अश्विनी असोकनः आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ‘रिअल’ उद्योजिका

0

“ मी सिलिकॉन व्हॅली सोडून भारतात आले ते माझ्या पतीबरोबर 'एआय' (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) कंपनी सुरु करण्यासाठी... या कंपनीची एक महिला सह-संस्थापिका असूनही आणि मी  सोफ्टवेअर कोडची एक ओळही लिहीत नाही आणि हे मी सगळ्यांना आवर्जून सांगते जेणेकरुन ते त्यांच्या साचेबंध कल्पनांमधून बाहेर पडतील,” मॅड स्ट्रीट डेनच्या अश्विनी असोकन सांगतात.

तंत्रज्ञान क्षेत्रात असूनही अश्विनी कोडची एक ओळही लिहीत नाहीत. आपल्या संस्थेच्या सहसंस्थापकाशी लग्न केलेल्या अश्विनी या दोन मुलांची आई आहेत. मुख्य म्हणजे स्टार्टअपमधील महिलांच्या आजच्या गरजांबाबत त्या परखडपणे बोलताना दिसतात. त्यांच्या मते आता स्त्रियांनीच परिस्थिती हातात घेण्याची गरज आहे. तसेच त्या केवळ बोलून थांबणाऱ्यांपैकी नाहीत तर आघाडीला जाऊन लढणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळेच अनेक स्त्रियांसाठी त्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरु शकतात. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या अश्विनीकडे सहाजिकच सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास, आव्हाने आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला यासह इतर अनेक विषयांवर अश्विनी यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बालपण

अश्विनी या मुळच्या चैनईच्या... त्यांनी संगीत आणि शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि वयवर्षे चौदा ते एकवीस या काळात त्यांना कार्यक्रमांनिमित्त देशभर प्रवास करायला मिळाला. सहाजिकच आपण एक कलाकार होणार अशीच कल्पना असलेल्या अश्विनी यांची महाविद्यालयातील हजेरी जेमतेमच होती. मात्र त्यांच्या वडिलांच्या मनात काही वेगळेच होते. अश्विनी यांनी इंटरॅक्शन डिजाईन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यावे, असा वडिलांचा आग्रह होता. गंमत म्हणजे कार्नेजी मेलॉनमध्ये असताना त्यांनी निवडलेला प्रबंधाचा विषय होता नृत्यांचे सांस्कृतिक प्रकार रोबोटस् आणि इतर डिजिटल एजंटच्या हालचालींचे डिजाईन करण्याचा विचार करताना कशा प्रकारे मदत करु शकतात..

“नृत्य, संगीत, डिजाईन, संगणक, समाज आणि संस्कृती यांना जोडणाऱ्या धाग्यांच्या आधारेच मी माझे आयुष्य घालविले आहे आणि या सगळ्यासाठी मी एका व्यक्तीचे देणे लागते – माझ्या वडिलांचे... कसे कोण जाणे त्यांना सगळ्याच गोष्टींबद्दल सगळे काही माहित असते,” अश्विनी सांगतात. त्यांची आई त्यांच्या कुटुंबाचा कणा आहे आणि लाड करणाऱ्या आजीप्रमाणे तिच्या मुलांची काळजी घेणारे दुसरे कोणी त्यांनी आजपर्यंत पाहिलेलेच नाही.

इंटेलचा अनुभव

इंटेल हा अश्विनी यांच्यासाठी खूप काही शिकाविणारा अनुभव ठरला. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जेनेव्हाईव्ह बेल हे दहा वर्षांहून अधिक काळ अश्विनी यांचे वरीष्ठ अधिकारी होते. स्मार्ट होम व्यवसायांतर्गत ते युएक्स या संस्थेची उभारणी करत होते आणि त्यादृष्टीने ते डिजायनर्स, मानववंशशास्त्रज्ञ, ह्युमन फॅक्टर अंभियता यांची टीम उभारत होते. टीव्हीचे भविष्य आणि भविष्य़ात त्यामध्ये शक्य असलेले बदल घडविण्याच्यादृष्टीने अभ्यास करणे हा त्यामागचा उद्देश होता. अश्विनी यांना या टीमची सदस्य होण्याची संघी मिळाली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर कामही करता आले. ज्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील लोक होते, सिलिकॉन डिझाईनमध्ये मध्यवर्ती भागात काम करणारे होते तसेच सॉफ्टवेअर आणि सेन्सरच्या क्षेत्रातीलही होते. “ इंटेलमधील माझा संपूर्ण प्रवास हा मला खूप काही शिकविणारा होता आणि युएक्स, डिजाईन आणि पिपल सेंट्रीक रिसर्च या गोष्टी तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यांच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे मदत करतात हेदेखील मला शिकता आले, ,” त्या सांगतात.

इंटेलमधील शेवटच्या चार वर्षांत अश्विनी त्यांच्या लॅबसाठी मोबाईल रिसर्च अजेंडावर काम करत होत्या आणि त्यावेळी त्यांना मशीन लर्निंग, इमेज रेक्गनिशन, सेन्सर्सबरोबर काम करणाऱ्या टीम्स आणि कॉनटेक्स्युअल कंप्युटींगबरोबर जवळून काम करता आले. याच काळात त्यांची आर्टीफिशियल इंटेलिजन्समधील रुची वाढली.

व्यावसायिक जीवनात खुल्या दिलाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे काम करुन पाहिले पाहिजे आणि त्याचबरोबर इतर संबंधित क्षेत्रातही काही अनुभव मिळविला पाहिजे, हा आपल्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात मोठा धडा असल्याचे अश्विनी यांना वाटते. “ न्युरल नेटवर्क कसे काम करते ते मला समजते, मशीन लर्निंगचे अगदी महत्वाचे तत्व मला समजते, तंत्रज्ञान कसे एकत्र करावे याची मला पुरेशी माहिती आहे आणि इतर कशाहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे मला माझ्या विषयाचा गाभा चांगलाच माहीत आहे – तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा जगभरातील लोकांसाठी अधिक अर्थपूर्ण रीतीने वापर करणे,” त्या सांगतात.

मॅड स्ट्रीट डेन

“ माझे लग्न एक न्युरोसायन्टीस्टशी झाले आहे जे आर्टफीशियल इंटेलिजन्स (एआय) चे प्रमुख होते. आम्ही दिवस रात्र एकाच विषयावर चर्चा करत असू. चर्चेचा विषय असे एआय आणि समाज आणि तंत्रज्ञानाचे भविष्य... त्यामुळे या मार्गावरुन एकत्रच वाटचाल करणे आमच्यासाठी नैसर्गिक होते. जर माझे त्यांच्याशी लग्न झाले नसते, तर मात्र मी हे केले असते, असे मला वाटत नाही. आमच्या एकमेकांना शोधण्याच्या आणि एकत्र वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये भविष्याबद्दलच्या आमच्या कल्पना हा अविभाज्य भाग होता. आमचे लग्न झाल्यापासून माझ्यात खूपच बदल झाला असून याचे सगळे श्रेय माझ्या नवऱ्यालाच आहे,” त्या सांगतात.

आज एआय कडे ज्या नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते ते अश्विनी यांना चांगलेच खटकते. त्यामुळे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही मनोवृत्ती बदलण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. मॅड स्ट्रीट डेन (एमएएस) ही त्यांच्यासाठी केवळ तंत्रज्ञान कंपनी नाही तर अशी एक कंपनी आहे जिला एआय आणि संगणकाची दृष्टी लोकांपर्यंत अधिक अर्थपूर्ण प्रकारे पोहचविण्याची आशा आहे.

व्यावसायिक बनताना...

अश्विनी यांच्या मते उद्योजकांनी बाजारपेठ समजून घेणे महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी त्यांची उत्पादने ठेवली जाणार आहे तिथले लोक, त्यांच्या सवयी, भावना, व्यवस्था, घडणाऱ्या घडामोडी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. अश्विनीच्या दृष्टीने सातत्याने होणारे बदलच एका व्यावसायिकाच्या आयुष्याची व्याख्या आहे.

एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काही गुण आत्मसात करावे लागतात आणि त्यातील त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा म्हणजे इतरांच्या प्रती असलेली सहानुभूती...

तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला

समाज माध्यमांच्या द्वारे अश्विनी सातत्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांबाबत बोलत असतात आणि त्यांच्या मते प्रमुख अडचण ही आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या आणि त्या कामासाठी पात्र असलेल्या महिलांना काही काळाने या क्षेत्रापासून दूर जावे लागते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे लग्न आणि मुले.... पण हा काही फक्त महिलांचा प्रश्न नाही, अश्विनी सांगतात, “ व्यवस्थेची रचनाच त्यांच्या विरुद्ध आहे.”

पायाभूत सुविधांची कमतरता आणि त्याचबरोबर महिलांना त्यांच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर मदत करणाऱ्या धोरणांची कमी यामुळे ही व्यवस्था चालू आहे. खरे सांगयचे तर संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगाची व्यवस्थाच पुरुषांसाठी आहे, असा पुरुष ज्याला कौटुंबिक कामे करण्याची किंवा मुलांना वाढविण्याची काळजी करण्याची गरज नाही.

“ स्टार्ट अप्सदेखील प्रामुख्याने पुरुषांचाच विचार करताना दिसतात. उदाहरणार्थ स्टार्टअपमध्ये स्तनपानासाठी जागा आणि बालसंगोपन केंद्रांऐवजी फुसबॉलटेबल, खेळ, चकचकीत कॅफे यांची निवड केली जाते,” त्या सांगतात.

या क्षेत्रात स्त्रियांची संख्या वाढेल, अशी अश्विनी यांना आशा आहे. मात्र हे काही आपोआप होणार नाही. सत्तास्थानावर असलेल्या महिलांकडूनच यासाठी चालना मिळायला पाहिजे आणि त्यासाठी नुसता पाठींबा देऊन चालणार नाही तर महिलांची संख्या आणि परिस्थिती बदलण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत, असेही त्यांना वाटते.

यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती सर्वांना समान पातळीवर आणण्याची गरज संस्थापक आणि गुंतवणूकदारांना पटवून देणे. “ तुम्ही फक्त एका जागी बसून केवळ ‘ओके’ म्हणू शकत नाही. तुम्ही तुल्यबळ आहात, ते सिद्ध करुन दाखवा. तसेच अशा प्रकारे समपातळी तयार करण्यासाठी तुम्हाला नक्कीच कष्ट पडणार आहेत कारण ही असामनता पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे,” त्या सांगतात.

तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या कमी टक्केवारीसाठी आपण नेहमीच आकांत करत असतो, पण महिलांचा एक लहानसा गट जो बदल घडविण्यासाठी काम करत आहे, त्याची आपण कदर केली पाहिजे आणि अश्विनीदेखील हे करणाऱ्यांपैकी एक आहे. “ एमएसडीमध्ये आमची चार महिला आणि चार पुरुषांची टीम आहे. मात्र भविष्यात एखादी लहान मुल असलेली महिला कंपनीमध्ये आली तर त्यादृष्टीने आम्ही खेळ आणि मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योजना तयार केली आहे. त्याचबरोबर स्तनपान करण्यासाठीही जागा आहे.

त्या सध्या चैनईमधील काही लोकांबरोबर काम करत असून तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांना स्टार्ट अप ग्रुपस् च्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एक महिला म्हणून आपण आपल्या कारकिर्दीसाठी आणि गरजांसाठी स्वतःच जबाबदार आहोत. सर्वप्रथम तुम्ही कोण आहात, हे स्पष्ट असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्ही निर्लज्जपणे आपल्या मागण्या किंवा प्रश्न मांडले पाहिजे – इंटेलमधील त्यांच्या महिला वरिष्ठांकडून अश्विनी यांनी शिकलेला हा पहिला धडा होता.

याबाबत अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, “ स्तनपानासाठी विशेष खोलीची मागणी करा आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करुन द्या, की ते काम करणाऱ्या आयांच्या बाबत सहानुभूती दाखवत नाहीयेत... तंत्रज्ञान परिषदांमध्ये बाल संगोपन विभागाची मागणी करा जेणेकरुन त्यांना काम करणाऱ्या महिलांना सात नंतर मुलांचीही काळजी घ्यावे लागते, ही गोष्ट ते समजून घेत नसल्याची जाणीव होईल... माझ्या मागण्या आणि प्रश्न विचारणे मी थांबविणार नाही...”

त्यांचे स्वतःचे उदाहरण सांगताना त्या म्हणतात, “ एक सज्ञान नागरिक म्हणून मी माझे संपूर्ण आयुष्य अमेरिकेत घालविल्यानंतर मी नुकतीच भारतात परतले. मी वीस वर्षांची तरुणी नाही. मी दोन मुलांची आई आहे. माझी मुले अगदी लहान असताना कंपनीला सुरुवात झाली. त्यापैकी एकाला तर अजूनही स्तनपान सुरु होते. तेंव्हा कामानिमित्त मी देशभरात फिरत असे... या एक दिवसाच्या ट्रिपस् करताना माझा स्तनपानाचा पंप नेहमीच माझ्या जवळ असे. व्हीसीबरोबरच्या मिटींगमधूनही मी दोन वेळा रेस्ट रुममध्ये जाऊन माझ्या नवजात बाळासाठी या पंपाच्या सहाय्याने दूध काढले आहे आणि ते दूध घेऊन मी मुंबई, बंगळुरु आणि देशभरात कुठूनही मी चैनईला घेऊन गेले आहे.”

कंपनीची वाढ होत असताना सहाजिकच अश्विनीचे काम आणि प्रवास यामध्येही वाढ होत आहे. पण त्यांनी त्यांच्या सहसंस्थापकाशीच लग्न केल्याने, कुटुंब, घर, मुले आणि काम – सगळ्यामध्येच ते एकत्र आहेत. “ आमची एकमेकांकडून ही आग्रहाची मागणी असते आणि जसे की मी नेहमीच सांगत असते, माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त स्त्रीवादी आहे,” त्या सांगतात.

अश्विनी म्हणतात त्या एक दिवस फक्त उद्योजक होतील आणि महिला उद्योजक नाही तसेच त्यांचे नाव आघाडीच्या उद्योजकांच्या यादीत असेल ते केवळ उद्योजक म्हणून महिला उद्योजक म्हणून नव्हे. “ मला केवळ महिला असल्यामुळे त्या यादीत यायचे नाही आणि अल्पसंख्य रहायचे नाही. आज मी हे मान्य करते कारण मला माहित आहे की दुर्दैवाने मी त्या अल्पसंख्यांकांपैकी एक आहे आणि त्यांच्यासाठी बोलणे गरजेचे आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. एक व्यावसायिक म्हणून ही केवळ सुरुवात आहे आणि अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पण भविष्यात मात्र मला महिला उद्योजक ही विशेष श्रेणी आहे, असे ऐकायचेही नाही,” त्या सांगतात