माणसांनी माणसांसाठी सुरू केली आहे, माणुसकीची मोहीम ‘नाम फाऊंडेशन’!

1

या नश्वर जगात येऊन तू काय घेऊन जाणार आहेस? अरे वेड्या ही मालमत्ता, हे वैभव, हा थाट-माट काय नेता येणार आहे सोबत? ज्या शरीराला इतके जपतोस, सजवतोस ते तरी तुझ्या सोबत येणार आहे का? मग ही कसली धडपड करतो आहेस? जगण्याची! पाच बंगले, गाड्या कशासाठी? मी-माझं-मला कशासाठी? कशासाठी ही आत्ममग्नता? ही आत्मग्लानी आहे यातून सावध हो, आजूबाजूला बघ किती लोकांना साध्या साध्या गोष्टीसुध्दा मिळाल्या नाहीत. तुझ्याजवळच्या काही गोष्टी जर देण्याची मनाची तयारी केलीस तर त्यांच्याही चेह-यांवर हास्य, कृतज्ञता दिसेल, आनंद दिसेल त्यात हरवून जा, हे सुख तुला दुसरं कुठे मिळेल का? बघ विचार कर! हा संवाद आहे मनातला .....एका सामाजिक बांधिलकी जपणा-या ‘मना’तला.... काही लोक संवाद साधून थांबत नाही तर पुढे जातात. होय, आम्ही तुम्हाला नाना पाटेकर या वास्तवदर्शी नटसम्राटाने, मकरंद अनासपूरे या विनोदाच्या बादशहासोबत सुरू केलेल्या एका सामाजिक चळवऴीबद्दल सांगण्याचा हा प्रयत्न केला आहे. खरेतर हे सारे केवळ निमित्त म्हणून घडले पण लोकांनी त्याला ‘नाम फाऊंडेशन’ ही संज्ञा दिली, (‘म’करंद आणि ‘ना’नामधला)  काहींनी नावंही ठेवली! पण हा संवाद आता आकार घेतो आहे. एका खूप मोठ्या चळवळीचा विस्तार होतोय आणि यातून आमचे व्यक्तिगत साध्य काहीच नाही असे जेंव्हा या चळवळीचे प्रणेते म्हणतात तेंव्हा त्यांच्या या सा-या खटाटोपाला तुम्ही काय म्हणाल? 

‘युअर स्टोरी’ने त्यासाठी हास्यसम्राट मकरंद अनासपूरे यांना त्यांच्या व्यस्त कामकाजातून गाठलं आणि त्यांच्याशी या चळवळीबाबत तिच्या भवितव्याबाबत आणि अंतिमत: तिच्या सकारात्मक परिणामांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मकरंद म्हणाले की, “नाना सारख्या संवेदनशील विचार करणा-या कलावंतासोबत माझं नातं सुरुवातीपासूनच जुळलं मी या क्षेत्रात आलो तेच मुळी नानांच्या प्रोत्साहनामुळे. नाट्यदर्पणच्या एकांकीकामध्ये नानासमोर चांगला अभिनय केला आणि चांगला नट म्हणून पुरस्कार मिळाला तेंव्हा १९९४मध्ये नानाच्या प्रेरणेतून मुंबई गाठलं. त्यानंतर मुंबईच्या नाट्य-सिने क्षेत्रात माझा प्रवास सुरू झाला. यशवंत हा पहिला सिनेमा केला. त्यानंतर माझी स्वतंत्र वाटचाल सुरु होती. त्या काळात अगदी शुन्यातून मी सुरुवात करत मराठीत चांगला नट म्हणून नावारुपाला येण्यापर्यंतचा टप्पा गाठला. काही महिन्यांपूर्वीपासून नानांचा फोन येत असे की मराठवाड्यात स्थिती गंभीर आहे. काही मदत देतो ती वाटून ये. पण मी त्यांना तुम्ही येत असाल तर एकत्र जाऊ असा आग्रह केला.”

आणि मग ही चळवळ सुरु झाली. त्यात सयाजी शिंदे, दिलीप प्रभावळकर, जितेंद्र जोशी सारख्या इतरही मित्रांनी सक्रीय  सहभाग घेतला आणि बीडचा कार्यक्रम केला. त्यातून जे वास्तव समोर आले त्यानंतर नागपूर आणि इतर ठिकाणी मदत देण्याची कल्पना रावबिली. माध्यमांनीही यात चांगली माहिती दिली अणि मग अनेकांनी मदतीचा ओघ सुरू केला. त्यातून ‘नाम फाऊंडेशन’ची सुरूवात झाली, मकरंद म्हणाले.

मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून पाऊस झाला नाही त्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्हीचा हंगाम नापिकीमध्ये गेला. पिण्याचे पाणी नाही, शेतीचे उत्पन्नच नाही. त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणाचा लग्नांचा खर्च करता येत नाही. जनावरांना चारा-पाणी नाही, दुध-दुभत नाही. त्यामुळे शेतक-यांना कर्ज झाली. ती फेडता येत नाहीत म्हणून तीन हजारापेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली. त्यामुळे खूप मोठे दुष्टचक्र निर्माण झाले.

शहरात आपण जगतो आपल्या कुटूंबासोबत मित्रपरिवारासोबत त्यातच धन्यता समजतो. पण समाजात असा एक घटक आहे, जो शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे तो आज संकटात आहे, तर त्याला आपण सारे मिळून काही मदत करु शकतो तर केली पाहिजे इतका साधा विचार करून काही लोक समोर आले आणि ही चळवळ उभी राहिली.

मकरंद म्हणाले की, मे महिन्या अखेर जलसंधारणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे साडेतीनशे किंमीपर्यंतचा जुन्या तलाव, नद्या यांच्यातील गाळ काढणे, बंधारे घालणे, पाणी अडवणे आणि जिरवणे यासाठी बांधबंदिस्ती करणे यासाठी उपक्रम सुरू झाला आहे. आज मराठवाड्यात पाण्यासाठी १४४कलम जारी करण्याची वेळ आली ही यादवीची सुरुवात नाहीतर काय आहे? आता आपण यासाठी काही करू शकतो आहोत तर काय केले पाहिजे ते यथाशक्ती केले पाहिजे अशा विचारातून हे काम सुरू झाले आहे. मृत झालेल्या जलस्त्रोतांना संजिवनी देण्यासाठी सध्या २००किमी पर्यंत कामे झाली आहेत पाऊस येईपर्यंत ती चारशे किमी व्हावीत असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची मोहीम’ इतकाच या चळवळीचा उद्देश आहे असे मकरंद म्हणतात. “इतरांसाठी मी काहीतरी करू शकतो ज्यातून त्यांना आंनद झाला तर त्यात मी सहभागी होऊ शकतो असे वाटल्याने ही सुरू झाली आहे. ही आपली भावंड आहेत. हीच त्यामागची भावना आहे” असे ते म्हणाले.

या कार्यात जितकी माणसं जोडली जातील तितकी कमी आहेत आपल्या महाराष्ट्रातील सेलीब्रेटी जरी पुढे आले आणि त्यांनी आपापल्या भागात हे काम हाती घेतले तरी खूप मोठे काम होणार आहे. या मदतीच्या प्रवासात आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शिलाई यंत्रे दिली, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, आणखी काही मुलांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी काही शिक्षणसंस्थांची मदत घेऊन मार्ग मिळवून दिला. आम्ही निमित्त आहोत श्रेय केवळ आमचे नाही याची आम्हाला जाणिव आहे. काहीतरी चांगले घडावे यासाठी कारणीभूत झालो याचा आम्हाला आनंद आहे.

मकरंद म्हणाले. “हे करताना आम्ही खूप कुणी मोठे आहोत हा भाव नाही. आमच्या काही चूका झाल्या नाहीत किंवा होणार नाहीत असा दावा नाही. पण आम्ही ही काळजी घेउन जातो आहोत की चुका होणार नाहीत. तशी प्रत्येक गावात जबाबदारी घेणारी दहा माणसं मिळतात त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय आमचा वेग त्यामुळे थोडा कमी असेल, पण जेंव्हा पाऊस पडेल आणि पुढच्या हंगामात काही शेतकरी एक चांगले पिक त्यावर घेतील, काही जोड धंदा सुरू असेल त्यातून चार पैसे जोडतील आणि सहजपणाने त्यांना जगता येईल ते पहायला मिळेल तेंव्हा जो आंनद असेल त्याचे काय मोल करता येईल?” मकरंद यांनी सांगितले.

येत्या जुलै महिन्यापर्यंत एक कोटी झाडे लावण्याचा आमचा संकल्प आहे. जे काही लोक यामध्ये जे काही योगदान करतील अगदी स्वत:च्या सवडीने दोन वर्षांपर्यंत दोन झाडे हवी तेथे लावून ती नीट वाढवतील तर त्याचे श्रेय आणि आनंद त्यांना मिळणार आहे. मकरंद म्हणाले की, “नाना तर या सा-या कामाला रिले स्पर्धेसारखे समजतात आम्ही निमित्तमात्र आहोत ही चांगल्या कार्याची बँटन घेऊन निघालो आहोत आणखी दोन वर्षांनी कुणाच्या तरी हाती सोपवून जाऊ तो आणखी दोन वर्षांनी चांगल्या कुणाच्या तरी हाती सोपवून जाईल माणस जोडत जातील आणि सामाजिक बांधिलकीचे हे काम निरंतर सुरूच राहिल याचा आनंद जाताना किती असेल ते सांगता येणार नाही.” मकरंद सांगतात. नाम ही काही नाव मिळवण्यासाठी सुरू केलेली चळवळ नाही. किंवा कुणी नावं ठेवली म्हणून ती थांबणारही नाही. कारण इतक्या दुष्काळातही पाझरलेला तो ‘माणुसकीचा झरा’ आहे जो माणसांना जोडण्यासाठी, त्यांच्या जगण्याच्या संघर्षात त्यांना उभे करण्यासाठी, चेह-यांवर आनंद फुलवण्यासाठी वाहात राहणार आहे “ना’ना’म’करंद”च्या माणूसकीच्या महायज्ञाला युअर स्टोरीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

वेबसाईट : http://naammh.org

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण

स्वानुभवाच्या प्रेरणेतून अनाथांना कौटुंबिक जिव्हाळा मिळवून देणारे धेंडे दाम्पत्य

एक असे प्राध्यापक, जे ३३ वर्षापासून सर्व सुखसुविधा सोडून जंगलात राहतात, आदिवासींसाठी...!