टाकाऊ लाकडातून टिकाऊ फर्निचरची निर्मिती : ट्रॉपिकल साल्वेज

टाकाऊ लाकडातून टिकाऊ फर्निचरची निर्मिती : ट्रॉपिकल साल्वेज

Monday November 09, 2015,

3 min Read

टाकाऊ लाकडातून टिकाऊ फर्निचर तयार करणारे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या कृतीमधून देणारे टीम ओब्रायन....यांनी १९७७मध्ये पदवी प्राप्त केली आणि इंडोनेशियाच्या लोंबोक बेटावर ते आले. इथल्या निसर्ग सौंदर्यानं ते खूप भारावून गेले होते. पण तिथले स्थानिक लोक अतिशय मजबूत आणि जुन्या दर्जेदार लाकडाचे खांब काढून तिथं काँक्रिटचे खांब उभे करत असल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा त्यांनी लोकांना सागवानाच्या लाकडाचा वापर जळण म्हणून करताना पाहिलं. दर्जेदार लाकूड असं नष्ट होऊ नये म्हणून काही तरी केलं पाहिजे असा निर्धार त्यांनी केला. पण एवढ्या मोठ्या लाकडी खांबांचं काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी तातडीनं गोडावून भाड्यानं घेतलं आणि लोकांकडून अतिरिक्त लाकूड विकत घेण्यास सुरूवात केली. थोड्याच दिवसात त्याच्याकडे लाकडाचा ढीग जमला पण त्याचं काय करायचं याचा निर्णय ते घेऊ शकलेले नव्हते. त्यानंतर ओब्रायन यांनी सुतारांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीनं या मौल्यवान लाकडातून सुंदर कलाकृतींची निर्मिती करुन त्या विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता.


image


त्यांचा निर्धार पक्का असला तरी त्यांना कोणी साथ दिली नाही. महिनाभरातच सुतारही काम सोडून गेले. टाकाऊ लाकडाचं फर्निचर करणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. या सर्व गोष्टी त्या परिसरात पसरल्या आणि लोक ओब्रायन यांना ‘पाक कायू साम्पाह’ म्हणजे ‘मिस्टर गारबेज वूड’ असं चिडवू लागले. हा व्यवसाय स्थिर करायला ओब्रायन यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. जुन्या लाकडाचा बराचसा भाग खराब असल्य़ानं काही वेगवेगळी लाकडं मिळून त्यातून कलात्मक आणि विक्रीयोग्य फर्निचर तयार करण्यासाठी जास्त निर्मितीक्षमता आणि साधनांची आवश्यकता असते. तर काहीवेळा विविध प्रकारची लाकडं वापरली गेल्यानं कीड लागायची शक्यता असते. पण ओब्रायन आणि त्यांच्या टीमने या किड्यांचा प्रभाव नष्ट करणारी किटकनाशकं तयार केली आणि ती हाताळणंही सोपं होतं, अशाप्रकारे चांगल्या दर्जाचं उत्पादन करणाऱ्या ‘ट्रॉपिकल साल्वेज’ची निर्मिती झाली.

भविष्यात लागणाऱ्या लाकडाचा शोध आतापासूनच घेतला पाहिजे असा विचार त्यांनी केला. इथं त्यांना भौगौलिक ज्ञानाचा फायदा झाला. इथली जंगलं उष्णकटिबंधातील गटात मोडतात. भूकंप आणि ज्वालामुखीमुळे झाडं मुळासकट पडली आणि त्या भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ती नदीपात्रात वाहत आली होती. तसंच इथं होणाऱ्या वृक्षतोडीमुळेही नदीपात्रात लाकडं मोठ्याप्रमाणात होती. पण एवढा साठा असूनही ओब्रायन यांना भविष्यात लाकूड कसं उपलब्ध होईल याची चिंता होती. त्याच दरम्यान त्यांना भाताच्या शेतात दिसणाऱ्या लाकडांचं रहस्य कळलं. शेकडो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेक विशाल वृक्ष पृथ्वीच्या पोटात गाडली गेली होती.


image


इथल्या दलदलीत गाडली गेल्यानं या झाडांची लाकडं आणखी मजबूत झाली कारण या दलदलीतून ऑक्सीजन या झाडांपर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे ही लाकडं शेकडो वर्षांपर्यंत तशीच राहिली आणि उष्ण कटिबंधातील या जंगलांवर ओब्रायन यांनी लक्ष केंद्रीत केलं कारण त्यांच्यासाठी हाच खरा खजिना होता. दहा वर्षांनंतर उत्तर अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेत त्यांच्या कंपनीनं ठसा उमटवला आहे. आजही उत्पादनाची गुणवत्ता हीच त्यांची जमेची बाजू आहे, असं ओब्रायन सांगतात.

व्यवसायातील यशानंतर ओब्रायन यांनी जेपारा फॉरेस्ट कन्झर्व्हंसीला सहकार्य करत इंडोनेशियात संरक्षण, शिक्षण आणि वनीकरण योजना राबवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी देशी झाडांसह आतापर्यंत ३५ प्रकारची ५०० रोपं लावून ती जगवली आहेत. अनेकांना आता या उष्णकटिंबधातील जंगलांचं महत्त्व समजलं आहे, पण आता या जंगलांचं संरक्षण करण्याची आवश्यकता ओब्रायन व्यक्त करतात. ओब्रायन यांनी ट्रॉपिकल साल्वेजचं काम करता करता हजारो झाडांची कत्तलही थांबवली आहे. त्य़ामुळेच या उष्णकटिबंधीय जंगलांचं भवितव्य सुरक्षित ठेवण्याचं आवाहन ते करतात.

    Share on
    close