'द फ्लोर वर्क'च्या मिता माखीजा यांची खुसखुशीत वाटचाल

0

तुमचं स्वतःचं हॉटेल असावं हे तुमचं स्वप्न आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या जागेच्या करारावर तुम्ही संध्याकाळी सही करणार आहात आणि तुमच्या भागीदाराने हळूच सांगितलं की, या कामासाठी रक्कम कमी पडतेय. अशा वेळी काय कराल? दीर्घ श्वास! रडाल! तुझं स्वप्न आपण परत कधीतरी पूर्ण करू?

पुण्यात राहणाऱ्या नीता माखीजा या ४३ वर्षांच्या साहसी महिलेने यापैकी काहीच केलं नाही आणि स्वतःच रेस्टोरंट स्वतःच सुरु करायचं ठरवलं. अचानक बसलेल्या या धक्क्यातून सावरत त्यांनी गंभीरपणे विचार केला, आणि बँकेतून पर्सनल लोन घेतलं, काही रक्कम नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून घेतली. अशा पद्धतीने लागणारं भांडवल जमा करून त्या त्यांच्या द फ्लोर वर्क रेस्टोरंट च्या कामाला लागल्या.


पुण्यात जन्मलेल्या आणि पुण्यातच लहानाच्या मोठ्या झालेल्या मीता यांचं स्वप्न पूर्ण झालं ते त्यांच्या लग्नानंतर. मीता यांच्या पतीला नोकरी निमित्ताने सन फ्रान्सिस्कोला जावं लागलं, त्यावेळी मीता यांनी सन फ्रान्सिस्को च्या कॅलिफोर्निया कॅलीनारी अकादमी मध्ये १८ महिन्यांचा शेफ प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. यामुळे त्यांच्या स्वयंपाक कलेला अजून वाव मिळाला. त्यामुळे तिथे त्यांनी साडेचार वर्ष काम केलं. तिथल्या लेस फॉली, फिफ्थ फ्लोर या सारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये काम करत असताना उच्च दर्जाचं चोकलेट कसं बनवायचं हे पण त्या शिकल्या. मिशेल रेचिउति या नामवंत चाॅकलेट तज्ञाकडून मीता यांनी चाॅकलेट बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं.

भारतात परत आल्यांनतर आणि त्यांच्या जवळ या क्षेत्रातील असलेल्या अनुभवामुळे त्या बड्या रेस्टोरंटची सल्लागार म्हणून काम करू लागल्या. पुण्यातील नामवंत अग्नेय आशियातील पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं मलाक्का स्पाइस, पोस्ट ९१ या, तसंच मुंबईच्या मिया कुसिना यासारख्या रेस्टोरंटच्या सल्लागार म्हणून त्या काम करू लागल्या. मिता याबाबतचा त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात," अशा कामात समोरच्या व्यक्ती किंवा ग्राहक हे फार जबाबदारीने वागत नव्हते. त्यांच्याशी चर्चा करताना ते सगळ्या गोष्टी मान्य करायचे पण माझी पाठ फिरली की ते पुन्हा जैसे थे." २०१० मध्ये मीता यांनी त्यांचं हे काम बंद केलं आणि स्वतःचं रेस्टॉरंट सुरु करायचं ठरवलं. यासाठी उपयुक्त ठिकाण शोधण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळ लागला आणि जागा संशोधनानंतर कल्याणीनगर मधील एका उत्तम ठिकाणी आपलं बस्तान बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याठिकाणी त्यांना आत आणि बाहेरची अशी मोठी जागा उपलब्ध होणार होती. मिता आणि त्यांची मैत्रीण याचं आधीच ठरलं होतं की, मैत्रीण यासाठी लागणारा पैसा पुरवणार आणि व्यवसाय वाढवण्याची जबाबदारी मीता यांची. पण ते झालं नाही. त्यांच्या मैत्रिणीने आयत्यावेळी माघार घेतल्याने मीता यांनी एकटीनेच सगळं करण्याचा निर्णय घेतला.त्यांना उत्तम कॉन्टीनेन्टल पदार्थ आणि बेकरी पदार्थांचा कॅफे सुरु करायचा होता.


नवीन व्यवसाय असल्याने रेस्टॉरंट उभारणे आणि ते चालवणे यातच सगळं भांडवल खर्च झालं. त्यामुळे जाहिरातीसाठी काहीच रक्कम शिल्लक राहिली नाही. मिता सांगतात ," पहिल्या दिवसापासून येणारी लोकं एकमेकांना सांगून जी जाहिरात होत होती तीच. लोकं फोन करून ठिकाण कुठे आहे हे विचारायचे. लोक येणं अवघड नव्हतं. मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी रेस्टॉरंट चालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आमच्याकडे येणारे ६० टक्के ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले. काही जणांना चव आवडली नाही. पण आम्ही प्रामाणिकपणे सगळं करत होतो. युरोपियन पदार्थात प्रामुख्याने मीठ आणि काळीमिरी या दोनच गोष्टी वापरल्या जातात." असं मिता सांगतात.

मीता यांच्या तत्वानुसार," जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा तुम्ही जे द्याल तेच सगळ्यांना आवडेल असं नाही, आणि ते आवडावं अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. त्यांच्याकडे येणारे लोक नेहमी भारतीय चव असणारे पाश्च्यात्य पदार्थ द्या अशी मागणी करायचे. त्यांनी इतरत्र खाल्लेले पाश्च्यात्य पदार्थ हे खात्रीशीर नाहीत हे समजावणं त्यांना फार कठीण जात होतं. त्यावेळी," मी याबाबतीत फार प्रामाणिक आहे आणि अशा पद्धतीने पदार्थात बदल करणं जमणार नाही," असं त्या अधिकारवाणीने सांगतात.

मीता यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचा व्यवसाय हळू हळू स्थिर व्हायला मदत झाली. त्या लोकांच्या सूचना विचारात घेऊ लागल्या. चव बदलणे या शिवाय इतर सूचनांचा त्या स्वीकार करत होत्या.त्यांना सुरूवातीचं त्यांच्या कॅफेचं स्वरूप आठवलं बेकरी आणि त्याचबरोबर पिटा ब्रेड, सेन्ड्विच, सूप आणि सलाड हेच पदार्थ त्या ठेवायच्या, जेवण नसायचं." नेहमी येणाऱ्या काही ग्राहकांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही इतके छान पदार्थ बनवता, मग पाच जेवणाचे पदार्थ का ठेवत नाही, त्यांनतर नवीन पाच पदार्थ सुरु करण्यात आले. त्यांनतर काही लोकं आणखी काही पदार्थ का नाही सुरु करत असं विचारू लागले. अजून दोन किंवा तीनच पदार्थ वाढवा अशी त्यांची सूचना होती. त्यांनतर आम्ही पूर्ण जेवणासाठी वेगळा विभाग सुरु करायचं ठरवलं." त्या हसत हसत सांगतात, त्यांच्या एका महिला ग्राहकाने लंडनच्या एका बेकरीत लेमन रासबेरी केक खाल्ला होता. तो केक मीता यांनी बनवावा अशी विनंती त्यांनी केली. मीता यांनी त्या केकची चव न बघताच तो केक तयार करण्याचं आव्हान स्वीकारलं. " आमच्या ग्राहकाने सांगितलेल्या चवीचा केक तयार होई पर्यंत आम्ही एक आठवडा भर निरनिराळ्या प्रकारे लेमन रासबेरी केक तयार करत होतो. आणि आता आमच्याकडे लेमन रासबेरी केक कायमस्वरूपी उपलब्ध आहे." असं त्या अभिमानाने सांगतात.

मीता यांना पाळीव प्राण्यांबद्दल अतिशय प्रेम आहे. त्यामुळे पुण्यातील प्राण्यांशी संबंधित अनेक संस्थाशी त्या जोडल्या गेल्या आहेत. यातूनच त्यांना पेट फ्रेंडली रेस्टोरंट ची कल्पना सुचली. " मला वाटतं कुत्रा हा प्रेमळ प्राणी आहे, पण त्याचा मालक कामासाठी दिवसभर बाहेर असतो. त्यावेळी कुत्रा घरी एकटाच असतो. मालक संध्याकाळी घरी येतो आणि काहीतरी खाण्यासाठी म्हणून पुन्हा बाहेर जातो त्यामुळे कुत्रा बिचारा पुन्हा एकटा पडतो. त्यामुळे आमचे ग्राहक त्यांचे कुत्रे आणि मांजरांना घेऊन आमच्याकडे येऊ शकतात अशी तजवीज आम्ही केली. हे पाळीव प्राणी दिलेल्या सूचना ऐकतात आणि त्यांचे मालक त्यांना टेबलाच्या खाली बांधून ठेऊ शकतात." त्या सांगतात. त्यांनी सुरु केलेली पद्धत भारतातील इतरही रेस्टोरंटमध्ये सुरु करावी असे त्यांना वाटते.

द फ्लोर वर्क बद्दल सोशल मिडिया वर सुरु असलेल्या चर्चेमुळे त्याचं यश लक्षात येतं. गेल्या वर्षभरापासून त्यांनी जागेत गुंतवलेले पैसे परत मिळायला सुरवात झाली आहे, अजून काय पाहिजे. त्यामुळे हा व्यवसाय अजून कसा वाढवता येईल याचा विचार मिता करत आहे. डिसेंबर महिन्यात वानवडीमध्ये द फ्लोर वर्क ची अजून एका शाखा सुरु झाली. " अगदी सुरवातीच्या नियोजन प्रमाणे द फ्लोर वर्क च्या पुणे आणि परिसरात छोट्या छोट्या बेकरी सुरु करायच्या होत्या आणि पुणे शहराच्या दुसऱ्या टोकाला एक रेस्टॉरंट सुरु करायचं होतं. आता ६ ते ८ बेकरींना पुरवता येईल इतका माल आम्ही तयार करू शकतो. याशिवाय अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे बेकरी चालवता येईल का याचाही मी विचार करत आहे, म्हणजे भागीदारी मध्ये जर कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर त्यांना सगळे पदार्थ पुरवण्याची जबाबदारी माझी. अशा पद्धतीने." अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

लेखक : इंद्रजीत डी चौधरी

अनुवाद : श्रद्धा वार्डे