कच-यापासून वीज, ‘स्वच्छ भारत’ साठी मुख्यमंत्र्यांची आघाडी.

‘स्वच्छ भारत ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला गतीमान करणारी देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आघाडी कार्यरत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशभरात अससेली कच-याची समस्या सुटू शकते. कच-यापासून वीज निर्मितीही होऊ शकते. यातून देशातल्या वीजेचा तुटवडाही कमी होऊ शकतो. हा उद्देश घेऊन ही समिती युद्धपातळीवर काम करत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री या समितीचे प्रमुख आहेत. या समितीच्या प्रयत्नांचा हा लेखाजोखा.

0

मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेली एक समिती स्वच्छ भारत मोहिमेच्या वेगवेगळ्या पैलूंवर काम करत आहे. या समितीची एक बैठक नुकतीच चंदिगडमध्ये पार पडली. कच-यापासून वीज निर्मिती करणे हा कच-यापासून मुक्ती मिळवण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे असं आपलं म्हणणं या समितीनं मांडलय. पुढच्या महिन्याच्या शेवटी ही समिती याबाबतचा आपला ‘अति विशेष’ असा अहवाल पंतप्रधानांना सादर करणार आहे.


विजेची उपलब्धता, घराघरात स्वच्छता
विजेची उपलब्धता, घराघरात स्वच्छता

पीटीआयनं दिलेल्या माहिती नुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपसमितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र, मिझोराम, हरियाणा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह इतर सात राज्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपली दुसरी बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “ ऊर्जा क्षेत्रात असलेले विकासक हा सर्व कचरा गोळा करण्याचं काम करतील, त्या कच-याचं वर्गीकरण करतील आणि वीज निर्मिती केंद्रांकडं तो पाठवून देतील, आणि तिथं त्या कच-यावर प्रक्रिया करून त्याचं रूपांतर ऊर्जेत करण्यात येईल.”

ते बोलताना पुढं म्हणाले, कच-यावर जलविद्युत प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात आली की सौर प्रकल्पात की थर्मल विद्युत प्रकल्पात प्रक्रिया करण्यात आली यावर वीजेचा दर काय असेल हे अवलंबून असेल. नायडू म्हणाले, “ आम्ही दीर्घकाळ टिकणारी अशी शाश्वत स्वरूपाची मॉडेल्स तयार करणार आहोत. आम्ही कच-याचं रूपांतर ऊर्जेत करणार आहोत. ओला कच-यावर सुद्धा कशी प्रक्रिया करायची याबाबतचं मॉडेलही आम्ही विकसित कऱणार आहोत. सिंगापूरनं दाखवून दिल्याप्रमाणं या ओल्या कच-यापासून पिण्याचं पाणी देखील तयार केलं जाऊ शकतं असं ही तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे.”

ही दुसरी बैठक होण्यापूर्वी समितीची पहिली बैठक गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये पार पडली. आता पुढची बैठक ही पुढल्या महिन्यात बंगळुरू इथं आयोजित केली गेली आहे.

ते म्हणाले, “ ही बैठक खूपच फलदायी ठरली, केंद्र सरकारच्या विविध खात्यांकडून तीन सादरीकरणं करण्य़ात आली, त्यामध्ये तज्ञांच्या एका गटानं एक तांत्रिक स्वरूपातलं सादरीकरण केलं. हा सगळा कार्यक्रम कसा राबवायला हवा या दृष्टीनं सर्वच सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा कल्पना मांडल्या. या बैठकीत केवळ अहवाल तयार करण्यावर भर न देता व्यावहारिक उपाययोजनांवरही भर देण्यात आला.”

कच-यापासून २० मेगावॉट ऊर्जा कशा प्रकारे निर्माण केली गेली याचं एक उदाहरण चंद्राबाबू नायडूंनी दिल्लीतल्या ओखालामध्ये बोलताना दिलं. ते पुढं म्हणाले, “ कच-या पासून वीज निर्मिती प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने काम करताहेत. कच-यापासून वीज निर्मिती करण्याचा हा प्रयोग ते संपूर्ण जगभर करत आहेत. चीन, अमेरिका, जपान या देशांमध्ये असेच ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत.”

स्वच्छता हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा जेणेकरून लहान वयातच मुलं स्वच्छतेची सवय आपल्या अंगी बाणवतील. याबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणं किती आवश्यक आहे याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण होईल अशी शिफारस हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केल्याची माहितीही नायडू यांनी दिली.

कच-याच्या पुनर्वापराबाबत बोलताना ते म्हणाले, “ यावर आम्ही एक प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली. केंद्र सरकार देखील याबाबत अतिशय उत्सुक आहे; केद्रीय वीज नियामक मंडळ देखील याबाबत अतिशय उत्सुक आहे.”

एकदा का हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त सिद्ध झाला, की मग कच-यापासून निर्माण झालेली विजेच्या युनिटच्या दरात लक्षणीय घट होईल असंही ते पुढं म्हणाले.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe