२४ दिवसांत ३२ जिल्ह्यांच्या सायकल सफरीची ‘कमाल’

0


कोणत्याही व्यक्तीच्या मनात पुढे जाण्याची, काहीतरी करून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे खरोखर एक जादूच आहे. काही तरी करून दाखवण्याचं एखाद्याने ठरवलं आणि ते सिद्ध करण्यासाठी उत्साह आणि जिद्दीच्या सगळ्या मर्यादा जर त्यानं पार केल्या तर तो इतरांसाठी प्रेरणा ठरतो. कमाल हजसुद्धा असंच व्यक्तिमत्व आहे.

माझ्याजवळ ५० हजारांच्या जवळपास रुपये जमले की या पैशांचं काय करायचं, हा प्रश्न मला पडतो असं कमाल सांगतात. त्यामुळे असंच काहीतरी करण्यासाठी ते तामिळनाडूमधल्या ३२ जिल्ह्यांच्या सफरीवर निघाले आणि तेही सायकलवरून... तामिळनाडूमधल्या उन्हाळ्यातल्या वातावरणाचा विचार करता या कामाला किती प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे, ते समजू शकेल.


कितीतरी दिवसांपासून कमालच्या डोक्यात या पराक्रमाचा विचार घोळत होता. त्याचवेळी कमाल स्वत:च्या ओएमआर पॅडल मेसेंजर्स  (सायकलद्वारे सेवा पुरवणे) सेवा हा नवा उद्योग (स्टार्टअप) चालवत होते. चेन्नईसारख्या गर्दीच्या शहरात सायकलवरून सेवा देण्यासाठी त्यांनी हे स्टार्टअप सुरु केलं होतं. याची सुरुवात त्यांनी चेन्नईचं आयटी केंद्र ओएमार ते थ्रीवनमीर आणि सिरुसेरीमध्ये केली होती. कमाल सांगतात, याची सुरुवात मी एकट्यानंच केली होती. मी फोनवरून ऑर्डर्स घ्यायचो आणि कागदपत्रं, पेन ड्राईव्ह किंवा दिलेल्या वस्तू पत्त्यावर पोहोचवायचो. एका तासाच्या आत वस्तूची डिलीव्हरी हे ओएमआर पॅडल मेसेंजरचं वैशिष्ट्य आहे. तीन महिने हे काम केल्यावर हे कायमस्वरुपी करण्यासारखं हे काम नसल्याचं कमालच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी मोबाईल बिलबोर्ड जाहिरातीचा नवा उद्योग सुरु केला. काही दिवस त्यांनी त्यातही सर्व प्रकारची कामं एकट्यानंच सांभाळली. पण मग मात्र त्यांची हिंमत सुटायला लागली. त्यामुळेच कमाल 'व्हॉट्स ऑन' या कंपनीत लेखक म्हणून दिवसा नोकरीही करु लागले.

कमाल सांगतात की या प्रवासाची तयारी म्हणून मी माझ्या नोकरीशिवाय दररोज ६० ते १०० किलोमीटर सायकल चालवायचो. याशिवाय २०१४ मध्ये मी सायकलवरून संपूर्ण चेन्नईमध्ये १० हजार किलोमीटरचं अंतर पार केलंय. जेव्हापासून माझ्या मनात या प्रवासाची कल्पना घोळायला लागली आणि यूअरस्टोरीवर वेगवेगळे लेख वाचायला सुरुवात केली, त्यानंतर तर नवीन कार्य हातात घेण्याची माझी जिद्द आणखी वाढली.


त्यांच्या या यात्रेचा कोणताही विशिष्ट हेतू नव्हता.. मी ३ मे २०१५ ला चेन्नईमधल्या वेलाचेरीपासून या प्रवासाला सुरुवात केली आणि २७ मे २०१५ ला हा प्रवास संपला. यापूर्वी कोणी असं करण्यात यशस्वी ठरलेलं नाही. सायकलवर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करणारा मी भारतात पहिलाच ठरलोय. हा प्रवास फक्त सायकल चालवण्यापुरता मर्यादित नव्हता तर ग्रामीण भागातून जाताना स्थानिक बोलीभाषा, विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वादही घेतला. “ एक चित्रपट निर्माता असल्यानं मी या प्रवासात एक माहितीपटही तयार केला.”

आपल्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा आणि नवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीने कमाल अशा प्रवासाला निघतात. “ गौरव सिद्धार्थ, कार्तिक वर्मा आणि मार्क ब्युमोंटसारख्या लोकांकडून मला प्रेरणा मिळते कारण त्यांनी मानवी मर्यादांच्या पलिकडे जाऊन अशा लांबच्या सायकल सफरी पूर्ण केल्या आहेत. अशा साहसांमधून मीही स्वत:चा शोध घेत असतो.” ही तर सुरूवात आहे भविष्यात मला कन्याकुमारी ते कच्छ, श्रीनगर, हैदराबाद आणि चेन्नई असा प्रवास करायचा आहे. “ मी हे धाडस करण्यास सक्षम आहे हे मला सिद्ध करायचंय”, असं ते सांगतात.

तामिळनाडू या आपल्या राज्याचा त्यांना अभिमान आहे. तसंच लोक सायकलवरुन जगाचा प्रवास करतात पण आपल्याच राज्याचा प्रवास करण्याचा विचार कोणी क्वचितच करतं, असं कमाल म्हणतात. तसेच या सायकल यात्रेतून तामिळनाडूतील पर्यटनस्थळांची माहिती त्यांना जगासमोर आणायची आहे. “ लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असल्याने मी लॉयलो महाविद्यालयातून दृकश्राव्य माध्यमातून पदवी शिक्षण घेतलं आणि माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात केली. त्यामुळेच सायकल चालवण्यासोबत मी चित्रपट निर्मितीचंही काम करतोय,” असं कमाल सांगतात.


आपल्या या यात्रांमधून कमाल यांना समाजाच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. “ संपूर्ण भारतावरील चित्रपटाच्या माध्यामातून हे शक्य आहे, आपल्या जवळ पैसा नसला तरी कुटुंब तसंच मित्रांची साथ असल्यानं माझ्यात हिंमत आहे,” असा निर्धार ते व्यक्त करतात.