झाशीच्या राणीचा वारसा सांगणारी महाराष्ट्राची लेक

झाशीच्या राणीचा वारसा सांगणारी महाराष्ट्राची लेक

Tuesday August 15, 2017,

2 min Read

काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहिद झालेले कर्नल संतोष महाडीक यांच्या वीर पत्नी स्वाती या आता पतीच्या निधनानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून देशाच्या शत्रूंशी लढण्यास सज्ज झाल्या आहेत.


image


मागील वर्षी कुपवाडा मध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहिद झालेल्या शहिद कर्नल संतोष महाडीक यांच्या वीर पत्नी स्वाती या महाराष्ट्र कन्येने झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि राजमाता ताराराणी किंवा अहिल्याबाई होळकर यांचा वारसा पुढे चालवत पतीच्या निधनानंतर त्यांचेच कार्य पुढे चालविण्याची परंपरा आज एकविसाव्या शतकात देखील कायम राखली आहे. पतीच्या निधना नंतर शहिदांच्या विधवा म्हणून आसवे ढाळणे अमान्य करून या विरांगनेने आता पतीच्या पावलावर पाऊल टाकून सैन्य दलात प्रशिक्षण घेतले आहे आणि त्या आता शत्रूशी लढण्यास सज्ज झाल्या आहेत. पतीच्या अंत्य संस्काराच्या वेळीच त्यांनी जो निर्धार व्यक्त केला त्यानुसार आता त्या सैन्य दलात भर्ती झाल्या आहेत. त्यांनी लष्कराकडे नोकरी न मागता अभ्यास करून एसएसबी परिक्षा उत्तिर्ण झाल्या, त्या नंतरच्या भर्तीच्या नियमांनुसार सा-या फे-या पूर्ण केल्या. मात्र त्यांच्या या निर्धाराच्या आड त्यांचे वय येत होते, मात्र भारतीय संरक्षण विभागाने यासाठी त्यांना विशेष सवलत दिली आणि त्यांचा देशाच्या सेवेचा मार्ग मोकळा झाला.

स्वाती यांना देशाची सेवा करता यावी यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी त्यांना वयात सुट मिळावी म्हणून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर याना विनंती केली आणि स्वाती यांनी एसएसबी परिक्षा उत्तिर्ण केली, आता त्या चेन्नईत ऑफिसर्स प्रशिक्षण अकादमीत शिक्षण घेत आहेत. स्वाती यांना १२ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी दोघांनाही बोर्डीग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे, जेणे करून त्यांना प्रशिक्षण पूर्ण करता यावे.

स्वाती म्हणतात की, “पतीच्या निधना नंतर मी दु:खाच्या धक्क्यात होते, त्यातून सावरताना मी स्वत:ला पूर्वीपेक्षा जास्त कठोर अनुभवले. असे वाटले की माझे पती ज्या कार्यात शहीद झाले ते कार्य आता मला पूर्ण केले पाहीजे.मुले आता लहान आहेत मात्र त्यांनी देखील सैन्य दलात यावे तर मला आनंद होईल.”


image


शहीद कर्नल संतोष यांचे भाऊ जयवंत घोरपडे दुधाचा व्यवसाय करतात, त्यांनी सांगितले की भावाच्या निधना नंतर स्वाती पुण्यात गेल्या आणि त्यांनी तेथे एसएसबीच्या परिक्षेची तयारी सुरू केली. त्यांच्या इच्छेच्या सन्मानासाठी मुलांना आमच्याकडे ठेवून घेतले. त्या नंतर मुलीला देहरादूनला तर मुलाला पाचगणीला प्रवेश मिळवून दिला” स्वाती एमए पर्यंत शिकल्या आहेत, आणि त्या केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होत्या मात्र सैन्य दलात भर्ती होताना त्यांना ही नोकरी देखील सोडावी लागली.