कॉटन साडी उद्योगातील आव्हानाना तोंड देत हजारो मजूरांचे हात तयार करतात सुंदर कलाकृती!

0

स्त्रियांच्या जीवनात नविन लुगडे किंवा साडी ही वस्तू म्हणजे आनंदाचे वेगळे रुप असते. अलिकडच्या काळात साड्या किंवा नऊवार, पाचवार अश्या प्रकारच्या साड्या वापरण्याचे प्रमाण कमी होत आहे मात्र नवी साडी हा स्त्रियांच्या आजही जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. हातमाग किंवा यंत्रमागावर काम करणारे रोजंदारी मजूर किती कष्टाने या साड्या किंवा कापड तयार करतात याची जाणिव नागपूरच्या मोमिनपूरा भागातील एहसान उल हक यांची कहाणी ऐकली की येते. शाळेचे तोंड देखील न पाहिलेल्या एहसान यांची मुले आज शिक्षण घेत आहेत पण ज्या व्यवसायात ते आणि त्यांच्या दोन पिढ्या जगल्या त्या व्यवसायाला कसे जगवायचे आणि त्याच्या सोबत भविष्यात कसे जगायचे याचे कोणतेही उत्तर त्यांच्या चमकदार डोळ्यात दिसत नाही.

नागपूरच्या मोमिनपूरा भागात रोजंदारी मजूर म्हणून कष्टाची कामे करणा-यांच्या वस्तीत जाताना मुस्लिम बहुल भाग असल्याने आपण नेहमीच नकारात्मक भाव मनात घेवून जात असतो. मात्र या ठिकाणी हिंदू स्त्रियांच्या, देवी-देवतांच्या वस्त्रांची निर्मिती करण्यासाठी अक्षरश: शेकडो हात दिवस रात्र राबतात आणि त्यातून त्यांना फार काही मोठा फायदा होताना दिसत नाही. केवळ पाच ते दहा आणि फार तर शंभर रुपयांच्या प्राप्तीसाठी धागाच्या भट्टीत काम करणारे आणि यंत्रमागावर काम करणारे मजूर पाहिले की काय बोलावे ते सूचत नाही. अन्सार मसजिदच्या आश्रयाने आज स्वत:चे दहा बाय दहाचे नऊवार, सहावार, पाचवार साड्या तयार करून विकण्याचे दुकान असलेल्या एहसान उल हक यांच्याकडे यंत्रमाग आणि हातमाग या व्यवसायातील चांगले वाईट दोन्ही प्रकारचे ज्ञान आहे, या व्यवसायात लोक अनेक पिढ्यांपासून कसे नाईलाज म्हणून काम करत आहेत ते सांगताना ते म्हणातात की, “केवळ भरोसा आणि ईमानदारी यावर त्यांनी जीवनभर हा व्यवसाय केला आणि म्हणून आज नोटबंदीसारखे संकट असताना त्यांना केवळ नावावर उधारीवर पन्नास हजारा पर्यंतचा कच्चा माल मिळतो आहे”. म्हणून ते आपला व्यवसाय करू शकत आहेत.

एहसान भाई यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, “नागपूरात मोमिनपूरा या वस्तीमध्ये ते वयाच्या दहाव्या वर्षापासून हातमाग यंत्रमागच्या व्यवसायात वडिलांसोबत काम करु लागले. आज सुमारे ४५वर्ष ते काम करत आहेत पण हा व्यवसाय जसा होता त्या पेक्षा वाईट स्थितीत आज चालवला जात आहे.” या व्यवसायात नकल करणारे बरेच जण आले, मोठे भांडवलदार आले, त्यांनी पैसा कमाविला मात्र एहसान भाई यांच्यासारखे कित्येकजण आजही जुन्या पध्दतीने या व्यवसायात आला दिवस साजरा करत असतात. एक साडी तयार करण्यासाठी किमान वीस जणांचे हात लागतात ते सांगत होते, “त्यात धाग्याची लडी पक्की करण्यापासून तिला रंग देणे आणि त्यात जरी भरण्यापासून वेगवेगळ्या डिझाइनच्या मागणी नुसार साड्या किंवा कपडा तयार करण्यापर्यंत या रोजंदारीवर काम करणा-या मजूरांचे हात लागत असतात.” आज एहसान भाई त्यांच्या तरूण मुलांसोबत हा व्यवसाय करत आहेत मात्र महिन्याला त्याना दहा हजाराच्या पेक्षा जास्त कमाई होत नाही कारण हाताने उधार कच्चा माल घेवून काम करण्याच्या मर्यादा आहेत. दोनशे रुपयांच्या भांडवली खर्चात तयार झालेल्या साडीला येथे जास्तीत जास्त २५०रुपये भाव मिळतो मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करणारे काहीजण आहेत ते सुरतच्या कापड उद्योगात जुन्या झालेल्या यंत्रांना या भागात लावून त्यातून काम करण्याचा प्रयत्न करतात, मात्र झोपडीत राहणारी अनेक कुटूंब दिवसभर साड्यांना जरीकाम करणे आणि त्यात डिझाइन भरण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. यंत्रमाग हातमाग विणकरांच्या या कष्टाच्या जीवनाला जवळून पाहिल्यावर उद्यमिता आणि प्रामाणिकता यांचे फळ त्यांना फार काही मिळत नाही तरी ही माणसे दु:ख न बाळगता प्राक्तन समजून हा व्यवसाय करत आहेत आणि भविष्यात तो वाढेल याची वेडी आशा करत घातक परिस्थिती मध्ये काम करत आहेत. त्यांच्या चेह-यावरील निरागस हास्य पाहून मनात अस्वस्थता येते, मात्र देशाच्या मेक इन इंडियाच्या नारेबाज नेत्यांनी बोलघेवडेपणा सोडून खरच यांच्या या उद्योगासाठी काही करावे असे मनोमन वाटते. एहसानभाई आणि त्यांच्या मुलांनी या व्यवसायात उधारी मजूरीच्या मदतीने आज किमान स्वत:चा गाळा घेवून साड्या विकण्याच्या आणि त्यांचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणात करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.  हिंदू स्त्रियांच्या वस्त्रांच्या व्यवसायात काम करणा-या या लोकांना पाहिले की कुठे आहेत धर्माचे ठेकेदार असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.