रिपेअरमायगॅजेटडॉटइन – गॅजेटस् दुरुस्ती क्षेत्रात आशेचा नवा किरण

रिपेअरमायगॅजेटडॉटइन – गॅजेटस् दुरुस्ती क्षेत्रात आशेचा नवा किरण

Monday January 11, 2016,

4 min Read

गॅजेटस् अर्थात उपकरणांची संख्या जितकी जास्त तितकी ती दुरुस्त करण्याच्या कटकटीही जास्त... या दुरुस्तीसाठी पैसा तर खर्च होतोच, पण त्याचबरोबर वेळ वाया जातो तो वेगळाच... अंकुर गुप्ता यांनाही असाच अनुभव आला. अवघ्या एका वर्षांत आपले दहाहून अधिक फोन बिघडल्याचे अंकुर सांगतात आणि या फोनच्या दुरुस्तीच्या निमित्ताने त्यांना दिल्लीच्या नेहरु प्लेसमधील दुकानांमध्ये वारंवार हेलपाटे घालावे लागत. या दुकांनांना एवढ्या वेळा दिलेल्या या भेटींनंतर ते त्यांच्या मित्रमंडळींमध्ये या विषयातील जवळपास तज्ज्ञच बनून गेले.

या अनुभवांमधूनच अंकुर यांच्या विचारांना चालना मिळाली आणि रिपेअरमायगॅजेटडॉटइन (RepairMyGadget.in), या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा जन्म झाला. चोवीस वर्षीय अंकुर हे बंगलोर स्थित रिपेअरमायगॅजेटडॉटइन या गॅजेट दुरुस्ती फर्मचे सहसंस्थापक आहेत. अमेटी विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंकुर यांनी नरसी मोंजी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. तर रिपेअरमायगॅजेटडॉटइनची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी एयरटेलमध्ये एक वर्ष नोकरीही केली.

image


फोन दुरुस्तीच्या निमित्ताने वारंवार या दुकांनांना दिलेल्या भेटींनंतर गॅजेट दुरुस्तीच्या पारंपारिक मॉडेलमध्ये अनेक समस्या आणि कमतरता असल्याची तीव्र जाणीव अंकुर यांना झाली. दुरुस्तीसाठी वारंवार घालावे लागणारे हेलपाटे व त्यामध्ये वाया जाणारा वेळ आणि एकाच प्रकारच्या समस्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांमधील तफावत या त्यापैकी प्रमुख समस्या होत्या. बऱ्याचदा बिघाड अगदी छोटासा असतो, पण त्यासाठी आकारले जाणारे दर खूपच जास्त असतात. ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेत अंकुर यांनी आपला रुममेट अश्विनी कुमार यांच्यासह रिपेअरमायगॅजेटडॉइनला सुरुवात केली. अश्विनी कुमार हे क्विकसिल्वर सोल्युशन्समध्ये प्रॉडक्ट मॅनेजर अर्थात उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत होते.

“ गॅजेटच्या बिघाडाबाबत मला आलेल्या वैयक्तिक अनुभवांतूनच गॅजेट दुरुस्ती क्षेत्रात किंमत आणि गुणवत्तेचा सर्वोत्तम कॉम्बो शोधण्यास मला प्रवृत्त केले. सर्विस सेंटरमध्ये पंधरा दिवस त्रास सहन करुन सारे प्रयत्न व्यर्थ गेल्यानंतर, या क्षेत्रात ग्राहकांची यादी बनवून त्यांना सेवा देणाऱ्या संघटीत खेळाडूची गरज प्रकर्षाने उघड झाली. या कल्पनेबाबत अनेक मित्रांशी चर्चा केल्यानंतर यात पुढे जाण्याचा आणि गॅजेट दुरुस्तीसाठी बाजारपेठ तयार करण्याचा निर्णय मी घेतला,” अंकुर सांगतात.

हे क्षेत्र अगदीच असंघटीत असल्याने त्यामध्ये सुरुवात करणे अंकुर यांच्यासाठी मुळीच सोपे नव्हते, तसेच यामध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळणेही कठीण होते. अंकुर यांनी पहिली नेमणूक केली ती ओएलएक्स पोस्टींगद्वारे... झाकिर हुसेन - काश्मीरमधील एक तंत्रज्ञ, ज्यांना सतरा वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव होता - यांनी अंकुर यांच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची आठ जणांची टीम असून ते संपूर्ण बंगळुरुमध्ये सेवा देतात. तर शहरभरात वितरणासाठी त्यांनी रोडरनर आणि पार्सल्डडॉटइनशी भागीदारी केलेली आहे.

या क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या होती, ती म्हणजे संघटनाचा अभाव आणि गॅजेट दुरुस्त करण्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे घालण्यामध्ये वाया जात असलेला वेळ... “ प्रत्यक्ष दुरुस्ती करणाऱ्याला केवळ जेमतेम पगार मिळणार तर बहुतेक सर्व नफा हा रिटेलरचाच होणार, हे पहाणे अतिशय निराशाजनक होते. गॅजेटस् च्या या दुनियेत ग्राहकांना सर्विस सेंटरपर्यंत जाण्याशिवाय पर्यायच नसतो आणि त्यांच्याकडून मजबूत किंमतही वसुलली जाते. त्याचवेळी स्थानिक दुकानांमध्ये किंमत आणि गुणवत्तेच्याबाबतीत फसवणूक होण्याची भीतीही सतत असतेच. शिवाय दुरुस्ती करणाऱ्याविषयी ग्राहकाला संपूर्ण माहिती मिळण्याची कोणतीही सोय सध्याच्या व्यवस्थेत उपलब्ध नाही,” अंकुर सांगतात.

एकदा का ग्राहकाने त्याच्या गॅजेटविषयीची संपूर्ण माहिती आणि बिघाड सांगणारा अर्ज भरुन ऑनलाईन मागणी नोंदविली, की ही माहिती ते गॅजेट दुरुस्त करु शकतील अशा विक्रेत्यांमध्ये प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर हे गॅजेट ग्राहकांकडे जाऊन ताब्यात घेतले जाते आणि मुख्य म्हणजे ते दुरुस्त होईपर्यंतच्या काळासाठी ग्राहकाला एक पर्यायी गॅजेटही पुरविण्यात येते. बहुतेकदा दुरुस्त झालेले गॅजेट ४८ तासांत आणि दोन महिने वॉरंटीसह परत केले जाते. त्याचबरोबर कंपनी कॅश ऑन डिलिवरीची सेवाही देऊ करते.

बाजारपेठेविषयी बोलताना अंकुर सांगतात, “ आपण एका अशा देशात रहातो, जेथे १.५ बिलियन गॅजेट, - लॅपटॉप आणि मोबाईलच्या समावेशसह आहेत. तर सुमारे ९० टक्के समस्या या स्क्रीन खराब होण्याबाबतच्या असतात आणि त्यासाठी सरासरी खर्च १५०० रुपये एवढा आहे. एकूणच काय तर ही लाख मोलाची संधी असल्याची आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर बीटूबी विभागांतही प्रचंड संधी आहेत,” अंकुर सांगतात.

अवघ्या चार महिन्यांच्या काळातच कंपनीने सुमारे २५०० मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि दरमहा चाळीस टक्क्यांनी वाढ होत असल्याचा त्यांचा दावा आहे. येत्या काळात टीअर १ आणि टीअर २ शहरांमध्ये विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ई कॉमर्स फर्मबरोबर भागीदारी करण्याचाही त्यांचा विचार आहे, जेणे करुन ते अधिक विस्तारीत सेवा देऊ शकतील.

जेंव्हाजेंव्हा गॅजेटमध्ये बिघाड होतो, तेंव्हातेंव्हा होणारा खर्च हा केवळ पैशांचाच नसतो, तर त्यासाठी वाया जाणाऱ्या वेळेचाही असतोच. रिपेअरमायगॅजेटने ग्राहकांना घरपोच सेवेची सुविधा उपलब्ध करुन देत, एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्याचबरोबर ग्राहकांचे समाधान करण्यासाठी त्यांना ते पर्यायी गॅजेटही उपलब्ध करुन देत आहेत. मात्र हे मॉडेल किती यशस्वी होईल? हे मात्र येणारा काळच सांगेल...

लेखक – आदित्य भुषण द्विवेदी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन