगेच कामाला लागत झीझीझू आकाराला आलं. आपल्या उत्पादनांचं वर्णन ‘भारताची माया असणारं लहान मुलांचं उत्पादन’ असं अशिनी करतात. मे २०१५ मध्ये झीझीझूची सुरूवात झाली. अशिनी यांचं स्वतःच बालपण आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा मिलाफ त्यांच्या उत्पादनांमध्ये पाहायला मिळतो.

अमेरिका-भारत-लंडन

अशिनींच बालपण भारत आणि अमेरिकेत असं दोन्हीकडे गेल्याने दोन भिन्न संस्कृती त्यांनी जवळून अनुभवल्या. रट्गर्स विद्यापीठातून त्यांनी विपणन आणि मानसशास्त्र या विषयांमध्ये पदवी मिळवलीय. अतिशय प्रतिष्ठीत मिडिया कंपनी एनबीसीमध्ये त्यांनी काही काळ काम केलंय.

२००८ मध्ये लग्न झाल्यावर त्या लंडनला स्थायिक झाल्या. तिथे गेल्यावर मग त्यांनी एमबीए करायचं ठरवलं. इम्पिरिअल महाविद्यालयातून त्यांनी विपणन आणि उद्योजकत्व या विषयात एमबीए केलं. त्यानंतर त्या द इस्ट इंडिया कंपनी या लक्झुरी फाईन फूड स्टार्टअपमध्ये रुजू झाल्या.

आपल्या स्थलांतरांबाबत बोलताना त्या सांगतात, “एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाताना आपण बऱ्याच स्थित्यंतरांमधून जात असतो. तिथल्या भिन्न वातावरणात, संस्कृतीत जुळवून घ्यायला खूप कठीण जातं. पण जीवनातला हा अनुभव बरंच काही शिकवणारा असतो. तुम्हाला खूप काही नवनवीन गोष्टींची माहिती होते, तुमचं जग विस्तारित होतं. तुम्ही चौकटीबाहेर विचार करायला लागता. आज मी जे काही आहे ते या स्थलांतरांमधल्या अनुभवामुळेच”.

‘झीझीझू’ या गंमतीशीर नावाबाबत अशिनी सांगतात, “काळ्या रंगाची मान असणाऱ्या हिरव्या रंगाचा वारब्लेर या गाणाऱ्या पक्षाची शीळ झीझीझू अशी ऐकू येते. वारब्लेर हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. आपणही या पक्षांप्रमाणे खूप कारणांनी स्थलांतर करत असतो. चांगल्या संधीच्या शोधात आणि स्वप्नपूर्तीकरता आपण गावं, शहरं, देश पालथे घालत असतो. माझे बाबा, पती आणि बऱ्याच मित्रमैत्रिणींनी हे केलं. मी सगळ्यांना या पक्षाशी जोडते”.

होळी आणि हॅलोविन

वेगवेगळ्या संस्कृतीत वाढत असल्याने त्या प्रत्येक संस्कृतीत सारख्याच उत्साहाने रमतात. प्रत्येक संस्कृतीचा आपला असा काही ठसा असतो, बाज असतो. अशिनींनी स्थानिक संस्कृतीशी आपलं नात विणताना, मूळ संस्कृतीशीही नाळ टिकवून ठेवलीय. त्यामुळेच आपल्या लेकीला त्या होळीचा रंग लावताना हॅलोविनची मजाही लुटायला लावतात. त्या म्हणतात, “मला आणि माझे पती आम्हां दोघांनाही नवीन गोष्टींचा आस्वाद घेताना आपल्या संस्कृतीची नाळही टिकवून ठेवायची आहे. त्यामुळेच नव्या जुन्याचा मेळ साधत आम्ही झीझीझू साकारू लागलो. नव्या पिढीतल्या पालकांना डोळ्यासमोर ठेवून, थोड्या मिष्किल शैलीत आम्ही आमची उत्पादनं डिझाईन करतो”. भारत आणि पाश्चिमात्य देशांमधल्या ज्या ज्या गोष्टी अशिनींना भावतात, त्या सर्व गोष्टींचा मेळ त्या त्यांच्या उत्पादनांमध्ये सादर करतात. अशिनींचे भागीदार आर्थिक बाजू आणि काम या दोन्ही बाबी चांगल्या पद्धतीने हाताळतात.

मेक इन इंडिया

अशिनी म्हणतात, “आपल्या देशांमध्ये साधनांची कमतरता अजिबात नाही. आमच्या उद्योगात या साधनांचा वापर करताना एक वेगळाच आनंद आम्हांला मिळतो”. झीझीझूचं मुख्य कार्यालय गुजरातमध्ये आहे. त्यांच्यासोबत सध्या चार जणांची टीम काम करत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या त्या खंद्या प्रवर्तक आहेत. त्यांच्या उत्पादनाकरता लागणारा सर्व कच्चा माल त्या भारतीय उत्पादकांकडूनच घेतात. स्थानिक कापसापासून ते उत्पादनांवर असणाऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स स्थानिक कलाकारांकडून बनवून घेण्यापर्यंत झीझीझूमध्ये सगळं काही ‘मेक इन इंडिया’ आहे.

विक्रीचं गणित

कोणत्या उत्पादनाला जगभरातील ग्राहक उचलून धरतील, कोणत्या डिझाईन्स त्यांच्या पसंतीस जास्त उतरतील यासर्व गोष्टींचा विचार अशिनींच्या डोक्यात सतत घोळत असतो. केवळ लहान मुलांकरता, बाजारात खूपशा लहान मोठ्या कंपन्यांची अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. कंपन्यांच्या भाऊगर्दित आपल्या ब्रँडचा टिकाव लागून, लोकांना त्याची दखल घ्यायला लावणं हे सर्वात मोठं आव्हान सध्या अशिनींसमोर आहे. बाजारात ग्राहकांच्या डोळ्यात भरण्याकरता त्यांनी जाहिरातींवर विचारपूर्वक खर्च केला. भारतीय ग्राहकांमध्ये ऑरगॅनिक कनसेप्ट रुजवणे आणि त्याचं महत्त्व पटवून देण्याकरता त्यांना चांगलीच मशागत करावी लागली.

image


झीझीझूमध्ये कपडे, डिझाईन्सबाबत कोणत्या नविन गोष्टी करता येतील याचा त्या सतत विचार करत असतात. त्या सांगतात, “आम्ही ०-४ वयोगटाकरता उत्पादनं बनवतो. यात बाळांकरता रॉम्पर्स, वनसाय सूट आणि तीन साईजचे टी-शर्ट असतात. तुमच्याकडे २० डिझाईन्स असल्यावर कोणती डिझाईन लोकांना जास्त आवडेल आणि कोणती साईज जास्त विकली जाईल, याचा अंदाज बांधणं खरंच खूप कठीण जातं”.

अशिनी घरातूनच काम करत असल्याने, काही लोकं त्यांचं काम फारसं गांभीर्याने घेत नसल्याची बोच त्यांना सतावते. त्यांच्या कामाकडे फावल्या वेळातला उद्योग म्हणून पाहत असल्यांचं त्यांना पसंत नाही. त्या म्हणतात, “माझी लेक नर्सरीत असताना किंवा ती झोपली असेल तेव्हा काम करणं मला सोयीचं असतं. कारण त्यामुळे मी तिच्यासोबत उत्तम वेळ घालवू शकते. माझी मुलगी आणि काम या दोघांनाही मी सारख्याच न्यायाने गोंजारू शकते. पण काम बंद ठेवून मी बसते असंही नाही. मी मुलीकरताच वेळ आणि काम दोघांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करते”.

लक्ष्य आणि धोरण

जगभरातून झीझीझूच्या उत्पादनांना मिळणारा वाढता प्रतिसाद अशिनींमधल्या कामाचा उत्साह सतत सळसळत ठेवतो. त्या म्हणतात, “आमच्या कामाची घेतली जाणारी दखल, माझ्याकरता क्षितिजं विस्तारत आहे”.

अशिनींचे व्यवसायातले भागीदार आणि सह-संस्थापक राहिल हे त्यांचा मजबूत आधारस्तंभ आहेत. अशिनींच्या शब्दात सांगायचं तर, “या प्रवासात, व्यवसायाची गणितं, स्वप्न, यश आणि आव्हानं वाटून घेण्याकरता भागीदार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही प्रत्येक बाबतीत एकमेकांवर विश्वास टाकून जबाबदाऱ्या व्यवस्थित निभावू शकतो”.

या विश्वासामुळेच अशिनी लंडनमध्ये राहूनही व्यवसाय सांभाळू शकतात. त्या म्हणतात, “व्यवसायात आमच्या दोघांवर असलेली प्रत्येक जबाबदारी आम्ही निभावतो. दररोज कामकाजाचा आढावा घेण्याकरता स्काइप वरून वारंवार संवाद सांधणं आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. मी बैठकांकरता आणि इतर कामांकरता बऱ्याचदा भारतामध्ये येते. मी युकेमध्ये राहत असल्याचाही आमच्या व्यवसायाला चांगला फायदा होतो. इथल्या बाजारातून आम्हाला खूपशा नवीन कल्पना मिळतात. मी एनआरआय पालकांच्याही नेहमी संपर्कात असते. त्यांच्यामध्येही आमची उत्पादन फार लोकप्रिय आहेत”.

अशिनी येत्या काळात लहान मुलांची काही आणखी उत्पादनं आणण्याच्या विचारात आहेत. झीझीझूला त्यांना एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून ओळख मिळवून द्यायची आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

लहान मुलांच्या कपड्यांच्या जागतिक बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी ‘किडॉलॉजी’

बाळाच्या गरजांच्या एक पाऊल पुढे रहाण्यास पालकांना मदत करणारे बेबीबेरी....

आदर्श माता ते आदर्श उद्योजिका – तारा शर्मा सलुजा यांची कथा


लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – साधना तिप्पनाकजे