वेगळ्या वाटांचा शोध घेताना.....

स्वतःचा वेगळा मार्ग निवडून त्यावर यशस्वी वाटचाल करणे किती लोकांना जमते ? पण अशी जोखीम पत्करणारी एक यशस्वी उद्योजिका म्हणून अनु पार्थसारथी यांच्याकडे पाहाता येईल. १९८३ साली स्टार्ट अप कंपनी असलेल्या विप्रोमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र सात वर्षांच्या तेथील समृद्ध अनुभवानंतर त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. कशी घडली त्यांची कारकिर्द ? जाणून घेऊ या...

0
अनु पार्थसारथी
अनु पार्थसारथी

दिल्लीतच लहानाच्या मोठ्या झालेल्या अनु यांचे वडील सरकारी नोकरीत होते, तर आई देखील नोकरी करत होती. “आईवडील दोघांनीही नोकरी करणे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हते. एक प्रकारे माझी आईच माझा आदर्श होती. ती सर्वच गोष्टी करण्यात तरबेज होती. तिने आपले काम कधीच ९ ते ५ या वेळेत बांधून घेतले नव्हते. त्या कामाची तिला प्रचंड आवड होती. पण त्याच वेळी घराची जबाबदारीही ती समर्थपणे सांभाळत होती. ती माझी आणि दोन भावांची खूप काळजी घेत असे. आमची शाळेतील प्रगती बघण्यासाठी ती वेळोवेळी शाळेतही येत असे” अनु अभिमानाने सांगतात. अशी कर्तृत्ववान आई मिळाल्यावर सहाजिकच त्यांनीही तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि मोठेपणी आईसारखेच बनण्याचा मनोमन निश्चय केला.

अनु आणि त्यांच्या दोन्ही भावंडांना लहानपणापासूनच एक गोष्ट चांगलीच समजली होती, ती म्हणजे स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची गरज... सुदैवाने मुलींनी फक्त लग्न-संसारच करावा, असे बुरसटलेले विचार त्यांचे नव्हते. “ आपल्याला स्वतः कष्ट करुन पैसे मिळवावे लागेल आणि स्वतःच्या पायावर उभे रहावे लागेल, हे आम्हाला पहिल्यापासूनच माहित होते,” त्या सांगतात.

दिल्लीतील अतिशय चांगल्या सीबीएसई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. सामान्यतः बहुतेक सर्व तामिळ लोक आपल्या मुलांना याच शाळेत पाठवित असत. त्यावेळच्या शाळांबाबतची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा समान दर्जा आणि वाजवी शुल्क.... आजच्या इंटरनॅशनल स्कूल्सच्या तुलनेत तर तेंव्हाचे शालेय शिक्षण खूपच स्वस्त होते. अनु आजही त्या आठवणींमध्ये रमतात. “सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेत विविध पार्श्वभूमीचे विद्यार्थी असत - श्रीमंत, गरीब, अतिशय बुद्धिमान, बेताचे बुद्धिमान – त्यामुळे मला सुरुवातीपासून वेगवेगळ्या लोकांचा सहवास लाभला,” त्या सांगतात.

त्यांच्या मते दिल्लीत रहाण्याचा अनुभव फारच चांगला होता. “मी लोकांना नेहमी सांगते की, कारकिर्दीच्या सुरुवातीलाच फ्रंट-लाईन सेल्समध्ये काम करायला हवे, कारण त्यामुळे तुम्ही पुर्णपणे बदलून जाता. दिल्लीत राहाणेदेखील अशीच गोष्ट आहे. येथे राहिल्याने स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःच्या पायावर उभे रहाणे, या गोष्टी तुम्ही नैसर्गिकपणे शिकता. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट अर्थात जो सर्वार्थाने लायक आहे तोच तरतो, या म्हणीचा खऱ्या अर्थाने तुम्हाला दिल्लीत प्रत्यय येतो. ती सतत तुम्हाला दक्ष ठेवते. तुम्ही दिल्लीत वाढला असाल तर तुम्ही कधीच अगतिक होणार नाही,” त्या सांगतात.

दिल्लीतील शालेय जीवनानंतर त्यांच्या आयुष्यातील टप्पा होता तो म्हणजे बिटस् पिलानी... आजही त्या त्याविषयी उत्साहाने बोलतात, “बिटस् पिलानी ही इतर शैक्षणिक संस्थापैक्षा किती वेगळी आहे, याचा प्रचार किंवा चर्चा प्रत्यक्ष संस्थेतर्फे किती केली जाते, मला माहित नाही. मात्र आम्ही तिथेच शिकल्याने कदाचित त्यावेळी आम्ही हा वेगळेपणा गृहितच धरला होता. आज मात्र इतर अनेक ठिकाणे पाहिल्यानंतर मला वाटते की भारतीय विद्यापीठांचा विचार करता माझ्या मते बिटस् ही सर्वार्थाने इतरांपेक्षा वेगळी आहे. महानगरापासून दूर असल्याने, तिथे तरुण विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होऊ शकते आणि त्यांच्या आयुष्याला दिशा मिळते. दुसरे म्हणजे त्याची रचना. बिटस् तुम्हाला तुमचे स्वतःचे वेळपत्रक आखण्याचे स्वातंत्र्य देते तसेच स्वतःचे वर्ग आणि विषय निवडीचेही... आणि खरी गोष्ट म्हणजे हजेरी सक्तीची नसल्याने स्वतःचे निर्णय घेण्याचा दबावही विद्यार्थ्यांवर असतो. तेथील शैक्षणिक व्यवस्था विद्यार्थ्यांनाच त्यांच्या खऱ्या आवडीबाबत विचार करण्यास प्रवृत्त करते. मला वाटते माझा जागतिक दृष्टीकोन विकसित करण्यात बिटस् पिलानीचा मोठा हात आहे.”

या शिक्षणाच्या दरम्यानच त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाली. विप्रो पर्व... “विप्रो ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली घटना होती. विप्रो ही अगदी बे एरिया मधल्या गॅरेज स्टाईल स्टार्ट अप कंपन्यांसारखी होती. कंपनीचे ऑफीसदेखील नेहमीच्या ऑफीसेस सारखे दिसत नसे. काही टेबल्स एकत्र करुन ते तयार केले होते. तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी होते. पण महत्वाकांक्षा मात्र मोठी होती. आम्हाला जागतिक बाजारपेठ काबीज करायची होती. एक मोठी महत्वाकांक्षा पण मर्यादित अंदाजपत्रक आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेली ती कंपनी होती. पण कंपनीच्या मंडळावर मात्र जबरदस्त लोक होते. बाजारात उतरुन, स्वतःहून काही करुन दाखविण्याची त्यांची ताकद होती. तसेच सूचनांची वाट न बघता स्वतःहून निर्णय घेण्याची क्षमताही होती. सुरुवातीलाच नव्या लोकांना संधी देण्याचे उत्कृष्ठ काम त्यांनी केले,” अनु सांगतात. अनु स्वतःदेखील त्यापैकीच एक होत्या. विप्रो मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी अर्थात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून त्या रुजू झाल्या. बिटस् पिलानीमध्ये शेवटच्या सत्राला असतानाच त्यांना ही संधी मिळाली. या प्रशिक्षणानंतर हवे ते निवडण्याची त्यांना मुभा होती. त्यानुसार त्यांनी सेल्सची निवड केली. “तो काही फार विचारपूर्वक घेतलेला निर्णय नव्हता. कोणीतरी मला सांगितले की, सेल्समध्ये फारशा महिला नाहीत. त्यामुळे मी विचार केला की मग आपण हे का करुन दाखवू नये? आणि मी दाखविले. एवढा सरळ विचार होता. तुमच्या कंपनीच्या नावे धनादेश देण्यासाठी ग्राहकांचे मन वळविण्याचे आव्हान मोठे असते, ते मला खूप आवडले. आजही मी अनेक स्टार्ट अप्सना हेच सांगते की, जोपर्यंत तुम्हाला ग्राहकाकडून पहिला धनादेश मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही बाकी काय करता त्याला फारसा अर्थ नसतो. मला हे खूप सुरुवातीलाच शिकता आले,” त्या सांगतात. त्याचप्रमाणे एक नवी कंपनी असल्यामुळे विप्रोमध्ये त्यांना वेगवेगळ्या कामांचा अनुभव मिळाला. “ नंतर मी मार्केटींगमध्ये गेले. विप्रोच्या जाहिरात मोहिमांसाठी मी ऍड एजन्सीबरोबरही काम केले. तसेच मी जपानमधील ग्राहकांबरोबर काम केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये काम केले. रशियाला जाऊन तेथे बस्तान बसविण्यासाठीही मी मदत केली. विप्रो माझ्यासाठी अभुतपूर्व अनुभव होता. त्यातून उद्योग उभारणीबद्दल मी खूप शिकले,” त्या सांगतात.

विप्रोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना त्यांना एचयुएल अर्थात हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये नोकरीसाठी मुलाखतीचे बोलावणे आले. एचयुएलमधून बोलावणे येणे त्याकाळी खूपच प्रतिष्ठेचे होते. “विप्रोमधील प्रशिक्षणाच्या दरम्यान माझी तंत्रज्ञान उद्योगाशी ओळख तर झालीच पण त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या जगात सुरु असलेल्या घडामोडींशीही... मी एचयुएलमध्ये गेल्यावर तेथील वातावरण मला विप्रोपेक्षा खूपच वेगळे वाटले.मला त्याच क्षणी कळले की मी या वातावरणात आनंदी राहू शकणार नाही. त्यामुळे संधी मिळताच मी तेथून बाहेर पडले. मी विप्रोमध्येच रहाण्याचा निर्णय घेतला. मी आजही लोकांना सांगते की स्टार्ट अप कंपनीमध्ये कारकिर्दीला सुरुवात केल्यास, सुरुवातीपासूनच तुम्हाला कंपनीतील महत्वाच्या गोष्टींवर काम करण्याचा अनुभव मिळू शकतो, ज्याद्वारे तुम्ही खूप काही शिकू शकता. जे माझ्या बाबतीत नशिबाने विप्रोच्या निमित्ताने घडले,” त्या सांगतात.

सात वर्ष विप्रोमध्ये काम केल्यावर त्यांना नवी क्षितीजे खुणावू लागली. “मला वेगवेगळ्या गोष्टी करुन बघायला मनापासून आवडते आणि एकाच ठिकाणी मी फार काळ अडकू शकत नाही. विप्रोमध्ये एवढा काळ काम केल्यानंतर हे स्वाभाविक होते. दुसरे म्हणजे मी नुकतीच आई झाले होते. सात वर्षे कपंनीत काम केल्यानंतर मी व्यवस्थापनाच्या मधल्या पायरीवर होते आणि त्याची पुढची पायरी म्हणजे मला ऑफीसमध्ये खूप जास्त वेळ द्यावा लागणार होता. ते नव्वदचे दशक होते. त्याकाळी 'वर्क फ्रॉम होम' सारख्या सुविधा नव्हत्या. तुम्ही सकाळी साडे आठ ते रात्री नऊ पर्यंत ऑफीसमध्ये बसणे अपेक्षित असायचे. त्याचबरोबर शनिवार-रविवारही जावे लागायचे. वैयक्तीक वेळ मिळण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्यासाठी हे खूप अवघड होते. काम आणि घर यांच्यामध्ये समतोल साधणेही माझ्यासाठी आवश्यक होते. मला काम तर करायचेच होते पण त्याचबरोबर बाळाचे चांगले संगोपनही करायचे होते. विप्रोमध्ये राहून मात्र हे शक्य दिसत नव्हते. त्यामुळे तेथे राहून मागे पडल्याची भावना सतत बाळगण्याची माझी इच्छा नव्हता. त्याचवेळी मी स्वतःचा व्यवसाय सुरु करुन माझ्या ध्येयासाठी काम करण्याचे निश्चित केले. तसेच आपल्या वेळेचा उपयोग दुसऱ्यांच्या मर्जीसाठी नाही तर स्वतःच्या इच्छेनुसार करण्याचे मी ठरविले,”उद्याजेक बनण्य़ाच्या आपल्या निर्णयाविषयी त्या विस्ताराने सांगतात.

या पार्श्वभूमीवर वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी 'नेक्सस कन्स्लटंटस्' या स्वतःच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवण्यात त्या यशस्वी झाल्या. “मी माझे काम किती गांभिर्याने घेते हे ग्राहकांना पटवून देण्याची मी सर्वोतोपरी काळजी घेत असे. साडी हाच माझा त्यावेळी पेहराव होता. नेक्सस सुरु करण्याची कल्पना मला माझ्या स्वतःच्या अनुभवांमधूनच सुचली होती. मोठमोठ्या कंपन्यांबरोबर काम करुन त्यांच्यासाठी कर्मचारी शोधणे ही नेक्ससची मूळ कल्पना होती. आज अनेक जण हे करताना दिसतात पण नव्वदच्या दशकात ही परिस्थिती नव्हती,” त्या आवर्जून सांगतात. त्याकाळी जाहिरात देऊन लोकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा करण्याची पद्धत होती, किंवा महाविद्यालयातूनच थेट विद्यार्थी निवडले जायचे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येई. लोकही शेवटपर्यंत तिथेच टिकून रहात तसेच त्यांना काढून टाकण्याचीही पद्धत नव्हती. सार्वजनिक किंवा खासगी, उद्योग कोणताही असो, नोकरभरतीची हिच पद्धत सगळीकडे होती. पण बदलाला सुरुवात झाली होती. “जर मला सात वर्षांनी नोकरी सोडाविशी वाटू शकते, तर माझ्या लक्षात आले की असे इतरही लोक असणार जे बदलत्या काळात नोकरी सोडणार आणि ही संख्या वाढत जाणार. माझ्या असेही लक्षात आले की, लोक नोकऱ्या सोडणार आणि कंपनीला त्या जागा भराव्या लागणार. त्यावेळी फारच थोड्या अशा कंपन्या होत्या, ज्या नोकरभरतीसाठी मदत पुरवत होत्या. फक्त लोकांना व्हिजा आणि मध्य-पूर्वेच्या देशांमध्ये काम मिळवून देणारे काही लोक होते,”त्या अधिक माहिती देतात.

नवे काम सुरु केल्यानंतर त्यांनी टेक फर्मस् अर्थात तंत्रज्ञान संस्थांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रीत केले. या संस्थांसाठी लोक मिळणे अवघड असल्याने त्यांनी त्यासाठी मदत देण्यास सुरुवात केली. नेक्ससची सुरुवात अशी झाली. यामध्ये त्यांनी साधलेली वेळ खूपच महत्वाची होती. १९९०-२००० या काळात भारतीय कंपन्या खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहचल्या होत्या. आणि त्यांना स्वतःला नोकरभरती करणे कठीण जात होते. “अशा वेळी त्यांना माझ्यासारख्या लोकांची गरज होती. या क्षेत्रातील माझा अनुभव आणि व्यवसायाची समज, यामुळे मी त्यांच्यासाठी सुयोग्य भागीदार होते. इन्फोसिसच्या नंदन निलकेनींबरोबर मी बरेच काम केले. त्यांच्या अमेरिकेतील ऑफीसचे बस्तान बसविताना मीच लोकांची भरती केली,”त्या सांगतात. त्यावेळी त्यांचा जगभर प्रवास सुरु होता. त्याच दरम्यान बऱ्याच जपानी, युरोपियन आणि इतर आशियायी कंपन्याही भारतात येत होत्या. त्यापैकी इप्सोन, एसएपी आणि ल्युसंटसारख्या कंपन्यांसाठी भारतातदेखील भरतीचे काम केले.

“मी नेहमीच लोकांना सांगते की कर्मचारी शोधणे ही सोपी गोष्ट आहे. मात्र तुम्हाला नेमके कोण हवे आहे? आणि त्यामागे काय कारण आहे?, हे माहित असणे, हीच अवघड गोष्ट आहे. एकदा ते निश्चित झाले की मग पर्यायांची निवड करणे शक्य होते,” त्या सांगतात.

'नेक्सस कस्लटंटस्' च्या काळातच त्यांनी अमेरिकेतील बे एरियामध्ये स्थलांतर केले. दहा वर्षे त्या तेथे राहिल्या. “तिथे मी बऱ्याच व्हीसी फंडस् बरोबर काम केले. या अनुभवाने माझ्यात संपूर्ण परिवर्तन झाले. मला शिकण्याची मोठी संधी त्यावेळी मिळाली. उद्योग उभारणी आणि विस्ताराबाबत एक अगदी वेगळा दृष्टीकोन मला मिळाला. ग्लोबल एक्झिक्युटीव्ह टॅलेंट हे माझे दुसरे साहसी पाऊल मग मी टाकले. त्यावेळी मी स्टॅंडफोर्डला एक श्वेतपत्रिका (व्हाईट पेपर) सादर केली. त्यावेळी कामाच्या जगामध्ये भविष्यात होणारा बदल आणि भारत आणि चीनसारख्या देशांतील लोक कशा प्रकारे या जागतिक संस्थांचे भविष्यात नेतृत्व करतील, त्याबाबत मी बोलले. अमेरिकेतील उद्योगक्षेत्र समजून घेतल्यामुळेच कामाची संस्कृती कशी बदलेल याचा दृष्टीकोन मला मिळाला. त्याचबरोबर अशा संस्थांचे नेतृत्वही खूप वेगळे असेल, हे मला जाणवले. यावर कोणीच फारसे काम करत नसल्याचेही माझ्या लक्षात आले. त्यामुळे ते करण्याची गरज मला वाटली,” त्या सांगतात.

यावेळी त्या एका सेमी कंडक्टर फर्मचे उदाहरण देतात, बऱ्यापैकी नावाजलेली ही फर्म आहे. त्या सांगतात,”सेमी कंडक्टरचे जग कसे बदलत आहे, हा आमच्या चर्चेचा मुख्य मुद्दा होता. सुरुवातीच्या काळात या कंपन्यांना त्यांच्या चिप्स सॅमसंग किंवा तशाच मोठ्या कंपन्यांना विकाव्या लागत आणि डिझाईनच्या वेळीच या चिप्सची निवड केली जाई. मात्र आज डीआयवाय किंवा इतर गोष्टींमुळे कोणीही कुठेही बसून कम्प्युटिंग डीव्हाईस बनवू शकतो .आणि ती व्यक्ती आता माझी नविन ग्राहक आहे. पण मी तुमच्यापर्यंत पोहचणार कशी? तुम्ही काही सॅमसंग नाही. अशा वेळी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन खासगी ग्राहकांपर्यंत पोहचणे ही वेगळी गोष्ट आहे. अशा वेळी तुम्ही असे उद्योग शोधले पाहिजेत जे पूर्वीपासून हे करत आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही भरती केली पाहिजे. मी अशा कंपनींबरोबर काम करुन त्यांच्यासाठी ' सीएमओ' मिळवून दिले . जेंव्हा लोकांचा मुद्दा येतो त्यावेळी तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे.”

त्यांचे लोक सगळीकडे आहेत. आठ लोकांच्या त्यांच्या टिममध्ये सगळ्या महिला आहेत. “माझा व्यवसाय हा हाय व्हॅल्यू आणि हाय एन्ड या प्रकारात मोडतो, तो काही केवळ आकड्यांवर आधारित नाही. एक गोष्ट मी चांगलीच शिकले आहे, ते म्हणजे तुमची व्यवस्थापनाची शैली ही तुमची स्वतंत्र असते. मी पूर्वी व्यवस्थापन शास्त्रावरची अनेक पुस्तके वाचायची आणि ते करुन पहावे, असे मला वाटायचे. पण मला हळूहळू समजू लागले की जी शैली त्यांच्यासाठी योग्य ठरली ती माझ्यासाठी ठरेलच असे नाही आणि त्यामुळे स्वतःची शैली शोधून काढली पाहिजे, जी माझ्यासाठी काम करेल. महिलांची नेमणूक, त्यांना प्रशिक्षण आणि त्यांच्याबरोबरच काम करणे ही माझी शैली होती. मी त्यांना तयार केले आणि त्याही माझ्याबरोबरीने प्रगती करु लागल्या. तुम्ही तुमची स्वतःची कंपनी सुरु करण्यामागे मोठे कारण हे असते की, तुम्ही तुमच्या तत्वांनुसार काम करु शकता, तुम्हाला तडजोड करावी लागत नाही. तुम्हाला हवे त्याप्रकारे तुम्हाला काम करता येते. माझ्याबरोबरीने माझ्या टीमलाही हे सुख मिळेल हे मी नेहमीच बघितले,” त्य़ा सांगतात.

त्या रोज अशा अनेक नव्या कंपन्या किंवा व्यवसाय पहतात. त्यानिमित्ताने अनेकांना भेटत असतात, जगात बदल घडविणारे हे घटक खूपच प्रभावशाली आहेत. त्या रोज या लोकांना भेटण्यासाठी इच्छुक असतात. “मी नुकतीच एका ऑटोमोबिल कंपनीला भेटले, जी नविन तंत्रज्ञानाद्नारे या उद्योगामध्ये परिवर्तन आणण्याच्या प्रयत्नात आहे. कदाचित काही आठवड्यांपूर्वीच मला ऑटोमोबिल उद्योगाबद्दल काहीही माहित नव्हते, पण आता काही आठवड्यातच मला या उद्योगाविषयी सर्व काही माहित आहे. अगदी या क्षेत्रातील इतर खेळाडू आणि इथे होत असलेले नवनविन प्रयोग, इत्यादीविषयीही... रोज नव्याने शिकणे माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे. खरे म्हणजे, जर ती कंपनी मला फारशी उत्तेजित करु शकली नाही तर कदाचित त्यांच्यासाठी भरती करणे मला जमणारही नाही,” त्या सांगतात.

कायम सर्वत्र चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे वरिष्ठ स्थानावर काम करणाऱ्या महिलांची कमी संख्या...याबाबबत विचारता अनु सांगतात, “पुरुषांनी बनविलेल्या नियमानुसारच आपण का चालावे? नोकरी करुन पैसे मिळविणे हे पूर्वी पुरषांचेच काम होते. महिला या क्षेत्रात नव्या आहेत. येथील सर्व नियम पुरुषांनीच बनविलेले आहेत. जर त्यांना संध्याकाळी पबमध्ये जाऊन जनसंपर्क वाढवायचा असेल, तर तशा प्रकारेच काम चालते. जर आपणही तेच नियम पाळायचे ठरविले, तर आपण त्यांची भ्रष्ट नक्कल ठरु... जर आपण त्यांचीच भ्रष्ट नक्कल ठरत राहीलो, तर तेच नेहमी वरच्या पातळीवर राहतील. जर कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांना स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर त्यांनी आपल्या पद्धतीने काम केले पाहिजे,” त्या सांगतात.

जर तुम्ही चांगल्या असाल आणि लोकांनाही तुम्ही चांगल्या वाटलात, तर कंपनी तुम्हाला साथ देईल, त्यामुळे महिला उच्च स्थानी का पोहचत नाहीत, या गोष्टीवरुन मी माझी झोप आज उडवून घेत नाही. कारण ते होणारच आहे. जर तुम्ही आज पुरुषांशी बोललात, तर बरेच जण तुम्हाला सांगतील, की कदाचित सीईओ होण्यापेक्षा त्यांना घरी रहायला आवडेल, आज त्यांना ते सुख नाही. पण हा बदलही घडेल, जेंव्हा अर्ध्या संस्था महिला सांभाळत असतील तर अर्ध्या घरांची जबाबदारी पुरुषांवर असेल,” त्या ठामपणे सांगतात.

अनु यांच्या दृष्टीने हा संपूर्ण प्रवास महत्वाचा आहे. “जे तुम्हाला आवडते ते करा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्हाला अगतिक वाटेल अशा ठिकाणी अडकून पडू नका, तुमच्यासाठी ती सर्वाधिक वाईट गोष्ट असेल. दुसरे म्हणजे कारकिर्दीच्या सुरुवातीलाच शक्य तेवढ्या गोष्टी शिकून किंवा करुन बघा. कोणत्याही एका विषयातील तज्ज्ञ होऊ नका किंवा एकाच ठिकाणी अडकून पडू नका. वेगवेगळे प्रदेश, लोक, नोकऱ्या, भौगोलिक स्थिती आणि व्यवसायांशी ओळख करुन घ्या- त्यामुळे तुमची चांगली वाढ होईल आणि जर तुम्ही स्वतःचे काही करु शकलात तर जरुर करा कारण ती सर्वात सुंदर गोष्ट असेल आणि त्यावर तुमचे नियंत्रण असेल.

अनु यांच्याबरोबर झालेल्या या मुलाखतीनंतर एक समाज म्हणून बऱ्याच गोष्टींबाबत विचार करण्याची गरज तीव्रपणे जाणवली. आणखी अशाच अनेक कंपन्यांमध्ये बदल घडविण्यासाठी अनु यांना खूप शुभेच्छा..