ख्वाडाच्या निमित्ताने अडथळ्यांची शर्यत बनली अनुभवांची शिदोरी - दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे

ख्वाडाच्या निमित्ताने अडथळ्यांची शर्यत बनली अनुभवांची शिदोरी - दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे

Tuesday December 22, 2015,

3 min Read

अस्सल मातीतला रांगड्या धाटणीचा ख्वाडा सिनेमा हा यावर्षाच्या मराठी सिनेमांच्या यादीत अग्रस्थानी असेल. धनगर समाजाचे आयुष्य अत्यंत प्रभावीपणे या सिनेमातनं समोर आले ते ही कुस्तीसारखा तांबड्या मातीतल्या खेळाचे माध्यम वापरुन. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केले गेले. ख्वाडा म्हणजे ऑब्स्टॅकल म्हणजेच अडथळा. या सिनेमातनं धनगर समाजातल्या एका कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष मांडला गेलाय. पण प़डद्यावरचा हा संघर्ष मांडताना या सिनेमाच्या दिग्दर्शकाला पडद्याबाहेरच्या संघर्षाला तोंड द्यावे लागले होते. खरेतर आज हे सांगायचे निमित्त एवढेच की आपल्या पहिल्या हिट सिनेमाच्या संघर्षाची शिदोरी गाठीशी घेऊन आता हा दिग्दर्शक दुसऱ्या सिनेमाच्या जुळवाजुळवीमध्ये व्यस्तही झालाय. हा दिग्दर्शक म्हणजेच भाऊराव कऱ्हाडे.

image


“ ख्वाडा सिनेमाची कथा लिहिल्यानंतर ही कथा घेऊन मी अनेक निर्मात्यांचे उंबरठे झिजवले. निर्मात्यांना कथा तर आवडत होती पण कुठलाच अनुभव आणि प्रशिक्षण नसलेल्या दिग्दर्शकावर पैसे लावायला ते तयार नव्हते. यापैकी अनेक निर्मात्यांनी मला ही कथा त्यांना विकावी अशी सुचना केली, त्यांना प्रस्थापित दिग्दर्शकाला घेऊन या कथेवर सिनेमा बनवायचा होता. पण मी ठाम होतो की कथा माझी आहे तेव्हा सिनेमा मीच बनवणार आणि शेवटी एक मार्ग सुचला.”

हा मार्ग म्हणजे भाऊरावने त्यांच्या घरच्या शेतीतला एक तुकडा विकला आणि त्यातनं पैसे उभे करत तो स्वतःच या सिनेमाचा निर्माता बनला. “ मी शेतकरी कुटुंबातनं आलोय, मी स्वतः शेतकरी म्हणून काम करतो, त्यामुळे मातीचे मोल आमच्यापेक्षा अधिक कोणाला कळणार जेव्हा ख्वाडावर पैसे लावायला कोणताच निर्माता तयार होत नव्हता तेव्हा मीच या सिनेमाचा निर्माता बनायचा निर्णय घेतला. माझ्या घरच्या शेतजमिनीतला तुकडा विकण्यासाठी मी माझ्या कुटुंबाला यासाठी तयार केले, अर्थात हे सोप्पे नव्हते, पण मला विश्वास होता की या सगळ्यातनं शेवटी सगळे काही चांगलेच होणार आहे ”.

image


सिनेमासाठी पैसे मिळाले आणि मग सुरुवात झाली ती कलाकारांच्या जुळवाजळवीची. “ भाऊ शिंदे हा माझा मित्र, सिनेवेडा आणि या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शकही आहे. मला सिनेमातल्या नायकाच्या भुमिकेसाठी खरा खुरा आखाड्यातला तरुण हवा होता, खूप शोध घेतला पण आजचे तरुण हे आखाड्यापेक्षा जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्यात जास्त मग्न आहेत. शेवटी भाऊलाच या सिनेमाच्या नायकाची भूमिका द्यायचे ठरले, भाऊचे शरीर हे तालमीतले आहे, त्यामुळे या भूमिकेसाठी त्याला फक्त वजन वाढवावे लागले एवढेच. ”

सिनेमा तयार झाला, त्यानंतर तो महोत्सवामध्येही झळकला आणि यातच मोठी गोष्ट घडली ती म्हणजे ख्वाडाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा परीक्षक पसंतीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. पण यानंतरही या सिनेमाचा संघर्ष थांबला नव्हता. राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागल्यानंतर सिनेमा प्रदर्शित होत नव्हता कारण सिनेमाला प्रेझेंटरचा मिळत नव्हता. निर्मितीमध्ये स्वतःचे पैसे घातल्यानंतर आता पुढे तो थिएटरपर्यंत कसा पोहचवायचा हा प्रश्नच होता. जो सोडवला बॉलीवूडचे आघाडीचे कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी.

image


एकेकाळी पदवीधर नसल्यामुळे आणि इंग्रजी नीट येत नाही म्हणून पुण्याच्या एफटीआयआयमध्ये इच्छा असूनही भाऊरावला प्रवेश मिळाला नव्हता, यानंतर भाऊरावने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, पण तरीही एफटीआयआयमध्ये त्याचा शिरकाव होऊ शकला नाही. ज्याची सल आजही त्यांच्या मनात आहे. पण जे मिळाले नाही यापेक्षा जे मिळाले त्याचा सकारात्मक वापर करण्याकडे भाऊरावचा कल आहे. ख्वाडाच्या यशानंतर भाऊराव आता त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त झालाय. या सिनेमाची कथा आणि धाटणीही ग्रामीण बाज असलेली आहे. शेवटी मातीतला माणूस मातीचे मोल जाणतो हेच खरे...