सह्याद्रीच्या छाव्याची ऐतिहासिक कामगिरी

0

विविध ठिकाणी फिरणं हे बर्‍याच व्यक्तींची आवड असते. विशेषत: वेगवेगळे बीच...समुद्र...रेसॉर्ट अशी विविध पिकनीक स्पॉट्स आदि ठिकाणी जाण्यासाठी अनेकांची ओढ लागलेली असते. परंतू ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अशा किल्ल्यांची भटकंती करून महाराष्ट्रातल्या गड आणि किल्ल्यांची माहिती आणि फोटोंचा खजिना जमा करणारे श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंड यांची किल्ल्यांवरची भटकंती विश्‍वविक्रमाच्या दिशेने सुरू आहे.

गडकोटांच्या राज्यात फिरणार्‍यांना श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. देशभर फिरून सर्व दुर्गाचा अभ्यास ज्या मोजक्या अभ्यासकांनी केला आहे, त्यामध्ये गोजमगुंडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. या राज्यात पाचशेच्या वर किल्ले असावेत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. पण हे सर्व किल्ले राज्यभर अनेक दुर्गम जागी, खेडोपाडी असे विखुरलेले आहेत. या सर्व किल्ल्यांना भेटी देणे, त्यांचा अभ्यास करणे हे तसे एखाद्या गिरिदुर्गाएवढेच महत्त्वाचे काम आहे. या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातील सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांनी नुकत्याच केलेल्या आग्रा भेटीत देशातील सुमारे १००० व्या किल्ल्याला भेट देऊन विश्वविक्रमाची घडी साधली आहे. त्यामूळे त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.

गेल्या दहा वर्षात आणि इतक्या कमी वयात आजवर त्यांनी संसार, व्यवसाय संभाळुन दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या नंतर दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी आग्रा किल्ल्याला भेट देऊन देशभरातील सुमारे १००० हुन अधिक किल्यांची ओळख करुन घेणारे राज्यातील दुसरेच व्यक्तिमत्व ठरले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र सोबत दुर्गमहर्षी श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांची स्मारक असलेल्या गड किल्यांच्या संवर्धनाचं काम करत आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांनी पिंपरी शहरातून ऐतिहासिक किल्ल्यांच्या भेटीला सुरुवात केली. सुरवातीला सुमारे ४०० किल्ल्यांना भेटी देऊन ४५ हजार फोटोंचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात भरवले. त्यानंतर आपली किल्ल्यांवरील भटकंती सुरू ठेवून २२ नोव्हेंबर रोजी १००० व्या किल्ल्याला त्यांनी भेट दिली आहे. गोजमगुंडेनी हे दुर्गाचे राज्य स्वत: पायदळी तुडवले, त्यांनी अभ्यास केला आणि आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी तब्ब्ल १ लाख ७५ हजार फोटोंचा संग्रह केला आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसारच या फोटोची माहिती आणि संग्रह केला आहे. किल्ल्यांची माहिती देताना पुन्हा त्यामागे काही दिशा, विचार आहे. अगदी सुरुवातीला तो भाग, मग तो जिल्हा, मग त्या जिल्ह्याचा नकाशा, नंतर त्या किल्ल्याच्या परिसराचा नकाशा आणि प्रत्यक्ष किल्ल्याचा नकाशा असे आपण त्या किल्ल्यापर्यंत पोहोचतो. त्या विशिष्ट किल्ल्याची माहिती घेतानाही मग त्या किल्ल्याकडे जाण्याचे मार्ग, अन्य माहिती, दुर्गदर्शन आणि इतिहासाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. याला उत्तम छायाचित्रांची जोड आहे.

या सार्‍यातून सारा महाराष्ट्रच जोडला जातो, त्याचे एकत्रित दर्शन घडते. गडकोट म्हटले, की अनेकजण रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, सिंधुदुर्ग यांच्यापलीकडे जात नाहीत. पण अशांना मग सेगवा, आसावा, काळदुर्ग (जि. ठाणे), मदगड, कोंढवी (जि. रायगड), साठवली, बारवाई (जि. रत्नागिरी), नारायणपूर, कोंढवळ, मंदाने (जि. नंदुरबार), रायकोट (जि. धुळे), तोंडापूर, नशिराबाद, पाल, रसलपूर (जि. जळगाव) अशा एक ना दोन अनेक किल्ल्यांचा पहिल्यांदाच परिचय होतो. यातील अनेक नावेच काहींनी पहिल्यांदा ऐकलेली असतात. या पाश्वभूमीवर गडांचे हे विविध आकर्षक रूप पाहतानाच उडायला होते.

मात्र केवळ या लोकांपर्यंत किल्ल्यांचे सुंदर रूप पोहचवण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन दुर्गसंवर्धन मोहिमा त्यांनी हाती घेतल्या. राज्यातील वेग-वेगळ्या किल्यांवर आजवर २५० हुन अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा त्यांनी राबवल्या आहेत. त्यांनी पुणे विद्यापिठाची एम. फिल एंट्रन्स परीक्षा पास केली आहे. लवकरच ते पीएचडी डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त करतील. राज्यात विविध ठिकाणी २०० हुन जास्त मोफत व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. महाराष्ट्रातील ३५० हुन अधिक गड किल्यांच्या त्यांनी चित्रित केलेले सुमारे ४५ हजार छायाचित्रांची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा व शिवरथ यात्रा निघाली ते गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतुनच. २०१६ या पुढील वर्षात देशातील १ हजार किल्ल्यांची भ्रमंती करून जवळपास २ लाख छायाचित्रांच्या २ जागतिक रेकॉर्डसह १ एशिया रेकॉर्ड, १ इंडिया रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड चा विश्‍वविक्रम प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे. गड-किल्यांच्या संवर्धनासाठी सरकार विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणारे हे देशातील एकमेव व्यक्तीमत्व आहे. दुर्गसंवर्धन उल्लेखनीय कामगिरी बद्दल अनेक संस्था संघटनांकडुन विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. ३० मार्च २०१६ रोजी राज्यातील ३०० किल्ल्यांवर एकाच दिवशी एकाच वेळी भगवा ध्वज लावून दुर्गसंवर्धन मोहीम राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे.

  • गडकिल्ले भटकता-भटकता संशोधनाच्या वाटेवर वळलेल्या, ‘ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ले पाहणारे, स्वत: त्यात रमून आणि इतरांना रमवून टाकणार्‍या श्रमिक गोजमगुंडे यांची इच्छा आहे की त्यांच्या किल्ले भटकंतीप्रमाणे इतरांनीही किल्ले भटकंती करून सर्वसामान्यांच्या मनातही महाराष्ट्रदेशी पसरलेल्या दुर्गांविषयी आपलेपणा वाढावा.