‘अनंत’ संघर्षाची कहाणी : युद्धभूमी ते शेतजमिन...

‘अनंत ’निर्धार सर्वसमावेशक विकासाचा !

‘अनंत’ संघर्षाची कहाणी : युद्धभूमी  ते शेतजमिन...

Sunday August 23, 2015,

5 min Read

भिंतीवर रूबाबात टांगलेला लष्करी पोषाख, वाफाळलेल्या चहासोबत तासनतास रंगलेल्या चर्चा, पक्का निर्धार आणि काहीतरी नवीन शिकण्याची प्रबळ इच्छा. यातूनच जन्म झाला अनंत सर्विसेस अॅण्ड डेव्हलपमेंटचा.

‘अनंत’ शेतक-यांसाठी कौशल्य विकसन कार्यक्रम राबवते, ज्यामध्ये शेतक-यांना अधिक कार्यक्षम आणि कुशल शेतकामाच्या पद्धती शिकवल्या जातात. आणि यात आधार घेतला जातो तो आधुनिक तंत्रज्ञानाचा. याशिवाय शेतकरी आणि समाजातील गरीब–दुर्बल घटकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी rozgarmela.com नावाची वेबसाईट ‘अनंत’ने तयार केली आहे. ‘इन्नोव्हेट इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट होल्डिंग’ आणि ‘उपाया सोशल व्हेन्चर्स’ या उपक्रमांच्या माध्यमातून ‘अनंत’ने नुकतंच शेतबियाणांसाठी मदतनिधी उभारला होता. “समाजातील सर्व स्तरातल्या लोकांचा सर्वसमावेशक विकास साध्य करणं हाच मुळात ‘अनंत’ उद्देश आहे,” ‘अनंत’चे संस्थापक अजित सिंग म्हणाले. “म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या सामाजिक भेदाची किंवा कामाच्या स्वरूपाची आडकाठी त्यामध्ये येता कामा नये. ‘अनंत’ या शब्दाचा अर्थसुद्धा तोच तर आहे, ज्याला कोणतीही मर्यादा नाही. आमच्या कंपनीच्या लोगोमधूनही हेच स्पष्ट होतं”, अजित सिंग सांगतात.

शेतक-यांच्या प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानाची कास

शेतक-यांच्या प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानाची कास


‘अनंत’चा इतिहास मोठा रंजक आहे. आणि त्यातली सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे कंपनीचे संस्थापक अजित सिंग यांचे आर्मीमधले दिवस. अजित म्हणतात, “माझ्या आर्मीमधल्या दिवसांमुळे नव्या लोकांसोबत आणि अत्यंत कठीण प्रसंगांसोबत जुळवून घ्यायला मला मदत झाली. काम करणा-या माणसांची मोठी टीम हाताळण्याची आणि दुर्गम भागांमध्ये प्रवास करण्याची ताकद मिळाली”. अजित सिंग यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक होती, “माझी आर्मीमधली कारकीर्द ही नुसती आव्हानात्मक आणि आनंददायकच नव्हती, तर मी तिथे केलेल्या कामामुळे मला आर्मीमधून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याची ताकद मिळाली. मी देशातल्या काही अतिदुर्गम आणि कठीण ठिकाणी काम केलंय. शिवाय 1999च्या कारगिल युद्धामध्येही मी सहभागी होतो. या काळात मी सामना केलेला प्रत्येक कठीण प्रसंग मला जीवनाचं महत्त्व समजावून गेला. विशेषत: आर्मीने मला भारताच्या आतल्या, खूप आतल्या भागांमध्ये जाण्याची आणि तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याची संधी दिली.”

लष्कराला अलविदा केल्यानंतर आपल्या कारकिर्दीत भेटलेल्या अनेक प्रकारच्या लोकांचा अजित विचार करत राहिले. आणि सरतेशेवटी ते एक डेव्हलपमेंट प्रोफेशनल बनले. समाजातल्या गरीब-दुर्बल घटकांनाही विकासात सामावून घेण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन तिथल्या लोकांना प्रशिक्षण देऊ लागले. दिल्लीतल्या एका छोट्याशा चहाच्या ठेल्यावर मित्रांसोबत याच विषयावर त्यांच्या असंख्य वेळा चर्चा झडू लागल्या. “आमच्यापैकी 5 जण ग्रामीण भागातल्या लोकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी विविध संस्थांसोबत काम करत होते. या कामादरम्यान आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या फार जवळून पाहिल्या. आणि आपण जे काही काम करतोय, त्याचा लाभ फारच थोड्या लोकांपर्यंत पोहोचतोय हे जाणवल्यावर आम्हाला मनस्वी दु:ख झालं”, अजित सांगत होते.

सर्वांसाठी विकास हवा, सर्वांचा विकास हवा

सर्वांसाठी विकास हवा, सर्वांचा विकास हवा


दिल्लीतल्या त्या चहाच्या ठेल्यावर रंगलेल्या चर्चांमध्येच खरा ‘अनंत’चा जन्म झाला. अजित सांगतात, “सुरुवातीच्या काळात आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला, की आमची संख्या पाचवरून थेट दोनवर आली. शेवटी उरलो होतो मी, आणि सुरेश कुमार !” गेल्या वर्षभरात ‘अनंत’नं प्रामुख्यानं तीन गोष्टींवर लक्ष केंद्रिय केलंय. आपल्या लाभार्थ्यांची अर्थात, प्रशिक्षणार्थींची नोकरी मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती ठेवणं, त्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करणं आणि rozgarmela.com म्हणजेच ‘अनंत’ची रोजगार वेबसाईट.

त्यांना मदतीचा हात हवाय

त्यांना मदतीचा हात हवाय


आपल्या कामाच्या पद्धतीविषयी सांगताना अजित म्हणतात, “सर्वात आधी लाभार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या प्रगतीची माहिती गोळा करतो. यामुळे लाभार्थी आणि त्यांना काम देणारे (अर्थात ज्या संस्थांसाठी आम्ही एखादा प्रकल्प सुरु करतो) त्यांच्या इच्छा, अपेक्षा आणि प्रतिक्रिया आम्हाला कळतात. ही सर्व माहिती आम्ही तयार केलेल्या एका अॅप्लीकेशनमध्ये गोळा करतो. आमच्या भागीदार संस्थांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते. या माहितीच्या आधारे या संस्था त्यांच्या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेऊ शकतात, तसेच त्यांच्या कामगिरीचा आढावाही घेऊ शकतात. यामुळे त्यांना प्रकल्पामध्ये काही त्रुटी असल्यास त्यांच्यावर योग्य त्या तातडीच्या उपाययोजना करणं शक्य होतं.”

प्रशिक्षणाने त्यांचं' जीवनच बदलून गेलं

प्रशिक्षणाने त्यांचं' जीवनच बदलून गेलं


यानंतर ‘अनंत’नं काम सुरु केलं ते म्हणजे गुणवत्ता मूल्यांकनाचं. “वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचं प्रशिक्षण दिलेल्या शेतक-यांच्या कामाचं मूल्यांकन करण्यासाठी आम्ही अॅग्रीकल्चर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) सोबत काम सुरु केलं. माझ्यामते या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणा-या काही मोजक्याच संस्थांपैकी आम्ही एक होतो”, अजित मोठ्या अभिमानानं सांगतात. ‘अनंत’कडून देशभरातल्या 19 राज्यांमधल्या तब्बल 30 हजार शेतक-यांचं 11 स्थानिक भाषांमध्ये गुणवत्ता मूल्यांकन करण्यात येतं.

आणि सगळ्यात शेवटी ‘अनंत’चा भर आहे तो म्हणजे rozgarmela.com या वेबसाईटवर. या वेबसाईटवर प्रामुख्याने एसएमएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रोजगार शोधणारे आणि रोजगार देणारे अशा दोघांमधला दुवा म्हणून ही वेबसाईट काम करते. अजित सांगतात, “या वेबसाईटद्वारे पुरवण्यात येणा-या कोणत्याही सुविधेसाठी रोजगार शोधणा-यांना पैसे द्यावे लागत नाहीत. रोजगार पुरवणा-यांमध्येही आमची विश्वासार्हता वाढवण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत”.

“प्रारंभीच्या काळात ‘अनंत’ ला उभं करण्यासाठी आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी आम्हाला खूप झगडावं लागलं. मात्र त्याहीपेक्षा आमच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणं हे एक मोठं आव्हान होतं. एक नवखी कंपनी आणि छोटीशी टीम मिळून इतकी मोठी जबाबदारी पार पाडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसणं कठीण होतं.” अजित म्हणाले. पण सर्व अडचणींवर मात करत ‘अनंत’ने धीम्या गतीनं का होईना, पण प्रगती केली. दुस-या वर्षात अनंत फायद्यात आली, आणि आता नव्या गुंतवणुकीच्या मदतीने अधिक सक्षम आणि व्यापक तंत्रज्ञान कंपनीत आणण्याचा ‘अनंत’चा मानस आहे. तसंच, मार्केटिंगसाठी काहीतरी भन्नाट कल्पना राबवण्याचाही विचार ‘टीम अनंत’ करते आहे.

‘अनंत’च्या उभारणीत आपल्या टीमचा आणि मित्रपरिवाराच्या योगदानाचा अजित आवर्जून उल्लेख करतात. “जेव्हा काही चांगले लोक एकत्र येऊन काहीतरी करतात, तेव्हा अनेक चांगल्या गोष्टी घडतात”, अजित सांगतात. “अनंतमध्ये अनुभवी, ज्येष्ठ आणि अननुभवी तरूणांचा भरणा असलेली एक चांगली टीम आहे. प्रत्येकामध्येच प्रत्यक्ष काम करण्याची उपजत इच्छा आहे. अगदी सुरुवातीच्या कठीण काळापासून यातला प्रत्येकजण आमच्यासोबत आहे. यातल्या प्रत्येकाने कामावरची प्रचंड निष्ठा वेळोवेळी सिद्ध केली आहे.”

‘अनंत’च्या कामाचं स्वरूप कायम बदलतं राहिलं आहे. त्यामुळे ‘अनंत’लाही स्वत:मध्ये लवचिकता आणणं आवश्यक झालं. “आम्हाला कायम नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत रहावं लागेल, त्यातून नव्या गोष्टी घडवाव्या लागतील आणि आधीच्या तंत्रज्ञानात नवे बदल करावे लागतील. त्यानंतरच आम्ही आमच्या आणि आमच्या भागीदारांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करू शकणार आहोत”, अजित सांगतात. “यासाठी सर्वात महत्त्वाचं कुठलं तत्व असेल तर ते हे की अजून किती तुम्ही करू शकता, आणि अजून किती करायची तुमची इच्छा आहे.”