रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी देणाऱ्या स्वाती बोंडिया

0

एखादी धडधाकट व्यक्ती जेव्हा सिग्नल लागल्यानंतर गाडीजवळ जाऊन भीक मागते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक सहज विचार येतो की, ʻयांना भीक मागायची गरज काय आहे. त्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे. त्यामुळे ते कोठेही सहज मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करू शकतात.ʼ तुमच्या मनात कधी असे आले आहे का, की त्यापैकी अनेकजणांनी आपले नशीब आजमावून पाहिले असेल, कदाचित शंभरहून अधिक वेळा. या प्रयत्नात त्यांचा पैसा, श्रम आणि वेळ वाया गेले असतील. आपल्यापैकी अनेकांनी भीक मागणाऱ्या या धडधाकट व्यक्तिंच्या उदरनिर्वाहाकरिता किंवा नोकरीकरिता काही प्रयत्न केले नसतीलच. मात्र स्वाती बोंडिया यांनी माणुसकीच्या नात्याने या सर्व गोष्टींचा विचार केला.

स्वाती सांगतात की, ʻएकदा मी रिक्षातून जात होते. तेव्हा एक पाच वर्षांची मुलगी माझ्याजवळ भीक मागण्यासाठी आली. मी तिला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा ती जोरजोरात रडू लागली. मी माझ्या रिक्षातून खाली उतरले आणि तेथील विविध दुकानात गेले. मी तिच्यासाठी कपडे आणि खाऊ घेतला. त्यावर मला त्या मुलीने सांगितले की, दीदी या गोष्टींचा काहीच उपयोग होणार नाही. मला फक्त दहा रुपयांची गरज आहे. माझ्या आईला या कोणत्याही वस्तूंचा फरक पडत नाही. मी जर पैसे न घेता घरी गेले तर ती मला मारेल.ʼ त्यानंतर स्वाती बोंडिया या त्या मुलीच्या आईशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेल्या. खरे पाहता, त्या फक्त तिच्या घरी विदारक सत्य पाहण्यासाठी जात होत्या. राजस्थान येथून स्थलांतरीत झालेले ते कुटुंब होते. त्यांना येथे एक नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र येथे पोहोचल्यानंतर त्यांना येथील स्थानिक भाषेत संवाद साधता येत नसल्याने नोकरीकरिता नकार देण्यात आला होता. स्वाती सांगतात की, ʻतीन ते चार महिन्यात रवी आणि त्यांच्या कुटुंबियांकडे असलेला तुटपुंजा पैसादेखील संपला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी भीक मागणे सुरू केले होते. मला माहित होते की, त्यांना मी मदत करणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी नोकरी शोधण्याचे आश्वासन देऊन मी तेथून बाहेर पडले. माझ्या ओळखीत असलेली कोणतीही कंपनी त्यांना नोकरीची संधी देईल, याबाबत मला साशंकता होती. अपेक्षाभंग झाल्याने मी निराश होऊन त्यांच्याकडे परतले. तेव्हा मला फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि दृष्टीकोनात झालेला बदल पाहायचा होता. त्या मुलांचे वडिल दाढी करुन आणि स्वच्छ कपडे परिधान करुन बसले होते. तसेच मुले आणि त्यांच्या आईनेदेखील स्वच्छ कपडे परिधान केले होते. मी तेथे गेल्यानंतर अपेक्षेने त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आणि त्यामुळे मी अधिकच निराश झाले. मला माहित होते की, मी त्यांच्याकरिता नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊ शकते. मला त्यांच्या कलाकुसरीवर विश्वास होता. कला ही त्यांच्या रक्तातच असते.ʼ त्यानंतर स्वाती घरी परतल्या आणि त्यांनी त्यांना नोकरीची संधी मिळेल, असा एक प्रस्ताव तयार केला.

रवी सांगतात की, ʻआम्ही फूटपाथवर राहत होतो. आमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी माझी मुले रस्त्यावर भीक मागत असत. आमच्या सर्व अपेक्षा स्वातीजींवर अवलंबून होत्या. नोकरीच्या अनेक संधी हुकल्याने आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती.ʼ स्वाती त्यांना एका दुकानात घेऊन गेल्या, जेथे त्यांनी फर्निचर बनवण्यासाठी लागणारे सामान विकत घेतले. त्यानंतर त्यांनी एक लहान खुर्ची तयार केली. फुटपाथवरील आपल्या घराशेजारीच त्यांनी ती विक्रीकरिता ठेवली. त्या खुर्चीची विक्री ७५० रुपयात झाली. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती, असे स्वाती सांगतात. या कल्पनेतील सामर्थ्य लक्षात आल्यानंतर स्वाती यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ओम शांती ट्रेडर्सची स्थापना केली. ज्या माध्यमातून त्यांनी यांसारख्या अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यानंतर महाविद्यालय आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्यांनी एका संस्थेची स्थापना केली, जी रस्त्यालगत राहणाऱ्या अशा अनेक लोकांची भेट घेऊन त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असे. स्वाती सांगतात की, ʻघरदार नसलेल्या आणि अनेक गरिब लोकांना आम्ही रोजगाराची संधी देऊ केली. आम्ही त्यांना कलाकुसरीचे धडे दिले, ज्यामुळे त्यांना विक्री करण्यास योग्य असे आकर्षक फर्निचर तयार करण्यास मदत होऊ लागली. त्या फर्निचरची लीला पॅलेस, ताज विवांता आणि आचार्य इन्स्टिट्युटसारख्या ग्राहकांना विक्री करण्यात आली.ʼ या संस्थेत सध्या २२९ लोक कामाला असून, त्यात अनेक कुटुंबांचादेखील समावेश आहे. ʻसामानाच्या विक्रीतून येणारा पैसा त्यांच्याकरिताच पुन्हा वापरण्यात येतो. ४२ टक्के महसूल त्यांच्या कुटुंबांना देण्यात येतो. ज्याचा वापर त्यांच्या रेशनिंगकरिता, मुलांच्या शिक्षणाकरिता, आऱोग्याकरिता करण्यात येतो.ʼ

शिरीष सांगतात की, ʻमला आता जिवंत असल्यासारखे वाटत आहे. स्वातीजींची भेट होणे, हे आमच्यासाठी एका वरदानाप्रमाणे होते, ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे पालटून गेले. माझी मुले आता शाळेत जातात, इंग्रजी बोलतात. माझी बायकोदेखील आता सुखात आहे.ʼ ʻआम्ही या लोकांच्या कुटुंबियांकरिता केलेली पहिली गोष्ट म्हणजे आमच्याशी संबंधित असलेल्या शासकीय शाळांमध्ये त्यांच्या मुलींना शिक्षणाकरिता भरती केले. हा प्रयत्न आम्ही त्यांच्या मुलांकरितादेखील केला. मात्र मुलांना आम्ही शाळेपासून दूर पळतानाच पाहिले. तर मुली मात्र शाळेत जाण्याकरिता, शिकण्याकरिता खूप उत्सुक होत्या.ʼ, असे स्वाती सांगतात. स्वाती यांच्या या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. दोन प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ज्युनियर चेंबर येथे वर्ल्ड कॉंग्रेस दिनादिवशी पहिल्यांदाच भारताचा झेंडा फडकावण्यात आला आणि या सर्वांचे श्रेय जाते ते स्वाती यांना. कनाझवा येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात जगातील १० प्रभावी व्यक्तिमत्वाच्या (१० आऊटस्टॅडिंग यंग पर्सन) यादीत त्यांना स्थान देण्यात आले होते. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या गेल्या १०० वर्षाच्या इतिहासात कोणाही भारतीयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. तळागाळातील लोकांपर्यंत प्रभाव पोहोचण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघांनी त्यांचा प्रस्ताव कोलंबियाला रवाना केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपआपल्या देशांमध्ये सामाजिक कार्यात विशेष ठसा उमटवणाऱ्या सहा व्यक्तींच्या संघात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली. स्वाती यांच्या या कार्य़ाने एका मोठ्या वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावले असून, सध्या ते अभिमानाने दरमहा अकरा हजारापर्यंत पगार घेतात. २०१८ पर्यंत दोन हजार कुटुंबांचे जीवन स्थिर करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

लेखक - बिंजल शाह

अनुवाद - रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi