'पवित्रा'चा पवित्रा परिवर्तनाचा! माध्यम डॉक्युमेंटरी, लई भारी!

'पवित्रा'चा पवित्रा परिवर्तनाचा!
माध्यम डॉक्युमेंटरी, लई भारी!

Friday October 16, 2015,

6 min Read

पवित्रा चालम हे आगळ्या धाटणीच्या डॉक्युमेंटरी आणि लघुपट निर्मितीत समोर येत असलेले एक मोठे नाव आहे. पवित्राच्या आयुष्यातली कितीतरी वर्षे बंगळुरूच्या कर्ले स्ट्रिटवर सरलेली. कर्ले रस्ता त्यांच्या आयुष्यातील भूत-वर्तमानाशी निगडित आहे. किंबहुना ‘कर्ले स्ट्रिट मिडिया’ची (सीएसएम) सुरवातच पवित्रा आणि कर्ले स्ट्रिट यांच्यातील अतुट नात्यातून झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थात चलचित्राच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याची पवित्राची आगळी हातोटीही त्यामागे होतीच. ही हातोटी उपजत असली तरी तंत्राची गोष्टही जरा वेगळीच असते. ते आत्मसात करावे लागते. म्हणून मग पवित्राने न्युयॉर्क फिल्म ॲअकॅडमीचा मार्ग चोखाळला.

पवित्रा यांच्या चित्रपट निर्मितीची कारकीर्द एका अर्थाने बसमधून सुरू झाली. त्याचे असे झाले, की ‘पिस इन पाकिस्तान’ अभियानात त्या सहभागी झाल्या होत्या आणि या अभियानांतर्गत भारत-पाकदरम्यान विशेष बस सुरू करण्यात आलेली होती. दोन्ही देशांतील युवकांमध्ये संवादाची प्रक्रियाही या अभियानात अंतर्भूत होती. इथं पवित्राची पहिली फिल्म तयार झाली. डॉक्युमेंटरी स्वरूपात ती होती. नंतर पुढे २००५ मध्ये युरोपातील ‘पिस चाइल्ड इंटरनॅशनल’समवेत पवित्रा ‘फिल्ममेकर’ म्हणून होत्या. मानवी संघर्षाचा मुलांना कसा फटका बसतो. मुलांचे भावविश्व कसे उद्ध्वस्त होते, हे त्यांना बघायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने इथूनच आपल्याला नेमके काय करायचेय, हे त्यांच्या लक्षात आले.

२०१२ मध्ये पवित्रासह काही उत्साही युवकांनी मिळून ‘सीएसएम’ची (कर्ले स्ट्रिट मिडिया) मुहूर्तमेढ केली. देशभरातल्या लहानसहान पण अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणायच्या, असे ‘सीएसएम’ चमूचे उद्दिष्ट ठरले.

image


अराजकतावादी, हट्टवादी, यथार्थवादी आणि आशावादी अशा अवतीभवतीच असलेल्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांतील संघर्ष हाच ‘सीएसएम’च्या यशाच्या मुळाशी होता. संस्थेची गाडी रुळावर आणण्यात आणि संस्थेला पुढे नेण्यात त्याचीच मोठी भूमिका होती, असे सीएसएम चमूचे सदस्य मानतात.

स्थापनेपासून ते आजअखेर ‘सामाजिक न्याय’ या विषयाला वाहिलेल्या ५० गोष्टींवर ‘सीएमएम’ने डॉक्युमेंटरी बनवलेल्या आहेत. फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात व्यवसाय हा पहिला आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. फिल्ममेकिंगचे जे काही बिझनेस मॉडेल आहे, तेच असल्या ध्येयवेड्या फिल्ममेकर्सना नडते आणि नाडतेही.

पवित्रा सांगतात, ‘‘आमच्याकडे नेहमीच कामापुरते पैसे असतात. टाइट बजेटमध्ये आमचे काम चालते. मर्यादित साधनसामुग्रीत काम करायचे असते. आणि वरून कामात दर्जाही राखायचा असतो.’’

‘‘आमची प्रत्येक फिल्म ही स्वत:च सृजनशिलतेचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे. सत्याचे अधिष्ठान आहे. वास्तवाचे त्यात भान आहे. खुप अभ्यास आम्ही केलेला असतो. पण धांगडधिंगा विषयांचीच चलती फिल्ममेकिंगमध्ये सध्या असल्याने डॉक्युमेंटरीसह सामाजिक विषयांवर बनवलेल्या फिल्म लोकांपर्यंत फार कमी पोहोचतात.’’

‘‘एकाहून एक सरस, कसदार आणि खऱ्या गोष्टी वास्तव समाजात बघायला मिळतात. समाजात कितीतरी मुद्दे असे आहेत, ज्यांना फिल्ममेकरनी स्पर्ष करण्याची नितांत गरज आहे. हे मुद्दे जर लोकांच्या काळजाला भिडले तर परिवर्तनाची लढाई आम्ही जिंकू शकतो, हा आम्हाला विश्वास आहे.’’

‘‘सामाजिक न्याय आणि फिल्ममेकिंग या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा धमाका होतोच. एखाद्या ज्वलंत सामाजिक विषयावर साधी डॉक्युमेंटरी जरी साकारली तरी ती एखाद्या बॉम्बसारखी परिणामकारक ठरू शकते. आम्ही कलावंत आपल्या कलेच्या बळावर एखाद्या वास्तवाला त्या पातळीवर नेऊन ठेवतो, जिथून त्या वास्तवातले खरे दु:ख प्रेक्षकांपर्यंत पाझरते.’’

कला आणि नाट्य यात समतोल राखता येणे, हे एका चांगल्या डॉक्युमेंटरी मेकरचे लक्षण आहे.

‘‘लोकांच्या जगण्याशी निगडित गोष्टी आम्ही फिल्ममधून सांगत असतो. अशात आमच्या कॅमेऱ्यातून वास्तवाचे अंगन्अंग टिपले जायला हवे. साधारणपणे नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीत जगण्यातले वास्तव सामावलेले असते. अशात ते अतिशयोक्तीपूर्ण करून वा त्यात रंजकतेचे रंग भरून जर आम्ही ती गोष्ट सांगायला गेलो तर त्या गोष्टीचे गांभीर्यच कमी होण्याचा धोका असतो. म्हणून चित्रिकरण, सादरीकरण दोन्हीही सरळ, थेट आणि प्रखर असण्यासह वास्तव असणेही आवश्यक ठरते.’’

‘‘जमिनीशी नाते सांगणाऱ्या, शोकमग्न स्वरूपाच्या या गोष्टींचे चित्रिकरण करताना लोकांनी तुमची ही फिल्म बघितलीच पाहिजे, हा ताणही तुमच्यावर असतो. फिल्ममेकरला म्हणूनच दैन्याचा अतिरेक आणि नाट्याचा अतिरेक टाळून फिल्म या दोघांच्यामध्ये कुठेतरी ठेवायची असते.’’

image


‘‘ज्या-ज्या गोष्टी आम्ही आमच्या फिल्ममधून सांगतो, त्या-त्या गोष्टीत आम्ही आधी आकंठ बुडालेलो असतो. हृदय हलवून सोडणाऱ्या किवा मग एखाद्या करुण, दु:खद संघर्षाशी निगडित या कथा असतात. इतरांसाठी या कथा कशा प्रेरक ठरू शकतील, ते पाहणे ही देखिल फिल्ममेकर म्हणून आमची जबाबदारी ठरते.’’

‘‘रुना नावाच्या एका लहान मुलीची कथा ‘सीएसएम’ने पडद्यावर साकारली. या मुलीच्या डोक्यात पाणी झालेले होते. गंभीर अशा आजाराशी ती आणि तिच्यासाठी तिचे आई-वडील लढत होते. रुना आणि तिच्या आई-वडिलांची परिस्थिती जाणून घेत असतानाच आम्हाला जगण्या-मरण्याची लढाई लढत असलेल्या कितीतरी मुलींच्या हृदयाला हात घालणाऱ्या संघर्षकथा ऐकायला मिळाल्या. आम्ही सतत रुना आणि तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहिलो. रुनाच्या बरे होण्यातही पावलोपावली आम्ही तिच्यासोबत होतो.’’

जे लोक आम्हाला त्यांच्या जगण्यात वाटेकरी करून घेतात. जे लोक त्यांच्या संघर्षाची कथा फिल्मद्वारे आम्ही समाजापर्यंत पोहोचवावी म्हणून आम्हाला संधी देतात, त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच असतो. अगदी फिल्म तयार झाल्यानंतरही. हे सगळे लोक कर्ले स्ट्रिट मिडिया परिवाराचाच एक घटक बनलेले असतात.

‘इंडिलायबल ८’ ही आठ जणांची अद्भूत कहाणी आमच्या माध्यमातून समोर येऊ घातलेली होती, पण निर्मितीच्या मध्येच या आठ जणांपैकी एक मरण पावली. पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळू न शकल्याने मृत्यूसमोर जीवन पराभूत झालेले होते. सगळ्यांनाच तिच्या मृत्यूने धक्का बसला.’’

पवित्रा सांगतात, ‘‘सात वर्षांपूर्वी कँसरशी मुकाबला करत असलेल्या आयेशाला मी भेटले होते. डॉक्टरांनी हात टेकलेले होते आणि ती आता थोड्या दिवसांची आहे म्हणून सांगूनही टाकलेले होते. आयेशाचे वजन घटत-घटत ३० किलोपर्यंत आलेले होते. याउपरही कॅमेऱ्यासमोर येऊन आपल्या जीवनातले बरेवाईट प्रसंग कथन करायला ती कमालीची उत्सुक होती. आयेशासारखी कुणीही मी आजवर पाहिली नाही.

चित्रिकरणादरम्यान आयेशा दररोज आवर्जून म्हणायची, ‘एका रुग्णाने जरी माझ्या बोलण्यातून जगण्याची प्रेरणा घेतली तरी मी समजेन की मी माझे संपूर्ण जीवन मजेत जगले.’ आजही आयेशाचे हे वाक्य मी माझ्या हृदयात जपून ठेवलेले आहे.’’

‘‘आयेशा मरण पावली, त्याआधी थोड्याच वेळेपूर्वी चित्रिकरणाने विराम घेतलेला होता. ‘आयेशा दी इटर्नल वन’ नाव या लघुपटाला देण्यात आले होते. कँसरशी लढत असलेल्या देशभरातील रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या लघुपटाने मानसिक आधार दिला. लढण्याचे बळ दिले. माझी निर्मिती होती म्हणून मलाही बरे वाटले आणि माझ्या सर्जनात्मक आकांक्षांमध्येही एक शक्ती संचारली.’’

‘‘आमचे बहुतांशी बॉलिवुड स्टार, निर्माते शेजारी देशाशी असलेल्या संघर्षाचा विषय सातत्याने हाताळत असतात, इतका की आता तर त्याचा चावून चोथा झालेला आहे. आमच्या आतच देशातच किती असे विषय आहेत, ज्यांच्याशी फिल्ममेकर म्हणून आम्ही संघर्ष करायला हवा. तिथे आम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करतो.’’

‘‘गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या आणि त्यांच्यासमवेत जगत असलेल्या लोकांच्या गुंतागुंतीच्या मागण्यांचा विषय जेव्हाही समोर येतो, तेव्हा कुणीही त्या विषयाला ऐरणीवर घेत नाही, हेच आपल्याला बघायला मिळते. जास्तीत जास्त लोक जेव्हा एखाद्या सामाजिक समस्येला हात घालतात, तेव्हा समाजाचे चित्र बदलते. समस्येचे निराकरण व्हायला सुरवात होते. जगण्याचे चित्र बदलते. फिल्मशक्तीच्या माध्यमातून जगण्याचे चित्र बदलण्याचे, जगण्यात चांगले बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.’’

image


पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्सची संख्या फारच कमी आहे. कारणे या माध्यमात आव्हानेच आव्हाने आहेत. हे सोपे काम नाही.

‘‘शॉर्ट डॉक्युमेंटरीची शैली ही पटपट गोष्ट सांगण्याची असते. चित्रपटगृहांत ‘बजरंगी भाईजान’ बघायला आलेल्यांना ‘भाईजान’ सुरू होण्यापूर्वी दाखवण्याची गोष्ट म्हणून ती उपयुक्त असतेच. शिवाय दूरदर्शन हे देखिल शॉर्ट डॉक्युमेंटरीसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. डिजिटल फिल्म मेकिंगमुळे तर या माध्यमाला व्यासपीठाच्या उपलब्धतेबाबत सुगीचे दिवस आलेले आहेत.’’

‘‘‘रुटिंग फॉर रुना’ साकारताना समोर खुप अडचणी होत्या. पहिली म्हणजे रुनाची नेमकी वैद्यकीय स्थिती फक्त डॉक्टरांनाच माहिती होती. दुसरी म्हणजे आम्ही कलेचे उपासक. आरोग्याशी, वैद्यकाशी त्यात ‘बर्थ डिफेक्ट’शी निगडित काहीही कुणालाही कळत नव्हते. सर्वांत मोठी अडचण म्हणजे निर्मितीसाठी पैसाही आमच्याकडे नव्हता. लवकरच हा आम्ही लघुपट पूर्ण करणार आहोत.’’

‘‘क्राउड फंडिंगच्या माध्यमातून इंडिगोगोवर नॉन-फिक्शन फिल्म बनवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. ‘रुटिंग फॉर रुना’ या आमच्या निर्मितीतून ‘बर्थ डिफेक्ट’विरुद्ध लढ्याला प्रारंभ होईल, अशी आशा आम्हाला आहे.’’

व्यावसायिक उपक्रमांतूनही सीएसएम सक्रिय आहे. डॉक्युमेंटरी, अॅड आणि वेबसाठी चित्रिकरणासह सिनेमेटिक तंत्रासह प्रयोग सादर करण्याच्या कितीतरी संधी सीएसएमला मिळत असतात.

‘सीएसएम’चे भविष्य

‘‘आम्ही सार्वजनिक जीवनाशी निगडित विषयांमध्येही ॲअॅड कॅम्पेनिंग करणार आहोत. उदाहरणार्थ आम्ही मिशन ब्लड डोनेशन हा विषय आधी हाताळू. फिल्म जगात परिवर्तन घडवून आणू शकते, हे त्याद्वारे आम्ही सिद्ध करू इच्छितो.’’

‘‘स्टार्ट-अपसाठी आम्ही काही वेब व्हिडियो आणि प्रमोशनल व्हिडियो तयार करतोय. आम्ही जिद्दी आहोत. आमच्यात उत्साह आहे. आमच्यासमोर ध्येयही आहे. आम्ही समाज आणि देश घडवण्याच्या लढ्यातील एक शिपाई आहोत, या स्वाभिमानाच्या भावनेची जोडही आमच्या जिद्दीला आहे. कोण रोखेल आम्हाला?’’ पवित्रा यांचा पवित्रा यावेळी अगदी एखाद्या चळवळीतील कार्यकर्तीचा असतो.