महत्वाकांक्षी अभिमन्यूच्या ‘सॉक्रेटिस ब्रँड'ला ग्राहकांची पसंती

0

अदिपूर हे गुजरातमधील तसे लहानसे शहर. मात्र अशाच लहानशा शहरातील अभिमन्यू चौहानने उद्योग जगात एक वेगळा ठसा उमटवलाय... चिकाटी, महत्वाकांक्षी असणाऱ्या अभिमन्यूची कहाणी प्रेरणा देणारी आहे...अभिमन्यू लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहत होता.. स्वतःचा असा एक व्यवसाय असावा की जेणेकरून स्वतःभोवती एक वलय निर्माण होईल.. उद्योजक म्हणून आपले नाव पुढे येईल, असे त्याला नेहमी वाटायचे...त्याचे वडीलही त्याला पाठिंबा देत असत...

आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असल्यास त्याला आधुनिक शिक्षणाची जोड द्यायला हवी, असे त्याला वाटत होते आणि त्यासाठी त्याने अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ठरविले. अर्थशास्त्र आणि कला शाखेकडून शिक्षण घेण्यापेक्षा अभियांत्रिकी शिक्षण घेणे त्याने जास्त पसंत केले. त्यासाठी अभिमन्यूने गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला..मात्र कालांतराने त्याचे इंजिनीअरिंगमध्ये मन रमले नाही..घेतलेला कोर्स हा फार जुना झालेला असल्याने त्याचा सध्याच्या तांत्रिक युगात काहीच फायदा होणार नाही, असे अभिमन्यूला वाटते होते..

फेब्रुवारी २००८ मध्ये अभिमन्यूच्या वडिलांचे निधन झाले आणि एक मोठा आधार गेला...त्याच्या पाठीशी उभी असलेली शक्ती हरवली. अभिमन्यू सांगतो की, वडिलांच्या निधनाने माझी स्वप्ने भंग होण्याची भीती त्यावेळी मला वाटत होती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सगळी जबाबदारी माझ्यावर पडली होती. वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला होतो. माझ्यासमोर सर्वात यक्ष होता तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सर्वांच्या पालनपोषणाचा. त्यांची सर्व जबाबादारी माझ्या खांद्यावर आली होती..दरम्यान नोकरीच्या शोधात असताना मुंबईत टीसीएसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. नोकरी करण्याची माझी मानसिकता नव्हती तरीही मी ती नोकरी घरच्या जबाबदारीमुळे केली. नोकरी करून माझी स्वप्ने पूर्ण होणार नव्हती. एकांतात काहीतरी वेगळे करण्याचे सुचेल असे त्याला नेहमी वाटत होते. त्यामुळे काही महिन्यांतच अभिमन्यूने नोकरी सोडली...

अभिमन्यू पुढे सांगतो की, मुंबईतली नोकरी सोडल्यानंतर पुन्हा कच्छला आलो...घरच्यांची माझ्यावर जबाबदारी असताना नोकरी सोडून कच्छला येणे कठीण काम होते...सतत त्याबाबत मी काळजी करत होतो. काळजीपोटी कधी कधी रात्रीची झोप पण लागायची नाही. समाजातील लोक काय बोलतील, याचेही माझ्यावर दडपण होते. अशावेळी मात्र माझी आई पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यावेळी मला नेहमी वडिलांचा कानमंत्र आठवायचा. ते नेहमी बोलायचे की, “काही तरी आव्हानात्मक काम कर”.

टीसीएसमध्ये नोकरी करत असताना अभिमन्यूने व्यवसायासंदर्भातील माहिती घेतली होती. भविष्यातील व्यवसायाबाबत विचारही केला होता. या माहितीचा त्याने पुरेपूर उपयोग करून ‘सॉक्रेटिस’ नावाचा ब्रँड मार्केटमध्ये आणला आणि आता या ब्रँडला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे...

‘सॉक्रेटिस’ हा भारतातील नावाजलेला टी-शर्टचा एक ब्रँड आहे. टी-शर्टवर लिहिलेली छोटी-छोटी वाक्ये मोठ्या मेहनतीने तयार केलेली असल्याची माहिती अभिमन्यू देतो. देशात एखाद्या घडलेल्या घटनेवरून मोठ्या घटनेची छोटी वाक्ये करून टी-शर्टवर छापली जातात..आम्ही ग्राहकांसाठी उत्तम दर्जाचे टी-शर्ट देतो...त्यावरील डिझाईन उत्तम असून वाक्यांमधून काहीतरी तत्त्वज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असतो. टी-शर्टची प्रिंट ही चांगला कपडा वापरून तयार केली जाते..चांगले शिवणकाम करून टी-शर्ट बनवली जातात. ग्राहकांना दिली जाणारी टी-शर्ट दीर्घकाळ टिकणारी आहेत. शिवाय टी-शर्ट ग्राहकांना आवडले नाही तर परत करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.


सध्या मार्केटमध्ये ऑनलाईन वस्तू देणा-या कंपन्यांमध्ये फ्लिपकार्ड,अॅमेझॉन, स्नॅपडीलच्या साईटवरही या ब्रँडची टी-शर्ट विकण्यासाठी आहेत. सध्या आमचा व्यवसाय सोशल मीडियावर अधिक अवलंबून आहे. मात्र आता ऑफलाईनही व्यवसाय सूरू करण्याचा आमचा विचार असून कॉमिकॉन या बंगळुरू आणि हैदराबाद येथील कंपनीशी चर्चा सुरू असून त्याठिकाणी आमची टी-शर्ट बाजारात येणार असल्याचे अभिमन्यू सांगतो.

सॉक्रेटिस असे नाव देण्यासंदर्भात माहिती देताना अभिमन्यू सांगत होता की त्यांला ग्रीक नावाबद्दल आवड होती. सॉक्रेटिस तत्त्ववेत्ता हे अथेन्समध्ये राहणारे होते. त्यांचे तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या तत्त्वावर आधारित आपलेही टी-शर्ट असावे असे वाटत असल्याने या महान तत्त्ववेत्त्याचे नाव दिले.

सध्या कच्छमध्ये कंपनीचे काम सुरू असून यंदाच्या आर्थिक वर्षांत 30लाखांचा माल विकण्यात आलाय. गेल्या वर्षी दहा लाखांचा माल विकला होता. चालू आर्थिक वर्षांत कंपनीची ही वाढ २०० टक्क्यांनी झाली आहे. कंपनीचे २४ लाखांचे टार्गेट होते. मात्र या वर्षात कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक व्यवसाय केलाय.

“व्यवसाय जरी चांगला चालला असला तरी कॅश ऑन डिलीवरीची मोठी समस्या निर्माण झाली होती. टी-शर्ट जरी विकली जात असली तरी रक्कम मात्र १५ ते ३० दिवसांनंतर मिळत होती. कुरिअर कंपनीकडून ही रक्कम वेळेत दिली जात नव्हती. मार्च २०१४ मध्ये व्यवसाय सुरू केल्यावर अवघ्या ५ ते ६ महिन्यांत सीओडीची ही सिस्टीम बंद केली. ही जबाबदारी ज्या कंपनीकडे दिली होती त्या कंपनीमुळेच ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कंपनी अडचणीत आली होती. अशा परिस्थितीत जरी विक्री होत असली तरी नवीन डिझाईनची योजना तयार करण्यासाठी पैशांची चणचण भासत होती. त्यामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली. कंपनीचे उत्पादन होणे थांबले होते. मात्र मी हिंमत हरलो नव्हतो,” असे अभिमन्यूने सांगितले. कंपनी पुन्हा उभारण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी भविष्याची तरतूद करून ठेवलेले बॉन्ड्स मुदतीपूर्वीच काढले. त्यावेळी माझ्यासाठी 'करो या मरो' ची परिस्थिती झाली होती. अभिमन्यूला माहीत होते की व्यवसायात यश आले नाही तर पुन्हा नोकरी करावी लागणार.

मेहनत करणा-यांना नशीबही साथ देते. तसेच अभिमन्यूच्या बाबतीत घडलंय. जुलै २०१४ पर्यंत कंपनी आर्थिक संकटातून जात होती. अशावेळी ग्राहकांना आवडेल अशी नवीन डिझाईन तयार केली. लोकांनी आमच्या ब्रँडला मोठी पसंती दिल्यानंतर कंपनीने पुन्हा भरारी घेतली. गुंतवलेल्या रकमेपैकी ८० टक्के काही महिन्यांतच मिळाली. फक्त २० टक्के रक्कम बाकी होती. मात्र गाडी पुन्हा रुळावर आल्याने आनंद झाला होता.

भविष्यातील योजनांबाबत माहिती देताना अभिमन्यू सांगतो की, यापुढे पोस्टर्ससाठी डिझाईन करण्याची कल्पना असून तशा कामाला सुरुवातही केली आहे. रस्त्यांवर विकल्या जाणा-या कपड्यांवरील डिझाईनही बनवण्याचा विचार करत आहोत...कॉलेजमध्येही सध्या विद्यार्थ्यांना भेटी दिल्या जात असून युवा वर्गाला आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे...नव्या पिढीपर्यंत संकल्पना पोहोचावी हाच त्यापाठीमागचा उद्देश आहे. परदेशातही माल विकण्याचा मानस आहे...मार्केटमधील दुस-या ब्रँडशी तुलना करत असून आपला ब्रँड कसा लोकांपर्यंत पोहोचेल आणि आवडेल याची काळजी आम्ही घेत आहोत.