एका अशिक्षित शेतकरी स्त्रीने देशाला सांगितले की बाजरीची शेती कशी करायची, पंतप्रधानांनी केले सन्मानित

0

कठीण परिस्थितीत हार मानण्यात कोणतीही हुशारी नसते. परिस्थती कितीही बिकट व प्रतिकूल असली तरीही मनुष्याने संघर्ष करून त्यावर मात करण्यातच खरा आनंद आहे. नशिबाच्या भरवशावर बसणाऱ्या लोकांच्या पदरी नेहमी निराशा येते. आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भाग्य ठरवायचे असते. जर आपला या गोष्टींवर विश्वास बसत नसेल तर आपण रेखा त्यागी यांच्या संघर्षाची कहाणी बघू या. मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्यातील जलालपूर गावात रहाणाऱ्या एका शेतकरी स्त्री रेखा त्यागी यांनी कठीण परिश्रमानंतरच यशाची एक नवी सुरवात केली आहे. रेखा त्यागी यांनी कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात एक असे स्थान मिळवले आहे जे मोठमोठ्या शेतकऱ्यांना व जमीनदारांना पण जमले नाही. रेखा या बाजरीच्या शेतीत बंपर उत्पन्न काढणाऱ्या मध्यप्रदेशच्या पहिल्या महिला शेतकरी ठरल्या. रेखा यांच्या या कठीण परिश्रमाला दाद देत स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सन्मान केला. नुकसानीतला धंदा समजल्या जाणा-या शेतीला रेखा यांनी कश्या प्रकारे नफ्यामध्ये परिवर्तीत केले, चला रेखा यांच्याकडूनच त्यांचा वृतांत जाणून घेऊ या.

एका साधारण स्त्री प्रमाणेच रेखा त्यागी यांचे जीवन सामान्य होते. रेखा यांचा नवरा शेतकरी होता व पाचवी पास रेखा तीन मुलांना अतिशय कुशल गृहिणी प्रमाणे सांभाळत होत्या. पण दहा वर्षापूर्वी नवऱ्याच्या अचानक निधनाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांच्यावर मानसिक तसेच आर्थिक संकट कोसळले. शेती होती पण पाठीशी पैसा व अनुभव नव्हता. नवऱ्याच्या हयातीत रेखा यांनी कधीच आपल्या शेतीमध्ये पाय ठेवला नव्हता पण आज तीन मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक मदतीने त्या मजुरांकडून शेती करून घेऊ लागल्या. अनेक वर्ष अशा पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये समाधानकारक प्रगती मिळत नसून शेतीसाठी वापरण्यात आलेल्या बी-बियाणाचा खर्च मोठ्या मुश्किलीने निघत असे.  मध्यप्रदेशातील बहुतांश शेतकरी हे नैसर्गिक आपत्तीने उद्भवलेल्या संकटाचा सामना करीत होते. कधी ओल्या दुष्काळाने तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. मागच्या चार वर्षांपासून पांढऱ्या किड्यांच्या प्रादुर्भावाने सोयाबीनच्या पिकांवर संकट आले आहे. शेतकरी सावकार व बँकांकडून जास्त व्याजदरावर कर्ज घेऊन शेती करतात परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अपेक्षित उत्पन्न होत नाही. पिकांचे नुकसान व कर्जबाजारी पणामुळे मध्यप्रदेशच्या मागच्या तीन वर्षात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशातच रेखा यांच्या समोर सगळ्यात मोठे आव्हान होते एकतर आपली २० हेक्टर शेती एखाद्या शेतकऱ्याला वाट्याने करावयास द्यायची किंवा या नुकसानीच्या व्यवसायाला नफ्यामध्ये बदलायचे.

सलग होणा-या नुकसानीने दाखवला नफ्याचा रस्ता

शेतीमधील या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी रेखा यांनी आपल्या शेतीमध्ये नवीन प्रकारे पीक घेण्याचा विचार केला यासाठी त्यांनी अनुभवी शेतकरी तसेच जिल्हा कृषी समितीच्या अधिका-यांशी संपर्क साधला. बाजरीच्या उत्पादनासाठी त्यांनी परंपरागत पद्धतीचा त्याग करून आधुनिक पद्धतीचा उपयोग केला. नवीन पद्धतीचे बियाणे व मातीची तपासणी करून शेतीमध्ये खतपाणी केले. शेतामध्ये सरळ बाजरीची पेरणी करण्याऐवजी त्यांनी बाजरीचीच छोटी रोपे तयार केली. रोपे तयार झाल्यावर त्यांना उपटून शेतामध्ये लावण्यात आले. याप्रकारे सघनता पद्धतीने केलेल्या लावणी मध्ये बाजरीच्या उत्पादनात रेखाने रेकॉर्ड तोड उत्पादन मिळवले. सामान्यतः परंपरागत पद्धतीने केलेल्या बाजरीच्या उत्पादनात प्रती हेक्टर १५ ते २० क्विंटल बाजरीचे उत्पादन होते. पण सघनता पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये रेखा यांनी एक हेक्टर जमिनीत जवळजवळ ४० क्विंटल बाजरीचे उत्पादन काढले. रेखाद्वारे केलेला हा अभिनव प्रयोग मध्यप्रदेश सहित पूर्ण देशात अभूतपूर्ण ठरला. अशाप्रकारे रेखा यांनी शेतकऱ्यांबरोबरच सरकारचे देखील लक्ष्य आपल्याकडे केंद्रित केले.

प्रधानमंत्री यांनी केले सन्मानित

रेखा यांची यशोगाथा केंद्रीय कृषी मंत्रालय व प्रधानमंत्री यांच्यापर्यंत पोहचली. १९ मार्चला दिल्लीत आयोजित कृषी कर्मण अवार्ड कार्यक्रमात रेखा त्यागी यांना आमंत्रित करून प्रधानमंत्री यांनी प्रशस्तीपत्रक व २ लाख रुपये रोख बक्षीस दिले. २०१४-१५ मध्ये खाद्यान्न उत्पादनात श्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी राज्यस्थान, मध्यप्रदेश, हरियाना व छतीसगढ़ समवेत आठ राज्यांना ‘कृषी कर्मण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यासाठी बोलावले होते.

केंद्रीय कृषी तसेच किसान कल्याण मंत्री राधामोहन यांनी सांगितले की वर्ष २०१४-१५ च्या कृषी कर्मण पुरस्कारासाठी स्क्रीनिंग समितीने आठ राज्यांची शिफारस केली. यासाठी खाद्यान्न प्रथम श्रेणीसाठी मध्यप्रदेश, द्वितीय ओरीसा व तृतीय मेघालय यांची निवड झाली. याचप्रकारे तांदळाच्या उत्पादनासाठी हरियाना, गव्हासाठी राज्यस्थान व द्विदल धान्यासाठी छतीसगढ़ची निवड झाली गळीताच्या धान्यासाठी तामिळनाडू व पश्चिम बंगालची निवड झाली. तसेच वैयक्तिक कृषी उत्पादनाच्या उत्तम प्रदर्शनासाठी मध्यप्रदेशमधून रेखा त्यागी यांना बाजरी उत्पादन व प्रदेश मधील नरसिंहपूर जिल्यातील नारायण सिंह पटेल यांना गव्हाच्या उत्पादनात सर्वोत्कृष्ट प्रदर्शनासाठी बक्षीस देण्यात आले. रेखा यांनी आपले हे श्रेय स्वतःच्या मेहनतीला तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

सरकार बनवणार रोल मॉडेल

मुरैना जिल्यातील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे उप-संचालक विजय चौरसिया यांनी सांगितले की मध्यप्रदेश सरकारने रेखा त्यागी यांच्या शानदार उत्पादन प्रदर्शनाने त्यांनी प्रदेशच्या महिला शेतकऱ्यांसाठी त्यांची रोल मॉडेल म्हणून नियुक्ती केली आहे. कृषीवर आधारित कार्यक्रम, प्रदर्शन, संमेलनामध्ये महिला शेतकऱ्यांना रेखा यांच्या उत्पादनाची ओळख करून प्रेरित केले जाईल. विजय चौरासिया सांगतात की जिल्यातील शेतकऱ्यांनी जर आधुनिक पद्धतीचा अवलंबन करून शेतीला प्राधान्य दिले तर वर्तमानात शेतकरी हा नक्कीच सधन होईल. रेखा यांनी आपल्या यशाचे गमक इतर शेतकऱ्यांना सांगितले,’’आता मी शेतक-यांना शेतीतील आधुनिक पद्धत अवलंबन करण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करणार आहे’’.

मुरैना जिल्यातील कलेक्टर विनोद शर्मा सांगतात की रेखा त्यागी यांचा पंतप्रधान मोदींकडून झालेला सन्मान हा पूर्ण मध्यप्रदेशचा सन्मान तसेच त्यांचे खरिप पिकातील उत्पादन हे निश्चितच वाखाणण्यासारखे असून ते शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहे.

बक्षिसाच्या रकमेतून करणार मुलीचे लग्न

आपली मुलगी रुबी हिच्या लग्नाचा खर्च हा पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या रोख बक्षीस रकमेतून करणार आहे. रुबी ही गणित हा विषय घेऊन बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे आपल्या आईच्या यशाने ती खूप आनंदी आहे. रुबी यांना भविष्यात शिक्षिका बनायचे आहे यासाठी ती बीएडचा अभ्यासक्रम करत आहे. रेखा सांगतात की,’’मला दु:ख आहे की मी शिकलेली नाही पण मुलीला तिच्या लग्नानंतर पण स्व:खर्चाने शिकवण्याची इच्छा आहे’’.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जैविक खत निर्मितीतून शेत-मातीला ‘निर्मळ’ करणाऱ्या निर्मला कंडलगावकर! गांडुळ पिकल्या कचऱ्याखाली ढोल ‘विवाम’चा वाजं जी…

संतोषच्या यंत्रातून शेतकऱ्यांची कमाई, स्वस्तात होते मस्त आता गाजर-धुलाई

एक गाव पडले अनेक शहरांना भारी - हिवरेबाजारची यशोगाथा!

लेखक : हुसैन ताबिश
अनुवाद : किरण ठाकरे