विविध सामाजिक संदेश देणारी भगवान मामाची बोलकी रिक्षा

विविध सामाजिक संदेश देणारी भगवान मामाची बोलकी रिक्षा

Tuesday April 05, 2016,

3 min Read


“दोन वेळेचं जेवण, आसऱ्याला घर यापुढे माणसाला अधिक काय हवं असतं ? नको तेवढी माया जमवून मोठमोठाले वाढदिवस साजरे करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छांचे अगडबम फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणे. हे बरोबर नाही त्यापेक्षा गरजूंना मदत करा, त्यातून जो आनंद मिळतो तो अन्य कशातूनच मिळत नाही. हव्यास करू नका, साधं आयुष्य जगा, कोणाचे हेवेदावे करू नका” हे वाक्य कुणा ज्ञानी पुरुषाचे किवा कुण्या विचारवंताचे नाही तर एका रिक्षाचालकाचे आहे.

जगातील वेगवान माहितीच्या पसा-यात सर्वसामान्यांना त्यांच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खूप काही पांडित्य असण्याची गरज नाही. एखाद्या ज्ञानवंताप्रमाणेच अगदी रिक्षा चालवण्याच्या कष्टाच्या आणि अशाश्वत धंद्यातील एक सामान्य रिक्षावाला देखील समाजाला शहाणे करण्याच्या प्रयत्नात प्रबोधनाच्या वाटेने जाऊ शकतो. याचे उदाहरण म्हणजे नाशिक शहरातील भगवान मामा आणि त्यांची बोलकी रिक्षा!

image


रिक्षाचालक म्हंटल की, गैरवर्तन करणारा, अवैध प्रवासी वाहतूक करणारा, प्रवाशांशी वाद घालणारा, उद्धट अशी सर्वसाधारण प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. मात्र नाशिकचे भगवान मराठे हे रिक्षाचालक प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबरोबरच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहे. नाशिक येथील पवननगर परिसरातील रहिवासी असलेले भगवान मामा उत्तमनगर ते सीबीएस दरम्यान प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय गेल्या १० ते १२ वर्षांपासून करत आहे.

image


बरीच माणसं असा विचार करतात की आपल्या व्यस्त कामकाजातून समाज कार्य करणं म्हणजे अशक्य गोष्ट... पण भगवान मामाची बोलकी रिक्षा पाहिली की हा गैरसमज कायमचा दूर होतो. त्यांनी आपल्या व्यवसायालाच समाजकार्याचं माध्यम बनवलंय. भगवान मामाची रिक्षा बोलकी आहे... ती यासाठी की ही रिक्षा कायम कुठल्यातरी सामाजिक विषयावर बोलत असते... कधी रस्ते सुरक्षा या विषयावर तर कधी बेटी बचावचा नारा देत, तर कधी शहिदांना श्रद्धांजली देताना तर कधी तरूणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत, भगवान मामाची रिक्षा कायम आपल्या बोलक्या फलकांच्य़ा माध्यमातून बोलत असते. भगवान मामा यांची सामाजिक संदेश लिहिण्याची शैलीही खास आहे. आजपर्यंत अनेकांनी त्यांच्या सामाजिक संदेशांमधून धडा घेत स्वत:ला बदलवण्याचा प्रयत्न केलाय...

त्यांची सामाजिक विषयांवरची मतं अगदी एखाद्या महाविद्यालयीन शिक्षकासारखी प्रगल्भ आहेत. आपल्या भारत देशापुढे उभी असलेली एक भयाण समस्या म्हणजे भ्रूणहत्या यावर ते अगदी पोट तिडकीनं बोलतात आणि आपल्या बोलक्या रिक्षाच्या माध्यमातून कायम समाजाला विचार करायला भाग पाडतात. सीमेवर जवान आणि शेतात किसान आहे म्हणून आपण आज इतकं चांगलं आयुष्य जगतो आहोत हा संदेशही ते आवर्जून तरुणांना देतात.

image


आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची आपल्याला जेव्हा जाणीव होते तेव्हा समाजासाठी काहीतरी विधायक काम नक्की करावं, इतका साधा विचार यामागे मामा करतात. त्यांच्या कामाचं स्वरूप छोटं असलं तरी त्याचा समाजावर होणारा सकारार्थी परिणाम फार मोठा आहे. बोलक्या रिक्षाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली ती त्यांचा मुलगा जेव्हा आजारी पडला तेव्हा मुलाच्या आजारपणात त्यांना कुणीही मदत केली नाही, दारोदार भटकून थकलेल्या भगवान मामांना त्यावेळी एका साध्या मजूराने १००० रूपयांची मदत केली, ती त्यांच्यासाठी लाखमोलाची ठरली आणि तिथूनच त्यांनी ठरवलं ते समाज प्रबोधन करायचं. गोरगरिबांचा आवाज बनायचं. तेव्हापासूनच मामांची रिक्षा बोलायला लागली, समाजप्रबोधनाचे धडे द्यायला लागली.

image


आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्यालाही जाणीव होते की आपण समाजासाठी, गरजूंसाठी, पीडितांसाठी काहीतरी करायला हवं, पण हा विचार प्रत्यक्षात आणणंही तितकंच महत्वाचं आहे. जे भगवान मामांनी करून दाखवलंय. तेव्हा चला तर मग आपणही भगवान मामांच्या बोलक्या रिक्षाचा आदर्श घेऊया आणि आपापल्या परीनं समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करू या...

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

गरजूंच्या उपयोगी पडणारा मुंबईचा ' 'सेवेकरी टॅक्सीवाला' विजय ठाकूर !

गरीबांच्या शिक्षणासाठी लोकल ट्रेनमध्ये ‘दान’ मागणारा प्रोफेसर...

पिल्लं उडून गेलेल्या घरट्यातील एकट्या पाखराला हेमंत सावंत यांचा मायेचा आधार

    Share on
    close