सर्वात स्वस्त वॉशिंग मशीन

0

या कथेला सुरूवात करण्यापूर्वी जरा एका प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग ही कथा वाचायला सुरू करा. तो प्रश्न म्हणजे- वॉशिंग मशीन खरेदीसाठी तुम्ही बाजारात गेलात, तर तुम्हाला वॉशिंग मशीनची काय किंमत मोजावी लागेल? आमच्या हिशोबाने कमीत कमी १० ते १५ हजार रूपये. परंतु तुम्ही फक्त दीड हजार रूपयांमध्ये वॉशिंग मशीन खरेदी करू शकता, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तुम्हीच काय, कुणीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. इंजिनियर असलेल्या पीयूष अग्रवाल यांनी हे आपल्या क्षमतेने खरे करून दाखवले आहे. पीयूषनी फक्त १५०० रूपयांमध्ये पोर्टेबल वॉशिंग मशीन तयार केली आहे... आणि या वॉशिंग मशीनला नाव दिले आहे ‘व्हिनस’

‘क्राऊडफंडिंग’चे व्यासपीठ असलेल्या इंडिगोने विनसला लाँच केले आहे. या मशीनचा वापर करणे अतिशय सोपे आहे. एक दहा वर्षे वयाचा मुलगा सुद्धा ही मशीन चालवू शकतो.

परदेशात इंजिनियरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर पीयूषनी भारतात आल्यानंतर ‘विम्बस नवरचना’ नावाने आपली कंपनी सुरू केली आहे. ‘व्हिनस’ ही वॉशिग मशीन या कंपनीचे सर्वात प्रमुख उत्पादन आहे. २००२ सालापर्यंत पीयूषनी भारतात पुरुषांच्या शौचालयात लावण्यात आलेल्या फ्लश सेंसरची मार्केटिंग केली. परंतु काही विशेष फायदा होऊ न शकल्याने पीयूषनी हे काम बंद करून टाकले.त्यानंतर त्यांनी गुडगावच्या एका बिझनेस कन्सल्टन्सी कंपनीसोबत काम केले आणि उरलेला सर्व वेळ ‘विम्बस नवरचना’ या त्यांच्या कंपनीसाठी समर्पित केला. याचाच परिणाम आज ‘व्हिनस’च्या रूपाने सर्वांसमोर आहे.


कसे काम करते ‘व्हिनस’ वॉशिंग मशीन?


हे मशीन काम तरी कसे करते याचा आपण नक्कीच विचार करत असाल. तर मग सर्वात अगोदर तुम्ही हे जाणून घ्या, की हे मशीन इतर सर्वसामान्य महागड्या मशीन प्रमाणे चालते तर वीजेवरच, परंतु वीजेचा खप मात्र जवळजवळ काहीच होत नाही. या मशीनचा वापर कसा करावा याबाबत पियूष अग्रवाल माहिती देतात. ते सांगतात की सर्वात आधी मशीनच्या माऊंड भागाला बादलीत टाकावे. त्यानंतर पाणी आणि डिटर्जंट पावडर टाकून मशीन सुरू करावी. नंतर मग मशीनमध्ये दोन-चार कपडे टाकून ही मशीन पाच मिनिटे चालवावी. मग कपडे काढून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. ही मशीन विशेषत: ग्रामीण महिलांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्याचे पीयूष सांगतात. चाळीस वर्षांपूर्वी बुल्गारिया देशात अशा प्रकारच्या मशीनचा वापर केला जात होता. परंतु ती मशीन खूपच जड असायची आणि एकावेळेला त्या मशीनमध्ये भरपूर कपडे धुवावे लागत असत. त्याच मशीनपासून प्रेरणा घेऊन पीयूष अग्रवालनी ‘व्हिनस’ ही वजनाने हलकी आणि छोटी मशीन तयार केली आहे. ही मशीन बादलीमध्ये अगदी सहज वापरता येते.

‘व्हिनस’च्या निर्मिती मागची कहाणी


आठ वर्षांपूर्वी पीयूष अग्रवाल यांच्या आईची मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. आणि त्यानंतर त्यांना अर्धांगवायू झाला. त्या नेहमीच बिछान्यावर असायच्या. दरम्यानच्या काळात पीयूष यांना आपल्या आईच्या बिछान्यावरच्या वापरेल्या चादरी आणि कपडे धुवावे लागत असत. पीयूष सांगतात की हे काम म्हणजे त्यांच्या समोर त्या काळात असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होते. स्वच्छतेच्या दृष्टीने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे योग्य नव्हते. आणि बाथरूममध्ये कपडे धुण्याचा अर्थ होता प्रत्येक वेळी बाथरूम चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे आणि हे काम कधी कधी अतिशय़ कठीण असायचे. या काळात पीयूष अग्रवाल यांच्या मनात विचार आला, की एक अशी पोर्टेबल वॉशिंग मशीन बनवावी, जी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी आपल्याला पाहिजे तिथे घेऊन जाता येईल, कपडे ही छान धुतले जातील आणि त्यातून आपले पैसे ही वाचतील. याचाच परिणाम आहे ‘व्हिनस’

या विषयावर मी अधिक गंभीरपणे विचार करायला सुरवात केली. जेव्हा मी संयुक्त राष्ट्रातील महिला सदस्या आणि स्वीडिश डॉक्टर हंस रोलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित केलेला अहवाल माझ्या वाचनात आला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जगातल्या लाखो महिला ज्या हाताने कपडे धुतात किंवा कपडे धुताना त्यांना मोठ्या प्रमाणात अंगमेहनत करावी लागते अशा महिलांना खांदेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील महिला तसेच सर्वसामान्य महिलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. वाशिंग मशिन खरेदी करणे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असते. तेव्हा असा सर्वसामान्य महिला वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपयुक्त ठरेल अशा स्वस्त दरातील वाशिंग मशीन तयार करण्यासाठी अधिक गंभीरपणे प्रयोग आणि संशोधन कार्य सुरु झाले.

‘व्हिनस’ ही मशीन बनवण्यामध्ये फक्त सात लोकांचा सहभाग आहे. पीयूष म्हणतात, “ आमची कंपनी नवखी असल्यामुळे फार गुंतवणूक होऊ शकलेली नाही. परंतु आमच्या ग्रुपमध्ये जितके लोक आहेत ते सर्व आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, म्हणून आम्हाला जास्त समस्या आल्या नाहीत. ‘व्हिनस’ म्हणजे सर्वांनी मिळून केलेल्या एकत्रित परिश्रमाचे फळ आहे.”

ही मशीन बनवण्यात काय काय अडचणी आल्या ?

ही मशीन बनवणे सोपे नव्हतेच. किती तरी आव्हाने समोर आली, परंतु म्हणतात ना, की आपण आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एकदा का मनापासून ठरवले की मग काहीही अशक्य नसते. जे लोक वेळ आणि साधनांच्या कमतरतांना आपल्या अपयशाची कारणे समजतात असे लोक पीयूषना मुळीच आवडत नाहीत. आपल्याकडे जी साधने उपलब्ध असतील त्याद्वारे आपण आपले काम पूर्ण केले पाहिजे असे पीयूष मानतात. आणि आव्हाने आपल्यावर अधिक काळ हावी होऊ शकत नाहीत हे ही समजून घेतले पाहिजे असेही त्यांना वाटते.

ही मशीन लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गात अडचणीही आल्या. ‘व्हिनस’ ही एक योग्य किंमत असलेली योग्य मशीन आहे हे लोकांना पटवून देणे ही त्या अडचणींपैकी सर्वात मोठी अडचण असल्याचे पीयूष सांगतात. ते म्हणतात, “जेव्हा जेव्हा आम्हाला लोकांनी गंभीरतेने घेतले नाही किंवा आमची तितकीशी दखल घेतली नाही त्यावेळी आम्ही आमच्या कृतीवर कायम ठाम राहिलो. सुरूवातीच्या काळात आम्ही हे काम पद्धतशीरपणे करू शकलो नव्हतो. आता आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. यातून आम्हाला आमच्या यशाची खात्रीही मिळालेली आहे आणि आत्मविश्वास देखील. यामुळे आता शेवटी आमच्या गाडीने रूळावर छान धावायला सुरू केले आहे.”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe