येत्या तीन वर्षात ‘ओलाच्या’ पन्नास हजार महिला चक्रधारी : ड्रायविंग क्षेत्रात स्त्री शक्तीची धडक !

येत्या तीन वर्षात ‘ओलाच्या’ पन्नास हजार महिला चक्रधारी : ड्रायविंग क्षेत्रात स्त्री शक्तीची धडक !

Saturday October 24, 2015,

5 min Read

ही बातमी वाचण्यापूर्वी तुम्ही ‘शोले’ चित्रपटाची गोष्ट आठवा. रामगडमधली एक सामान्य मुलगी बसंती कशी बिनधास्त टांगा हाकते. मर्द टांगेवाला लाजावा अशा थाटात ‘चल धन्नो’ म्हणते. पण कितीही झाले तर हा होता चित्रपटच… वास्तविक पाहाता ‘शोले’ला तीन दशकावर काळ उलटूनही ड्राइव्हिंगच्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी कायम आहे. सैन्यात महिला आल्या, इतकेच काय अंतराळातही स्त्रीशक्तीने भरारी घेतली, पण ड्रायव्हिंगमध्ये फारसे काही जमलेच नाही… पण आता लवकरच ड्रायव्हिंगमध्येही स्त्रीशक्तीची दमदार रुजुवात होणार आहे. हे ऐकून जर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल तर पुढल्या तीन वर्षांत जवळपास प्रत्येक पावलावर असेच आश्चर्यचकित होत राहाल.

नजीकच्या काळात कॅब चालवणार आहेत, अशा महिलांना कॅब कंपनी ‘ओला’ आता ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देते आहे. सध्याच्या परिस्थितीत कॅब चालवणाऱ्या महिलांची संख्या फारशी नाही, पण ज्या पद्धतीने ‘ओला’ने महिलांना कॅब ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा सपाटा चालवला आहे, तो पाहाता येणाऱ्या दिवसांत मोठ्या संख्येने कॅब ड्रायव्हिंगच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झालेला असेल.

गेल्या काही वर्षांत महिला ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे. विशेषत: एकटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकडून महिला कॅब ड्रायव्हरची मागणी आवर्जून नोंदवली जाऊ लागलेली आहे. अर्थात आपल्या सेवेसह प्रवासी व ड्रायव्हरच्या सुरक्षेचे उपाय अधिकाधिक विकसित करत नेणाऱ्या बऱ्याच कॅब कंपन्या आहेत. नियमितरित्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महिला कॅब ड्रायव्हर उपलब्ध करून देणाऱ्याही कंपन्या बऱ्याच आहेत. पण ‘ओला’ ही अशी कंपनी आहे, जी याबाबतीत फार पुढला विचार करते. ओला कंपनी ड्रायव्हिंगच्या माध्यमातून महिलांसमोर एका अतिरिक्त रोजगाराचा पर्यायही उभा करू पाहात आहे. महिलांनी ड्रायव्हिंगला आपला व्यवसाय बनवावेच, त्यासह कॅबमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त उत्पन्नही मिळवावे.

image


ओलाचे मार्केटिंग कम्युनिकेशन डायरेक्टर आनंद सुब्रमण्यम सांगतात, ‘‘आताच काही महिन्यांपूर्वी आम्ही ‘ओला पिंक’ नावाची एक नवी ओला कॅब सुरू केलेली आहे. ही कॅब विशेषत: महिला प्रवाशांसाठी आहे. महिला ड्रायव्हरना प्रशिक्षण, दक्षता विकास आणि सशक्तीकरणासाठी ईपी (एम्पॉवर डेव्हलपमेंट) आणि एएसडीसी (ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट काउंसिल) सोबत एका करारावर स्वाक्षरीही केलेली आहे. महिलांमध्ये ड्रायव्हिंगकडे एक रोजगार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रुजवणे हा ओला पिंक सुरू करण्यामागचा उद्देश आहे. सोयीसुविधांपासून वंचित घटकांतील महिलांना स्वावलंबी बनवणे, हे लक्ष्य आहे. प्रशिक्षणात मुख्यत: ड्रायव्हिंग, गाडीची जुजबी दुरुस्ती, रस्त्यावरील मार्गदर्शक फलकांचे वाचन या गोष्टी शिकवल्या जातात. शिवाय प्रवासी, पोलिस यांच्याशी संवादाची पद्धत, शिष्टाचार, संवाद साधता येण्याइतपत इंग्रजी, तंत्र आणि रस्त्यांची माहिती, प्रशिक्षणही दिले जाते. वैध वाहनचालक परवाना आणि व्यावसायिक बॅच ज्या महिलांकडे आधीच आहे, त्यांना केवळ प्रशिक्षण दिले जाते.’’

आनंद सांगतात, ‘‘ओला स्त्रोत, आर्थिक पर्याय आणि महसुलातील सततची वाढ या माध्यमातून ड्रायव्हर्सचीही मदत करते. ओलासाठी ड्रायव्हिंगची जबाबदारी देण्यापूर्वी ड्रायव्हरला आवश्यक ते सगळे प्रशिक्षण दिले जाते. अन्य ड्रायव्हर्सप्रमाणेच ओलाच्या ड्रायव्हर्सजवळही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक माहितीचा तपशील असलेले दस्तऐवज म्हणजेच केवायसी (नो युअर कस्टमर) कायम उपलब्ध असते.

आनंद यांच्यामते पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ओला अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी ड्रायव्हरचे गुन्हेगारी स्वरूपाचे रेकॉर्ड पाहिले जाते. पोलिस व्हेरिफिकेशन केले जाते. ते नेमकेपणाने व्हावे म्हणून ‘ऑथब्रिज’ तसेच या सारख्याच आयएसओ आणि आयएसओ-आयएसएम प्रमाणित आस्थापनांची मदत ‘ओला’कडून घेतली जाते.

कुशल ड्रायव्हर बनण्याच्या दिशेने सर्वव्यापी प्रशिक्षणादरम्यान ‘ओला’ आपल्या महिला ड्रायव्हरना कमी व्याजदराने दररोज फेडावयाचे कर्जही उपलब्ध करून देते. स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस कंपनी आणि महिंद्रा फायनांसची सेवा त्यासाठी घेतली जाते. ड्रायव्हिंगकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणाऱ्यांना खासगीरित्या कारखरेदीत मदत करण्यासाठी खास ओलाने १०० कोटी रुपयांच्या निधीची स्वतंत्र तरतूद केलेली आहे.

यशस्वी महिला ड्रायव्हर रेणुका देवी सांगतात, ‘‘मला स्वावलंबी व्हायचे होते. स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते. ओलाने मला मदत केली.’’ दोन वर्षांपूर्वी ओलाच्या मदतीने एक कार खरेदी करून रेणुका यांनी व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्याकडे ७ कार आहेत. ओलाच्या माध्यमातून रेणुका यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. आणि हा व्यवसाय त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत बनलेला आहे. रेणुका हसत-हसतच सांगतात, की जेव्हापासून ओला आणि त्यांचा संबंध आला, तेव्हापासून त्यांना पाहिजे ते ओलाकडून मिळाले. तांत्रिक मदत तर एका हाकेवर मिळाली.

आणखी एक यशस्वी महिला ड्रायव्हर शिबा सांगतात, ‘‘ओलाशी संलग्न होऊन मला दोनच महिने झालेले आहेत आणि या दोन महिन्यांतच आमचे नाते घट्ट झालेले आहे. एवढ्या कमी काळात माझ्या कॅबसाठी जे बुकिंग मला कंपनीकडून मिळाले, ते मला आजवर कधीही मिळाले नव्हते. मी खुश आहे. मला मोकळा वेळ असेल तेव्हा माझ्या सवडीने जर मला ओलाकडून काम मिळत असेल तर ओला ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधीच. मला काहीही झाले तरी ती दवडायची नाही.’’

ड्रायव्हर आणि प्रवासी दोहोंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ओलाने अनेक टप्प्यांवर उपाययोजना केलेल्या आहेत. प्रत्येक ओला कॅबमध्ये जीपीएस संचलित एसओएस (सेंसर ऑब्झर्व्हेशन सर्व्हिस) बसवलेले आहे. जेणेकरून आधीच फिड केलेल्या मित्रांना तसेच कुटुंबीयांना वेळोवेळी प्रवासाची खरी वेळ ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून पोहोचवता यावी. चोवीस तास सुरू असणारे ओलाचे एक कॉल सेंटरही आहे. ग्राहकांना आवश्यकतेनुसार त्याची मदत होते. गरज भासल्यास ओला आपल्या प्रत्येक कॅबला ट्रॅक करू शकते. ती नेमकी आता कुठे आहे, हे अचूक जाणून घेऊ शकते.

ओला कॅबमधून प्रवास करणाऱ्यांकडून फिडबॅक फॉर्म भरवून घेतले जातात, प्रवाशांच्या अभिप्रायांची दखल घेतली जाते. सेवा अधिकाधिक उत्तमोत्तम करण्याच्या दिशेने प्रयत्नांत कुठलीही कसर ओला सोडत नाही. आनंद यांचे म्हणणे आहे, की कुठलीही महिला ड्रायव्हर जर तिला सोयीचे वाटत नसेल तर ड्रायव्हर म्हणून स्वत:ची बुकिंग रद्द करू शकते अगदी शेवटच्या क्षणीही. त्यामुळे आम्ही प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ देत नाही. ज्या महिला ड्रायव्हरला आपली ड्यूटी रद्द करावयाची असेल ती तातडीने आमच्या ड्रायव्हर सपोर्ट टीमशी संपर्क करून मदत घेऊ शकते. महिला ड्रायव्हर आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या शक्य त्या सर्व उपाययोजना ओलाने अंमलात आणलेल्या आहेत.

ओलासाठी काम करणाऱ्या ७० टक्के ड्रायव्हर्सकडे त्यांच्या स्वत:च्या कार आहेत. ओलाचा सल्ला घेऊन टाटा, निसान, मारुती, फोर्ड, महिंद्रा आदी कंपन्यांकडून कार खरेदी करतात, असेही बरेच ड्रायव्हर आहेत.

ओलाने पुढल्या तीन वर्षांत ५० हजार महिला ड्रायव्हर्सना आपल्यासोबत घेण्याचे लक्ष्य निर्धारित केलेले आहे. लक्ष्यप्राप्तीसाठी ते जोमाने कामालाही लागलेले आहेत. एआयडब्ल्यूईएफए (ऑल इंडिया वुमेन्स एज्युकेशन फंड असोसिएशन, दिल्ली), एएनईडब्ल्यू (असोसिएशन फॉर नॉन ट्रॅडिशनल एम्प्लॉयमेंट ऑफ वुमेन, चेन्नई), अँजल सिटी कॅब सर्व्हिस (बंगळुरू) यांसारख्या राष्ट्रीय आणि स्थानिक अशा संस्थांचे सहकार्यही ओलाने त्यासाठी घेतलेले आहे. महिला ड्रायव्हर आणि ड्रायव्हिंग व्यवसायिकांसाठी ड्रायव्हिंग हे रोजगाराचे एक सवलतीचे आणि कायमस्वरूपी असे साधन म्हणून पुढे यावे म्हणून ईपी आणि एएसडीसीचे सहकार्यही ओलाने घेतलेले आहे.