५८ वर्षीय नीरु गर्ग यांचा ‘अनमोल उपहार’

0

म्हणतात ना, की कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते.... आणि ते वेळीच लक्षात घेत, ती संधी साधणाराच खरा हिरो असतो... ही कहाणीही काहीशी अशीच... एक सुखवस्तू गृहिणी... घरसंसाराबरोबर नवऱ्याच्या व्यवसायातही मदत करत आपले आयुष्य शांतपणे जगणारी... सर्वसामान्यांच्या भाषेत आता निवृत्तीचे वेध लागले असतील, अशीच... पण स्वप्नांना तर कशाचेच बंधन नसते आणि अशाच एका क्षणी नीरु यांना याची प्रचिती आली आणि त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले... जाणून घेऊ या त्यांची ही आगळीवेगळी कहाणी...

खरोखरच या गोष्टीला एका क्षणातच सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल. नीरु गर्ग या टीव्हीवर मिल्खा सिंह यांची मुलाखत पहात होत्या, ज्यामध्ये सिंह यांनी त्यांना मिळालेल्या एका भेटीमुळे झालेल्या आनंद आणि आश्चर्याचा आवर्जून उल्लेख केला. ही भेट होती एक चलनी नोट, ज्यावर त्यांची जन्मतारीख होती..

आणि याच घटनेने जन्म झाला तो ‘अनमोल उपहार’चा.. खास तारखा साजरा करण्याचा नीरु यांचा हा खास मार्ग.... “ मग तो तुमचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, घराची वास्तुशांती असो, मुलांचा पदवीदान समारंभ असो, आम्ही तो खास बनवतो. उदाहरणार्थ, जर तुमचे लग्न १ जानेवारी १९९० मध्ये झाले असेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून अशी चलनी नोट देऊ शकता, ज्यावर सिरियल नंबंर असेल, ‘०१०१९०’. असा क्रमांक असलेली नोट आम्ही तुमच्यासाठी शोधून काढतो आणि तुमच्या पसंतीच्या डिजाईनसह ती फ्रेम करुन तुमच्यापर्यंत पोहचवतो,” नीरु सांगतात.

वयाच्या ५८ व्या वर्षी सुरुवात

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर या लहानशा शहरात नीरु यांचा जन्म झाला. त्या तेथे लहानाच्या मोठ्या झाल्या, तिथेच त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढेही त्याच शहरात त्यांचे वास्तव्य राहीले. त्या एक गृहिणी असून तीन मुलांच्या आई आहेत, पण घरची जबाबदारी सांभाळताना त्या त्यांच्या पतींच्या व्यवसायातही वेळोवेळी मदत करत असत. सहाजिकच व्यवसाय ही काही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नव्हती आणि त्यामुळेच अनमोल उपहारची कल्पना सुचल्याने त्यांना चांगलाच उत्साह आला.

“ माझी मुले मोठी झाल्याने माझ्याकडे मोकळा वेळ होता, त्यामुळेच मी या कल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला, कारण मला नेहमीच स्वतःचे काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती,” त्या सांगतात. यामध्ये त्यांच्या पतीनेही त्यांना सर्वार्थाने मदत केली.

अनमोल उपहार

नीरु यांनी सुमारे नऊ महिन्यांपूर्वी या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हा खूपच उत्साहवर्धक राहिला आहे.

त्यांच्या कामातील सगळ्यात रंजक भाग असतो, तो म्हणजे चलनी नोटेचा शोध... एकदा त्यांच्याकडे इमेल किंवा फोनच्या माध्यमातून मागणी आली, की ग्राहकाला हवी असलेली तारीख असलेल्या नोटेचा शोध सुरु होतो. सहसा, नीरु या त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्येच विचारणा करतात आणि अशी तारीख असलेली नोट मिळवतात. “ एका आठवडाभर आधी मागणी नोंदवल्यास, ग्राहकांना हवे ते मिळवून देण्यात मला नक्कीच मदत मिळते,” नीरु सांगतात.

मात्र हा शेवटी आकड्यांचा खेळ आहे आणि काही वेळा तुमच्या ग्राहकांना हवी असलेली तारीख शोधून काढणे सोपे नसते. “रोजचा दिवस आमच्यासाठी एक नवीन आव्हान असते – ते म्हणजे योग्य ती चलनी नोट, वेळेत शोधून काढण्याचे... मुख्य म्हणजे ग्राहकाने मागितलेली नोट शोधण्यात आम्हाला अपयश आल्यास, त्यांना नाही म्हणणे हे आमच्यासाठी केवळ आव्हानच नसते तर खूपच कठीण कामही असते,” त्या पुढे सांगतात.

आणखी एका आव्हानाचा त्या आवर्जून उल्लेख करतात, ते म्हणजे त्यांची सर्व डिजाईन्स ग्राहकांना आवडतील, हे सुनिश्चित करुन घेणे. सध्या त्यांच्याकडे एक डिजायनर आहे, जो त्यांना डिजाईनच्या कामात मदत करतो. मात्र या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्या व्हिज्युअल डिजायनर्सची संख्या वाढवत आहेत, जेणेकरुन त्यांना उत्तम परिणाम मिळतील.

आपला हा उपक्रम लोकापर्यंत पोहचविण्यासाठी नीरु विशेष प्रयत्न करताना दिसतात, पण त्या एका विशिष्ट बाजारपेठेत काम करत असल्याने, हे करणे म्हणजे त्यांच्यासाठी मोठे आव्हानच आहे. त्यामुळे या संकल्पनेबाबत जागरुती निर्माण करण्यासाठी, त्या दिल्लीतील विविध मॉल्समध्ये स्टॉल उभारण्यासारख्या अनेक पर्यायांचा वापर करताना दिसतात.

त्यांच्या उत्पादनाला जास्त मागणी ही देशाच्या उत्तरेकडील भागांतून खास करुन दिल्लीमधून असली, तरी चैनईमधूनही मागण्या मिळविण्यात त्यांना यश आले आहे.

महिला उद्योजक

नीरु सांगतात, “ मला या वयात स्वतःचे काहीतरी सुरु करावेसे का वाटले, हा प्रश्न लोकांना जरी पडत असला, तरी माझ्या पतीने मात्र मला सतत यासाठी प्रोत्साहनच दिले आणि लोकांच्या या वागण्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, हे आवर्जून पाहिले आहे.”

बऱ्याच जबाबदाऱ्या एक हाती सांभाळणे हे त्यांच्या मते महिला उद्योजकांसमोरील एक सर्वात मोठे आव्हान आहे. त्या हे मान्य करतात, की काम आणि रोजच्या आयुष्यातील तोल सांभाळणे आणि सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळणे हे महिला उद्योजकांसाठी सहज सोपे निश्चितच नसते.

प्रेरणा

त्यांच्या कुटुंबाकडून मिळणारा खंबीर पाठींबा हा त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसादही... “ दर वेळी जेंव्हा मला आमच्या उत्पादनाबाबत ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा मागणी नोंदवली जाते, तेंव्हा मला अतिशय समाधान वाटते,” त्या सांगतात.

कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी त्या कोणताही शॉर्टकट वापरत नाहीत, कारण त्यांचा त्यांच्या पतीच्या तत्वज्ञानावर पूर्ण विश्वास आहे, जे सांगते की कठीण परिश्रमाला दुसरा पर्याय नसतोच.

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन