इंग्रजीतील चेतन भगतप्रमाणेच राष्ट्रभाषेत नवे पर्व..!हिंदी साहित्यातही अवतरला आता दिव्य प्रकाश...

कुणालाही नावे ठेवू नये - दिव्य प्रकाश दुबे

0

दिव्य प्रकाश दुबे... नवोदित हिंदी लेखक... दिव्य प्रकाश या नावातील आद्याक्षरे मिळवून वाचकांनीच त्यांना ‘डीपी’ ही नवी ओळख दिली. किंबहुना हिंदी साहित्य वर्तुळात आताशा ते ‘डीपी’ या नावानेच ओळखले जातात. ‘टर्म्स अँड कंडिशन अप्लाय’ कादंबरीने ते रातोरात चर्चेला आले. डीपी म्हणजे हिंदीतील ‘सीबी’. ‘सीबी’ अर्थातच इंग्रजीतील चेतन भगत. भगत यांच्या ‘फाइव्ह पॉइंट समवन’ या कादंबरीने लोकप्रियतेचे नवे कीर्तीमान प्रस्थापित केले. ‘मध्यम वर्गातील संघर्ष’ हेच ‘डीपी’ यांच्याही कादंबरीचे मुख्य सूत्र. ‘डीपी ’ यांची लेखनशैलीही ‘सीबी’ यांच्याप्रमाणेच साधीसरळ, संवादी आणि म्हणून धाराप्रवाही. खमंग खिचडी आणि एकही खडा नाही. रसिक तृप्त होणारच!

दिव्य प्रकाश दुबे...
दिव्य प्रकाश दुबे...

हिंदीच्या आठवणीतील शेवटचे बेस्ट सेलर फिक्शन म्हणजे 'केशव पंडित' आणि 'कानुन का बेटा'. ‘पॉकेट बुक’ फॉर्ममधील ही कादंबरी. ‘पॉकेट बुक’ फॉर्ममध्ये कादंबर्‍या लिहिणारे सुरेंद्रमोहन पाठक, वेदप्रकाश शर्मा वा गुलशन नंदा हे तत्कालिन कादंबरीकार बेस्ट सेलर असले तरी पुन्हा त्यांना ‘साहित्यिक’ वा ‘सारस्वत’ असा दर्जाही हिंदीत मिळाला नाही. आपल्या मराठीत जे दुर्दैव सुहास शिरवळकर, बाबा कदम या बेस्ट सेलर कादंबरीकारांच्या वाट्याला आले तेच या मंडळींच्याही. या अर्थाने पाहिले तर चेतन भगत जसे इंग्रजीत अपवाद ठरले तसेच दिव्य प्रकाश दुबे उपाख्य ‘डीपी’ही हिंदीत अपवाद ठरले. दोघांच्या वाट्याला ‘बेस्ट सेलर’ म्हणून लोकप्रियताही आली आणि दोघांना सारस्वतांच्या मांदियाळीत स्थानही मिळवता आले.

दिव्य प्रकाश यांचे वेगळेपण म्हणजे त्यांना चेतन भगत यांना मिळाली तशी प्रसारमाध्यमांची साथ लाभली नाही, तरीही त्यांनी हे दिव्य यश मिळवले. दिव्य यांनी यू ट्यूबची साथ घेतली. पोस्ट व्हायरल झाली. पाहाता पाहाता हजारो शेल्फमध्ये ‘टर्म्स अँड कंडिशन अप्लाय’ने आपली जागा पक्की केली...अगदी दिमाखात!

दिव्य प्रकाश यांचे वडिल प्रशासकीय सेवेत होते. वारंवार बदल्या होत. हरदोई, शहाजहानपूरसारख्या लहानमोठ्या शहरांतून त्यांचे बालपण गेले. वाचनाचा नाद अगदी तेव्हापासूनचा आणि ‘लोकांनी हिंदी साहित्य वाचणे का सोडले’, हा पुढ्यात पडलेला प्रश्नही तेव्हापासूनचा. अखेर या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी शोधलेच. सहज उपलब्ध होऊ शकतील आणि रंजक मार्गाने नेत प्रबोधनाचे उद्दिष्ट साध्य करतील, अशी पुस्तके लिहिण्याचा मार्ग दिव्य यांनी चोखाळला आणि वाटचाल सुरू झाली.

टर्म्स अँड कंडिशन अप्लाय - कव्हर पेज
टर्म्स अँड कंडिशन अप्लाय - कव्हर पेज

आयआयटी प्रशिक्षण ते नाट्यलेखन

दिव्य प्रकाश यांचे शालेय शिक्षण हिंदीतून झाले. बारावीत केवळ यामुळे मोजलेली जास्तीची फी आजही त्यांच्या स्मरणात आहे. दिव्य आयआयटी प्रशिक्षणासाठी लखनौला गेले तेव्हा, तिथे त्यांच्यासमोर एक वेगळेच विश्व आ वासून होते. गुरुत्वाकर्षण या संकल्पनेचा इंग्रजीतील ‘ग्रॅव्हिटी’ या संकल्पनेपर्यंतचा त्यांचा प्रवास तब्बल वर्षभराचा होता. हे विश्व आपल्याला गिळायलाच बसलेले आहे, याची जाणीव व्हायला त्यांनी फार वेळ घेतला नाही! आपल्याला बीकॉम किंवा बीएस्‌सीही करायचे नाहीये, हेदेखील त्यांनी त्याचवेळी ठरवून टाकले. पित्याची प्रशासकीय सेवेची परंपरा आपणही पुढे चालवावी, हेही ठरवून झाले. हिंदी मुख्य विषय ठरवून टाकला. तयारी सुरू झाली. मुंशी प्रेमचंद, हरिशंकर परसाई, महादेवी वर्मा, केदारनाथ सिंह... अशा साहित्यिकांच्या रचनांचे भंडार पुढ्यात आले. पुस्तकांच्या विश्वातील ते मंतरलेले महिने दिव्य प्रकाश यांना आजही खुणावतात. ‘कुणालाही नावे ठेवू नये’, हा मंत्रही त्यांना याच मंतरलेल्या महिन्यांतून मिळाला.

मंतरलेल्या याच महिन्यांत त्यांनी आचार्य रजनिश (ओशो) आणि स्वामी विवेकानंद यांचीही शंभरांवर पुस्तके वाचली.

पण... शेवटी रुङकीत इंजिनअरिंगलाच प्रवेश घ्यावा लागला. हुश्श... पण अंधारतील ते दिव्य प्रकाश कसले! इथेही त्यांनी स्वत:साठी उजेड शोधलाच. ‘ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर’च्या रहाटगाड्यात रंगमंचाचे छोटे विश्व स्वत:साठी निर्माण केले. ‘प्रगती पे उतारू भारत’ (प्रगतीच्या दिशेने भारत) हे नाटक त्यांनी लिहिले. सोबतच दररोज २५० पाने हे टार्गेट ठरवून वाचनही चाललेलेच असे, हे विशेष! सगळ्या दगदगीत झाली एकदाची बीई, पण नंतर लगेच नोकरी मिळाली नाही म्हणून मग एमबीएच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. पुण्यातील सिम्बॉएसीस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये नंबर लागलाच!

दरम्यानच्या काळात दिव्य प्रकाश यांनी लखनौतील लहानमोठ्या व्यावसायिकांसाठी जाहिरातींचे लेखन केले. स्थानिक हिंदी दैनिकांतून या जाहिराती प्रकाशितही झाल्या, पण दिव्य प्रकाश यांनी हे काम व्यवसाय म्हणून केले नव्हतेच. आपोआपच ते बंद झाले. नाट्यलेखनाचा पुनश्च हरीओम केला. ‘माजी विद्यार्थी’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून बेतलेले ‘आप का यस्टर्डे हमारा टुमॉरो’ हे नाटक रंगमंचावर आले आणि दिव्य प्रकाश तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. अनेक महाविद्यालयांतून या नाटकाचे प्रयोग झाले. पुढे ‘कुबुलनामा’ हा लघुपट लिहिला. प्रस्थापित अभिनेते पियूश मिश्रा यांनी ‘अक्षरी रुपये अकरा’ एवढ्या मानधनावर या लघुपटात काम केले, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

रंगमंचाकडून कादंबरीकडे...

पहिली कादंबरी दिव्य प्रकाश यांनी लिहायला घेतली तेव्हा ज्याच्या हाताखाली पहिली नोकरी केली, तो खडूस बॉस विषय म्हणून का असेना चांगलाच उपयोगात आला. वाचन काहीसे कमीच पसंत असलेला एक भला मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्यात आणि अशा वर्गातून आपला स्वत:चा एक वाचक वर्ग नव्याने निर्माण करण्यात चेतन भगत जसे यशस्वी ठरले, तसे उदाहरण हिंदी साहित्यात अलीकडच्या काळात नव्हतेच... स्वत: दिव्य प्रकाश यांच्या शब्दांत सांगायचे तर "इंग्रजी साहित्यातील काहीतरी कसदार वाचूयात असे ठरवणारा वर्ग जसा चेतन भगत यांनी आपल्याकडे ओढून घेतला तसे चुंबकत्व समकालीन हिंदी साहित्यात नव्हतेच, आणि म्हणूनच बालपणी हिंदी कॉमिक्स आनंदाने वाचणारी मुले तरुण झाली म्हणजे इंग्रजी एके इंग्रजीच वाचायला घेतात. हिंदीत वाचायला तसे काही नसतेच, असे या मंडळीला हमखास वाटते." राष्ट्रभाषेतील ही पोकळी दिव्य प्रकाश यांनी भरून काढली.

टर्म्स अँड कंडिशन ऍप्लाय-कव्हर

दिव्य प्रकाश यांच्यासाठी या पहिल्यावहिल्या पुस्तकाला प्रकाशक शोधणे म्हणजे एक दिव्यच ठरले. एका प्रकाशकाने तर थेट या शब्दांत सांगितले, की तीनशेपर्यंत प्रती छापू आणि काही संस्था तसेच वाचनालयांना पाठवू,जे काही पैसे मिळतील ते आपले.

दहा हजार प्रती छापण्याची तयारी प्रकाशकाने दर्शवली, पण मग पुस्तक विकत घेऊन वाचणारे मिळतीलच, याची काही खात्री नाही, असेही त्याने सांगून टाकले. दिव्य प्रकाश यांना आपलेच पुस्तक आपणच प्रकाशित करावे, हे पटेना. शिवाय एवढी पदरमोड करूनही प्रकाशनाशी संबंधित अनेक लहानमोठ्या अडचणी असतातच. दर्जेदार छपाईही काही तोंडाचा खेळ नाही.

वाळवंटात पाण्यासाठी भटकावे तसे दिव्य प्रकाश एका चांगल्या प्रकाशकाच्या शोधात होते आणि मरुस्थलात शुभ्रशीतल तळे आढळावे, तशी शैलेश यांची भेट घडली. शैलेश म्हणजे हिंदी साहित्य सृजनातील प्रतिभावंत नवोदितांसाठीची एक संजीवनीच. शैलेश लेखकांचे ब्लॉग आवर्जून फॉलो करतात. साहित्य संमेलनांतून लेखकांना भेटतात. नवोदितांच्या साहित्यकृती प्रकाशित करण्यात मदत करतात. शैलेश यांनी दिव्य प्रकाश यांना हिंमत दिली.

‘मार्केटिंग टेक्निक’चे महत्त्व

इंग्रजी दैनिकांतून पुस्तक परीक्षणे आवर्जून छापली जातात, पण हिंदी दैनिकांत तशी पद्धत नाही. दिव्य यांना हा एक मोठा अडथळा होता. हिंदी दैनिकांतून प्रसिद्धीची सोय झाली नाही, मग यू ट्यूबचा मार्ग चोखाळला. मार्ग चपखल ठरला. (काही प्रमोशनल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता)

दिव्य यांच्याच मास्टरस्ट्रोक एंटरटेन्मेंट या कंपनीने हे व्हिडिओ तयार केलेले आहेत. कंपनीच्या माध्यमातून दिव्य यांनी काही लघुपटही बनवले होतेच. उदाहरणार्थ ‘छोटे से पंख’, ‘इट्‌स रिंगिंग.’ ‘‘साधेसरळ स्वाभाविक कथानक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील हौशी मंडळी हे लघुपट लोकप्रिय होण्याचे कारण ठरली’’,असे स्वत: दिव्य प्रकाश सांगतात.

चित्रपटांसाठी कथानक लिहिण्याचा विषय डोक्यात घोळतो, पण दिव्य यांना वाटते की अजून त्याला अवकाश आहे. टीव्ही मालिका लिहायच्याच नाहीत, हे तर त्यांनी ठरवून टाकलेले आहे. लेखनाच्या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना ते सांगतात, की आधी खूप वाचा. आणि ज्या-ज्या विषयांचा, पार्श्वभूमीचा अनुभव स्वत: घेतलेला आहे, ते आधी लिहा. जे जग जवळून पाहिले आहे, ते पानांवर उतरावा.

कागदावर उतरवले, तर आपोआपच वाचकही या जगाच्या सहज जवळ येतो.

हिंदीतील निखिल सचान आणि इतर लेखकांचे कौतुक दिव्य मनापासून करतात. ते म्हणतात, ‘‘विविध क्षेत्रांतून आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींनी हिंदीतून लिहिते व्हायला हवे. अन्यथा या भाषेशी आपली नाळ तुटेल. आणि लिहायचे ठरवलेच तर आपल्याच भोवतालातल्या विषयांबद्दल ओढ अधिक असायला हवी. उदाहरणार्थ आपल्या आसपास घडणार्‍या घटना, प्रकरणे’’

स्वत: लिहिलेल्या पुस्तकांचे मार्केटिंग वा प्रमोशन स्वत: करणे म्हणजे कमीपणाचे अशी हिंदी लेखकांची मानसिकता. या मानसिकेतेची टर्र उडवायला दिव्य प्रकाश मागेपुढे पाहात नाहीत. ते म्हणतात, ‘‘स्वत: आणि स्वत:च्या पुस्तकाच्या मार्केटिंगसाठी चाललेल्या क्रियाकलापांमध्ये हे लेखकराव भारत आणि पाकिस्तानप्रमाणे अंतर राखून असतात. आणि याची झळ एकुणात वाचन संस्कृतीला बसते. पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचत नाही.’’ पुस्तक हे सुद्धा शेवटी एक उत्पादन आहे आणि प्रत्येक उत्पादनाला मार्केटिंगची गरज असतेच, यावर दिव्य प्रकाश ठाम आहेत.

तुम्हाला काही समजून घ्यायचे असेल तर लेखन म्हणजे काय हे माहित करून घेणे आहे, अशी सृजनाची साधीसरळ व्याख्या दिव्य करतात. त्यांचे येऊ घातलेले पुस्तक हे होऊ घातलेल्या नागरिकांवर बेतलेले आहे. म्हणजे मुलांवर. पाच कथा त्यात असतील. आपण त्यासाठी दिव्य प्रकाश उपाख्य ‘डीपी’ यांना खूपखूप शुभेच्छा देऊयात...