वृद्धांना ‘आभाळमाया’ देणाऱ्या डॉ अपर्णा देशमुख

वृद्धांना ‘आभाळमाया’ देणाऱ्या डॉ अपर्णा देशमुख

Thursday January 14, 2016,

5 min Read

आजकालच्या जगात सर्वच गोष्टींचे व्यावसायिकरण झालेले दिसून येते. याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. रुग्णापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देणाऱ्या डॉक्टर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. डॉ अपर्णा देशमुख यांनी मात्र आपल्या पेशाला साजेसा सेवाभाव जपतानाच सामाजिक जाणीवही कायम राखली आहे.

image


मुळच्या जळगावच्या असलेल्या डॉ अपर्णा वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात आल्या. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर एका वृद्धाश्रमामध्ये काम करत असताना त्यांनी ‘वृद्धाश्रम’ या संकल्पनेचेही व्यावसायिकरण झालेले अनुभवले. उतरत्या वयात कुटुंबापासून दुरावलेल्या आणि वृद्धाश्रमांमध्येही आपुलकीची ऊब अनुभवू न शकणाऱ्या वृद्धांच्या यातना त्यांना हेलावून गेल्या. उतरत्या वयात येणाऱ्या आजारपणांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजण्याची या वृद्धांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती नसेल तर त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे नरकयातना आहेत हे त्यांनी जवळून अनुभवले. यावर तोडगा काढायला पाहिजे या विचारातूनच सेवाभावी वृत्तीने चालणारे वृद्धाश्रम सुरु करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि त्यांनी सुरु केलेल्या 'अर्पण सोशल ऍण्ड वेलफेअर संस्थे'अंतर्गत वृद्धांना ‘आभाळमाया’देणारे घर अस्तित्वात आले.

image


एम.एस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेली कुठलीही २७ वर्षांची मुलगी आपल्या करिअरमध्ये यश मिळविण्याबरोबरच आपल्याला साजेसा जोडीदार मिळविण्याची इच्छा बाळगून असेल. डॉ अपर्णा देशमुख यांनी मात्र एकीकडे आपली प्रॅक्टीस करतानाच दुसरीकडे आपले संपूर्ण आयुष्य वृद्धांच्या सेवेसाठी खर्च करायचे निश्चित केले. या समाजकार्यात कोणतीही बाधा येऊ नये म्हणून त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

“अविवाहित राहून समाजकार्याला वाहून घेण्याच्या निर्णयाला घरच्यांकडून सुरुवातीला थोडा विरोध झाला. मात्र माझे वडिल स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी त्यांच्यामधून माझ्यामध्ये रुजलेल्या सामाजिक जाणीवेला समजून घेतलं. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहून नेटाने हे काम करत असल्याचं पाहून आता घरच्यांचाही मला पूर्ण पाठिंबा आहे,” असं डॉ अपर्णा सांगतात.

image


२०१० साली एका भाड्याच्या जागेत डॉ अपर्णा यांनी ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ सुरु केले. “सुरुवातीला एक-दोन वृद्ध ‘आभाळमाया’मध्ये होते. मी स्वतः त्यांची देखभाल करायचे. हळूहळू ही संख्या वाढली आणि आजघडीला पन्नाशीपासून नव्वदीपर्यंत वय असलेले एकूण ५७ जण ‘आभाळमाया’च्या कुटुंबातील सदस्य आहेत,” डॉ अपर्णा सांगतात. त्या पुढे सांगतात, “जसजशी व्याप्ती वाढत गेली तसतशी कर्मचारी भर्तीही केली. मात्र इथला सर्व खर्च मी स्वतःच्या पैशातून करत असल्यामुळे मला कर्मचाऱ्यांना फार मोठे पगार देणं शक्य होत नाही. त्याशिवाय इथे असलेले अनेक वृद्ध हे अंथरुणाला खिळलेले असतात. तर काहींना मानसिक आजार असतो. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून स्वच्छतेची अपेक्षा आपण करु शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली घाण दररोज साफ करणे, अशा अस्वच्छ वातावरणात राहून मनोभावे त्यांची सेवा करणे यासाठी एक विशेष सेवाभावी मानसिकता असावी लागते. त्यामुळे ‘आभाळमाया’मध्ये कर्मचारी सहसा टिकत नाहीत. जे कर्मचारी माझ्याकडे वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. वृद्धाश्रमातील काही वृद्धही त्यांना जमेल ते काम आपल्या घरातलं काम समजून स्वेच्छेने करतात.”

इतर वृद्धाश्रमांच्या तुलनेत ‘आभाळमाया’मध्ये खूपच कमी रक्कम आकारली जाते. “वृद्धाश्रमाची जागा भाड्याची असल्यामुळे मला अपरिहार्यपणे त्यांच्याकडून पैसे घ्यावे लागतात. अन्यथा त्याची तितकीशी गरज पडली नसती,”असं डॉ अपर्णा सांगतात. केवळ पाच हजार रुपयांमध्ये वृद्धांना इथे सर्व सुविधा पुरविल्या जातात. एखाद्या कुटुंबाला पाच हजार भरणे शक्य नसेल तर त्यांना जेवढी रक्कम शक्य आहे तेवढी रक्कम देण्याची मुभाही दिली जाते. ‘आभाळमाया’मध्ये वृद्धांना मोफत वैद्यकीय उपचार पुरविले जातात. एवढेच नाही तर डॉ अपर्णा येथील रुग्णांवरील शस्त्रक्रियाही मोफत करतात. केवळ ‘आभाळमाया’मधीलच नाही तर इतर वृद्धाश्रमांतील वृद्धांवरही डॉ अपर्णा यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजपर्यंत अशाप्रकारे किमान ४०० मोफत शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

image


“जसजसं लोकांना ‘आभाळमाया’बद्दल समजतं आहे तसतशी इथे येणाऱ्या वृद्धांची संख्या वाढते आहे. मात्र आता मलाही आर्थिक अडचणींमुळे मर्यादा येत आहेत. सरकारने जर माझ्या कामाची दखल घेऊन अन्नधान्य किंवा जागेच्या स्वरुपात मदतीचा हात पुढे केला तर मी अधिक वृद्धांची काळजी घेऊ शकते. सध्या ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु असल्यामुळे त्यावर खूप खर्च होतो. सरकारकडून जागा मिळाली तर खूप मोठी मदत होईल,” असं डॉ अपर्णा सांगतात.

वृद्ध व्यक्तींबाबत समाजाच्या संवेदनशीलतेबद्दल बोलताना त्या सांगतात, “यापूर्वी दोन वेळा वृद्धाश्रमाच्या परिसरातील नागरिकांच्या असंवेदनशीलतेमुळे मला वृद्धाश्रमाची जागा बदलावी लागली आहे. काही लोकांनी तर आमच्याकडे तक्रार केली होती की तुमच्या वृद्धांना बघून आमची मुलं घाबरतात. तर काहींचं म्हणणं होतं तुमचे वृद्ध रात्रभर कण्हत राहतात, कोणीतरी मध्येच ओरडतं, आम्हाला त्रास होतो. या अशा तक्रारी करणाऱ्यांबद्दल काय बोलावं? वृद्ध व्यक्ती परग्रहावरुन आलेले असतात का? ती सुद्धा तुमच्या आमच्यासारखी माणसं असतात. मग त्यांची भिती वाटण्याचं कारण काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जी परिस्थिती त्यांची आहे ती वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अशा लोकांमुळे पुन्हा पुन्हा जागा बदलावी लागू नये म्हणून मी अखेरीस एक स्वतंत्र इमारत ‘आभाळमाया’साठी भाड्याने घेतली. आता ‘आभाळमाया वृद्धाश्रम’ पुण्यामध्ये सिंहगड रोडवर माणिकबागमध्ये आहे.”

image


आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलांबाबत बोलताना त्या सांगतात, “अनेकदा मुलांना जबाबदारी नको असते म्हणून ते आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. मात्र प्रत्येकवेळी कारण हेच असतं असं नाही. बऱ्याच वेळा दोघंही नोकरीला असल्यामुळे अंथरुणाला खिळलेल्या पालकांकडे लक्ष द्यायला कुणी नसतं, दिवसभर नर्स ठेवणं परवडणारं नसतं तर कधी कधी घरातील व्यक्तींनाही पाठदुखी, मणक्याचे आजार यासारखी काही तरी आरोग्याची समस्या असते ज्यामुळे ते स्वतः अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींची काळजी घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे वृद्धाश्रमाची मदत घ्यावी लागते, जिथे त्यांच्या पालकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांना वैद्यकीय सेवाही पुरविली जाते.” त्या पुढे सांगतात, “मी पाहिलं आहे की तरुणांमध्ये वृद्ध व्यक्तींबद्दल संवेदनशीलता अधिक असते. मात्र हीच मुलं पुढे जाऊन आपल्याच आईवडिलांना का सांभाळत नाहीत हे कळत नाही. प्रेमापोटी नाही तर किमान कर्तव्यापोटी तरी त्यांना जपावं. मात्र ज्यांना हे कुठल्याही कारणास्तव जमत नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी केवळ आपल्या संस्कृतीच्या विरोधात म्हणून किंवा लोक काय म्हणतील म्हणून त्या म्हाताऱ्यांचे हाल करत त्यांना घरात ठेवू नये. अशावेळी त्यांनी चांगल्या वृद्धाश्रमांचा पर्याय निवडावा. जेणेकरुन त्या वृद्ध व्यक्तींचे शेवटचे दिवस चांगले जातील.”

image


वृद्ध व्यक्तींबाबत कळकळीने बोलणाऱ्या डॉ अपर्णा यांनी ‘आभाळमाया’ला एका वृद्धाश्रमाचे रुप न देता घरपण देण्याचा प्रयत्न केलाय. इथे साजरा होणारा प्रत्येक सण-वार, वृद्ध व्यक्तींचे बर्थ डे सेलिब्रेशन, त्यांना सहभागी करुन घेऊन परिसरात राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान, त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले गीतरामायणासारखे कार्यक्रम यासारख्या गोष्टी या पिकलेल्या पानांनाही तजेला देतात. वृद्धापकाळातही ते जीवनाचा आनंद अनुभवत आपले उरलेले आयुष्य आपल्या समवयस्कांबरोबर आनंदात जगतात. सोबतीला असते डॉ अपर्णा देशमुख आणि सहकाऱ्यांची ‘आभाळमाया’.

    Share on
    close