मूर्ती लहान पण किर्ती महान !

0

आईच्या पोटात असतानाच काही मुलं जगावेगळं स्वप्नं घेऊन जन्म घेतात...किंवा नियती त्यांचं भविष्य आधीच अधोरेखित करून ठेवत असावी. उरण येथील अशाच एका स्वप्नाळू पण जिद्दी युवकाने एका महिन्यात आठ वेळा समुद्रातून पोहून लिमका बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद करण्यात येणार असून उरण परिसराचे नाव उंचवले आहे.

राज संतोष पाटील हे त्या १० वर्षीय जिद्दी युवकाचे नाव आहे. एका महिन्यात आठ वेळा समुद्रातून पोहून लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव उज्ज्वल करण्याचे त्याचे स्वप्न त्याच्या भावूक डोळ्यांत स्पष्टपणे दिसते. कोवळ्या वयातील त्या नजरेत विश्‍वविक्रम स्थापित करण्याचा आत्मविश्‍वास झळकताना दिसतो आहे. आठ समुद्र पोहून ओलांडण्याचा विक्रम करण्याची खूणगाठ त्याच्या मनात पक्की बांधलेली.. राजचा आजवरचा प्रवास जाणून घेतला की एक मात्र नक्की जाणवतं, ‘तुमचं आयुष्य तुम्हाला भव्यदिव्य करण्यासाठी सहाय्य करायला नेहमीच तत्पर असतं..प्रश्न असतो तुमच्या दृष्टिकोनाचा, मनाच्या उभारीचा आणि आत्मविश्‍वासाचा.’ उत्तुंग ध्येयाच्या दिशेने मजल-दरमजल करीत वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच राज पाटील याच्या स्वप्नपूर्तीला सुरवात झाली होती. राजने वयाच्या चौथ्या वर्षीच पोहण्याची कला अवगत करून सर्वप्रथम वाशी ब्रिज ते गेट ऑफ इंडिया असे सागरी अंतर पोहून पार केले.

वडील जलतरणपटू असल्यामुळे राजला जणू जन्मतःच पोहण्याच्या कौशल्याचे बाळकडू प्राप्त झाले होते. उरणजवळच्या केगाव बीच किंवा जवळील एखाद्या तलावात जलतरणातील प्राथमिक धडे त्याने गिरविण्यास सुरवात केली. लांब पल्ल्याच्या सागरी जलतरणाची सुरवात व्हायला अजून बर्‍याच सरावाची आवश्यक होती. त्यामूळे त्याने दिवसातून ५ ते ६ वेळा नवी मुंबई स्पोट्र्स क्लबच्या स्विमींगपूलमध्ये सरावाला सुरूवात करून स्पर्धात्मक मनोभूमिका विकसित केली. जिद्द वाढत गेली आणि अशाच उर्मीतून त्याच्या शारीरिक जोमाचा कस वयाची १० वर्षे पूर्ण केल्यानंतर लागला. असे म्हणतात की, ‘ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, पण कोवळ्या वयात समुद्र पार करून जाण्याचे स्वप्न पाहिलेल्या राजच्या या यशामागे त्याचे वडिल संतोष पाटील आहे. अमोलची गती, प्रगती, शारीरिक आणि मानसिक क्षमता हेरून राजच्या वडिलांनी त्याला तलावातील प्रवासानंतर समुद्रांमध्ये पोहण्यास प्रोत्साहित केले. १ नोव्हेंबर रोजी सुरू केलेला समुद्राचा आर-पार प्रवास सुरू झाला. सुरवातीला केगाव बीच ते कानोजी अंग्रे आईसलॅण्ड असे २४ किलोमीटरचे सागरी अंतर त्याने ७ तास ३२ व ३७ सेकंदात पूर्ण केले. सर्व क्षमतांचा कस लागणे म्हणजे काय असते, हे जाणण्याची सुरूवात इथून झाली. ४ नोव्हेंबर रोजी २४ कि.मी. लांबीचा मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास ८ तास ५४ मिनिटे व ३२ सेकंदात पोहून गेल्यावर राजचे मन:सार्मथ्य वाढले. त्यानंतर राजने एलिफंटा आईसलॅण्ड ते मांडवा जेट्टी असा २१ कि.मी. अंतर ६ तास ६ मिनिटे ५२ सेकंदात पोहून पार केले. जस जसे त्याचे समुद्री प्रवास वाढू लागले तस तसा राजचा आत्मविश्‍वास वाढीस लागला. १५ नोव्हेंबर रोजी रेेवस जेट्टी ते भाऊचा धक्का असा १७ कि.मी. अंतराचा प्रवास ६ तास ११ मिनिटे व ५८ सेकंदात पोहून पूर्ण केला. ६ दिवसानंतर पुन्हा एकदा २१ नोव्हेंबर रोजी राज भवन मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया असा १५ कि.मी. चा प्रवास ५ तास ३३ मिनिटे व २२ सेकंदात पूर्ण केला. २५ नोव्हेंबर रोजी रेवस जेट्टी ते मोरा पोर्ट असा २२ किमी अंतर असलेला प्रवास अवघ्या ५ तास २४ मिनिटे २७ सेकंदात कापला. सागरावरील हवामान, वार्‍याचा वेग आणि दिशा, पाण्याचे तापमान तसेच लाटांची दिशा असे इतर महत्वाचे घटक पोहणार्‍याची परीक्षा घेतात. वेळप्रसंगी दमछाक देखील करतात. बदलत्या तापमानात समुद्रांंतून पोहताना हात आणि पाय मारत राहायचे, हे येरा गबाळ्याचे काम नव्हेच..परंतू राजची असलेली इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वास यामुळे या परिक्षेत तो पास झाला. आता नवनवीन विक्रम करणे ही गोष्ट राजसाठी नित्याचीच बाब होऊ लागली. राजचे पुढील सर्वात मोठे आव्हान ३१ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी बेलापूर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया २५ किमी अंतर अवघ्या ११ तास ५८ मिनिटे ६ सेकंदात पार केले. एका महिन्यात आजपर्यंत देशातून कोणीच आठ वेळा समुद्रातून प्रवास केलेला नाही. पण या चिमुरड्याने एका महिन्यात आठ वेळा समुद्रातून पोहून अंतर कापले आहे.

आठ वेळा समुद्रातून पोहताना दडपण वगैरे येणे हे राजच्या स्वभावात बसणारे नाही. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठीचा हा शेवटचा प्रवास मोठ्या आत्मविश्‍वासाने पार करून ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ अशी संपूर्ण देशातील नागरिकांना प्रचिती दिली आहे. एव्हाना आठ समुद्री प्रवास राजने आपल्या बाहुबलाने वश केल्यानंतर साता समुद्रापार पोहण्याचे त्याचे स्वप्न आहे. यापुढे आणखी एक सागरकिनारा..मध्ये अथांग खारे पाणी आणि त्याच्या पल्याड..ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती !