माऊली असामान्य बुध्दिमत्तेच्या मुलांची

0

मूल जन्माला येणं हा कुटुंबासाठी आनंदसोहळा असतो. परंतु आपलं बाळ इतरांच्या मुलासाऱखं नसल्याची जाणीव होते. वैद्यकीय उपचारानंतर मूल मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे निदान समोर येतं. एक धक्कादायक वास्तव आणि समाजाची अवहेलना यांचा सामना करताना प्रचंड धीराने सामोरे जावं लागतं. या मुलांकडे समाज कायम वेगळ्याच नजरेने बघत असतो. मात्र तरीही या मुलांकडे जिद्द असते. हीच जिद्द शिरीष पुजारी यांना अस्वस्थ करत होती. विकलांग मुलांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ होईल अशा संस्थेची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षणही घेतलं. बेलापूर येथील शहाबाज गावात १९९० साली अवघ्या तीन मुलांना घेऊन त्यांनी स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. स्वच्छता आणि पाणी या प्रश्नांमुळे हे वर्ग सेक्टर एक इथल्या शिशु संगोपन केंद्रात हलविण्यात आले. अथार्त ही वाटचाल तेवढी सोपी नव्हती, या मुलांसाठी काहीतरी भरीव काम करण्याच्या इच्छेतूनच बेलापूर सेक्टर आठ इथं संस्थेने स्वतःच्या मालकीची जागा घेतली. आज या जागेवर नव: शांती या नावाने वास्तू उभी आहे. आज या शाळेत जवळपास दोनशेहून अधिक विद्यार्थी आहेत. उरण येथील केगावमध्येही शाळा सुरू करण्यात आली आहे.


तीनवर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना या शाळांमध्ये शिकवले जाते. सामान्य मुलांच्या बुध्दीमत्तेप्रमाणे या मुलांच्या बुध्दिमत्तेत वाढ होत नाही. घराच्या चार भिंतीत यांचं अाय़ुष्य कोमेजून जाते. अठरा वषापर्यंतच या मुलांना शाळेत शिकता येतं. त्यानंतर पुन्हा निराशेच्या गर्तेत ही मुलं ढकलली जातात. त्यामुळे शेल्टर वर्क शॉप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शिरीषताई सांगतात. अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. देणगी स्वरूपात मिळणाऱ्या निधितूनच या मुलांचे संगोपन केले जाते. विद्यार्थ्यांचा खर्च देणगी स्वरूपातून केला जातो. शाळेचा गणवेश आणि साहित्य मोफत दिले जाते. मुलांनी केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळावे या हेतूने दर वर्षी एक प्रदर्शन भरविले जाते. विक्रीसाठी मांडलेल्या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

एशिया पॅसेफिक गेम्समध्ये संस्थेतल्या चार मुलांनी सुवणर्पदक आणि वर्ल्ड गेममध्ये एक सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलं आहे. संस्थेतील मुलं जेव्हा असे पुरस्कार मिळवतात तेव्हा आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. या मुलांबरोबरच प्रत्येक मुलाने आपल्या अंगी असलेले गुण दाखवावे अशी भावना शिरीषताई व्यक्त करतात. त्या म्हणतात समाजापासून वेगळे पण समाजाच एक भाग असलेल्या या मुलांना सहानुभूतीची नव्हे तर प्रेमाची, मायेची गरज असते. आणि असे काम करणाऱ्या संस्थांना समाजाच्या भक्कम पाठिंब्याची गरज असते.